आज प्रश्न फक्त जि. प.च्या शाळेतील विद्यार्थी ‘कच्चे’ असण्याचा नाही. शिक्षणातील नव्या ‘स्तर-भेदांचा’ ही आहे. महापालिकेच्या शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे गिरवलेल्या युवकाचे हे आत्मचिंतन..
‘असर’च्या (Annual Status of Education Report) अहवालामुळे ‘शिक्षण प्रक्रिया’ व ‘शिक्षण व्यवस्था’ यावर माध्यमांतून चर्चा सुरू आहे. गेले काही दिवस ‘लोकसत्ता’ने शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, अनुभवी कार्यकर्ते यांना या विषयावर लिहिते केले आहे व या एकाच विषयाची चर्चा शक्य तितक्या सर्व बाजूंनी व्हावी हा हेतू त्यामागे आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील आठवी इयत्तेचे काही विद्यार्थी इयत्ता दुसरीच्या मुलांइतके ‘कच्चे’ असल्याचे ‘असर’च्या अहवालाचा निष्कर्ष आहे. हा ‘निष्कर्ष’ हे ‘पूर्ण वास्तव’ असेलही, पण यानिमित्ताने का होईना, आपली ‘शिक्षण प्रक्रिया’ व ‘शिक्षण व्यवस्था’ यातील दोष, उणिवा यांची चर्चा होत आहे ही एक जमेची बाजू आहे.
प्रस्तुत लेखक शालेय शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर महापालिका, जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळा अशा तीनही ‘शिक्षण व्यवस्थेचा’ विद्यार्थी म्हणून बरे-वाईट अनुभव घेतलेला एक युवक आहे, हा झाला एक भाग. दुसरा भाग असा की, प्रस्तुत लेखकाचे वडील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. आयुष्यातील ३७ वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यातील तब्बल २७ वर्षे मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या शाळांत शिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली. त्यामुळे घरात शिक्षण क्षेत्र-व्यवस्था-प्रक्रिया याला पूरक चर्चा चालायचीच. हे ‘आत्मपुराण’ सांगण्याचे कारण म्हणजे या विषयाच्या अनुषंगाने लिहिण्यापूर्वी लेखकाच्या ‘बोनाफाइडस्’बद्दल वाचकांना किमान माहिती असावी. ‘स्व-अनुभव’ या पात्रता निकषावर हा लेख लिहिण्याचे मी धाडस करत आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महात्मा फुल्यांनी प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक व सक्तीचे करण्याची मागणी केली. स्वतंत्र-लोकशाही-प्रजासत्ताक भारतात ‘शिक्षण हक्क’ कायदा करण्यास व राज्यघटनेत ‘शिक्षणाचा अधिकार’ हा मूलभूत अधिकार म्हणून समावेश करण्यास एकविसाव्या शतकाचे पहिले दशक उजाडावे लागले. प्राथमिक शिक्षणाविषयीची सरकारी अनास्था यावर यापूर्वी विविध माध्यमांतून बरीच चर्चा झाली आहे. प्रस्तुत लेखाचा हा विषय नाही, परंतु आजही ‘असर’सारखे अहवाल परत एकदा आपल्याला ‘किमान गुणवत्तेचे प्राथमिक शिक्षण’ या विषयावर चर्चा करायला भाग पाडतात.
ज्या काळात माझा शालेय पातळीवरचा प्राथमिक शिक्षणाचा प्रवास सुरू झाला, त्या वेळी मंडल-कमंडल, आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण असा देशात धामधुमीचा काळ सुरू होता. मराठी शाळांना बरे दिवस होते. महापालिका शाळेत जाणे म्हणजे ‘कमीपणा’ मानला जात नव्हता. खासगी मराठी-इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा पर्याय उपलब्ध असतानाही वडिलांनी शिक्षकाच्या भूूमिकेतून महापालिकेच्या मराठी शाळेचा पर्याय निवडला. त्या वेळी त्यांचे इतर सहकारी शिक्षक बहुतेककरून आपल्या मुला-मुलींना खासगी मराठी-इंग्रजी अनुदानित-विनाअनुदानित शाळांत दाखल करत.
महापालिकेच्या शाळेत असूनही गुणवत्तापूर्ण शिक्षणात आपण कुठे कमी पडतोय असे वाटत नव्हते. समवयस्क मित्र-नातलग खासगी मराठी-इंग्रजी शाळेत जात असताना त्या वेळीही कोणताही ‘न्यूनगंड’ माझ्यात निर्माण झाला नाही. वाचन-लेखन कौशल्य, भाषण-संभाषण कौशल्य, अभ्यासेतर उपक्रम यामुळे पुढील शैक्षणिक वाटचालीत उपयोगी ठरणाऱ्या आपल्या अंगभूत गुणांची ओळख व पायाभरणी मुंबई महापालिकेच्या शाळेतच झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा