आमच्यामुळे महाविद्यालयाचे, विद्यापीठाचे कुठे कुठे अडते, हे दाखवून देण्याचा प्रयत्न संपकरी प्राध्यापक गेले ९० दिवस परीक्षांवरील कामावर बहिष्कार घालून करीत आहेत. या मार्गाने सरकारचे नाक दाबले जावे, असे संपकरी ‘एमफुक्टो’ या प्राध्यापकांच्या संघटनेचे डावपेच आहेत. पण, यात सरकारचे कुठे काहीच बिघडलेले नाही. कारण, आपल्या मागण्या वदवून घेण्यासाठी प्राध्यापकांनी जे मार्ग अनुसरले त्याचा फटका आतापर्यंत फक्त विद्यार्थ्यांनाच बसला आहे. परीक्षेच्या कामात प्रत्येक टप्प्यावर अडवणूक करून आपली शिक्षक असण्याची पुरेपूर ‘किंमत’ या आधुनिक द्रोणाचार्यानी एकलव्याकडून वसूल केली आहे. त्यांच्या करिअरविषयक नियोजनाचा खेळखंडोबा, मनस्ताप, अस्वस्थता जे जे काही शिक्षकांना देता येतील ते ते त्यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे. या सगळ्यानंतरही त्यांच्यामधला ‘शिक्षक’ जागा आहे का, असा प्रश्न पडतो.
अमुकतमुक शाळा किंवा महाविद्यालयातील शिक्षकाने माझ्या आयुष्याला वळण लावलं किंवा त्यांच्यामुळेच घडलो, असे कृतज्ञतेने सांगणारे अनेकजण आपल्याला आजूबाजूला दिसतील. कुणा शिक्षकाने त्यांच्यातला आत्मविश्वास जागवलेला असतो किंवा कुणी त्याच्यातल्या सुप्त गुणांना जागे केलेले असते. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन घरच्या समस्यांपासून ते आयुष्यात आलेल्या ‘स्पेशल’ मित्र किंवा मैत्रिणीविषयीही कुणी शिक्षकांशी हितगूज केलेले असेल. पण, प्राध्यापकांच्या संपाच्या पाश्र्वभूमीवर अमुकतमुक शिक्षकामुळे माझी सीएची प्रवेश परीक्षा किंवा तमुक एका विद्यापीठात वा परदेशात जाण्याची संधी हुकल्यानं एक वर्ष फुकट गेले, असे रागारागाने सांगणारे विद्यार्थी सर्वत्र दिसतील. गेले ९० दिवस चाललेल्या या प्राध्यापकांच्या संपाचे फलित हे आहे. या संपातून संघटनेला जे मिळेल ते मिळो, पण या संपाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आदर, प्रेमापासून त्यांच्या गुरूंना भविष्यात मुकावे लागणार आहे.
आपल्यामुळे विद्यापीठाचे, महाविद्यालयाचे अडते हे दाखविण्यासाठी ४ फेब्रुवारीपासून जे जे करता येईल ते ते संपकरी प्राध्यापकांनी केलेले आहे. पण, या सगळ्या संघर्षांत जर खरेच कुणाचे अडत असेल तर ते आहे, वर्षभर जीव तोडून मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे. सुरुवात महाविद्यालयाच्या परीक्षांपासून झाली. शिक्षकांच्या असहकारामुळे काही महाविद्यालयांनी परीक्षा रद्द केल्या, काहींनी लांबवल्या, तर काहींनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केल्या. अजूनही काही महाविद्यालयांमध्ये परीक्षा झालेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आता ही महाविद्यालये शिक्षकांची बहिष्कारातून माघार घेत असल्याची पत्रे आल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात परीक्षा घेत आहेत. संपकरी शिक्षकांचे काहीच गेले नाही. त्यांचे फेब्रुवारी-मार्चमधले परीक्षेचे काम एप्रिल-मे महिन्यापर्यंत लांबले. पण या लांबलेल्या परीक्षांमुळे अनेक विद्यार्थ्यांचं भरून येता येणार नाही, असं नुकसान झाले आहे. उल्हासनगरच्या सीएचए महाविद्यालयाचे उदाहरण घेऊ.
मे महिन्यापर्यंत महाविद्यालयांच्या, विद्यापीठांच्या परीक्षा संपलेल्या असतात म्हणून सीएसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा या महिन्यात घेतल्या जातात. पण, संपाच्या ‘कृपे’मुळे सीएचएम महाविद्यालयात एप्रिलपर्यंत परीक्षा झालेल्या नव्हत्या. आता येथील प्राध्यापकांनी वेतन कपातीच्या भीतीने संपातून माघार घेत असल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे, ५ मे पासून महाविद्यालयाने परीक्षा घ्यायचे ठरविले. पण, याच काळात सीएचीही परीक्षा आल्याने महाविद्यालयाची परीक्षा देऊ की सीएची अशा द्विधा मन:स्थितीत इथले विद्यार्थी सापडले. महाविद्यालयाच्या परीक्षा आणखी लांबविण्यास प्राचार्य तयार नव्हत्या. या परीक्षा आधीच झाल्या असत्या तर मुलांना शांतपणे सीएच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करून परीक्षा देता आली असती. पण, आता मुलांना सकाळी महाविद्यालयाची परीक्षा देऊन तातडीने सीएचे परीक्षा केंद्र गाठावे लागणार आहे. अशा मानसिक आणि शारीरिक त्रासातून दिलेल्या या दोन्ही परीक्षांचा निकाल असून असून किती चांगला असणार आहे? या मुलांशी बोलताना शब्दाशब्दांत त्यांचा प्राध्यापकांवरील राग व्यक्त होतो. त्यांच्या करिअरशी खेळणाऱ्या शिक्षकांविषयी त्यांनी आदर बाळगावा, अशी अपेक्षा तरी कशी करता येईल?
संप फेब्रुवारीला सुरू झाला. त्या वेळी सरकारने वेतन कपातीची धमकी दिली. त्यावर ‘आम्ही आमची महाविद्यालयातील कामे सोडलेली नाहीत. आमचा बहिष्कार केवळ परीक्षांवर आहे,’ असे संघटनेकडून सांगण्यात आले. ही कामे म्हणजे लेक्चर्स, मार्गदर्शन करणे वगैरे. पण, कुठल्या महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीनंतर लेक्चर्स घेतली जातात? मुले अभ्यासात मश्गुल असल्याने मार्गदर्शन घेण्यासाठीही महाविद्यालयात फिरकत नाहीत. फेब्रुवारी-मार्चमध्ये ते फिरकतात ते केवळ परीक्षा देण्यासाठी. पण, शिक्षकांचा याच कामावर बहिष्कार. मग ते महाविद्यालयात येत तरी का होते? आणि कुठल्या कामाची ढाल पुढे करून ते फेब्रुवारी-मार्च-एप्रिलमधील पगारावार हक्क सांगत होते? या महिन्यात त्यांनी जे काम करणे अपेक्षित होते ते त्यांनी केलेलेच नाही. मग त्यांना या महिन्याचे वेतन तरी सरकारने का द्यावे?टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकनाचे गुण विद्यापीठाकडे सुपूर्द करणार नाही, हा आणखी एक अडवणुकीचा प्रकार. खरेतर हे मुलांच्या वर्षभर केलेल्या मूल्यांकनाचे गुण आहेत. शिक्षकांचा बहिष्कार सुरू झाला ४ फेब्रुवारीला. पण, आम्ही काय करू शकतो (की कुठल्या थराला जाऊ शकतो) हे दाखविण्यासाठी अंतर्गत मूल्यांकनाचे गुण विद्यापीठाकडे सुपूर्द न करण्याचा पवित्रा संपकरी शिक्षकांनी घेतला आहे. आपल्या प्राध्यापक असल्याची पुरेपूर किंमत जणू या प्रकारच्या अडवणुकीतून प्राध्यापक वसूल करीत आहेत.
विद्यार्थ्यांचे तुमच्या संपामुळे किती नुकसान होतंय, असं म्हटलं की, ‘आमची मुलं नाही का परीक्षेला बसलेली, त्यांचे नाही का नुकसान होत,’ असा एक युक्तिवाद केला जातो. पण, परीक्षा न होण्याने सामान्य विद्यार्थी जितके अस्वस्थ होत असतील, तितकी प्राध्यापकांची मुले कशी होतील? किंवा आपले मूल परीक्षेला जाते आणि परीक्षा न देताच परत येते, हे जितके प्राध्यापकांनी पचवले आहे तितके सर्वसामान्य पालक कसे पचवतील.खरेतर हे बहिष्कार आंदोलन ‘सन्मानपूर्वक’ संपविण्याच्या अनेक संधी चालून आल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी या सर्व वादात आपला शब्द खर्ची घालण्यास दाखविलेली तयारी. पवारांनी थेट दिल्लीपर्यंत आपली पत यात लावली. पण, त्यांच्या शब्दालाही संपकरी प्राध्यापकांनी मान दिला नाही.
आमच्या बहिष्कारामुळे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलाव्या, असा संपकरी प्राध्यापकांचा आग्रह. आंदोलनाला न जुमानता सर्वच विद्यापीठांनी टप्प्याटप्प्याने प्रात्यक्षिक परीक्षा सुरू केल्या. पण, प्राध्यापकांच्या असहकारामुळे अनेक ठिकाणी परीक्षा रद्द कराव्या लागल्या. आता परीक्षा होतील, नंतर होतील या अपेक्षेने मुलांना तासन्तास वर्गावर थांबवून ठेवण्यात आलं. संपात सहभागी नसलेल्या प्राध्यापकांना अडवून त्यांनाही परीक्षा केंद्रांवर जाण्यास मज्जाव करण्यात आला. पण, प्रश्न असा आहे की, संपावर तोडगा निघत नाही म्हणून विद्यापीठाने परीक्षा किती काळ लांबवायला हव्या होत्या? शेकडो परीक्षा, लाखों विद्यार्थी यांमुळे मुंबईसारख्या विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर येणारा ताण प्राध्यापकांना माहीत नाही का? तरीही प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकला हा आग्रह. एकदा बहिष्कार मागे घेतला की आम्ही जीव तोडून काम करू, असा प्राध्यापकांचा त्यावर युक्तिवाद. पण, महिना महिना लांबलेल्या परीक्षा कशा काय जीव तोडून काम करून घेणार? प्राध्यापक दिवसभर एकाच ठिकाणी बसून, तीन तासांऐवजी सहा तास काम करून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करू शकतात. पण, मर्यादित वेळेत परीक्षा आवरत्या घेण्यासाठी मुलांना काय एकाच दिवशी तीन-तीन पेपर द्यायला लावायचे?
उलट सरकारने नमते घ्यावे यासाठी संपकरी प्राध्यापकांकडे ‘गांधीगिरी’चे उत्तम मार्ग उपलब्ध होते. उत्तरपपित्रका तपासणी केंद्रांवर बसून दिवसरात्र मूल्यांकन करायचे. काळ्या फिती लावलेले शिक्षक घरी न जाता दोन-तीन दिवस या केंद्रांवर ठाण मांडून उत्तरपत्रिका तपासून आपला निषेध व्यक्त करताहेत, हे सर्वत्र दिसून किंवा छापून आलेले चित्र किती परिणामकारक झाले असते. यामुळे सरकार नाक घासत तर आलेच असते, पण परीक्षेचे कामही थांबले नसते. उलट वेळेआधी पूर्ण होऊन विद्यार्थ्यांचे निकालही वेळेत लागले असते.शिक्षकांच्या मागण्या किंवा त्या पूर्ण करण्याची सरकारची पद्धत योग्य की अयोग्य, या वादात शिरण्याचे कारण नाही. कारण, त्यावर आतापर्यंत खूप चवितचर्वण झाले आहे. पण, या मागण्या पदरात पाडण्याचा शिक्षकांचा मार्ग मात्र केवळ विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याच्या प्रकारामुळे आततायीपणाचा वाटतो. परीक्षाविषयक कामावर बहिष्कार टाकण्यापेक्षा वरीलप्रमाणे अभिनव पद्धतीने प्राध्यापकांना आपल्या मागण्या मांडल्या असत्या तर त्या आतापर्यंत सरकारच्या गळी उतरल्याही असत्या.
प्राध्यापकांनी या प्रकारे अभिनव पद्धतीने आंदोलन करणे हे प्राध्यापकांच्या बौद्धिक प्रतिष्ठेलाही साजेसे ठरले असते. या शिवाय आमरण उपोषणाचा मार्गही खुला होताच. पण, सरकारने तोंड उघडावे यासाठी प्राध्यापकांना विद्यार्थ्यांचे नाक दाबण्याचा मार्ग जास्त जवळचा वाटला, यासारखी शोकांतिका ती काय? तुमच्यातला शिक्षक अजून जागा आहे, हा प्रश्न या संपकरी प्राध्यापकांना विचारावासा वाटतो तो याचसाठी?
तुमच्यातला शिक्षक अजून जागा आहे?
आमच्यामुळे महाविद्यालयाचे, विद्यापीठाचे कुठे कुठे अडते, हे दाखवून देण्याचा प्रयत्न संपकरी प्राध्यापक गेले ९० दिवस परीक्षांवरील कामावर बहिष्कार घालून करीत आहेत. या मार्गाने सरकारचे नाक दाबले जावे, असे संपकरी ‘एमफुक्टो’ या प्राध्यापकांच्या संघटनेचे डावपेच आहेत. पण, यात सरकारचे कुठे काहीच बिघडलेले नाही.
First published on: 06-05-2013 at 02:57 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher within you is still alive