|| कमलाकर नाडकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांना प्रथम प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या १९६७ सालच्या ‘काका किशाचा’ या नाटकाच्या चष्म्यातून त्यांच्या सहकारी नट-मित्राने घडवलेले स्मरणीय दर्शन..

किशोरची आणि माझी मैत्री इतकी निव्वळ, निर्लेप व निरंतरची होती, की प्रथम आम्ही कुठे भेटलो, कसे भेटलो, याचा ठावठिकाणा कुणाच्याच लक्षात असणं शक्य नाही.

एक खरं.. त्याला राज्य नाटय़स्पर्धेत ‘काका किशाचा’ हे शाम फडके लिखित नाटक करायचं होतं आणि त्यातील एका प्रमुख भूमिकेसाठी त्याने मला विचारणा केली होती. नाटकात काम करण्याची माझी भूक सदैव तप्तच असायची. चांगल्या भूमिकेसाठी तर मी हावरटच असायचो. दबकत दबकतच मी किशोरला होकार दिला. दबकण्याचं कारण आमची ‘बहुरूपी’ ही नाटय़संस्थाही या नाटय़स्पर्धेत होती. पण मला योग्य भूमिका त्यात नव्हती. त्यावेळी एका स्पर्धक संस्थेच्या व्यक्तीनं दुसऱ्या स्पर्धक संस्थेच्या नाटकात प्रत्यक्ष सहभाग घेणं म्हणजे जरा अवघडच दुखणं होतं. पण मी विशेष मनावर न घेता उदारमतवादाचा अंगरखा चढवला आणि माझ्या संस्था-सदस्यांना परोपकारी बनवून शांत केलं!

किशोरनं मला ‘काका किशाचा’ची मूळ संहिता वाचायला दिली. ती वाचल्यानंतर मी जरा नाराजच झालो. ‘‘आपण दुसरं नाटक निवडू या..’’ मी किशोरला म्हणालो. ‘‘नाटककाराला मी काही प्रयोगांचं मानधन अगोदरच दिलं आहे. आता त्यात बदल होणं शक्य नाही,’’ किशोर ठामपणे म्हणाला. अन् नाटकाच्या तालमी सुरू झाल्या.. माझ्यासकट! किशोर नाटकात ‘किशन देशपांडे’ होता, तर मी त्याचा मित्र ‘मध्या राजे’ होतो.

किशोरचं सगळं शास्त्रशुद्ध आणि शिस्तबद्ध असायचं. दिग्दर्शनाची एक वेगळी स्वत:ची संहिताच त्याने तयार केली होती. नेपथ्याचा आराखडा, पात्रांच्या हालचाली, त्यांची वेशभूषा सारं तो लिहून ठेवायचा. हे पेपरवर्क करणं तो कुठं शिकला होता, कुणास ठाऊक! बहुधा नागपूरला पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या तालमीतलं त्याचं हे अवलोकन असावं. असल्या शिस्तीची आणि काटेकोरपणाची  मला अजिबातच सवय नव्हती. माझा सगळा भर उत्स्फूर्ततेवर!

‘काका किशाचा’साठी त्याने अथक परिश्रम घेतले. स्पर्धेपूर्वी एक प्रयोग त्यानं त्याच्या कलानगरच्या कॉलनीतही घडवला. तो तुफान रंगला. त्या प्रयोगाचा अनुभव जमेस धरून त्याने पुन्हा तालमी घेतल्या आणि एकूण प्रयोगाला अधिक हलकंफुलकं आणि प्रसन्नता बहाल केली. परिणामी स्पर्धेतल्या प्रयोगांना तुफान यश मिळालं. अंतिम स्पर्धेत त्याला दिग्दर्शनाचं व मला अभिनयाचं पारितोषिक मिळालं. ‘काका किशाचा’ नाव दुमदुमायला लागलं. प्रयोगाच्या मागण्या यायला लागल्या. नावाजलेला एकही कलावंत नसताना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिलेलं व्यावसायिक रंगभूमीवरचं हे बहुधा ‘वस्त्रहरण’व्यतिरिक्त दुसरं नाटक! प्रयोग रंगतदार होत असेल तर प्रेक्षक नाव नसलेल्यांनाही दाद देतात, हे या नाटकांनी प्रथमच सिद्ध केलं.

‘नटराज’ संस्थेतर्फे ‘काका’चे सुमारे १८० प्रयोग आम्ही महाराष्ट्रभर केले. दौरेही केले. सर्व कलावंतांनीही विनापाकीट खेळ केले. ‘काका’ने फार्सिकल विनोदी नाटकाचा एक माहोल तयार केला आणि त्यात सिंहाचा वाटा किशोरचाच होता. या नाटकानंच त्याच्यावर लोकप्रियतेची मुद्रा प्रथम उमटविली. त्याला इतर नाटकांतून आणि चित्रपटांतून मग वेगवेगळ्या भूमिकेसाठी निमंत्रणं यायला लागली. तो रंगमंचावर आणि छोटय़ा-मोठय़ा पडद्यावर चमकायला लागला.

‘काका’च्या निमित्ताने त्याने फार्सिकल अभिनयातली एक वेगळी वाट चोखाळली होती. कृत्रिमतेचा अवलंब न करता स्वाभाविक देहबोलीतून तो विनोद निर्माण करायचा. त्याच्या अभिनयाचं नातं आत्माराम भेंडेंच्या अभिनयाशी जुळणारं होतं. अर्थहीन शारीरिक हालचालींचा त्याला मनस्वी संताप यायचा. खरं तर त्याच्या अभिनयाची जातकुळी वेगळीच होती. ती शब्दांत प्रकट करणं कठीण आहे. त्याच्या डोक्यात नेहमी नाटक आणि नाटकच असायचं. नाटक म्हणजे नाटकाचा प्रयोग, त्याची बांधणी, पात्रांचे परस्परसंबंध, विनोदाच्या जागा..

१९६७ ला ‘काका किशाचा’ यशस्वी झालं. नंतर त्यानं ‘रात्र थोडी, सोंगं फार’ हे दत्ता केशवांचं नाटक केलं. सुधा करमरकर यांच्या ‘वळलं तर सूत’मध्ये आणि ‘यमाला डुलकी लागते’ या नाटकात तो नट आणि साहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही होता. भरत दाभोळकरच्या सर्वच हिंग्लिश नाटकांतून तो हशे पिकवायचा.

आपलं नाटक करण्याबरोबरच व्यावसायिक रंगमंचावरची इतरांची नाटकंही तो आवर्जून बघायचा. त्यानंतर मग मला फोनाफोनी करायचा. त्याबद्दल चर्चा करायचा. प्रायोगिक नाटकाचं मात्र त्याला वावडं होतं. त्याबाबतीत त्याचे व माझे खूप वादंग व्हायचे.

माणूस म्हणून मात्र किशोर मऊ.. अगदी मेणाहून मृदू होता. शोभा त्याची प्रेमळ बायको. तिच्या प्रेमाधिकारशाहीचा त्याला वारंवार सामना करायला लागायचा. पण तो तितक्याच शांतपणे सारं निभावायचा. दौऱ्यावर मुक्कामात शोभा शॉपिंगच्या विचारात, तर किशोरच्या डोक्यात रात्रीच्या नाटय़प्रयोगाची चिंता! एकदा तर ती कोल्हापुरातील प्रयोगाच्या दिवशी ‘कोल्हापुरी साज हवा’ म्हणून हट्टच धरून बसली. आणि त्याचवेळी प्रयोगाला कसली तरी अडचण निर्माण झाली होती. ‘‘आपण येथे प्रयोग करायला आलो आहोत की कोल्हापुरी साज घ्यायला?’’ असा प्रश्नही झाला. अखेरीस किशोरनं स्त्रीहट्ट पुरा केला आणि नाटय़प्रयोगही अडचणमुक्त झाला. सुरळीत पार पडला. किशोर दोन्ही आघाडय़ांवर जिंकला होता!

प्रत्येक नाटय़प्रयोग हा त्या- त्या वेळेचा नवाच प्रयोग असतो. नवनव्या अडचणी येतच असतात. आयत्या वेळी भलतेच प्रश्न उपस्थित होतात. सगळेच कलावंत मानधनाशिवायचे असल्यामुळे त्यांनाही प्रेमात ठेवणं, एकेकाचे इगोज्, आवडीनिवडी जपणं हे फार कठीण काम असतं. पण त्या सर्वाशी सामना करायची क्षमता किशोरमध्ये होती. कधीही सैरभैर न होता तो शांतपणे सर्व काही पार पाडायचा. त्याच्या या अनोख्या अपवादात्मक क्षमतेला माझा नेहमीच सलाम असायचा.

शोभा (नाटककार व्यंकटेश वकील यांची कन्या) किशोरची पत्नी. त्याचं तिच्यावर निरतिशय प्रेम होतं. तिचंही त्याच्यावर तितकंच प्रेम होतं. शोभा गुजराती नाटकांतील लोकप्रिय अभिनेत्री होती. अभिनयाची तिला मनस्वी आवड होती. तिच्या त्या अभिनयवेडाला किशोरनं कधीच अटकाव केला नाही. मराठी नाटय़विश्वात जी काही थोडी आदर्श जोडपी होती, त्यात किशोर-शोभाचा अग्रक्रम होता! किशोरनं ‘फार्स’ हा नाटय़प्रकार अभिनयाच्या बाजूने अधिकाधिक विकसित करावा, त्या प्रकाराच्या वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहाव्यात असं मला मनापासून वाटायचं. मी त्याच्याकडे तसं बोलूनही दाखवत असे. पण वेगवेगळ्या भूमिका विविध माध्यमांतून साकार करतानाच्या धावपळीत त्याला ‘फार्स’वर आपलं लक्ष केंद्रित करायला अवसर मिळाला नाही.

किशोर ‘ग्लॅक्सो’ या प्रसिद्ध कंपनीत महत्त्वाच्या हुद्दय़ावर नोकरीला होता. परदेशी कंपन्या पगार भरपूर देतात, पण नियमितपणा व वेळ याबाबत फार कडक असतात. अशा कंपनीत राहूनही किशोर व्यावसायिक नाटकांचे प्रयोग व दौरे कसे काय जमवायचा, हे नटेश्वरच जाणे! बहुधा त्याचे वरिष्ठ वा सहकारी मराठी नसावेत. कदाचित ते मराठी वृत्तपत्रंही वाचत नसावेत. अन्यथा त्यांना वृत्तपत्रांतील नाटकांच्या जाहिरातींतून ‘किशोर प्रधान’ हे नाव ठळकपणे दिसलं असतं. झालं ते बरंच झालं! ‘ग्लॅक्सो’ कंपनीने मराठी रंगभूमीला एक उत्तम विनोदी नट दिला.. अगदी त्यांच्या ग्लुकोजसारखाच! वरळीच्या दूरदर्शन केंद्रावर जायचं असलं म्हणजे मी बस कंडक्टरकडे ‘ग्लॅक्सो’चं तिकीट मागायचो. ‘काका किशाचा’नंतर मी ‘किशोर प्रधान स्टॉपला उतरायचंय’ म्हणून सांगायचो आणि मराठी कंडक्टर बरोबर तिकीट फाडायचा!

किशोरनं नाटकांतून, चित्रपटांतून, दूरदर्शनवरील मालिकांतून अनेकानेक भूमिका केल्या. पण मला आठवत राहील तो एक पाय दुमडलेल्या अवस्थेत हसत उभा राहिलेला आणि माझ्याकडे टाळी मागणारा ‘काका किशाचा’मधला किशोरच!

kamalakarn74@gmail.com