बदलत्या काळात एकपीक पद्धतीने शेती करणे हे दिवसेंदिवस धोक्याचे, तोट्याचे होऊ लागले आहे. पीक, पाणी, हवामान आणि मुख्य म्हणजे बाजारपेठ यातील कुठलाही एखादा घटक कधी दगा देईल हे सांगता येत नाही. यासाठी शेती अभ्यासक कायम आंतरपीक घेण्याचा सल्ला देतात. मात्र ही आंतरपिके निवडतानाही पिकांचा विचार करावा लागतो. अशाच विचारातून केळीमध्ये झेंडूच्या घेतलेल्या आंतरपिकाची ही यशोगाथा…

Loksatta lokshivar Agricultural Production Management
लोकशिवार: प्रयोगशील, शाश्वत शेती!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
dairy farming news in marathi
लोकशिवार: गोपालनाचा जोडधंदा!
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Raj Thackeray
Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Justice Chandiwal Said This Thing About Devendra Fadnavis
Justice Chandiwal : “सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी..”, जस्टिस चांदिवाल यांचा खुलासा

शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग शेतकरी करीत असतात. काही वेळा सुरुवातीला प्रयोगाला यश येत नाही. तरीही ते पुन्हा जिद्द, चिकाटीने केले, की मग यश साथ देते. असाच अनुभव कोल्हापूर जवळील गडमुडशिंगी येथील युवा शेतकरी हर्षद गडकरी यास आला आहे. २० गुंठ्याची केळी शेती करताना त्यामध्ये झेंडूचे आंतरपीक घेत त्यांनी शेती फायदेशीर कसे असते हे दाखवून दिले आहे. या माध्यमातून शेती करत असताना त्यांनी या दोन्ही पिकांच्या माध्यमातून २ लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवलेले आहे. शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने प्रयोग केले. कष्टपूर्वक शेती केली की यश मिळू शकते हे या युवा शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

शेतीमध्ये शेतकऱ्यांना प्रयोग करण्याची आवड असते. अनेक शेतकरी आपल्या परीने ते करीत असतातच. अनेकदा असे प्रयोग करताना हात भाजले जातात. मग असा प्रयोग करायला नको अशी त्यांची मानसिकता बनते. तर काहीजण बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा एकदा असा प्रयोग करू पाहतात. त्यावेळी त्यांनी उत्पादन तंत्रामध्ये बदल केलेला असतो. आधीच्या चुका टाळल्या जातात. अशाच प्रकारची शेती हर्षद गडकरी यांनी करून दाखवली आहे. त्याचे वडील किरण गडकरी यांची वडिलोपार्जित अडीच एकर शेती. त्यातील त्यांच्या भावाकडे दीड एकर. त्यांच्या वाट्याला एक एकर शेती आलेली. त्यात पश्चिम महाराष्ट्रात हमखासपणे दिसणारी उसाची शेती करण्यावर त्यांचे लक्ष असायचे. ते करूनही चांगले उत्पन्न मिळत नसायचे. ही उणीव, खंत भासायची. पुढे त्यांना त्यांचा मुलगा हर्षद हा शेती कामासाठी मदत करू लागला. इतिहास विषयाची पदवीधर असलेल्या हर्षद याने शेतीमध्येच काम करायचे ठरवले. नोकरी करताना उत्पन्नाला मर्यादा असतात. त्यापेक्षा शेती केली तर मिळणारे सारे उत्पन्न आपलेच असते. तोटा झाला तरी तो आपलाच असतो. त्यामुळे करायचे तर शेतीच असे ठरवून त्याने या क्षेत्रात काम करायचे ठरवले. याचा जोडीलाच घरची पिठाची गिरणी चालवण्याकडेही त्यांनी लक्ष दिले आहे.

हेही वाचा >>> लोकशिवार: प्रयोगशील, शाश्वत शेती!

करोना साथ देण्यापूर्वी किरण गडकरी यांनी वेगळा प्रयोग म्हणून केळीची शेती करून पाहिली. ती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरली नाही. तेव्हा केळीला प्रति टन अवघा सहा हजार रुपयांचा दर मिळाला होता. सगळीकडे दर पडलेले होते. याच काळात त्यांनी हा प्रयोग करून पाहिला होता. तो निराशाजनक असल्याने पुन्हा त्याकडे त्यांनी पाहिले नाही. मात्र हर्षद यांनी पुन्हा एकदा असा प्रयोग करून पाहायचा ठरवले. तेव्हा त्यास गावातीलच शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळालेले प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शन मिळाले. ते केळी उत्पादन, निर्यात याबाबत अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात. त्यांचा सल्ला घेत त्यांनी २० गुंठे जागेमध्ये केळीचे उत्पन्न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जानेवारीच्या अखेरीस केळी लागवड करण्याचे ठरवून जी नाईन या जातीची निवड केली. गावातीलच एका शेतकऱ्याचे खोड आणून त्याची लावण केली. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने निगा केली. गावातील आणखी एक शेतकरी म्हाळू रेवडे यांनीही यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. याच्या जोडीलाच पिवळ्या झेंडूचे आंतरपीक घेण्याचे ठरवले.

त्यानुसार त्यांनी पाच बाय सहाच्या सरी मध्ये केळीची लागवड केली. आवश्यकतेनुसार वेळोवेळी खत, औषध फवारणी याकडे लक्ष दिले. त्यामुळे केळीचे बाग फुलत गेले. झेंडूला चांगलाच बहर आला. यंदाचा उन्हाळा कडक होता. तेव्हा झेंडू मुळे केळीला सावली मिळाली. झेंडूची फवारणी केली की ती केळीला उपयुक्त ठरत असे. केळीसाठी टाकण्यात आलेलया खताचा झेंडू फुलण्यास उपयोग झाला. त्यामुळे दोन्ही पिके चांगल्या पद्धतीने बहरत गेली. दहा महिन्यांमध्ये केळीचे पीक चांगल्या पद्धतीने तयार झाले. आतापर्यंत त्यांनी वीस गुंठ्यात १५ टन केळी उत्पन्न घेतले आहे. विशेष म्हणजे ही केळी दर्जेदार, उत्तम चवीची असल्याने व्यापाऱ्यांनी चांगल्या दराने खरेदी केली. ती आखाती देशांमध्ये निर्यात करण्यात आली आहेत. गडकरी यांच्या पहिल्या केळी प्रयोगाला दर मिळाला नव्हता पण यावेळी प्रतिटन १९ हजार ५०० रुपये असा भक्कम दर मिळाला. चांगला दर मिळाल्याने प्रयत्न सार्थकी लागल्याने गडकरी कुटुंबीयांना हायसे वाटले. १५ टन केळी विक्रीतून २ लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

ऊस बरा की केळी याचा तुलनात्मक अभ्यास गडकरी कुटुंबीयांनी केला. पूर्वी याच वीस गुंठे शेतीत ३० टन उसाचे उत्पादन मिळायचे. त्यासाठी २० हजार रुपये उत्पादन खर्च यायचा. त्याचे उत्पन्न ९० हजारापर्यंत असायचे. ऊस पिकाचा कालावधी १५ महिन्याचा असा होता. तुलनेने केळी पीक दहा महिन्यात आले. उत्पादन खर्च ६० हजार आला. शिवाय झेंडू पीक चांगल्या पद्धतीने उगवले. त्याची स्थानिक बाजारपेठेमध्येच विक्री करण्यात आली. त्यातून ४५ हजार रुपयांचे नफा मिळाला. ६० रुपये किलोने ती विकली गेली. सुमारे १३०० किलोचे उत्पन्न मिळाले. ठिबक द्वारे पाणीपुरवठा केल्याने शेतात गारवा राहिला होता.

एकूणच अल्पभूधारक शेतकरी असतानाही हर्षद गडकरी या युवा शेतकऱ्याने चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊन शेती उत्तम असते हे सिद्ध केले आहे. केळीचे मुख्य पीक आणि जोडीला झेंडू आंतरपीक हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर गडकरी कुटुंबीयांचा आत्मविश्वास वाढला आहे. आता त्यांचे वडील किरण गडकरी हे भावाची एक एकर आणि स्वत:ची एक एकर अशा दोन एकर जागेमध्ये केळीचे पीक घेण्याचे ठरवले आहे. त्यातील निम्म्या जागेत देशी केळी पिकवण्याचे मानस आहे. थोडक्यात काय तर शेती करताना ती शास्त्रशुद्ध पद्धतीने, योग्य निगा करून लक्षपूर्वक केली तर त्यातून चांगल्या पद्धतीने आर्थिक फायदा होऊ शकतो हेच यातून दिसून आले आहे. हर्षदसारख्या युवा शेतकऱ्यांची ही शेतीतून अधिक चांगली कमाई करण्याची किमया युवा वर्गासमोर आदर्श निर्माण करणारी आहे. नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीमध्ये चांगले प्रयोग करून अधिक उत्पन्न घेता येणे शक्य आहे हेच त्यांनी कृतिशीलपणे दाखवून दिले आहे.

dayanandlipare@gmail.com