स्थूल शरीर हे फक्त एकाच जागृतावस्थेत आमच्या उपयोगी पडते, म्हणून आम्ही त्या शरीराचे पोषण, मुंडण आणि अलंकरण करण्याकरिता झटत असतो. पण मन हे स्थूल व सूक्ष्म शरीरामध्ये फिरत असून जागृति व स्वप्न या दोन्ही अवस्थांतही हजर असते. तर अशा रीतीने सर्व अवस्थांमध्ये आपल्याला कधी सोडून न राहणाऱ्या मनाचे पोषण, मुंडण व अलंकरण याकडे आमचे लक्ष जात नाही, हा केवढा अविचार! मनाची खरी योग्यता, कर्तबगारी, महत्त्वही आम्ही नीट पहात नाही म्हणून इहपर आमची दुर्दशा होत आहे. मन हे या जन्मीचा आपला सोबती व गडी आहे. इतकेच नव्हे तर ते जन्मोजन्मी आपल्या हिताकडे लागले तर आपला सांगाती, सेवक किंवा मित्र होते. परंतु तेच अहिताकडे लागले तर आपला शत्रु होत असते. म्हणून मनास शत्रु किंवा मित्र करून ठेवणे आपले काम आहे. शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. कारण मनाला सोडून शरीर निरुपयोगी होते. मन आहे तर शरीरास भोग व क्रिया साधतात. मन नाही तर शरीर मृतप्राय असते. तर अशा उत्तम साधनभूत मनाकडे दुर्लक्ष करून फक्त शरीर तेवढे पोसून मिरविणे म्हणजे अपाय करून घेणे आहे. म्हणून मनाला रोज पुष्ट व निरोगी करणारे चांगले अन्न खायला द्यावे- म्हणजे संतबोध भरवावा. मन सुंदर सुशोभित होईल असे वरचेवर त्याचे मुंडण करावे म्हणजे बाधक भेद-कल्पनारूपी केश तोडून अगर उपटून टाकावेत आणि मनास दृढता व बल येईल अशी मनन व एकवाक्यताकरणरूपी तालीम करावी. मनाची भित्रेपणा जाऊन त्याचे ठिकाणी शूरपणा जडावा यासाठी नेहमी संकटे, दुख, ताप वगैरे सोसण्याची त्याला सवय लावून, काळाशी नेहमी कुस्ती घेण्यास शिकवून अंती काळास जिंकण्याची तयारी ठेवावी. मनरूपी घोडा नेहमीच बांधून घरी ठेवावा. मनरूपी घोडा जर निर्वाणी उपयोगी पडावा अशी इच्छा असेल तर त्याला सतत चांगला दाणा देऊन, चांगला खरारा करून, अंग रगडून, पुष्ट करून, मोकळ्या मैदानात, जंगलात, रणात, शर्यतीत वगैरे खेळवून त्याच्यातला भित्रेपणा काढून तयार व धीट करून ठेवावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा