सामाजिक कामासाठी कोणत्या तरी विचारांचा पाईक झाले तरच काम करता येते, असा गरसमज असणाऱ्या काळात डाव्या-उजव्या, सामाजिक, वैचारिक चौकटींच्या फंदात न अडकता औरंगाबादमधील तरुण संतोष गर्जे गेली १२ वष्रे काम करतो आहे. पोरकेपणाची कळ सोसणाऱ्या संतोषला ताईच्या चिमुकल्या मुलीचा चेहरा प्रत्येक अनाथ मुला-मुलीत दिसतो. त्यावर मात करण्यासाठी गेवराई शहरापासून सुरू असणारे सहारा अनाथालयाचे काम आता नावारूपाला येऊ लागले आहे. मात्र, त्यासाठी संतोषला तब्बल एक तप मेहनत घ्यावी लागली.
ऊसतोडीला जाणारे आई-वडील. घरी सहा भावंडे. त्यामुळे दिवाळीच्या सुमारास ते साखर कारखान्यावर गेले की, संतोष गर्जेसाठी त्याची ताईच सर्वस्व. त्याचा सगळा जीव तिच्यावर. तिच्या वडिलांनी चांगल्या घरी लग्न लावून दिले. किमान तिला ऊसतोडीला जाऊ नये, अशी भाऊजींच्या घरची स्थिती. एके दिवशी निरोप आला. तुमची मुलगी आजारी आहे. आई-वडील दोघे मुलीला बघायला गेले. तेव्हा त्यांना ताईचे प्रेत दिसले. त्यांना सांगितले, ताई बाळंतपणात गेली. तिची चिमुकली पोरकी झाली होती. नंतर कळले की, भाऊजींनी ताईच्या पोटात लाथ मारली होती. ताई गेल्याचे वडिलांनी एवढे मनाला लावून घेतले की, त्यांनी घरच सोडले. तेव्हा संतोषला जाणीव झाली पोरकेपणाची. ताईच्या मुलीचे पोरकेपण व वडील परागंदा झाल्यानंतर जाणवलेल्या संवेदनेने संतोषला पुरते ढवळून काढले आणि तेव्हा त्याने निर्णय घेतला, केवळ स्वत:चा नाही तर समाजात पोरकेपणा सहन करणाऱ्याला आधार द्यायचा, त्यांचा आधार बनायचे. आज संतोष सहारा अनाथालयात ४२ मुले सांभाळतो. प्रत्येक गावात ओळखीच्या व्यक्तींना आवर्जून सांगतो, ‘कोणी अनाथ, कोणी पोरका झाला असेल तर सांगा. मी त्याचा सांभाळ करेन.’
तशा या घटना फार जुन्या वगरे नाहीत. २००४ मध्ये संतोषचे झपाटलेपण सुरू झाले. त्याने औरंगाबादमध्ये काही दिवस नोकरी केली, पण अनाथ मुलांसाठी काम करण्याचा विचार काही शांत बसू देत नव्हता. त्याने गेवराईच्या मोंढय़ात काही व्यापाऱ्यांना अनाथ मुलांसाठी काम करणार आहे, मदत करा, असे म्हटले, पण कोणी दारात उभे केले नाही. एका मित्राने सांगितले, अनाथ मुलांसाठी काम करायचे असेल तर जागा लागते. किमान त्यांना ठेवणार कोठे, याची तर सोय कर, असे सांगितले आणि त्यासाठी संतोष गर्जेने अनेकांचे उंबरठे झिजवले. गेवराईतील एका व्यापाऱ्याला गाठून त्याने ७० पत्रे उधारीवर मिळविले. महिनाभराचा वायदा केला पशाचा. तेव्हा कळले की, उधारी करणे हा त्यातल्या त्यात सोपा मार्ग आहे. जसे पत्रे गोळा केले तसे खिळापट्टी, लाकडी बांबूंसाठी उधारी केली. मग जागा बघितली. एका शेतकऱ्याने सांगितले, तसा काही भाग पडूनच आहे, मुलांसाठी काही करत असाल तर उभारा एक निवारा. सगळी भिस्त उधारीवर. निवारा तयार झाला पण मुले कशी येणार आणि २०-२२ वर्षांच्या मुलावर विश्वास कोण ठेवणार? पायात नीट चप्पल नाही, अंगात नीटसे कपडे नाहीत आणि अनाथ मुलांना सांभाळेन, असे म्हणणाऱ्या तरुणाकडे अनाथ मुलांचे नातेवाईक तरी कशी मुले देणार? गेवराई तालुक्यातील केकतपांगरी, पोईतांडा, अंबुनाईकतांडा आणि टाकडगाव या गावांतून मुले मिळाली. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्याने प्रवास केला. फुकट प्रवास करण्याचे नवेच तंत्र या काळात संतोषने विकसित केले. मोटारसायकलवर पुढच्या गावाला जाणाऱ्याला, सोडा की पुढच्या गावापर्यंत असे म्हणायचे. तो जाईल त्या गावी जायचे. ओळखी काढायच्या, अनाथ आणि पोरकी मुले आहेत का, असे विचारायचे. असे करत त्याला सहा मुले मिळाली. मुलांना दर्जेदार साहित्य दिले तरच आणखी मुले अनाथालयात येतील, असे ठरवून मुलांसाठी पहिली उधारी झाली ती गणवेशाची. लहान मुलांना गणवेश, टाय, बूट असे सारे काही देण्यासाठी संतोषने मग जिवाचा आटापिटा केला. जे आपल्याला मिळाले नाही ते सर्व या मुलांना मिळायलाच हवे, असा त्याचा आग्रह असे. त्यातून नव्या उधाऱ्या, नंतर पसे न दिल्याने तोंड लपविणे, व्यापाऱ्यांची बोलणी असे सारे सहन करून संतोषने उभारलेल्या अनाथालयाचा कारभार समाजाच्या भरवशावरच चालतो.
२००४ पासून काम करणाऱ्या संतोषची संस्था पत्र्याच्या निवाऱ्यात चालायची. ना वीज ना पाणी. एकदा एका मुलाला िवचू चावला. दवाखान्यात भरती केले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले, दोन दिवस दाखल करून घ्यावे लागेल. त्यांनी बिल केले २० हजार रुपये. एवढे पसे आणायचे कोठून? संतोषने सावकाराचे दार गाठले. व्याजाने पसे आणले. या प्रकरणानंतर त्याने गावात नवी जागा भाडय़ाने घेण्याचे ठरविले. १ हजार ५०० रुपये भाडे ठरले. ही रक्कम वेळेवर देणे काही त्याला शक्य होत नव्हते. दर महिन्याला मालकाला विनंती करायची. ते घालून-पाडून बोलायचे. एवढी मोठी संस्था आणि भाडे द्यायला पसे नाहीत, तर कशाला चालविता हे? गेवराई शहरातच शिवाजीनगर भागात पुन्हा जागा बघितली. तेथे ६ वष्रे काढली. मात्र शेवटी त्या जागेचे मालक सेवानिवृत्त होणार होते. त्यांना पशाची नड होती. त्यांनी पसे द्या नाही तर जागा रिकामी करा, अशा सूचना दिल्या. शेवटी एके दिवशी रात्री त्यांनी सामानासह मुलांना घराबाहेर काढले. ती रात्र सगळ्यांनी मंदिरात काढली. तेव्हा संतोष गर्जे हा विकास आमटे यांच्या संपर्कात होता. चंद्रपूरला एका शिबिरात त्यांच्या औरंगाबादच्या हरीश जाखेटे यांच्याशी परिचय झाला. त्यांना काम पाहण्यासाठी बोलावले. गेवराईतील सहारा अनाथालय पाहिल्यानंतर त्यांनी गर्जे यास जागा घेऊन देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. हरीश जाखेटे यांनी त्यांचे मित्र सुशील पिपाडा व महेंद्र जाखेटे यांच्याशी संपर्क केला, जागेची पूर्ण किंमत देण्याचे ठरविले. सहारा अनाथालयासाठी तीन एकर जागा मिळाली. या जागेवर इमारत उभी करण्यासाठी संतोषचे प्रयत्न सुरू झाले.
दररोजचे लागणारे धान्य, अगदी पोहे, रवा किंवा डाळ सगळे काही दात्यांकडून मिळवायचे. वैतागून सहारा बंद करू असा विचार संतोषच्या मनात चमकून गेला. मात्र अहमदनगरला एका शिबिरात भेटलेले अविनाश सावजी या व्यक्तीने धीर दिला. मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. २०११ मध्ये आता मुले सांभाळायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा अमरावतीचे डॉ. सावजी यांनी मुंबईतील त्यांचे मित्र रमेशभाई कचोलिया यांना परिस्थिती सांगितली आणि त्यांनी संतोषच्या बँकेत एक लाख रुपयांची मदत पाठवली. अत्यंत अवघड वळणावर आलेल्या या मदतीमुळे पुन्हा हुरूप वाढला. असाच मदतीचा हात मिळाला तो विकास आमटे यांच्यामुळे. औरंगाबादला त्यांनी संस्थेच्या मदतीसाठी म्हणून संगीताचा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला. त्या निधीतून सहारा अनाथालयाची इमारत उभी राहिली. २०१२ मध्ये झालेल्या या कार्यक्रमामुळे साडेतीन हजार स्क्वेअर फुटांवर इमारत उभी राहिली. अशी अनेक माणसं संतोषला मदत करत होती. सतत मुलांसाठी स्वयंपाक करणाऱ्या नंदाताई बांगर यांना कधी त्यांच्या मेहनतीचे पसे देता आले तर कधी नाही. पण आठ वर्षांपासून त्या अनाथालयातील मुलांचा स्वयंपाक करतात. गेवराईतील रखमाजी चौधरी यांचे सहकार्यही मोठे आहे. त्यांनी मुलांसाठी अनेकदा मदतीचा हात पुढे केला. किती तरी हात- काही ओळखीचे तर काही अनोळखी. त्यांच्या मदतीच्या जिवावर ४२ मुलांसह सुरू असणाऱ्या संसारात संतोष गर्जे यांची पत्नीही त्यांना साथ देते आहे. विधि शाखेच्या पदवीधर असणाऱ्या अर्धागिनीच्या साथीमुळे अनेक कठीण प्रसंगांतून ते तरून गेले. अनेक वष्रे मदत मागताना लोक विचारायचे, संस्था नोंदलेली आहे काय? तेव्हा संतोषला कळाले की असे काही असते. संस्था कोठे नोंदवायची, कशी नोंदवायची याची माहिती घेत ते काम पूर्ण करण्यास संतोषला २००७ उजाडले. ‘आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था’ या नावाने नोंदणी होण्यापूर्वी तीन वष्रे तो काम करत होता, पण अनुदान हवे असेल तर त्याचे तीन वष्रे लेखापरीक्षण असायला हवे. ती अट पूर्ण होता होता २०११ साल उजाडले. महिला बालकल्याण विभागाकडे अनुदानासाठी अर्ज केला तर काही मार्ग निघेल असे संतोषला वाटले होते, पण काही उपयोग झाला नाही. गोपीनाथ मुंडे यांनीही सहारा अनाथालयाच्या कार्याचे कौतुक केले. पण सरकारी अनुदानाचा प्रस्ताव अजूनही धूळ खात पडून आहे. अगदी पाण्यापासून ते तेला-मिठापर्यंतच्या या लढाईत संतोषच्या ४२ पोरक्यांना मदत करणे आपले कर्तव्य नाही का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा