प्रत्येक क्षण समरसून जगणारी, प्रत्येक क्षणात दडलेल्या अर्थाचा शोध घेणारी, त्यातून जे गवसेल त्यावर मनन-चिंतन करताना उमगलेले जगण्याचे सार त्याच उत्कटतेने आपल्या चित्रपटातून जनमानसात रुजवणारी प्रतिभा म्हणजे सुमित्रा भावे. दिग्दर्शक ही उपाधी त्यांच्यामागे नव्हती तेव्हाही त्यांचा जगण्याचे धडे घेण्याचा प्रयत्न सुरूच होता. अत्यंत संवेदनशील, विनयशील, उबदार अशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अभ्यासवृत्तीची एक धार होती. ‘अभ्यासोनि प्रगटावे’ ही वृत्ती त्यांनी चित्रपटक लेतही जोपासली, त्यामुळे त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, उपयुक्ततावादाच्या पलीकडे जात जगणे शिकणारा आणि शिकवणारा असा त्यांचा सिनेमा होता.
दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे चित्रपट वेगळे आहेत, कारण त्यांची या कलेकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती. त्यांच्या चित्रपटातील व्यक्तिरेखा, त्यांच्या गोष्टी या वास्तव जगण्यात आलेल्या अनुभवांच्या मुशीतूनच आलेल्या होत्या. राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राच्या विद्यार्थिनी असलेल्या सुमित्रा भावे यांनी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मधून ‘रुरल वेल्फे अर’ या विषयावर पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यानंतर त्या ‘कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सव्र्हिसेस’ या पुणे येथील संस्थेशी जोडल्या गेल्या. दहा वर्षे या संस्थेत शिकवण्याचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी विविध सामाजिक प्रकल्पांवर काम करायला सुरुवात केली. लोकांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक समस्या त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. अनुभव आणि विचारांचे हे धन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना सिनेमा नावाचे माध्यम सापडले ते १९८४ मध्ये ‘स्त्री वाणी’ या अभ्यास प्रकल्पाच्या संचालक म्हणून काम पाहात असताना या प्रकल्पांतर्गत झोपडपट्टीत राहणाऱ्या स्त्रिया अत्यंत दुर्दैवी- प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत कशा जगतात याचे चित्रण त्यांनी ‘बाई’ या लघुपटातून केले. मुळात चित्रपट माध्यमाविषयी त्यांना त्या वेळी फारशी माहिती नव्हती. ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मधून चित्रपटनिर्मितीचे शिक्षण पूर्ण केलेले सुनील सुकथनकर त्यांच्याबरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. ‘बाई’ हा लघुपट त्यांनी अनेक स्त्रियांना गटागटाने दाखवला, चर्चा घडवून आणल्या. या पहिल्याच लघुपटाने त्यांना कथाबाह््य चित्रपट म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी ‘पाणी’ हा लघुपट केला, या लघुपटाच्या माध्यमातून गावोगावच्या स्त्रिया एकत्र येऊन, स्वयंस्फूर्तीने गावात पाणी कसे आणतात, याची कथा त्यांनी सांगितली होती. लोकांच्या सहभागातून तयार झालेल्या या लघुपटाला १९८७ साली सर्वोत्कृष्ट शैक्षणिक किंवा पर्यावरणविषयक चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
लोकांच्या रोजच्या जगण्याशी निगडित विषय आणि त्यांचे वास्तवचित्रण असेल तर तो चित्रपट त्यांच्या काळजाला भिडतो, याची प्रचीती त्यांना आली होती. त्यामुळे या माध्यमाचा अचूक वापर करत लोकांपर्यंत जगणं पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी केला. ‘मुक्ती’, ‘चाकोरी’ अशा लघुपटांनंतर १९९५ साली त्यांचा ‘दोघी’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. या पहिल्याच चित्रपटाला त्यांना उत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. २००२ साली ‘दहावी फ’ आणि ‘वास्तुपुरुष’ हे त्यांचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘वास्तुपुरुष’ हा त्यांना त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, संवाद, गाणी, अभिनय सगळ्यांतच वेगळेपण असलेला हा चित्रपट जणू एखादी कादंबरी पडद्यावर चितारावी तसा अनुभव देणारा होता. २००४ साली प्रदर्शित झालेला ‘देवराई’, त्यानंतर दोन वर्षांनी आलेला ‘नितळ’, निर्मितीसाठी आर्थिक पाठबळ पुरेसे नसल्याने तीन वर्षे रखडलेला आणि नंतर क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पूर्ण होऊन लोकांसमोर आलेला नितांतसुंदर ‘अस्तु’ ते अगदी अलीकडे २०१७ साली प्रदर्शित झालेला ‘कासव’ या प्रत्येक चित्रपटातून त्यांनी वेगवेगळ्या शारीरिक- मानसिक आजार आणि त्यातून माणसांच्या मनात उभी राहिलेली गुंतागुंत याचे सहजचित्रण केले आहे.
‘देवराई’ हा त्यांच्या दृष्टीने एकतानतेचा अनुभव देणारा चित्रपट होता. चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक मुख्य असला तरी फक्त त्याच्यामुळे चित्रपट घडत नाही, चित्रपटाशी संबंधित असलेल्या प्रत्येक विभागातली व्यक्ती जेव्हा त्या विषयाशी समरस होऊन आपापले काम चोख करते तेव्हा पडद्यावर तो उत्कट आविष्कार उमटतो ही त्यांची धारणा होती. त्यामुळे रोजच्या जगण्याशी संदर्भ असलेल्या सामाजिक-राजकीय विषयांवरची त्यांची हलकीफुलकी मांडणी असलेले चित्रपटही वेगळे ठरले.
कलाकृतीच्या यशाचे गमक
लोकांच्या सहभागातून तयार झालेल्या ‘पाणी’ या लघुपटाला १९८७ साली सर्वोत्कृष्ट शैक्षणिक किंवा पर्यावरणविषयक चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. हाच लघुपट शेजारच्या पाकिस्तानमध्ये गावखेड्यातील स्त्रियांना प्रेरणा मिळावी यासाठी कैकवेळा दाखवण्यात आल्याची माहिती सुमित्रा भावे यांना मिळाली. त्यांच्या कलाकृतींचे यश हे लोकांपर्यंत पोहोचण्यात होते आणि त्याची जाणीव आपल्याला पहिल्याच चित्रपटात झाली, असे त्यांनी अनेक वेळा बोलूनही दाखविले होते.