कुटुंबातील चौदा जणांची हत्या करून स्वत:ला गळफास लावल्याच्या ठाण्यातील घटनेने देश हादरला.. एवढे क्रौर्य कसे निर्माण होऊ शकते या प्रश्नाने अनेकांना अस्वस्थ केले. अर्थात वैयक्तिक, सामाजिक जीवनात दिसत असलेली ही क्रौर्याची एकमेव घटना नाही. गेल्याच आठवडय़ात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने महिला वाहतूक पोलिसाला केलेली मारहाण असो नाहीतर हरयाणामध्ये जाट आरक्षणाच्या आंदोलनात झालेल्या सामूहिक हिंसाचाराच्या घटना असोत. या घटनांच्या निमित्ताने समाजामध्ये व वैयक्तिक जीवनात हिंसेचा होत असलेला अवलंब नक्कीच चिंता निर्माण करणारा आहे. इतर वेळीही बस-रेल्वे प्रवासात होणारी शिवीगाळ-भांडणे, कोणत्याही मतभेद-वादातून हाणामाऱ्यांपर्यंत जाणाऱ्या घटना, बलात्कार, खून, आत्महत्यांच्या घटना घडतात. या घटनांमधील तपशील जरी वेगळे असले तरी हिंस्रपणाचा भाव मात्र सारखाच आहे. स्वत:ला किंवा दुसऱ्याला इजा पोहोचवण्यासाठी केलेली कृती, अशी हिंसेची ढोबळ व्याख्या करता येईल. यात केवळ शारीरिकच नव्हे तर शिवीगाळ, धमकी देणे अशाही बाबींचा समावेश करता येईल. लोकांमध्ये निर्माण होत असलेले हे हिंसेचे आकर्षण, त्यांच्या अतिरेकी टोकाच्या भूमिका, सार्वजनिक व कौटुंबिक ठिकाणी केले जाणारे आक्रमक वर्तन याचा ऊहापोह मानसोपचारशास्त्राच्या मदतीने केला जात असतो. केवळ मनोविकार किंवा व्यक्तिमत्त्व दोष असणाऱ्यांकडूनच नव्हे तर सामान्य म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तींकडूनही अनपेक्षितपणे गंभीर हिंसक कृती केली जाते. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या हिंसक घटनांच्या पाश्र्वभूमीवर हिंस्र प्रवृत्ती कशी निर्माण होते, त्याची कारणे, व्यक्ती अशा कृती करण्यापर्यंत कशी पोहोचते आणि अशा वृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी करावे लागणारे उपाय यांवर मानसोपचारतज्ज्ञांकडून टाकलेला प्रकाश..

डॉ. वाणी कुल्हळी

Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
Anda Bhurji, knife attack, Pimpri, Anda Bhurji money,
अंडाभुर्जी खाल्ल्याचे पैसे मागितल्याने चाकूने वार
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Nagpur murder, Murder of a youth, revenge ,
उपराजधानीत तीन दिवसांत तिसरे हत्याकांड; मित्राच्या खुनाचा बदला घेत युवकाचा खून

स्वपीडा हा मानसिक आजार

हिंसा जशी दुसऱ्या व्यक्तीला इजा पोहोचवून केली जाते, तशीच ती स्वत:लाही इजा करून केली जाते. कोणतीही व्यक्ती अशा प्रकारे स्वपीडनाकडे वळण्यामागे त्याच्यातील काही शारीरिक व मानसिक बाबी कारणीभूत ठरतात. काहीवेळा मेंदू व चेतासंस्थेच्या आजूबाजूला असणारे ‘५एचआयएए’ या संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्याने या व्यक्ती आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत येतात. या व्यक्ती गळफास घेणे, उंचावरून उडी मारणे, स्वत:ला गंभीर इजा पोहोचवणे अशा हिंसक कृती करून आत्महत्या करत असतात. अशा प्रकारे स्वत:ला इजा पोहोचवणाऱ्यांमध्ये लहान बालके व पौगंडावस्थेतील मुला-मुलींचे प्रमाण जास्त आहे. यातील सहा वर्षांखालील बालकांमध्ये गतिमंदता, आत्मकेंद्रीपणा दिसतो. वेदनेच्या संदर्भातील चेतातंतूंचा अभाव असल्याने ही बालके स्वत:ला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. बालकांमध्ये उद्भवणाऱ्या या समस्या औषधे व वर्तणुकीच्या उपचारांच्या साहाय्याने दूर करता येतात. पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये अशा हिंसक प्रवृत्ती बळावण्यामागे त्यांचा स्वत:बद्दल असणारा न्यूनगंड हे खरे कारण आहे. आपल्यामध्ये काही कमतरता आहे या विचारातून किंवा दु:खद भावनांपासून सुटका करून घेण्यासाठी ही मुले स्वत:ला शिक्षा करण्याचा प्रयत्न करतात. पालकांचे लक्ष वेधण्यासाठी, त्यांच्याकडून मागण्या पूर्ण करण्यासाठीही मुले अशा कृती करत असतात. उदासीनता, व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकल्यानेही हिंसक कृतीतून स्वत:ला इजा करण्याकडे या मुलांचा कल असतो. मान्यवर व प्रसिद्ध व्यक्तीने केलेल्या आत्महत्यांबाबत ऐकल्यानेही अशा अस्थिर व्यक्ती त्यांच्याप्रमाणेच अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. समाजामध्ये असणारी हिंसा व आक्रमकता विविध कारणांनी कमी-जास्त होत असते. पण स्वपीडन करण्याची वृत्ती ही केवळ मानसिक समस्यांमुळे निर्माण होत असल्याने त्यांचे प्रमाण हे नेहमीच स्थिर राहिले आहे. अशा कृतींसाठी नेहमीच कोणत्या तरी मानसिकसमस्या कारणीभूत असतात. त्यामुळे अशा कृती पुन्हा घडण्याची वाट न पाहता या व्यक्तींना मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे. यावर योग्य उपाय केल्यास या समस्या आटोक्यात येऊ शकतात.

डॉ. आनंद नाडकर्णी

जीवशास्त्रीय नाही, मनोसामाजिक आव्हान

हिंसा ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे. उत्क्रांतीच्या प्रवाहात माणसासमोर काही जीवशास्त्रीय आव्हाने निर्माण झाली. त्यामुळे ‘मारले नाही तर मरेन’ असा समज माणसांमध्ये उत्क्रांतीच्या आधीच्या टप्प्यापासूनच आहे. वन्यपशूंचे हल्ले किंवा टोळी करून राहण्याच्या काळात इतरांकडून होणाऱ्या हल्ल्यांना शारीरिक हिंसेने उत्तर दिले जात असे. या प्रकारे हिंसक वर्तन त्या काळाला अनुरूप होते. परंतु, नंतरच्या काळात माणसाने बुद्धीचा व भावनांचा वापर करून संस्कृती व सभ्यता असणारा आताचा समाज निर्माण केला. सध्या माणसासमोर उभ्या राहिलेल्या समस्यांचे स्वरूप जीवशास्त्रीय नसून ते मनोसामाजिक आव्हानांचे आहे. परंतु, आपण या प्रश्नांना मनोसामाजिकतेपेक्षा जीवशास्त्रीय आव्हानेच समजून पूर्वीप्रमाणचे हिंसक कृतींमधून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच अलीकडेच आरक्षणाच्या प्रश्नावरून हरयाणामध्ये झालेला हिंसाचार असो किंवा इतर ठिकाणीही सामूहिकपणे केला जाणारा हिंसाचार असो, अशा प्रकारचे प्रश्न हाताळताना अस्तित्व पणाला लावत हिंसक कृती करण्याकडे कल असतो. परंतु, हे प्रश्न हिंसेचा वापर न करता निराळ्या प्रकारेही सोडवता येऊ शकतात. सध्याच्या काळात समाजात एक प्रकारचा स्वकेंद्रिततेचा प्रवाह निर्माण झाला आहे. यात प्रत्येक जण ‘मी आणि माझे’ या चौकटीतच विचार करत आहे. स्वत:च्या प्रचंड प्रेमात असणारा हा जीवनप्रवाह स्वत:समोर उभा राहिलेल्या प्रत्येक प्रश्नाला जीवशास्त्रीय धोक्याचे स्वरूप देत हिंसाचाराकडे झुकत असतो. त्यामुळे आज हिंसाचार हाच आचार होऊ लागला आहे. हिंसक वृत्ती कमी करण्यासाठी आंधळ्या आत्मकेंद्रिततेकडून डोळस ‘स्व’त्वाकडे प्रवास होणे गरजेचे आहे. ‘स्व’च्या समाजाभिमुख स्वरूपाची ओळख प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या प्राचीन परंपरा, कला यापासून ते आधुनिक साहित्य, कला, शिक्षण यांचा उपयोग करत स्वभान व स्वभाव यांना आकार द्यायला हवा. हे सर्व प्रत्येकापर्यंत पोहोचावे यासाठी सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील. समाजात निर्माण होत असलेली हिंसक प्रवृत्ती, सामूहिक हिंसाचाराच्या वाढत्या घटना या केवळ मानसशास्त्राशी निगडित नसून हा मानवी जीवनावर परिणाम करणारा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. यासाठी समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, कला, साहित्य, राजकारण अशा मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्वच क्षेत्रांमध्ये यावर उपाय शोधला पाहिजे.

डॉ. हरीश शेट्टी

व्यवस्थात्मक सुविधांची गरज

सध्या जागतिकीकरणामुळे जीवनशैली अधिक गतिमान झाली असली तरी या गतीशी जुळवून घेणे अनेकांना जमत नाही. अशा वेळी येणाऱ्या तणावातून या व्यक्तींमध्ये चिडचिड, राग निर्माण होऊन हिंसक कृती घडत असतात. या रागातून घरातील लोकांशी वाद, भांडणे, मारहाण केली जाते, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, प्रवासातही अशा घटना घडत असतात. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार एकूण गुन्ह्य़ांमध्ये बलात्कार, खुनांसारख्या गुन्ह्य़ांबरोबरच कौटुंबिक हिंसेचेही प्रमाण जास्त आहे. यातून लहान मुले, महिला व वृद्धांना अनेक वेळा अत्याचारांना सामोरे जावे लागते. व्यक्तीला येणाऱ्या रागाच्या प्रमाणात त्याची हिंसक वृत्तीही वाढत असल्याने प्रथम रागावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. अनेकदा मेंदूच्या कार्यातील व संप्रेरक निर्मिती प्रक्रियेतील दोषांमुळे ती व्यक्ती एखाद्या बाबीवर पटकन भावनाधारित चुकीची प्रतिक्रिया व्यक्त करत असते. त्यामुळे इतरांशी लहानसहान गोष्टींवरून वाद घालत भांडण करण्याकडे तसेच शिवीगाळ, मारहाण करण्याच्या थरापर्यंत या व्यक्ती जातात. व्यसनाधीनता, मानसिक आजार यामुळेही काहीजण हिंसक कृती करतात. मात्र व्यक्तीमधील अशा वृत्ती, स्वभावात होत असलेले बदल आधीच ओळखून त्यावर उपाय करता येतील. चिडखोरपणा वाढणे, वारंवार राग येणे, मारावेसे वाटणे, संशयी वृत्ती, सध्याच्या आयुष्यापेक्षा पारलौकिक गोष्टींचा सतत विचार करणे अशी काही लक्षणे वारंवार व सातत्याने एखाद्या व्यक्तीमध्ये असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता मानसोपचारतज्ज्ञांकडून सल्ला घेणे गरजेचे आहे.

मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्याशी सतत संवाद साधल्याने व व्यायाम, चालणे अशा कृतींतून ताणतणाव व राग कमी होण्यास मदत होते. आपल्याकडे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करता याबाबत व्यवस्थात्मक सुविधा तयार केल्यास अशा समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

डॉ. आशीष देशपांडे

संवाद महत्त्वाचा 

लहान मुलांमध्ये भाषाविकास हळूहळू होत असला तरी त्यांच्यातील भावना मात्र उत्क्रांतीच्या नियमानुसार प्रगत असतात. त्यामुळे भाषेअभावी राग, भीती, वैफल्य, अडवणूक, अन्याय, गैरव्यवहार यांच्या अभिव्यक्तीसाठी शब्द, संधी आणि ऐकणारे कान मिळत नसल्याने या भावना देहबोलीतून व्यक्त होत असतात. मुलांना पालकच नसतील किंवा अर्निबध पालकत्व असेल, ‘नाही’ ऐकण्याची सवय नसेल, वाटून घेण्याचा अनुभव नसेल, ‘नंतर घेऊ’ला तयारी नसेल तर त्यांच्यात हिंसक वृत्ती वाढीला लागण्यास अनुकू ल वातावरण तयार होत असते. पौगंडावस्थेत निर्माण झालेले वागण्यातील दोष कित्येकदा भावनेच्या आहारी जाऊन केलेल्या कृतीच्या अतिरेकाने होत असतात. काही परीक्षणांनुसार १५% मुलांमध्ये १८ वर्षांनंतरही अशा बाबी कायम राहतात. मात्र इतर ८५% युवकांना अविवेकापासून दूर ठेवण्यासाठी खूप काही करता येण्यासारखे आहे. भावना आणि  विचार व्यक्त करायला घर व शाळांमध्ये जेव्हा वाव असतो तेव्हा भावनांचा अतिरेकी उद्रेक होत नाही. परंतु, भावनांच्या उद्रेकाला तात्कालिक कारणांपेक्षा कित्येक दिवस आधी अनवधानाने चाललेली मुलांची कुचंबणा कारणीभूत असते. मेंदूतील रसायनांचा विचार व भावनांवर घडणारा थोडाथोडा परिणाम एखादे दिवशी सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक र्निबध झुगारून अविवेकी निर्णय घेण्यास उद्युक्त करतो. लहान मुले व तरुणांमधील या प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवून त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी घर आणि शाळा तसेच महाविद्यालये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. लहान मुलांशी सतत संवाद साधल्याने, त्यांना जे म्हणायचे आहे ते ऐकून घेतल्याने त्यांच्याशी अधिक लवकर जुळवून घेता येते. सतत समज देण्यापेक्षा त्यांना समजून घेणेही गरजेचे आहे. असे प्रयत्न लहान मुले व युवकांमधील हिंसक वृत्ती रोखण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील.

Story img Loader