श्रीनिवास जोशी
अटलबिहारी वाजपेयी आपल्या सर्वाना पंतप्रधान, राजकारणी, कवी म्हणून परिचयाचे आहेत. त्यांच्याविषयीच्या माझ्या आठवणी मात्र खूप वेगळ्या आहेत. माझे वडील, पं. भीमसेन जोशी आणि अटलजींचे उत्तम ऋणानुबंध होते. त्यामुळे मला आठवतं तेव्हापासून त्यांच्या भेटींचा, गप्पांचा, कलाप्रेमानं झालेल्या दीर्घकाळाच्या ऋणानुबंधाचा साक्षीदार राहिलो. त्यामुळेच माझ्या मनात नेहमीच अटलजींचं स्थान खूपच वेगळं आहे. शांत, साधे, कलावंत आणि कलाप्रेमी अटलजी!
अटलजींनी त्यांच्या भाषणात ‘भीमसेनजी आवडते गायक’ असल्याचं अनेकदा सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या अनेकदा भेटी झाल्या होत्या. मला वाटतं, अटलजींचं कवी असणं हा त्या दोघांना जोडणारा आणखी एक दुवा होता. त्यांच्या अनेक भेटी मला आजही आठवतात. एक म्हणजे संगीतकार सुधीर फडके यांनी गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी भीमसेनजी आणि अटलजींची भेट झाली होती. त्यानंतर सावरकर चित्रपटावेळी सुधीर फडके यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही ते आले होते. जेव्हा जेव्हा अटलजी पुण्यात यायचे, तेव्हा त्यांची आणि भीमसेनजींची भेट ठरलेलीच असायची. दोघे भेटले की खूप गप्पा व्हायच्या. कलाविषयक, संगीतविषयक, साहित्यविषयक.. बरंच काही त्यांच्या गप्पांमध्ये असायचं!
भीमसेनजींच्या पंचाहत्तरीनिमित्त पुण्यात रमणबाग शाळेच्या मैदानावर मोठा सत्काराचा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला अटलजी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. अतिशय उत्तम भाषण त्यांनी त्या कार्यक्रमात केलं होतं. आजही त्यांचे ते भाषण कित्येकांच्या स्मरणात असेल.. त्यांचे संगीतावरचं आणि भीमसेनजींवरचं प्रेम त्यांच्या भाषेत, भाषणातही पुरेपूर उतरले होते. अजून एक आठवण म्हणजे, सवाई गंधर्व स्मारकाच्या उद्घाटनासाठी ते येणार होते. त्यावेळी ते पंतप्रधान होते. मात्र, सरकार डळमळीत होतं. त्यामुळे त्यांनी भीमसेनजींना विचारलं, ‘मला माहीत नाही, मी पंतप्रधान असेन की नाही..’ त्यावर भीमसेनजी म्हणाले, ‘तुम्ही पंतप्रधान असाल किंवा नसाल.. कार्यक्रमाला तुम्हीच आले पाहिजे.’ त्यावेळी अटलजी छान हसले होते. त्यांनी मान्य केल्याप्रमाणे ते आवर्जून आले, उद्घाटनानंतरही बराच वेळ त्यांच्या गप्पा सुरू होत्या.
काहीतरी राजकीय कार्यक्रमासाठी अटलजी पुण्यात आले होते. राजभवनात त्यांचा मुक्काम होता. नेहमीप्रमाणे आम्ही भेटायला गेलो होतो. गप्पा सुरू असताना अटलजी अचानक म्हणाले, ‘पंडितजी, आज गाने का मूड है?’ भीमसेनजींनी होकार दिला. अटलजींनी तानपुरा, हार्मोनियम आदी वाद्यं आणायला सांगितली. लागलीच मैफलीची तयारी सुरू झाली.
आम्ही तोपर्यंत बसून होतो. सगळी तयारी व्हायला जवळपास तासभर गेला. नंतर भीमसेनजींची मैफल सुरू झाली.. काय अप्रतिम मैफल झाली होती ती.. आजही स्मरणात आहे. अटलजीही त्या गाण्यात रंगून गेले होते. त्यावेळी मैफलीत मी तानपुऱ्याची साथ केली होती, थोडं गायलोही होतो.
त्यानंतर एकदा आम्ही दिल्लीला विमानाने जात होतो. त्याच विमानात सुशीलकुमार शिंदेही होते. त्यांनी भीमसेनजींची आस्थेनं चौकशी केली. त्यावेळी अटलजींना भेटणार असल्याचे भीमसेनजींनी त्यांना सांगितलं. लगेचच शिंदे म्हणाले, ‘भेटा भेटा, चांगला माणूस आहे.’ त्यांच्या त्या वाक्याने आम्हीही चकित झालो होतो. मात्र, नंतर विचार केल्यावर लक्षात आलं, विरोधी पक्षातले नेतेही अटलजींविषयी आपुलकीने, चांगले बोलायचे. त्यातूनच अटलजींचं मोठेपण अधोरेखित होतं.सर्वाच्याच मनात अटलजींविषयी आदराची भावना होती. भीमसेनजींना सरकारकडून पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. राष्ट्रपती भवनात कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमालाही अटलजी आवर्जून उपस्थित होते. अशा किती आठवणी सांगाव्यात.. आता भीमसेनजी आणि अटलजी दोघंही आपल्यात नाहीत.. मात्र, त्यांच्या गप्पा आठवतात, त्यांचा स्नेह आठवतो. भीमसेनजींमुळे अटलजींना अनेकदा भेटता आलं, त्यांचा सहवास लाभला, हे माझं सद्भाग्य! अटलजींच्या आठवणींनी आजही मन भरून येतं आणि डोळ्यांसमोर उभं राहतं ते त्याचं ऋजू, शांत व्यक्तिमत्त्व!