दिवंगत चतुरस्र अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे यांच्या आठवणी जागवणारे हे लेख..
एक त्यांच्या जिवलग मित्राचा आणि दुसरा त्यांच्या गुरुपत्नीचा ..

वेडीवाकडी अर्धवट वाढलेली दाढी, डोईवर कुरळ्या केसांचं जंगल, शर्टाची एकही गुंडी न लावता, छाती अख्खी उघडी टाकलेली, तोंडात सिगारेट, नाकपुडय़ा उडवत, भोवती जमलेल्या रुईया-पार्ले टिळक किंवा मिठीभाईच्या तरुण पोरा-पोरींना, ‘आवाज’ लावून, कुठल्या तरी एकांकिकेचं ‘मर्म’ समजावून देणं चाललेलं. छत्तीस वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वरळी ऑफिसमध्ये, अरुण काकतकरच्या रूममध्ये ‘विनय आपटे’चं हे रफ-टफ दर्शन मला प्रथम घडलं.
संध्याकाळी टी.व्ही.वर लाइव्ह कार्यक्रम असायचा. त्याच दिवशी सकाळी मी या टीव्हीवरच्या रूममध्ये पोहोचेपर्यंत ‘संध्याकाळ’चा विषयही ठरलेला नसायचा. त्यातल्या कलावंतांची निश्चिती तर दूरच! ‘अद्याप काय रेकॉर्डिग करायचं हे ठरलेलं नाही.’ या चिंतेत मी त्याच्या रूम कम गप्पाष्टक अड्डय़ावर पोचायचो, तर हा निवांतपणे मॉब एकांकिकांच्या सेटसंदर्भात कुणा तरी महाविद्यालयीन कलावतीशी चर्चा करण्यात दंग असायचा.
नंतर चहा पिता पिता, काय बोलायचं याच्याशी? या संभ्रमात असताना, ‘जब्बार’चा विषय निघाल्यावर माझ्या तोंडून वाक्य जाई की, ‘‘अमराठी मंडळींमध्ये जब्बारच्या ‘घाशीराम’इतकी लोकप्रियता कुठल्याही मराठी नाटकाला मिळाली नसेल..’’ मी हे वाक्य विनयसमोर उच्चारायचा अवकाश.. ‘‘अरे, ‘घाशीराम’च्या वेळी स्पर्धेत आम्ही ‘पहयले’ होतो बरं कां? ‘मॅन विदाऊट श्ॉडो’चा नंबर कितवा? पह्य़ला!’’ ‘पह्य़ला’ शब्द जोर देत उच्चारत, अंगठी घातलेलं मधलं बोट आम्हा पुणेकरांसमोर नाचवणार.
‘फायर’ सॉलिड गाजतोय नाही? असं मी चुकून विनयच्या पुढय़ात पुटपुटण्याचा अवकाश, लगेच ‘कसला बोडक्याचा सॉलिड?’ आम्ही याच विषयावरचं ‘मित्राची गोष्ट’ नाटक केलंय. रोहिणी काम करायची.. असं त्याच्या नाटकाच्या स्टोरीचं एकपात्री कथन सुरू होत असे. तुमच्या शब्दांचा चेंडू भलत्याच दिशेला उडवत, विनयचं नाकपुडय़ा उडवत झुरके मारणं चालू.
गप्पाष्टकातले वाद रंगात आलेले असताना याला संध्याकाळच्या कार्यक्रमाची आठवण होत असे. मग हा वैयक्तिक मैत्रीच्या जोरावर महाराष्ट्रातल्या मुंबईत राहणाऱ्या दोन-तीन मातब्बरांना, ऐन वेळी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फोनवर ‘राजी’ करू शकत असे आणि ‘तुम्ही पाचपर्यंत टीव्ही सेंटरवर पोचा. बाकी आलात की गाडगीळ बोलेल,’ असं माझ्याकडे बघत बोलत, डोळे मिचकावत, फोन ठेवत असे आणि स्वत: सेकंडहँड ‘जावा’ मोटारसायकलला ‘किक’ मारून ‘जावा’चा फडफड आवाज करत टीव्ही सेंटरबाहेर पडलेला असे. त्याच्या त्या जुनाट फटफटीवरची चिकटवलेली एक पट्टी मला अजून आठवते. ‘क्युअर व्हर्जिनिटी’ असे लिहिलेलं आहे.
प्रेक्षक त्याला टीव्हीवर ‘सप्रेम नमस्कार’ची पत्रं विजया जोगळेकर-धुमाळे बरोबर वाचण्यावरून ओळखतात. ‘काकतकर-विनय’ जोडीचे अनेक कार्यक्रम, विनय हा निर्मिती सहायक असूनही, काकतकर कायम ‘निर्मिती’ एवढय़ाच शब्दाखाली दोघांच्या ‘सह्य़ा’ टाकून, विनयच्या निर्मिती कौशल्याला दाद देत असे. पण खरं सांगायचं तर ‘विनय’ हा टीव्ही सुरू होण्याआधीपासून, नाटकातल्या अभिनय-दिग्दर्शनामुळे ‘नाव’ राखून होता. १९७४ मध्ये त्याचं नाव टीव्हीवर दिसू लागले, पण त्यापूर्वीच दोन वर्षे आधी १९७२ मध्ये त्यानंच गप्पात सुनावल्याप्रमाणे ‘घाशीराम’च्या स्पर्धेत, त्याचं आणि बोंद्रेचं ‘मेन विदाऊट श्ॉडोज’ पहिलं येऊन, त्याला अभिनयाचं पारितोषिकही मिळालं होतं.
स्वाती चिटणीस, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, महेश मांजरेकर, अतुल परचुरे यांचा विनय हा अभिनय-दिग्दर्शनातला ‘सर’ होता. ‘पुंडलिक शेट्टीवार’, ‘कुलवृत्तांत’, ‘अपुरी’ अशी काही एकांकिकांची नावंही मला आठवतात. कारण नंतरच्या टप्प्यावर मुंबईत त्याच्या साथीतच मी दूरदर्शनवर झळकत राह्य़लो. अगदी अलीकडे अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’मध्येही शेवटचे एकत्र येत परस्परांना दाद देत टोलेबाजी करत राह्य़लो. त्याच्या अनेक गोष्टी तो वैयक्तिक गप्पांत मनापासून सांगत असे. त्याचा एरवीचा ‘माज’ वाटणारा चेहरा नि आवाज पूर्ण लापता असे. कधी कधी हळवा होऊन रडतसुद्धा असे. आपलं मानणाऱ्यांनी फसवलं की तो अस्वस्थ होत असे.
अगदी आरंभी युवदर्शन, गजरा, आमची पंचविशी, मुखवटे चेहरे, मुलखावेगळी माणसं या माझ्याच कार्यक्रमांच्या उभारणीत साथ करता करता, नाटक चासकरांबरोबर टीव्हीवर आणि बाहेर ‘गणरंग’, ‘भूमिका’बरोबर नंतर गरजेनुसार इतरांबरोबर (दुसरा सामना ते नथुराम) करता करता, तो जाहिरातींना आवाजही देत असे. राजकीय पक्षांची चित्रफीत बनवत असे. नाटय़ परिषद-निर्माता संघाची जबाबदारी घेतल्यानं त्यातही धावाधाव होत असे; पण अलीकडे हिंदी, मराठी चित्रपट मालिकांच्या चित्रीकरणासाठी द्यावा लागणारा वेळ आणि होणारी भटकंती यामुळे त्याचा ताण वाढत चालला होता. कधी तरी वैजू (वैजयंती कुलकर्णी-आपटे) ‘आपण जेवायला जाऊ या, दोघंच!’ असं कळकळीनं म्हणत. त्याला थोडा बाह्य़ जगापासून (मुखवटय़ाच्या दुनियेपासून) दूर नेऊन, खरं रीलॅक्सेशन मिळेल असं बघत असे. अमेरिकेत सेटल झालेल्या मुलाची कर्तृत्वकहाणी किंवा अंधेरीतल्या छोटय़ाच्या बडबडीची ‘लाड कौतुके’ सांगत तो क्वचित मोकळाही होत असे; पण सकाळी उठल्यावर पुन्हा ‘रेस’ सुरू होई.
‘अफलातून’नंतर सईनं मारलेली मिठी, ‘मी प्रभाकर करणार नसेल तर विनयच करेल’ ही राजदत्तची शुभवाणी आणि ‘दुसरा सामना’नंतर पुलंनी गंधर्वच्या मेकअप रूममध्ये खांद्यावर हात ठेवून भरभरून दिलेली ‘दाद’ या गोष्टी विनयला सर्वाधिक आनंद देणाऱ्या वाटत. केशव केळकरांना तो मानत असे. स्वत:ची राजकीय विचारधारा लपवत नसे. ‘धिंगाणा’ नावाचं आणीबाणीविरोधी नाटकही त्यानं खुलेपणी केले होते. ‘नथुराम’चं वादळही त्यानं सहजतेनं झेललं होतं.
नाटक, चित्रपट, जाहिराती, अनुबोधपट या जोडीला ‘कुसुमाग्रजांची कविता’ तो त्याच्या कसबी आवाजात अप्रतिम सादर करत असे. माई-नाना (आई-वडील), नाटक, स्वत:चा आवाज, पिस्तूल आणि शिवाजी राजे हे त्याचे वीक पॉइंट होते.
‘मोह वाटावा असा द्रष्टा नेता’ असं शिवरायांबद्दल म्हणत. शेवटच्या आम्हा दोघांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ टीव्ही कार्यक्रमात त्यानं फोनही शिवाजी राजेंनाच लावला होता.
त्याचा ‘कालनिर्णय’च्या जाहिरातीतला आवाज, गोदरेज-टाटा टी, अंजली किचनच्या जाहिराती, ‘आरस्पानी राजवर्खीचं सादरीकरण, डॅडी आय लव्ह यू’चा पीस, चाळ नावाची वाचाळ वस्ती, आक्रोश, कलियुग, कुसुम मनोहर, रानभूल, नथुराम अशा कशाकशातून तो आठवत राहील.
मला मात्र ‘विनय’ आठवत राहील तो दोन कारणांमुळे! एक म्हणजे ऐन वेळी कार्यक्रम लाइव्ह उभं करण्याच्या सवयीमुळे. ज्यामुळे मला ऐन क्षणी हातात कागद न घेता, सादरीकरण आणि उत्स्फूर्त शब्दांकन जमू लागले.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची दहा वर्षांपूर्वीची ३ एप्रिल २००३ची भेट! पौडच्या बेडेकर राम मंदिरात त्याची आणि वैजू कुलकर्णीची मुलाखत मी घेणार होतो. मंदिराच्या आवारात माझ्या हातातली फाइल बघून म्हणाला, ‘‘काय आहे रे यात?’’
म्हटलं, ‘‘१९७७ ते २००३ पर्यंत दिसलेला- भेटलेला विनय यात नोंदवलाय.’’ ‘अर्धा तासाच्या मुलाखतीसाठी एवढं मटेरिअल काय करायचं?’’ यावर मी गमतीत म्हटलं की, ‘संदर्भ जवळ हवेत, केव्हाही मृत्युलेख लिहिता येतो.’’
यावर त्याच्या स्टाइलमध्ये त्यानं मला विचारलं, ‘‘भडव्या, तुझं वय किती?’’ ‘‘त्रेपन्न.’’ (२००३ साली) मी.
‘‘म्हणजे लेका, तुझाच बायोडेटा दे. तुझ्यावर मृत्युलेख लिहिण्याची संधी मला मिळणार. मी लहान आहे तुझ्यापेक्षा.’’ (तेवढय़ात कर्तृत्वानं अर्थातच मोठ्ठा. शेफारू नकोस.)
आणि दहा वर्षांनी, २०१३च्या शेवटाकडे जात असताना ही माझ्यावर काय वेळ यावी! त्याच्यावरच मृत्युलेख लिहिण्याची?
पण खरं सांगू? विनयला व्हीलचेअरमध्ये बसलेला, तोंडातून शब्द न फुटणारा, अशा अवस्थेत बघवलं नसतं.
आमच्या ‘मित्राची गोष्ट’ संपली.. हे..

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Meet Shravan Adode Railways man who announces in woman’s voice
कॉलेजमध्ये ज्या आवाजावर हसायचे, त्याच आवाजाने दिली रेल्वेत नोकरी! महिलेच्या आवाजात घोषणा करणारा हा तरुण आहे तरी कोण?
Story img Loader