या भूतलावर असे काही भूभाग आहेत की जे जगभरातील धनदांडग्यांना त्यांची धनसंपत्ती दडवून ठेवण्यासाठीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देतात. अशा भूभागांना ‘टॅक्स हेवन्स’ असे संबोधले जाते. अशा या ‘स्वर्गा’त आपली संपत्ती दडवून ठेवणाऱ्या महाभागांची यादी नुकतीच ‘आयसीआयजे’ या संस्थेने जाहीर केली आहे. ग्लोबल मीडियाच्या या मिशनमध्ये ‘इंडियन एक्स्प्रेसचा’ही सहभाग होता. हे ‘मिशन’ कसे साध्य केले त्याचा हा मागोवा..
आपल्या ज्ञात उत्पन्नापेक्षा चार पसे अधिक मिळवून देशाटन करावे किंवा गेलाबाजार दानधर्म करून पुण्य पदरात पाडून मोक्षप्राप्तीची वगरे तजवीज करून घ्यावी ही सर्वसामान्य भारतीयांची मानसिकता. फार तर पुढे जाऊन त्याला जागतिक परिमाण देता येईल. म्हणजे जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य, पापभीरू व्यक्तीला हे असंच वाटत असलं पाहिजे, असे आपण ‘हे विश्वची माझे घर’ मानणारे म्हणू शकतो. मात्र, ‘पिंडे पिंडे मतिर्भिन’ असतंच. याचा अर्थ आपल्या ज्ञात उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने अधिक पसे मिळवावे आणि ते देशाच्या बाहेर एखाद्या अज्ञात स्थळी गुंतवून अधिकाधिक श्रीमंत व्हावे, जगातल्याच नाही तर ब्रह्मांडातल्या सर्व सुखसोयी उपभोगाव्यात असंही वाटणारे महाभाग या जगात असू शकतात, हेही आपण गृहीत धरून चाललं पाहिजे.. नव्हे तसे ते असतातच आणि ते केवळ अस्तित्वातच नसतात तर आपल्या अवतीभवती उजळ माथ्याने फिरत असतात. कधी त्यांचा चेहरा लोकप्रतिनिधीचा असतो, तर कधी नोकरशहाचा किंवा मग उद्योजकाचा अथवा एखाद्या सेलिब्रिटीचा.. या चेहऱ्यांमागील खरे चेहरे शोधण्याचे कामही जगाच्या पसाऱ्यात कुठे ना कुठे चालू असते.. इंटरनॅशनल कॉन्सर्टअिम ऑफ इन्व्हिस्टेगिटिव्ह जर्नालिस्ट्स (आयसीआयजे) ही त्यातलीच एक संस्था. देशातील कराचा बडगा चुकवून, मायबाप सरकारला चकवून आणि अर्थविषयक कायदेकानू डावलून आपल्याकडची रग्गड माया देशाच्या बाहेर गुंतवणाऱ्या (ऑफशोअर टॅक्स हेवन्स) महाभागांची यादीच या संस्थेने सप्रमाण जाहीर केली आहे. उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत उभ्या-आडव्या पसरलेल्या या भूतलावरील १७० देशांमधील हजारो करबुडव्यांच्या या यादीत तब्बल ६१२ भारतीय आहेत, हे एव्हाना सर्वज्ञात झाले आहे. आयसीआयजेशी संलग्न असलेल्या ४६ देशांमधील ८६ शोध पत्रकारांच्या अथक मेहनतीतून निर्माण झालेले हे नवनीत आजवरच्या शोध पत्रकारितेच्या इतिहासातील सर्वात मोठे यश आहे.
खरोखर स्वर्गच
ऑफशोअर टॅक्स हेवन्स म्हणजे काय हे समजून घेऊ या. वर उल्लेखल्याप्रमाणे प्राप्तिकर व तत्सम अनेक कर चुकवून आपला पसा सुरक्षित कसा ठेवता येईल, या विंवचनेत असलेल्यांसाठी या जगाच्या पाठीवर असे काही खास भूभाग आहेत की ज्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास काहीही कर वगरे भरावा लागत नाही आणि पदरचा पसा सुरक्षितही राहू शकतो; तर ब्रिटिश व्हर्जनि आयलँड्स (बीव्हीआय), द कूक आयलँड्स, सामोआ, सिंगापूर व अन्य असे दहा भूभाग भूतलावर आहेत. त्यांनाच ऑफशोअर टॅक्स हेवन्स असं म्हणतात. आणि ही ठिकाणं खरंच स्वर्गादपि सुंदरच आहेत असंच म्हणावं लागेल. असो.
फायरपॉवर स्कँडल हा ऑस्ट्रेलियातील आजवरचा सर्वात मोठा आíथक घोटाळा. त्यात हेच ऑफशोअर टॅक्स हेवन्सचे लागेबांधे होते. ऑस्ट्रेलियातील राजकारणी, उद्योजक, रग्बीपटू वगरे या स्कँडलमध्ये त्यांच्या रोक्ष-अपरोक्ष गुंतले होते. या स्कँडलचा मागोवा घेता घेता आयसीआयजेचे संचालक गेरार्ड राइल यांच्या हाती एके दिवशी कम्प्युटरचा हार्ड ड्राइव्ह लागला. त्यात तब्बल २६० गिगाबाइट एवढय़ा माहितीचा साठा होता. त्यात २५लाख फाइली होत्या, ज्यात २० लाखांहून अधिक ई-मेल्स, अर्धा दशलक्ष शाब्दिक मजकूर, स्प्रेडशिट्स, पीडीएफ फाइल्स, इमेजेस आणि वेब फाइल्स आदींचा भरणा होता.
हार्ड ड्राइव्हच्या माध्यमातून
या सर्व डेटामध्ये देशोदेशीच्या बडय़ा बडय़ा व्यक्तींच्या संपत्तीचा विनियोग कोणकोणत्या कंपन्यांच्या/विश्वस्त संस्थांच्या नावाने कुठकुठल्या देशात गुंतवण्यात आला होता, याची साद्यंत माहिती या सर्व डेटात होती. एक लाख २२ हजार ऑफशोअर कंपन्या किंवा विश्वस्त संस्था, १२ हजार एजंट्स आणि एक लाख ३० हजार लाभार्थी, मालक किंवा प्रतिनिधी यांच्या नावांचा यात समावेश होता. एवढं मोठं घबाड हाती आल्यानंतर साहजिकच आयसीआयजेची सर्वच यंत्रणा कामाला लागली. हार्ड ड्राइव्हच्या माध्यमातून शोध पत्रकारितेच्या इतिहासातील सर्वात मोठे प्रकरण उघडकीस आले.
४० टक्के डय़ुप्लिकेट्स
आयसीआयजेने डेटाच्या केलेल्या प्राथमिक पृथक्करणातून या डेटातील सुमारे ४० टक्के फाइली आणि ई-मेल्स डय़ुप्लिकेट असल्याचे निष्पन्न झाले. या पृथक्करणातून ओळख पटवण्यात आलेल्या बहुतांश व्यक्ती या त्या त्या संबंधित संस्थेचे किंवा एकाच वेळी अनेक संस्थांचे वा कंपन्यांचे शेअरहोल्डर्स, संचालक, सचिव किंवा नामधारी पदाधिकारी होते. म्हणजे संबंधित कंपनी अथवा विश्वस्त संस्था नेमक्या कोणाच्या नावाची आहे याची खरी ओळख लपवण्यात आली होती.
यत्र तत्र सर्वत्र
एकाच वेळी हजारो कंपन्यांच्या संचालक, विश्वस्तपदी असणे ही खरं तर राजकारण्यांची ओळख. मात्र, अमूक इतके पसे मिळाले तर माझे नाव त्या कंपनीच्या संचालक अथवा विश्वस्त पदावर असायला माझी हरकत असणार नाही. त्यासाठी वर्षांकाठी काहीएक रक्कम मला द्या.. अशीच पटवापटवी या प्रकरणात होती. म्हणजे टॅक्स हेवन्समध्ये एकच व्यक्ती हजारो कंपन्यांच्या विश्वस्त किंवा संचालकपदी असू शकते. असंच याही प्रकरणात आढळून आलं. त्यामुळे एकाच व्यक्तीची नावं वारंवार यत्र तत्र सर्वत्र आढळली. मूळ कंपनी कोणाची याची काडीमात्र माहिती नसलेले त्या कंपनीच्या शेअरहोल्डर्स, संचालक किंवा विश्वस्तपदी होते. मूळ कारण त्यांना मिळणारी त्यासाठीची गलेलठ्ठ  फी.
करबुडव्यांचे देश
चीन, हाँगकाँग, तवान, रशिया, अझरबजान, युक्रेन, सायप्रस, न्यूझीलंड या देशांमधील अनेक व्यक्तींनी ऑफशोअर एन्टायटीज स्थापन केल्याचे या डेटात दिसून आले. अर्थात ही वानगीदाखलची नावे आहेत. प्रत्यक्षात देशांच्या नावांची यादी १७० आहे. या देशांत असलेली शासनव्यवस्था आणि करप्रणाली यावरून सहजच संबंधित देशांतील धनदांडग्यांनी टॅक्स हेवन्सचा आश्रय का घेतला हे समजून येते.  
 पृथक्करण
प्राप्त डेटा क्लिष्ट होता. त्यात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. संगणकीय तंत्रज्ञानाचे अडथळे होते. मात्र, या सर्व अडचणींवर मात करण्याची आयसीआयजेच्या शोध पत्रकारांची तयारी होती. सर्व प्रकरण मुळापासून खणून काढण्यासाठी आयसीआयजेशी संलग्न असलेल्या ४६ देशांमधील मीडिया हाऊसेसमधील ८६ शोध पत्रकारांनी अनेक खस्ता खाल्ल्या. त्यासाठी बाह्य़शक्तींची मदत घेण्यात आली. युनिक डिजिटल सिस्टीमच्या आधारे खासगी दस्तऐवज आणि माहिती यांचे शेअिरग करण्यात आले. या कामी युरोप व अमेरिकास्थित ऑनलाइन रिसर्च सिस्टीममधील मेसेज सेंटरचा वापर करण्यात आला.
अगम्य भाषेतील ई-मेल्स
आयसीआयजेकडे प्राप्त झालेल्या हार्ड ड्राइव्हमधील लाखो ई-मेल्सपकी बहुतांश अगम्य भाषेतले (एनक्रिप्टेड) होते. त्यांची फोड करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्याला फ्री टेक्स्ट र्रिटायव्हल (एफटीआर) सिस्टीम म्हणतात. ही सिस्टीम तुमच्याकडील डेटा, आकडेवारी, शब्द, नाव यांना एक विशिष्ट क्रमांक देते (प्री-इंडेक्स) आणि त्यानंतर त्यांची गणितीय भाषेत सोडवणूक करून माहितीचा अन्वयार्थ लावते.
एनयूआयएक्सची कमाल
ऑफशोअर टॅक्स हेवन्सच्या या प्रकरणात सर्वात मोठी आणि प्रमुख भूमिका बजावली ती सिडनीतील एनयूआयएक्स या संस्थेने. उच्च कोटीची तांत्रिक माहिती सोपी करून ती ओळखता येईल एवढय़ा टप्प्यात आणून ठेवणे ही अगदी सोपी आणि सुटसुटीत व्याख्याच त्यासाठी उपयुक्त ठरेल. एनयूआयएक्सने तिच्याकडील हे ई-डिस्कव्हरी सॉफ्टवेअरचं तंत्रज्ञान आयसीआयजेला मोफत उपलब्ध करून दिले. त्यामुळे टॅक्स हेवन्समध्ये रमणाऱ्या देशोदेशीच्या व्यक्तींची नावे व अन्य तपशील जगासमोर येणे अधिक सोपे झाले. जर्मनी, ब्रिटन आणि कोस्टा रिका येथील संगणक अभियंत्यांनी आयसीआयजेसाठी डेटा मायिनग आणि क्लििनग सॉफ्टवेअरचा वापर करून उपलब्ध डेटामधील आणखी एक क्लिष्टता दूर केली. त्यानंतर संपूर्ण डेटा वाचनीय झाला व देशागणिक त्या त्या व्यक्तीच्या नावाचा तपशील, त्याची एकंदर संपत्ती, त्याने कुठल्या ‘स्वर्गा’त गुंतवणूक केली आहे, किती प्रमाणात केली आहे वगरेचा तपशील उघडकीस आला. त्याची वर्गवारी न्यूझीलंडमध्ये करण्यात आली.
इंटर डेटाची स्थापना
या सर्व तुकडय़ांचे एकत्रीकरण करून इंटर डेटा तयार करण्यात आला. ब्रिटिश संगणक प्रोग्रामर्सनी डिसेंबर, २०१२मध्ये दोन आठवडय़ांच्या कालावधीत हा इंटर डेटा तयार केला. या इंटर डेटाच्या माध्यमातून आयसीआयजेशी संबंधित देशांतील पत्रकारांनी मग त्यांच्याकडील माहिती या डेटात डाऊनलोड केली. तसेच आयसीआयजेकडे प्राप्त असलेल्या माहितीच्या आधारावर अधिक संशोधन करून संबंधित बडय़ा धेंडांच्या उत्पन्नाचे स्रोत, तसेच त्यांच्या गुंतवणुकीचे तपशील आदी माहिती गोळा करून इंटर डेटामध्ये अपलोड केली.  जे दस्तऐवज वाचता येण्याजोगे नव्हते, उदाहरणार्थ- काही ठिकाणी छायाचित्रे होती, काही ठिकाणी पासपोर्टसशी संबंधित माहिती होती, काही ठिकाणी नुसतीच आकडेवारी होती तर काही ठिकाणी कोडवर्डस् होते. या सर्वाची उकल करण्यासाठी ऑप्टिकल कॅरॅक्टर रेगक्निशन (ओसीआर) सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. त्यामुळे डझनावारी नवी माहितीची कागदपत्रे, पासपोर्ट कोणाच्या नावाने आहे वगरेची माहिती तसेच संबंधित कंपन्या/संस्था कोणाच्या नियंत्रणाखाली आहेत आदी संवेदनशील माहिती हाती लागली. हाती आलेली माहिती  इंटरडेटात फीड करण्यात आली. संबंधित व्यक्तीचे नाव, त्याचा देश, त्याच्याकडील मालमत्तेचा तपशील याची पडताळणी करण्यात आली. तब्बल १५ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर माहितीचे सर्व धागे जुळून आले आणि ऑफशोअर टॅक्स हेवन्सच्या बातमीचा ग्लोबल धमाका उडवून देण्यात आला.
फायरपॉवर स्कॅण्डल
इंधन बचत करणारी तसेच पेट्रोलचा वापर कमी व्हावा यासाठी काम करणारी कॅप्सुल तयार करणारी कंपनी म्हणून फायरपॉवर इंटरनॅशनल नावाची एक कंपनी होती. तिची नोंदणी हाँगकाँगमधील होती. मात्र, ऑस्ट्रेलिया, रशिया, ऱ्होड्स, पापुआ न्यू गीनिआ या देशांमध्ये या कंपनीची कार्यालये होती. या कंपनीचा सर्वेसर्वा टिमोथी जॉन्स्टन याने ऑस्ट्रेलियातील रग्बी खेळाडूंच्या एका क्लबला अर्थपुरवठा करण्यासाठी तयारी दर्शवली. त्याने २००७ मध्ये तब्बल ६० दशलक्ष डॉलर निधी गुंतवणूकदारांकडून उभारला. त्यानंतर दिवाळखोर झाला. या प्रकरणात अनेकांचे पसे बुडीत गेले. ऑस्ट्रेलियन सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट कमिशनने जॉन्स्टनची चौकशी केली. त्यातून या प्रकरणात अनेक राजकारण्यांचे हितसंबंध गुंतल्याचे लक्षात आले. ऑस्ट्रेलियातील हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा म्हणजे फायरपॉवर स्कँडल.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा