डेंग्य़ूमुळे माणसे दगावल्याच्या बातम्या पावसाळय़ात येत राहतात आणि घबराट वाढत राहते..  वास्तविक हे बळी ‘डेंग्यू शॉक सिंड्रोम’चा पुरेसा प्रतिकार न झाल्याचे असतात आणि एरवी डेंग्यूचे रुग्ण काळजी घेणे व उपचार यांनी बरे होऊ शकतात. डेंग्यूच्या तपासण्यांपासून उपचारांपर्यंतचा खर्चसुद्धा कमी करता येणे सहज शक्य आहे. कसे? ते सांगणारे विस्तृत टिपण..
पावसाळ्यात अनेक ठिकाणी तापाच्या साथी येतात. पकी डेंग्यूच्या साथीबरोबर घबराटीची व अनावश्यक तपासण्या, उपचार, खर्च याचीही साथ येते. खरे तर वैद्यकीय विज्ञान व काही तज्ज्ञ डॉक्टर्सचा अनुभव सांगतो की वेळेवर, नीट उपचार केले तर डेंग्यूचे ९९% रुग्ण, तेही कमी खर्चात बरे होऊ शकतात.
डेंग्यू हा विशिष्ट प्रकारच्या (एडिस इजिप्ताय) डासामार्फत पसरणारा एक प्रकारचा विषाणू-ताप आहे. त्याचे दोन उप-प्रकार आहेत. साधा डेंग्यू व ‘गुंतागुंतीचा डेंग्यू’. अचानक जोरदार ताप, तीव्र अंगदुखी, कंबरदुखी, डोळ्यांच्या खोबणीत, त्याभोवती तीव्र दुखणे, खूप थकवा अशी डेंग्यूची खास लक्षणे साध्या डेंग्यूमध्ये काही रुग्णांमध्ये दिसतात, पण अनेकदा साधा डेंग्यू व इतर विषाणू-ताप यांच्या लक्षणांमध्ये फरक नसतो. त्यामुळे हा ताप डेंग्यूचा आहे असे निदान अनेकदा होत नाही. पण त्याने बिघडत नाही; डेंग्यूचे बहुसंख्य रुग्णही कुठलेही खास औषध न लागता ८-१० दिवसांत बरे होतात. ताप, डोकेदुखी, अंगदुखी यावर पॅरासिटॅमॉलची एक ते दीड गोळी दिवसातून ३ ते ४ वेळा गरजेप्रमाणे देणे व विश्रांती एवढेच सहसा पुरे असते. पण सुमारे १०% रुग्णांमध्ये ‘गुंतागुंतीचा डेंग्यू’ होऊन त्यापकी काहींच्या जिवाला धोका होऊ शकतो व म्हणून घबराट पसरली आहे. शिवाय काही अज्ञानी, काही अधाशी डॉक्टर्समुळे तसेच काही अधीर रुग्णांच्या दबावामुळे अनेकदा फार वायफळ खर्च होतो.
डेंग्यू पहिल्यांदाच झाल्यावर वर म्हटल्याप्रमाणे इतर साध्या तापापेक्षा वेगळे काही घडत नाही. डेंग्यू झाला आहे हे अनेकदा कळतही नाही. मात्र त्याच व्यक्तीला डेंग्यू परत, दुसऱ्यांदा झाल्यास ‘गुंतागुंतीचा डेंग्यू’ होऊ शकतो, कारण डेंग्यूचे हे दुसऱ्या तापाचे विषाणू व डेंग्यूच्या पहिल्या तापात शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडिज (प्रतिपिंडे) यांच्यातील संयोगामुळे दोन प्रकारचे दुष्परिणाम होतात. एक म्हणजे केशवाहिन्यांना जणू भोके पडून त्यातील रक्तातील प्लाझ्मा ‘गळू’ लागतो. त्यामुळे शरीराच्या आत शोष पडून रक्तदाब कमी होणे असे एका बाजूला तर पोटात, छातीत पाणी होणे दुसऱ्या बाजूला अशी गुंतागुंत काही रुग्णांमध्ये होते. काहींमध्ये यकृत, मूत्रिपड इ.ना अपाय होतो. ही गुंतागुंत तीव्र झाली तर गंभीर परिस्थिती होते. (डेंग्यू शॉक सिंड्रोम). दुसरे म्हणजे काही रुग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेट्सचा (बिंबाणू) मोठय़ा प्रमाणावर नाश होऊन प्लेटलेट्सचे प्रमाण कमी झाल्याने रक्तस्राव होऊ शकतो (हिमरेजिक डेंग्यू). मेंदू, फुफ्फुस इ. नाजूक जागी थोडासा रक्तस्रावही धोकादायक ठरू शकतो. मात्र सुमारे फक्त दहा टक्के रुग्णांमध्ये अशी गुंतागुंत होते. हे दुष्परिणाम/गुंतागुंत वेळेवर ओळखणे महत्त्वाचे असते.
तपासण्या : कोणाचे, किती महत्त्व?
डेंग्यूची काही खास लक्षणे/चिन्हे यामुळे डॉक्टरला डेंग्यूची शंका येते. सोबत एन.एस.१ ही रक्त-तपासणी पहिल्या पाच दिवसांत केली तर डेंग्यूचे पक्के निदान होते. पाचव्या दिवसानंतर दुसऱ्या दोन रक्त-तपासण्यांतूनही डेंग्यूचे नेमके निदान होते. या तपासण्यांसाठी प्रत्येकी सुमारे ६०० रुपये खर्च येतो. पण खरे तर त्यांचा निष्कर्ष काहीही आला तरी डेंग्यूवर करायचे उपचार बदलत नाहीत. त्यामुळे तापाच्या सरसकट सर्व रुग्णांमध्ये या तपासण्या करण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा ‘हिमोग्राम’ ही साधी रक्त-चाचणी जास्त उपयोगी आहे. त्यातून निरनिराळ्या गोष्टी कळल्यामुळे विषाणू-ताप, जिवाणू ताप व मलेरिया यापकी काय आहे हे कळायला मदत होते. शिवाय ‘हिमोग्राम’मध्ये आढळले की हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढले आहे, तसेच रक्तातील प्लेटलेट्सची संख्या दर मिलिलिटरमागे एक लाखांपेक्षा खाली गेली आहे तर ‘गुंतागुंतीचा डेंग्यू’ आहे असे म्हणता येते.
‘गुंतागुंतीच्या डेंग्यू’मध्ये सहसा तीन-चार दिवसांत ताप उतरतो, पण नंतर अतिशय थकवा येतो. काहींमध्ये दम लागणे, नाडीचा, श्वसनाचा वेग वाढणे, रक्तदाब कमी होणे, ग्लानीत राहणे अशी गुंतागुंत होऊ शकते. तसे झाल्यास इस्पितळात ठेवावे लागते; इतर तपासण्या कराव्या लागतात. उदा. उदरपोकळीत, छातीत पाणी होऊन दम लागल्यास सोनोग्राफी/क्ष-किरण चाचणी करावी लागते.
रक्त-तपासणीतून प्लेटलेट्सवर लक्ष ठेवणे हेही महत्त्वाचे असते. निरोगी व्यक्तींमध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण दर घनमिलिलिटरमागे ते दीड ते चार लाख असते. ते घसरल्यास एक-दोन दिवसाआड तपासावे लागते. एकदम एक लाखांच्या खाली गेले तर रोज प्लेटलेट्-काऊंट बघावा लागतो. सहसा सातव्या दिवसापासून प्लेटलेट्-काऊंट परत वाढू लागतो. वर दिलेली गंभीर लक्षणे नाहीत, पण प्लेटलेट्-काऊंट २५ हजारापेक्षा कमी झाला तरी इस्पितळात दाखल व्हायला हवे. तो १० हजाराच्या खाली घसरला तर सहसा नीलेतून प्लेटलेट्स द्याव्या लागतात.
प्लेटलेट्-काऊंट महत्त्वाचा असला तरी सर्व लक्ष फक्त प्लेटलेट्-काऊंटवर केंद्रित करणे चुकीचे आहे. एक तर वर दिलेली इतर गंभीर लक्षणे/चिन्हे आहेत का, ‘डेंग्यू शॉक सिंड्रोम’कडे वाटचाल नाही ना तेही बघावे लागते. तसेच प्लेटलेट्-काऊंट १० हजाराच्या खाली न घसरताही कातडी किंवा अंत:त्वचा याखाली रक्तस्राव होणे किंवा शरीरांतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे शौचास काळी होणे किंवा पोटात खूप दुखणे असा त्रास होऊ शकतो. असे झाल्यास रुग्णालयात दाखल करावे लागते.
बहुसंख्य रुग्णांमध्ये २० रु.ची औषधे पुरतात!
डेंग्यूच्या बहुसंख्य रुग्णांमध्ये विश्रांती, भरपूर पाणी, द्रवपदार्थ घेणे आणि ताप, डोकेदुखी-अंगदुखी यावर पॅरासिटॅमॉलची एक ते दीड गोळी दिवसातून ३-४ वेळा गरजेप्रमाणे देणे एवढेच सहसा पुरसे असते. त्यामुळे बहुसंख्य रुग्णांमध्ये १५-२० रुपयांची औषधे पुरतात! पॅरासिटॅमॉल सोडून दुसरे कोणतेही वेदनाशामक, तापहारक औषध घेऊ नये. (कॉम्बिफ्लाम किंवा तत्सम गोळ्यांमुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते.) अँटिबायोटिकचा उपयोग नसतो. काहीही केले तरी डेंग्यूचा ताप उतरायला ३-४ दिवस तरी लागतात, अनेकदा एक आठवडा लागतो. नीलेतून पॅरासिटॅमॉल दिल्याने अधिक गुण येत नाही. १०२ डिग्री फॅ.च्या पुढे ताप चढला तर सर्व अंग ओल्या फडक्याने पुसून काढावे, त्यासाठी इस्पितळात ठेवायची गरज नसते. दर दोन तासांनी लघवी होईल इतके पाणी सतत प्यायला हवे. वर नमूद केलेली गंभीर लक्षणे/चिन्हे आढळली तर मात्र इस्पितळात दाखल व्हायला हवे. गुंतागुंतीचा डेंग्यू झाला तरी तेही बहुसंख्य रुग्ण ८-१० दिवसांत बरे होतात. डेंग्यूचे रक्त-तपासणीतून पक्के निदान झाले असेल तर ताप असेपर्यंत रुग्णाने मच्छरदाणीत राहिले पाहिजे. कारण ताप असेपर्यंत रुग्णाच्या रक्तात डेंग्यूचे विषाणू असतात. डासांमार्फत इतरांना त्याची लागण होऊ शकते.
डेंग्यूच्या अनेक रुग्णांना खूप अशक्तपणा येतो, पण भरपूर पाणी, द्रवपदार्थ व विश्रांती यामुळे काही दिवसांनी तो जातो. काही डॉक्टर्स अशा रुग्णांना सलाइन लावतात. काही रुग्ण, आप्तेष्ट यांचा तसा दबाव असतो. खरे तर सलाइन म्हणजे फक्त र्निजतुक मिठाचे पाणी असल्याने त्याने अशक्तपणा जात नाही, पण सलाइनने अशक्तपणा जातो, या गरसमजाचा काही डॉक्टर्स गरफायदा घेऊन पसे कमावतात. तसेच अधीर झालेल्या ‘वजनदार’ आप्तेष्टांचा दबाव, विमा-कंपन्यांचा कारभार यामुळेही काही डॉक्टर्स गरज नसताना सलाइन लावतात. रक्तदाब कमी होणे अशी गंभीर लक्षणे/चिन्हे आढळली तर मात्र सलाइनची गरज असते.
डेंग्यूच्या प्रसाराबाबतही गरसमजच फार
डास साचलेल्या पाण्यात होतात. झाडी-झुडपात ते वास्तव्य करतात एवढेच. डेंग्यूच्या डासांचे वैशिष्टय़ म्हणजे ते साचलेल्या स्वच्छ पाण्यात होतात, घरांमध्ये राहतात व दिवसा चावतात. शाळेत, ऑफिस इ. ठिकाणी डास चावत असतील तर तिथे डासांचा बंदोबस्त करायला हवा. जादा काळजी म्हणून दिवसा पायमोजे घालावेत. घरातील कुंडय़ा, फ्रीजच्या खालील ट्रे, फुलदाणी, एअर-कंडिशनर, तसेच उघडय़ावरील टायर, फुटके डबे, कौले, करवंटय़ा, गच्चीवर पाणी साठण्याच्या जागा, झाकण उघडे राहिलेल्या पाण्याच्या टाक्या इत्यादीत पाणी साठल्यास तिथे डेंग्यूचे डास होतात. हे सर्व टाळायला हवे. घरातील पाण्याची पिंपे आठवडय़ातून एकदा पालथी करून पूर्ण रिकामी करून धुवायला हवीत.
डेंग्यूचे डास झाल्याबद्दल पालिकेला दोषी ठरवणे योग्य नाही. डेंग्यूचे डास घरात, घराभोवती होतात. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त नागरिकांनीच करायला हवा. सर्व डॉक्टर्सनी, आप्तेष्टांनी डेंग्यूच्या रुग्णांबाबत नगरपालिकेला कळवले पाहिजे. म्हणजे डेंग्यू झालेल्यांच्या व त्यांच्या शेजारच्यांच्या घरात, डास-नाशकाची फवारणी करणे, त्या परिसरातील डास होण्याच्या जागा बंद करायला लावणे हे काम पालिका करू शकेल. योग्य आरोग्य-शिक्षण जोरदारपणे करणे हेही पालिकेचे काम आहे. डेंग्यूचे डास घरात असल्यामुळे घराबाहेर फॉिगग करणे निर्थक आहे.
डेंग्यूबाबत घबराट आहे. त्याचा काही डॉक्टर्स गरफायदा घेत आहेत. हे सर्व थांबण्यासाठी याबाबतची समाजाची मानसिकता बदलायला हवी. डेंग्यूत एक टक्काच रुग्ण दगावतात हे लक्षात घेऊन पत्रकारांनीही अकारण घबराट पसरणार नाही, असे वृत्तांकन करायला हवे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Symptoms and prevention of dengue fever