दिगंबर शिंदे
रब्बी ज्वारीचे उत्पादन वाढीसाठी राज्य शासनाने यंदा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात १० हजार हेक्टरवर शाळू उत्पादन वाढीचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान संशोधित केले असून याद्वारे हेक्टरी ८० क्विंटलचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील जत, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, बार्शी या तालुक्यांना ज्वारीचे कोठार म्हणून परंपरेने ओळखले जाते. खरीप हंगामातील बेभरवशाचा पाऊस असला तरी परतीचा मान्सून बऱ्यापैकी होत असतो. जमीन काळी करलाट असल्याने या भागात रब्बी ज्वारीचे म्हणजेच शाळूचे पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते. नैसर्गिक स्थिती अनुकूल असल्याने या वर्षी जत तालुक्यात १० हजार हेक्टरवर शाळू उत्पादन वाढीचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान संशोधित केले असून याद्वारे हेक्टरी ८० क्विंटलचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कृष्णा, वारणा या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील पश्चिम भागात प्रामुख्याने पावसाचे प्रमाण जास्त आहे. पश्चिमेकडील शिराळा तालुका तर मिनी कोकण अशी ओळखला जातो. या भागात वार्षिक पर्जन्यमान ९०० मिलीमीटरपेक्षा अधिक आहे. नदीचे बारमाही पाणी असल्याने या भागात अलिकडच्या काळात उसाची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जात असली, तरी या भागातील मुख्य पीक भात आहे.
या उलट जत तालुक्याची ओळख प्रामुख्याने दुष्काळी भाग म्हणूनच केली जाते. म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी अद्याप सर्वदूर पोहोचलेले नसल्याने आजही या भागातील बहुतांशी शेती पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. या भागात मान्सून हंगामातील पश्चिमेकडील अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याने येणारा पाऊस सह्याद्रीच्या डोंगररांगावर अडवला जात असल्याने मान्सून सुरू झाला तरी केवळ ढगाळ हवाच पाहण्यास मिळते. मात्र, उत्तरा, हस्त नक्षत्रामध्ये पूर्वेकडील वाऱ्याने येणाऱ्या परतीचा पाऊस समाधानकारक पडतो. या भागात प्रामुख्याने काळी, करलाट जमीन असून या जमिनीमध्ये दहा फुटांपासून वीस फुटांपर्यंत काळी माती आढळून येते. यामुळे परतीच्या दमदार पावसाने एकदा जमीन चांगली भिजली की त्या ओलीवर तीन महिन्याचे शाळू पीक जोमदारपणे येते. हीच नैसर्गिक स्थिती ज्वारीचे कोठार ठरलेल्या या भागाला अनुकूल मानली जाते. या वर्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून उत्पादक वाढीसाठी योजना आखण्यात आली आहे. या योजनेमध्ये जत तालुक्यातील २५ हजार एकर म्हणजे १० हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक बियाणे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पुरविण्यात येत आहे. पेरणी करत असताना पारंपरिक पद्धतीऐवजी याद्वारे कशी करायची, दोन ओळीतील अंतर किती ठेवायचे, बीजप्रक्रिया कशी करायची खते किती व कोणती द्यायची, कोळपणी का आवश्यक आहे, किती करायची, पाण्याची उपलब्धता असेल तर किती व कोणत्या वेळी पाणी द्यायचे याची माहिती शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून देण्यात येत आहेत.
शाळू पेरणीचा हंगाम हस्त नक्षत्र समाप्तीचा म्हणजेच प्रामुख्याने ऑक्टोबर मध्यापर्यंत योग्य समजला जातो. या पूर्वी पेरणी केली तर खोडमाशीचा उपद्रव अधिक प्रमाणात होतो. जमिनीची खोली ३० सेमीपर्यंत असलेल्या हलक्या जमिनीसाठी फुले यशोमती, फुले अनुराधा, फुले माउली या जातीची निवड करावी, तर ६० सेंटीमीटर खोलीच्या मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा, फुले चित्रा, फुले माउल, परभणी मोती, मालदांडी ३५-१ या जातीची निवड करावी, तर ६० सेंटीमीटरपेक्षा अधिक खोलीच्या म्हणजे भारी जमिनीसाठी फुले वसुधा, फुले यशोदा, सीएसव्ही-२२, पीकेव्ही-क्रांती, परभणी मोती, या जातीचा वापर लाभदायी ठरतो.
एकरी चार किलो बियाणे हे प्रमाण योग्य असून पेरणीसाठी दुहेरी चाडय़ाचा वापर करणे आवश्यक आहे. एका चाडय़ाद्वारे बियाणे तर दुसऱ्या चाडय़ातून खत सोडता येते. दोन ओळीतील अंतर ४५ सेंटिमीटर व दोन रोपांतील अंतर १५ सेंटिमीटर ठेवावे. यामुळे एकरी ५९ हजार २५९ एवढी रोपसंख्या मिळते. एका कणसाचे १५० ग्रॅम वजन मिळाले तर एकरी उत्पादन ८ क्विंटलपर्यंत मिळू शकते.
पेरणीपूर्वी काणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुरशीनाशक गंधक तीन ग्रॅम प्रतिकिलो चोळावे. तर खोडमाशी नियंत्रणासाठी थायोमिथोयझाम ३० टक्के एफ.एस. १० मिली प्रति किलो चोळावे. पेरणीपूर्वी अर्धा तास अगोदर अॅझोटोबॅयटर २५ ग्रॅम व पीएसबी २५ ग्रॅम एक किलो बियाणे या प्रमाणात चोळावे.
उत्पादन वाढीसाठी मशागतीच्या अंतिम कुळवाची पाळी मारण्यापूर्वी एकरी चार टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. तर पेरणीवेळी ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद प्रति हेक्टर म्हणजेच अडीच एकरासाठी द्यावे. म्हणजेच ७८ किलो डीएपी व ५३ किलो युरियाचा वापर करावा. पेरणीनंतर ३५ दिवसांनी २ मिली प्रति एक लिटर पाण्यात मिसळून नॅनो युरियाची फवारणी करावी.
पहिले पाणी पेरणीनंतर ३० दिवसांनी, दुसरे पाणी ६५ ते ७० दिवसांनी आणि तिसरे व अंतिम पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत म्हणजे ८५ ते ९० दिवसांनी देणे लाभदायी ठरते. जर सिंचनाची व्यवस्था नसेल तर जिरायत रानामध्ये सरी वरुंबा पद्धतीने पेरणी केली तर पिकाची पाण्याची गरज भागू शकते. सरी वरूंब्यामधील अंतर साडेसहा फूट ठेवले तर चार फणाच्या चाडय़ांनी पेरणी होउ शकते. रुंद सरी वरुंब्यामुळे जर अतिपाऊस झाला तर पाणी निचरा होण्यास मदत होते. जमिनीत ओलावा टिकविण्यासाठीही या वरुंब्याचा उपयोग होऊ शकतो. यासाठी पेरणी यंत्राला दोन्ही बाजूंनी सरी यंत्र बसवावे. यामुळे पेरणी केलेले रान गादी वाफ्यासारखे तयार होते. हवा खेळती राहण्यास मदत होते, सर्व रोपांना आवश्यक सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात मिळतो. यामुळे उत्पादकता २५ टक्क्यांनी वाढते.
जिल्ह्यात यंदा १ लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर शाळूची पेरणी अपेक्षित आहे. या पिकाची उत्पादकता कमी असून उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने नवीन तंत्र विकसित केले असून या तंत्राचा वापर करून जत व कवठेमहांकाळ ताक्क्ययामध्ये १० हजार हेक्टर क्षेत्रावर उत्पादन वाढीसाठी प्रायोगिक तत्त्वावर अभियान हाती घेण्यात आले आहे. अग्रण धुळगावचा मका हब म्हणून विकास झाल्यानंतर ज्वारी उत्पादन वाढीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. – मनोजकुमार वेताळ, सहायक कृषी अधीक्षक, सांगली.
जत तालुका प्रामुख्याने कोरडवाहू म्हणूनच ओळखला जातो. खरिपाचा पाऊस झाला तर बाजरी, मटकी यासारखी पिके घेतली जातात. अन्यथा परतीच्या पावसावर आधारित रब्बी ज्वारीचा पेरा केला जातो. याची उत्पादकता एकरी चार ते पाच क्विंटल आहे. यामध्ये आठ क्विंटलपर्यंत वाढ करण्यासाठी पेरणीबरोबरच, खत नियोजनाची नवीन पद्धत वापरण्यास आम्ही उत्सुक आहोत. – संगाप्पा बंडगर, माडग्याळ. digamber.shinde@expressindia.com