|| अब्दुल कादर मुकादम
काश्मीर खोऱ्यात आपल्या सैन्याकडून असंख्य दहशतवादी मारले गेले. तरीही या हिंसाचारी कृत्यांची शृंखला संपली नाही. कारण त्यांच्या मागोमाग धर्माच्या अफूच्या गोळीची नशा चढलेली दुसरी तुकडी त्यांची जागा घ्यायला तयार असते. अजूनही वाहबी इस्लामच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव मुस्लीम समुदायावर पडलेला आहे. त्यातून त्यांना मुक्त करणे हाच दहशतवाद नष्ट करण्याचा परिणामकारक मार्ग आहे..
काश्मीरमधील उरी येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील हा हिंसाचारी भस्मासुर काही काळ निद्रिस्त झाला होता; परंतु गेल्या १४ तारखेला पुलवामा येथील हल्ल्याने तो पुन्हा नव्या जोमाने जागा झाल्याचा दारुण अनुभव आपल्याला घ्यावा लागला. हा हल्ला आतापर्यंतच्या सर्व हल्ल्यांत सर्वात मोठा आणि अधिक हिंस्र होता. कदाचित त्यामुळेच पाकिस्तानला अपेक्षित नसलेली भारत सरकारची आणि तमाम भारतीय जनतेची तीव्र प्रतिक्रिया अजूनही सहन करावी लागत आहे. आता केवळ निषेध करून भागणार नाही. तर यापुढे भारतात असा हिंसाचार घडवून आणण्याची पाकिस्तानला हिंमतच होणार नाही, असा धडा शिकविण्याची वेळ आली आहे. ही आम जनतेची भावना आहे.
हा अमानुष हल्ला झाल्यापासून गेला आठवडाभर हा विषय सतत चर्चेत राहिला; पण या विषयाशी संबंधित ‘इस्लाम’ हा महत्त्वाचा घटक मात्र दुर्लक्षित राहिला आहे. दहशतवादाला धर्म नसतो, असे सातत्याने म्हटले जाते; पण ते अर्धसत्य आहे. कारण दहशतवादी हिंसाचार हा नेहमीच इस्लामच्या नावाने होत असतो. म्हणून दहशतवादाचा मुकाबला करताना बळाचा वापर करणे जसे अपरिहार्य आहे तसेच ‘धर्म’ हा घटक या हिंसाचारात कशा तऱ्हेने कार्यरत असतो किंवा धर्माचा वापर कसा करण्यात येतो, हे समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे.
दहशतवादी संघटना आणि मसूद अझर किंवा हाफिज सईद यांच्यासारखे दहशतवादी नेते आणि आयएसआय ही पाकिस्तानी गुप्तहेर संघटना दहशतवादी हिंसाचारासारख्या हीन आणि अमानुष कृत्यांसाठी इस्लामचा बिनदिक्कत वापर करत असतात, इतकेच नव्हे तर २०-२२ वर्षांच्या तरुणांना धर्माची अफूची गोळी देऊन त्यांना भुरळ घालीत असतात आणि मग हिंसाचार घडवून आणण्याचे आदेश देऊन त्यांना आपल्या मोहिमेवर रवाना करतात. तसेच या अवस्थेपर्यंत या तरुणांच्या विवेकबुद्धीवर दहशतवादी सूत्रधारांनी पूर्णपणे ताबा मिळवलेला असतो.
म्हणूनच मग प्रश्न असा पडतो की, इस्लामी धर्मशास्त्रात किंवा परंपरेत असे काही मोहिनी अस्त्र आहे का, ज्याचा वापर करून असे भयानक उत्पात घडवून आणले जातात?
मदरशांपासून दार-उल-उलुम (देवबंद) जमाते इस्लामीसारख्या सर्वच धर्मपीठांमध्ये अशा तऱ्हेचा इस्लामचा विवेकवादी अभ्यास होत नसतो. इस्लामी श्रद्धेचे पाच स्तंभ, त्यातून निर्माण होणारी कर्मकांडे आणि शरीयत एवढीच त्यांच्या अभ्यासाची मर्यादा असते. इस्लामच्या बिगरमुस्लीम अभ्यासकांविषयी काय बोलावे? ‘इस्लाम हा हिंसाचाराला मान्यता देणारा धर्म आहे’ हे सूत्र त्यांच्या डोक्यात इतके ठाम बसलेले असते की, मुळात हे सत्य आहे का, याची शहानिशा करण्याचीही त्यांची तयारी नसते.
पण प्रश्न असा उपस्थित होतो की, हा सारा प्रयास कशासाठी? दहशतवादी हिंसाचाराचा मुकाबला शस्त्रबळानेच केला पाहिजे, हा युक्तिवाद योग्य आहे, पण पुरेसा नाही. आजपर्यंत जितके दहशतवादी हल्ले झाले त्यातील एकही दहशतवादी जिवंत परत गेलेला नाही. एक तर काही मानवी बॉम्ब बनून आले होते. दुसरीकडे शस्त्रबळाच्या वापरात आपल्या सशस्त्र दलांकडून ते मारले गेले. तरीही या हिंसाचारी कृत्यांची शृंखला संपली नाही. कारण त्यांच्या मागोमाग धर्माच्या अफूच्या गोळीची नशा चढलेली दुसरी तुकडी त्यांची जागा घ्यायला तयारच होती. तेव्हा शस्त्रबळाचा वापर अपरिहार्य असला, तरी दहशतवादी अमानुषतेला धर्माचा सोनेरी मुलामा चढविला जातो, तेव्हा तो मुलामा खरवडून काढून त्याखालचा दांभिकपणा उघड करणे आवश्यक होऊन बसते.
इस्लाममध्ये ‘धर्मद्रोहाची’ एक संकल्पना आहे. या संकल्पनेप्रमाणे अल्लाह, पैगंबर किंवा कुराण यांच्या बाबतीत जाणता अजाणता जरी काही अपमानास्पद कृती घडली, तर तो धर्मद्रोहाचा गुन्हा समजला जातो आणि त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. अनेक इस्लामी राष्ट्रांत अशा धर्मद्रोहाविरोधात कायदे करण्यात आलेले आहेत. पाकिस्तानात असा कायदा अस्तित्वात आहे. याचा इथे उल्लेख करण्याचे कारण इतकेच की, काही वर्षांपूर्वी भारतातील जवळजवळ सर्वच धर्मपंडितांनी (उलेमांनी) पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून होणारा हिंसाचार इस्लामविरोधी आहे, अशी जाहीर भूमिका घेऊन त्याचा निषेध केला होता. म्हणजेच पर्यायाने तो धर्मद्रोहच होता; पण निषेध करून हे उलेमा थांबले. त्यांनी त्यापुढचे पाऊल म्हणून दहशतवाद्यांना धर्मद्रोही ठरवून पावित्र्य विटंबना कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करावयास पाहिजे होती; पण त्यांनी ती केली नाही. अर्थात पाकिस्तानी दहशतवाद्यांना इस्लामद्रोही ठरविल्यामुळे पाकिस्तानी हैवान देवदूत बनतील, असे समजणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेण्यासारखे होईल. तरीही एक डावपेचाचा भाग म्हणून असा विषाला विषाचा उतारा देणे आवश्यक आहे, कारण पाकिस्तानी लष्करशहा आणि मसूद किंवा हाफिजसारख्या हैवानांना तीच भाषा कदाचित समजू शकेल. जगभरच्या लोकांना मात्र त्यांचा धार्मिक दांभिकपणा समजायला वेळ लागणार नाही.
वास्तविक पाकिस्तानची निर्मितीच धार्मिक विचारांच्या पायावर झाली; पण त्याच्या जन्मकाळीच भयानक जातीय दंगली झाल्या. धर्म हा राष्ट्रनिर्मितीचा आधार होऊच शकत नाही. म्हणूनच जन्मल्यापासून केवळ पाव शतकाच्या काळातच भाषा आणि संस्कृतीच्या पायावर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. तेव्हाही नियतीने त्यांना आणखी एक संधी दिली, पण पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना तिचाही फायदा उठविता आला नाही. कारण शिया-सुन्नी, अहमदिया यांसारखे पंथभेद, विविध भाषा आणि भौगोलिक अस्मिता यांसारख्या अंतर्गत भेदांनी पाकिस्तान पोखरले गेले आहे. अशा परिस्थितीत भारताच्या शत्रुत्वाचा बागुलबुवा उभा करून आपले अस्तित्व टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न पाकिस्तानच्या लष्करशहांना करावा लागत आहे, तोही धर्माचा वापर करून. म्हणूनच डावपेचाचा भाग म्हणून या विषाला विषाचाच उतारा देणे योग्य होईल असे वाटते.
इस्लामी परंपरेत जिहाद हा आणखी एक शब्द दहशतवादी जगतात चलनी नाण्यासारखा वापरला जात आहे. तोही जिहाद म्हणजे धर्मयुद्ध या अर्थाने! जिहादचा हा अर्थ पूर्णत: चूक आहे. कारण कुराणात जिहाद म्हणजे युद्ध या अर्थाने जिहाद हा शब्द कुठेही आलेला नाही. युद्धासाठी कित्ल हा शब्द वापरला गेला आहे. अरबी भाषेचे कोशकार इमाम रगीब यांच्या कोशाच्या आधारे डॉ. इंजिनीयर यांनी जिहद या धातूपासून निर्माण झालेल्या जिहाद या शब्दाच्या अर्थाच्या विविध छटा स्पष्ट करून असा निष्कर्ष काढला आहे की, प्रगल्भ आकलनशक्ती, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता या मूल्यांच्या पूर्ण बांधिलकीने कुठलेही काम करणे म्हणजे जिहाद. शिवाय या जिहादमध्ये, जिहाद-ए-अकबर म्हणजे उच्च दर्जाची जिहाद आणि जिहादे असगर म्हणजे निम्न दर्जाची जिहाद म्हटले जाते. माणसाच्या व्यक्तिमत्त्वातील अपप्रवृत्ती किंवा षड्रिपूंवर आपल्या मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमतांचा यथायोग्य वापर करून पूर्ण बांधिलकीने मात करणे, म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत आणि प्रगल्भ करण्याचा प्रयत्न असतो आणि त्याला जिहादे अकबर असे म्हणतात. तसेच समाजाच्या कल्याणासाठी किंवा विकासासाठी नि:स्वार्थ बुद्धीने कार्य करणे म्हणजे जिहादच असतो आणि त्यालाही जिहादे अकबर म्हटले जाते. इथे असा प्रश्न उपस्थित होतो की, जिहादचा संबंध युद्धाशी येतच नाही का? याचे उत्तर होय असेच आहे; पण कुठल्याही युद्धाशी आलेला संबंध हा जिहाद नसतो. इस्लाममध्ये अन्यायाचे परिमार्जन, आक्रमणाचा प्रतिकार आणि आत्मसंरक्षण या कारणास्तवच युद्ध अनुज्ञेय मानले आहे. अशा युद्धाचा प्रसंग आलाच तर ते युद्धही आपल्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक क्षमतांचा यथायोग्य वापर करून आणि तत्संबंधित मूल्यांच्या बांधिलकीने लढणे या अर्थाने तोही जिहाद असते, पण त्याचा दर्जा निम्नतर मानला जातो.
काही दिवसांपूर्वी आपल्या लष्करप्रमुखांनी दहशतवादाच्या विळख्यात सापडलेल्या तरुणांच्या मातांना आवाहन करून त्यांनी आपल्या मुलांना विनाशाचा मार्ग सोडून योग्य मार्गावर आणण्याचे प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला. हा सल्ला शंभर टक्के योग्य आहे; पण त्यात एक अडचण आहे, जे तरुण या विनाशकारी चक्रव्यूहात सापडले आहेत त्यांच्या विवेकबुद्धीवर असलेल्या विध्वंसक मोहिनीअस्त्राचा प्रभाव नष्ट करण्यासाठी पैगंबरांच्या समग्र क्रांतीचे स्वरूप आणि मूल्ये कोणती होती आणि अठराव्या शतकात होऊन गेलेल्या महंमद इब्न अब्दुल वाहब या आक्रमक सनातनी धर्म पंडिताच्या विचारांचे स्वरूप किती विकृत होते हे विवेकबुद्धीने शिकविणाऱ्या गुरुजनांची आम्हाला गरज आहे; पण त्याचीच वानवा आहे. म्हणूनच इस्लामी जगतात अजूनही वाहबी इस्लामच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव फार मोठय़ा मुस्लीम समुदायावर पडलेला आहे. त्यातून त्यांना मुक्त करणे हाच दहशतवाद नष्ट करण्याचा सर्वात जास्त परिणामकारक मार्ग आहे.
हे प्रभो आम्हाला सरळ मार्ग दाखव
ज्यांना तुझ्या कृपेचा प्रसाद मिळालेला आहे, अशांचा मार्ग दाखव
ज्यांच्यावर तुझी अवकृपा झाली आहे
अशांच्या मार्गावरून जाण्याची दुर्बुद्धी आम्हाला देऊ नकोस॥
कुराण १: ६-७