अफझल गुरू कारागृहात असताना त्याने संसदेवरील हल्ल्याची हकिगत एका मुलाखतीत सांगितली होती, त्यातील काही निवडक भाग.
दहशतवादी कारवायांकडे कसा वळलास?
तो १९९० चा काळ होता. जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडीचा काश्मीरमध्ये बराच बोलबाला होता. त्या संघटनेचा मी सदस्य होतो. त्यांच्यामार्फतच तीन महिने पाकिस्तानात गेलो होतो. तिथे पंधरा दिवस लष्करी अधिकाऱ्यांनी मला प्रशिक्षण दिले होते. जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडी हे पस्तीस संघटनांचे कडबोळे होते. त्यांना परदेशातून पैसा मिळत होता. प्रशिक्षण मिळत होते, परंतु त्याचा वापर योग्य प्रकारे करीत नव्हते. त्यांच्यातच खूप मतभेद होते व एकमेकांविरोधात तेच लढत होते. ते मला आवडले नाही. त्यामुळे पंचवीस दिवस काश्मीरमध्ये राहून मी दिल्लीत आलो. तत्पूर्वी काश्मीरमध्ये एसटीएफवाल्यांनी मला पकडून नेऊन छळले होते. त्यांनी माझ्याकडून लाचही घेतली होती. माझी आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, त्यामुळे दहशतवादी कारवायातून पैसे मिळण्याची आशा होती. शिवाय आमच्या संघटनेला (जैश ए महंमद) एक व्यापक दृष्टी होती. मला काश्मीरच्या स्वातंत्र्याची त्यातून प्रेरणा मिळत होती म्हणून मी याकडे वळलो.
दहशतवादी कारवायांमुळे भारतातील इतर मुस्लीमही बदनाम होतात याविषयी काय वाटते?
या मताशी मी सहमत आहे, की अनेकदा दहशतवादी कारवायांमुळे भारतातील इतर मुस्लिमांकडेही संशयाने बघितले जाते, पण त्याविषयी आपण काही करू शकत नाही. त्यांच्या वेदना मलाही समजतात.
संसद हल्ल्याचा खरा सूत्रधार असलेला गाझीबाबा याच्याशी तुझे काय संबंध होते?
गाझीबाबा हा माझे प्रेरणास्थान होता. गाझीबाबाला स्वतंत्र काश्मीर हवे होते. मी सहा महिने त्याच्याबरोबर वास्तव्यास होतो. संसद हल्ल्याच्या अगोदर तीनदा त्याला भेटलो होतो. गाझीबाबा व मी यांच्यात तारीक नावाचा एक मध्यस्थ होता. हल्ल्याच्या अगोदर मला एक लॅपटॉप, दहा लाख रुपये व २५ हजार रुपये घरभाडे देण्यात आले होते. हा लॅपटॉप मी एका रविवारी दीड वाजता श्रीनगर येथे असलेल्या गाझीबाबाकडे पोहोचता करण्यासाठी तारीकला दिला, त्याबरोबर एक डायरीही होती. त्यात काय होते ते मला माहीत नाही.
गाझीबाबाच्या पाठीमागे कोण होते?
गाझीबाबाला जैश- ए -महंमदचा म्होरक्या मौलाना मासूद अझर याची प्रेरणा होती.
संसदेवर हल्ल्याचा नेमका उद्देश काय होता?
लोकसभेत घुसून संसद सदस्य, राजकीय नेत्यांना खलास करणे हा त्यांचा हेतू होता, असे त्यांनी मला सांगितले होते.
संसद हल्ल्यात तुझी भूमिका काय होती?
हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना मी रसद पुरवठा केला. त्यांना हव्या त्या गोष्टी, माहिती उपलब्ध करून दिली.
संसद हल्ल्याची नेमकी योजना काय होती?
उ. महंमद नावाचा अतिरेकी दीड महिना माझ्याबरोबर होता. त्याने संसद, दिल्लीची विधानसभा, चाणक्यपुरी या भागांची रेकी केली होती. नंतर तो गाझीबाबाला भेटला. मग अंतिम लक्ष्य काय आहे, असे विचारले असता त्याने अगदी शेवटी संसदेवर हल्ला करण्यास गाझीबाबाने सांगितले असल्याचे म्हटले होते.
संसद हल्ल्यातील अतिरेक्यांना काय मदत केली होती?
त्या पाचही जणांना मी दिल्लीत आणले. ते पंजाबी बोलणारे होते, पण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातले होते. हल्ल्याच्या अगोदर महंमद, राजा यांनी पाकिस्तानात त्यांच्या आईवडिलांना फोन केले. आता आमची परीक्षा आहे, ती आम्ही पार पाडली तर बक्षिशी मिळेल, असे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. राजाची आई तर रडायला लागली. त्याने तिची समजूत काढली, ईदच्या शुभेच्छाही दिल्या. महंमद तर नेहमी इंटरनेटवर चॅटिंग करायचा, पण तो नेमका काय संदेश पाठवीत असे हे मला माहीत नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा