नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात माझ्या छोटय़ा मुलीने, सखीने ९८.२० टक्के गुण मिळविले. हे तिच्या स्वअध्ययनाचे फळ. अर्थात शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा त्यात निश्चितच वाटा आहे. वरळी येथील मराठा हायस्कूलची ती विद्यार्थिनी. दोन वर्षांपूर्वी याच शाळेतून माझ्या मोठय़ा मुलीने तन्वीने ९१.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला होता. या शाळेत शिक्षणाचे माध्यम अर्थातच मातृभाषा मराठी होते.
आम्हा सर्व भावंडांचे व आम्हा उभयतांचेही शिक्षण मराठी माध्यमातच झाले. त्यामुळे शैक्षणिक प्रगतीत कुठेही अडथळा आला नाही. मुलींचे शिक्षणाचे माध्यम निवडताना साहजिकच मातृभाषेला प्राधान्य देणे नैसर्गिकच होते. शाळा निवडताना मराठी माध्यम, घरापासूनचे अंतर, उत्कृष्ट शिक्षकवर्ग या निकषात बसणारी वरळी येथील मराठा हायस्कूल ही शाळा निवडली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण जेथे झाले त्या शाळेत म्हणजे मराठा हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी मुलींना दाखल करणे हीच खास गोष्ट होती. या शाळेत पुस्तकी शिक्षणाबरोबरच कलेच्या प्रांतातही कौशल्य दाखवण्याची संधी त्यांना मिळाली. अभ्यासाव्यतिरिक्त वक्तृत्व, अभिनय, नृत्य, गायन, चित्रकला इत्यादी क्षेत्रांतही त्यांना भरारी मारता आली. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाची सुरुवात झाल्यामुळे दोघींचाही पाया भक्कम झाला आणि त्यानंतर यशाची एकेक पायरी चढत असताना विविध स्पर्धा, परीक्षा यांना यशस्वीपणे सामोरे जाण्याचा आत्मविश्वास त्यांच्या अंगी बाणला गेला. माझ्या दोन्ही मुलींच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीमुळे आणि सर्वागीण विकासामुळे मातृभाषेतून घेतलेले शिक्षणच फायदेशीर आहे याची पोचपावती आम्हाला नक्कीच मिळाली.
दीपक काशिराम गुंडये, वरळी, मुंबई</strong>
प्रश्न विचारणारी पिढी घडतेय..
शि क्षण हे मातृभाषेतूनच मिळायला हवे. कारण व्यक्ती विचार मातृभाषेतूनच करत असते. भाषा हे नुसते संवादाचे साधन नसून भावभावना आणि संस्कृतीचीही सुवाहक आहे. मातृभाषा संपन्न असेल तरच इतर भाषा आत्मसात करणे सहज शक्य होऊ शकते. या सर्व विचारांतून आणि संकल्पनेतूनच आमच्या मुलाला, स्पंदनला आम्ही नवीन मराठी शाळा – रमणबाग येथे घातले आहे. आज तो ज्या प्रकारे विचार करतो, आम्हाला अनेक प्रश्न विचारतो यावरून आमचा हा मराठी शाळेत प्रवेश घेण्याचा निर्णय योग्यच असल्याचा अनुभव आम्हाला येत आहे. मराठी माध्यमामुळे अभ्यासाचा ताण कमी असल्या कारणाने इतर अवांतर गोष्टी करण्यासाठी त्याला वेळ मिळतो. मी स्वत: एक गिर्यारोहक असल्यामुळे त्याला मी आतापासूनच माझ्याबरोबर गिर्यारोहणासाठी घेऊन जातो. एक स्वच्छंदी तसेच सामाजिक भान असलेले संवेदनशील जीवन जगण्याचा पाया यानिमित्ताने आम्ही रचत आहोत. मराठीतून शिक्षण देण्यातूनच ‘प्रश्न विचारणारी’ पिढी आपण घडवू शकू, असा विश्वास आणि खात्री आहे.
बाळकृष्ण शिंदे, बिबवेवाडी, पुणे</strong>
खूश आहोत आम्ही..
मा झी कन्या राधा नाशिकला ‘आनंद निकेतन’ या मराठी माध्यमाच्या शाळेत पहिलीत शिकते आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत, राधाला घालण्यामागे आमचे दोन हेतू होते. एक तर नवीन ज्ञान हे मातृभाषेतूनच घेणे सोपे असते, हा सर्वकालीन सत्य सिद्धान्त आहे. दुसरा हेतू आपल्या पाल्याने मराठी भाषेतील समृद्ध साहित्याचे वाचक व्हावे असा होता. उत्तम वाचनाने व्यक्तीची अभिरुची संपन्न तर होतेच शिवाय विकसनशील मनांवर, उत्तम संस्कार घडतात, शब्दसंग्रह वाढतो आणि विचार करण्याची क्षमताही मिळते.
आता राधाच्या शाळेविषयी थोडेसे. आनंद निकेतन ही आपल्या अनेकविध उपक्रमांद्वारे शिक्षणक्षेत्रात स्वत:चे वेगळेपण जपणारी शाळा आहे. ज्या दिवशी शाळेला आम्ही पहिल्यांदा भेट दिली होती, तेव्हा तिथल्या एका ब्रीदवाक्यानेच शाळेची मूलभूत संकल्पना स्पष्ट केली. ते ब्रीदवाक्य आहे ‘आम्ही मूल्यशिक्षणाचा वेगळा तास घेत नाही’. खरोखरच, शाळेतील मुलांना, आपल्या रोजच्या संवाद आणि शिक्षणातूनच, एक उत्तम व्यक्ती, नागरिक बनण्यासाठी आवश्यक अशी मूल्ये अगदी सहजगत्या दिली जातात. राधाची आणि तिच्या शाळेतील लहान-मोठय़ा मित्रवर्गाची, एक उत्तम व्यक्ती घडण्याच्या दिशेने जी वाटचाल सुरू आहे, ती पाहून आम्ही शाळेवर आणि आमच्या निर्णयावर अत्यंत खूश आहोत.
रुपाली व दीपक कुलकर्णी, नाशिक
उत्तम शाळा, सजग पालक हे महत्त्वाचे
माझ्या पहिल्या मुलीचा जन्म झाला आणि साहजिकच मुलीला कोणत्या माध्यमात घालायचे याबद्दल चर्चा सुरू झाली. मी स्वत: मराठी माध्यमातूनच शिकले होते पण आमचे मित्रमैत्रिणी आता इंग्रजी माध्यमातच मुलांना घालत होते. पण माझ्या नवऱ्याने आणि घरातल्या सगळ्यांनीच मुलांना बालमोहन विद्यमंदिरमधेच घालणे कसे इष्ट आहे हे पटवून दिले. मनातून थोडी धाकधूक होती, की माझी मुले इतरांमध्ये बावरतील, मागे पडतील. पण असे काहीही होणार नाही असा नवऱ्याने दिलेला विश्वास आणि त्यांच्या अभ्यासाची त्याने उचललेली जवाबदारी यामुळे मोठय़ा संज्योतचे आणि तिच्यापाठोपाठ आलेल्या सुरभीचे मराठी माध्यमातून शिक्षण सुरु झाले..
मुले मातृभाषेतून शिकतात तेव्हा त्यांच्या विचार करण्याचे आणि व्यक्त होण्याचे माध्यम एकच असल्याने ती अधिक सहजतेने व्यक्त होऊ शकतात असे मला वाटते. अर्थात आम्हाला मिळालेली शाळा ही एक वेगळीच देणगी होती. मराठी वाचनाची हल्लीच्या काळात दुर्मिळ झालेली सवय त्यांना लागली. मराठीतून बोलणे सोपे वाटल्याने शालेय स्तरावरच्या वक्तृत्व स्पर्धा, श्लोकांच्या स्पर्धा या सगळ्यात त्यांनी आवडीने भाग घेतला. अर्थात या बरोबरीने त्यांच्या इंग्रजी व्याकरणावर घेतलेली मेहनत नजरेआड करून चालणार नाही. जगात बाहेर पडल्यावर बोलण्यात किंवा लिहिण्यात त्या कुठेही कमी पडल्या नाहीत.
उत्तम शाळा, दर्जेदार शिक्षक मिळणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पालकांनी सजग असणे या गोष्टी असतील, तर शिक्षणाचे माध्यम मराठी असले तरी काहीच फरक पडत नाही.
नीलिमा माधव देशमुख, दादर ,मुंबई
लोकसंवाद
आपला मुलगा वा कन्या सध्या मराठी माध्यमातून शिकत असेल, तर.. आपणास आपल्या पाल्यांना मराठी शाळेत का घालावेसे वाटले, त्या शाळेचा अनुभव कसा आहे, हे आम्हांस जरूर कळवा. आज ज्यांची मुले शाळेत शिकत आहेत अशा पालकांनीच कृपया आपले अनुभव पाठवावेत.
सोबत आपले नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक तसेच शाळेचे नाव आणि शाळेत शिकत असलेल्या मुला-मुलीसोबतचे आपले छायाचित्रही पाठवा. निवडक अनुभवांना ‘लोकसत्ता’तून प्रसिद्धी दिली जाईल.
कृपया, ई-मेल युनिकोड मराठीतून पाठवा. विषयामध्ये – ‘माझी शाळा मराठी’ असे आवर्जून नमूद करा.
’ई-मेल : loksatta@expressindia.com