पूर्वी अतिरक्तदाब हा मुख्यत: प्रौढांचा आजार होता पण आता तो तरुण मुलांमध्येही दिसून येत आहे. यातूनच पुढे हृदयविकार, पक्षाघात यांसारखे गंभीर आजार उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळे अतिरक्तदाब हीच आजच्या जागतिक आरोग्य दिनाची मध्यवर्ती कल्पना आहे. त्यानिमित्त विशेष लेख..
अतिरक्तदाब हा आजार चोरपावली येणारा, अचानक झडप घालणारा, घायाळ करणारा आहे. भारतासारख्या अनेक देशांत तिशी-चाळिशीच्या सुमारे १०-२५ टक्के लोकांना अतिरक्तदाब आढळतो आणि त्याचे प्रमाण व व्याप्ती वाढतच आहे. भारतीयांत अंतर्गत चरबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे अतिरक्तदाब व मधुमेहादी आजारांचा धोका जास्त असतो. मधुमेह बहुधा अतिरक्तदाबाला बरोबर आणतो. अतिरक्तदाबग्रस्त व्यक्तींना हृदयविकार, पक्षाघात, दृष्टी अधू होणे, मूत्रिपड निकामी होणे वगरे अनेक गंभीर व खíचक आजार किती तरी जास्त प्रमाणात होतात, अनेक जण दगावतात. महाराष्ट्रातल्या १२ कोटी लोकसंख्येपकी ३०-६० या वष्रे वयोगटात ३० टक्के धरले आणि त्यातल्या फक्त २० टक्के लोकांना अतिरक्तदाब असेल असे धरले तर अंदाजे ७२ लाख लोकांना हा धोका असावा. यापकी निम्मे (३६ लाख) तरी रोगनिदान न होता उपचाराशिवाय असू शकतील. यापकी प्रत्येक जण १० वर्षांत कधीही हृदयविकाराचा बळी होऊ शकतो. कर्त्यां वयात अवेळी मृत्यूचे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. शिवाय साठीनंतर पक्षाघाताचा धोका जास्त वाढतो तो वेगळा. अतिरक्तदाब आपण रोखला किंवा वेळीच उपचाराखाली आणला नाही तर आपले अतिदक्षता विभाग भरलेलेच राहतील. हृदयविकाराचे ३० टक्के रुग्ण आधीच जागीच दगावतात आणि भरती झालेल्यांपकी आणखी सुमारे ३० टक्के दगावतात. उरलेल्यांनाखíचक खाजगी उपचारांना सामोरे जावे लागते. या ७२ लाखांपकी केवळ २ लाख लोकांना ३ लाख प्रत्येकी खर्च करावा लागला असे धरले तरीही वार्षकि उलाढाल ६,००० कोटींच्या घरात जाते.
हृदयविकाराच्या उपचारांमध्ये एन्जिओप्लास्टी आणि बायपास ही दोन प्रमुख तंत्रे आहेत. या दोन्ही तंत्रांनी आजार थांबत नाही, फक्त तात्पुरती पुनजरेडणी होते. अतिरक्तदाब-प्रतिबंधात न लोकांना रस आहे, न शासनाला, न डॉक्टरांना, न वैद्यक विमा कंपन्यांना, असे म्हणायची पाळी आली आहे.
 पूर्वी अतिरक्तदाब हा मुख्यत: प्रौढांचा आजार होता, पण आता तो तरुण मुलांमध्येही दिसून येतो. बिघडलेली जीवनशैली (बठे जीवन, मानसिक ताण, अती खाणे, खाण्यामध्ये पिठूळ आणि स्निग्ध पदार्थाचा अतिरेक, व्यायामाचा अभाव आणि धूम्रपान), वाढते वय आणि अनुवांशिकता ही अतिरक्तदाबाची प्रमुख कारणे आहेत. या घटकांमुळे रक्तवाहिन्यांच्या महाजालामधला प्रवाह अडखळतो आणि हृदयाच्या पंपावरही अतिरिक्त भार येतो. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे अतिरक्तदाब.
रक्तदाबाचे आकडे लिहिण्याची पद्धत वरचा-खालचा अशी आहे. सामान्य रक्तदाब १००-१३९/५०-९० मिमी असतो. यातच १२०-१३९/८०-८९ हा सीमान्त रक्तदाब असे समजतात. अतिरक्तदाब म्हणजे सतत १४०/९० धरून पुढे असलेला. त्यात सहसा दोन्ही आकडे वाढतात. (वय अधिक १०० म्हणजे नॉर्मल रक्तदाब हे सूत्र आता बाद समजावे.) अतिरक्तदाबाचे तीन टप्पे आहेत : प्रथम टप्पा -१४० ते १५९/९० ते ९९, दुसरा टप्पा -१६०-१७९ /१००-१०९, तिसरा टप्पा १८० /११० पुढे. रक्तदाब २३०/१२० च्या पुढे चक्क इमर्जन्सीच असते.
विनाऔषध बरा
 भारतीय फिजिशियन असोसिएशनच्या तज्ज्ञांच्या मते अतिरक्तदाबाच्या पहिल्या टप्प्यात अतिरक्तदाब इतर दुष्परिणाम दिसत नसल्यास औषधे सुरू करण्याच्या आधी जीवनशैलीत बदल करून तीन महिने अतिरक्तदाब कमी करण्याचा प्रयत्न जास्त हितकारक आहे. दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्याचा अतिरक्तदाब असल्यास जीवनशैली बदलाबरोबरच अतिरक्तदाबाची औषधे घेणे अत्यावश्यक आहे. अतिरक्तदाबावर चांगले औषधोपचार उपलब्ध आहेत. बिटाब्लॉकर औषधे ही साठपूर्व वयोगटांमध्ये स्वस्त आणि सुरक्षित आहेत. अर्थात याबद्दलचे निर्णय डॉक्टर साधकबाधक विचार करून घेतील. रक्तदाब महिन्यातून एकदा तपासावा आणि गोळी व पथ्यापथ्य कधीही चुकवू नये. योग्य त्या इतर तपासण्या वेळच्या वेळी करून घ्याव्यात. मूलत: अतिरक्तदाबावरची औषधे हृदयाचा पंप शिथिल करतात किंवा शरीरातल्या रक्तवाहिन्यांचे महाजाल सलावतात. यामुळे शेवटी त्यावर अवलंबून असलेल्या अवयव/उतींमधील रक्तप्रवाह थोडासा घटतोच. (उदा. आपण नळाची तोटी फिरवली तर धार व दाब कमी होईल. यामुळे नळ फुटायचा टळेल. पण पाण्याचा लांबवरचा पुरवठाही कमी होईल.) हा रक्तप्रवाह कमी होण्याचे काही दुष्परिणाम संभवतात. म्हणूनच नसíगकरीत्या रक्तदाब उतरवण्यासाठी वर सांगितलेले सात-आठ उपाय करून पाहावेत. अनेकांनी असे उपाय करून पहिल्या-दुसऱ्या टप्प्यातला अतिरक्तदाब यशस्वीपणे विनाऔषध बरा केलेला आहे, स्वानुभवही आहे. याबद्दल यू-टय़ूबवर काही उद्बोधक चित्रफिती आहेत.
प्रतिबंधच जास्त महत्त्वाचा
 अतिरक्तदाब टाळणे- कमी ठेवणे मुख्यत: आपल्या हातात असते. आपले वजन प्रमाणात ठेवावे, शरीरभार १८-२२ यादरम्यान हवा. पोट सुटले असेल तर इंचा-इंचाने ते कमी करावे. कंबर-नितंब गुणोत्तर पुरुषांसाठी १ पेक्षा कमी आणि स्त्रियांसाठी ०.८५ पेक्षा कमी असावे. यासाठी योग्य आहार, तोही मर्यादित प्रमाणात आणि शारीरिक श्रमांशी निगडित असावा. पालेभाज्या, फळे, िलबू, कांदा आणि लसूण हे हितकारक असतात. पाणी जास्त प्यावे, त्याने मिठाचा निचरा होतो. तेल-तूप, साखर, मिठाई, पिठूळ पदार्थ, मांसाहार आणि मीठ मर्यादित असावेत. जवस, तीळ, तांदूळ-कोंडा, करडई, सूर्यफूल वगरे तेलांचा वापर जास्त चांगला. तंबाखू आणि धूम्रपान हे अत्यंत घातक असते. धूम्रपानाने रक्तवाहिन्या थेट आणि ताबडतोब खराब होतात. अतिमद्यपान वाईटच. पण आठवडय़ातून एक-दोन वेळा अल्प मद्यपान रक्तदाबासाठी हानिकारक नाही. मधुमेहावर लक्ष ठेवावे आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवावा. आठवडय़ातून निदान चार-पाच दिवस दमसांसाचा (अ‍ॅरोबिक) व्यायाम करावा. व्यायामापेक्षा खेळ चांगले. वयानुसार पोहणे, धावणे, टेकडी चढणे, सायकल, दोरीवरच्या उडय़ा, सर्व चेंडूखेळ, खो-खोसारखे वेगवान खेळ, भरपूर चालणे, जलद चालणे हे योग्य व्यायाम आहेत. रोज तास-अर्धा तास तरी अ‍ॅरोबिक व्यायाम करावा. तणावमुक्तीसाठी आसने, बठे खेळ, संथ संगीत, निसर्गभ्रमण, चित्रकला, वाचन, गप्पा-टप्पा, भजन-कीर्तन, चित्रपट आणि सुरक्षित लंगिक अनुभव हे वेगवेगळे मार्ग आहेत. रोज निदान सहा-आठ तास झोप घ्यायला हवी. दुपारची १०-२० मिनिटे झोपही हितकारक होते.
सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्रात ३००० प्राथमिक आरोग्य केंद्रे, ११००० उपकेंद्रे व ४०० ग्रामीण रुग्णालये आहेत, या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रात विशीवरच्या सर्वाचा वर्षांतून एकदा रक्तदाब (आणि रक्तातील साखर) मोजल्यास अतिरक्तदाब संभाव्य रक्तवाहिनी-अपघाताच्या आधीच कळून येईल. सर्व जनरल प्रॅक्टिशनर्सनी आपल्याकडे येणाऱ्या सर्व रुग्णांची शास्त्रीय पद्धतीने वर्षांतून एकदा तरी रक्तदाब तपासणी केली पाहिजे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांतर्फे अतिरक्तदाबावर सामान्य औषधोपचार मिळणे आवश्यक आणि शक्य आहे. यामुळे हृदयविकारांचे प्रमाण निम्म्यावर, तर पक्षाघाताचे प्रमाण पाव हिश्शावर येईल. अतिरक्तदाब मुळात टाळणे हे महत्त्वाचे, त्याखालोखाल लवकर शोधणे आणि समुचित उपचार हे मार्ग आहेत. आपण आणि महाराष्ट्र सरकारचे आरोग्य खाते या महत्त्वाच्या समस्येशी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने भिडणार काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा