संतोष मासोळे
ज्वारी हे महाराष्ट्राची ओळख असलेले पीक. नगर, सोलापूर आणि मराठवाड्यातील मोठा प्रदेश या ज्वारी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या ज्वारी पिकाच्याच समूह शेतीचा एक यशस्वी प्रयोग धुळे जिल्ह्यात तापी नदीच्या काठावर बहरास आला आहे. याच प्रयोगाविषयी…
करोनाकाळात अधिकाधिक सकस आणि पचनाला हलका असलेला आहार घेण्याचा सल्ला वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ देतात. यामुळे अनेकांच्या ताटातील पोळीची जागा आता ज्वारीच्या भाकरीने घेतली आहे. वास्तविक ज्वारी हे पीक राज्यात प्रामुख्याने नगर, सोलापूर आणि मराठवाड्यात घेतले जाते. मात्र अलीकडे खान्देशातही म्हणजे उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्वारीचे पीक डोलणारी शेती दिसू लागली आहे. धुळे जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावरील शेतांमध्ये घेतली जाणारी ज्वारी बहुतेकांच्या पसंतीची आहे. अनेकजण या भागातील ज्वारी खरेदीसाठी इच्छुक असतात. पण ज्वारी खरेदीच्या वेळी त्यांची दिशाभूल होते. यामुळे दरवर्षी ठरावीक कुटुंब ज्वारी अर्थात ‘दादर’ खरेदी करताना तापी काठचीच आहे का, हा प्रश्न आवर्जून करतात. यंदा मात्र खान्देशवासीयांसह राज्यातील प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातही धुळे जिल्ह्यातील तापी काठच्या शेतातली ज्वारी म्हणजे दादर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न समूह शेती प्रयोगातून झाला आहे. अर्थात यास जोड मिळाली आहे ती ‘पिकेल ते विकेल’ या संकल्पनेवर आधारित शासकीय योजनेची.
सामान्य शेत जमिनीवर घेतले जाणारे हे पीक अधिकाधिक यावे, सकस, गोड आणि आकर्षक पांढऱ्याशुभ्र दाण्याचे असावे, असा शेतकरी आणि ग्राहक असा दोघांचाही मानस असतो. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील तापी नदी काठच्या जवळपास ५०० एकर शेती क्षेत्रावर ज्वारी लागवड करण्याचा निर्णय घेतला. शिंदखेडा तालुक्यात रब्बी हंगामात घेतले जाणार ज्वारी हे मुख्य पीक आहे. यामुळे चार हजार ६०० हेक्टर क्षेत्र रब्बी ज्वारीच्या पिकाखाली आले आहे. या भागात रब्बी ज्वारीची पेरणी गोकुळअष्टमी ते दसऱ्यापर्यंत उपलब्ध असलेल्या ओलाव्यावर होते. यासाठी यापूर्वी शेतकरी प्राधान्याने आपले घरचे बियाणे कुठलीही प्रक्रिया न करताच वापरायचे. परंतु ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत ज्वारीची लागवड करताना या पारंपरिक पद्धतीला फाटा देण्यात आला. घरचे बियाणे वापरण्याऐवजी शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले ‘फुले रेवती’ वाणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. बीज प्रक्रियेचे तयार साहित्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. फुले रेवती वाणाचे बियाणे एका गोणपाटावर किंवा मोठ्या कागदावर पसरवून ठेवायचे आणि त्यावर मिळालेले औषधी द्रव्य शिंपडायचे. गुळाचे पाणी हलक्या हाताने मिसळून बियाणे साधारणपणे १० मिनिटे सावलीत वाळायला ठेवायचे. यानंतर हे बियाणे पेरणीसाठी वापरायचे, अशी पेरणीपर्यंतची पद्धत सांगण्यात आली आहे.
हीच पद्धत वापरून या भागातील ५०० शेतकऱ्यांच्या समूहाने ५०० एकर क्षेत्रावर केलेली ज्वारीची लागवड पंचक्रोशीत पारंपरिक शेतकऱ्यांना आता खुणावत आहे. डौलदार पिकांवर झुमकेदार कणीस आणि पांढरेशुभ्र चकाकी असलेले दाणे हे या पिकाचे आकर्षण ठरले आहे. बीज प्रक्रिया केलेले बियाणे वापरल्यामुळे रासायनिक औषधांच्या वापराची गरज पडत नाही. आता या प्रकल्पाने खऱ्या अर्थाने जोम धरला आहे. रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत शिंदखेडा तालुक्यातील पढावद, बेटावद, कमखेडा आणि मुडावद या प्रत्येक गावातील १२५ असे चारही गावांमधून ५०० शेतकरी या प्रकल्पात सहभागी झाले आहेत.
जैविक बीज प्रक्रिया केलेली आणि अधिकाधिक सेंद्रिय साधनांचा वापर केलेली दर्जेदार हेक्टरी ४५ क्विंटल ज्वारी अर्थात दादरची उगवण होईल, असा दावा केला जातो. शेतात दिसणाऱ्या डौलदार पिकामुळे आणि भरदार कणसांमुळे त्यास पुष्टी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी आत्मा अंतर्गत तीन लाखाचे अनुदान सहाय्य असून बियाणे चार किलो व लिक्विड कॉन्सरसिया (अँझाटोबँक्टर व पीएसबी जीवाणू संघ) २५० मिली प्रति लाभार्थी देण्यात आली. याशिवाय शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर हा पीक वाढीचा कालावधी आहे. उत्पादित झालेली ज्वारी प्रत्येकी पाच, १०, २५ आणि ५० किलोप्रमाणे विक्री केली जाईल. विक्री व्यवस्थापनाची जबाबदारी शेतकरी, कृषी विभाग व आत्मा तसेच पुण्यातील एका कंपनीने घेतली आहे. धुळे शहरात दादर अर्थात ज्वारी महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.
‘विकेल ते पिकेल’
* बाजार मागणी विचारात घेऊन पीक उत्पादनाचे नियोजन
* भौगोलिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण पिकाची बाजारपेठेत ओळख
* शेतकऱ्यांना खरेदीदार व प्रक्रिया प्रकल्पाशी थेट जोडणे
* रब्बी ज्वारी पिकाची मूल्य साखळी विकसित करणे
* भविष्यात उत्पादित रब्बी ज्वारीचा ‘ब्रँड’ तयार करणे
फुले रेवती वाण
* भारी जमिनीसाठी उत्तम
* पांढरे मोत्यासारखे दाणे
* पीक कालावधी ११० ते १२० दिवस
* भाकरीची उत्कृष्ट चव
* कडबा पौष्टिक व अधिक पाचक
* उत्पादन – हेक्टरी ३० क्विंटल
(कडबा – हेक्टरी ९० क्विंटल)
* प्रकल्पात समाविष्ट क्लस्टर – चार
* समाविष्ट गावे – चार
* प्रकल्पात समाविष्ट क्षेत्र – २०० हेक्टर
* समाविष्ट शेतकरी संख्या – ५००
नफ्या तोट्याचे अपेक्षित गणित
* प्रति हेक्टरी उत्पादन – २५ क्विंटल
* बाजारभाव रुपये – ३५०० रुपये क्विंटल
* एकूण उत्पादन – ५००० क्विंटल