घटनाकार, भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या अनेक संस्थांपैकी दी बाँबे शेडय़ुल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट ही एक संस्था. बाबासाहेबांनीच २९ जुलै १९४४ मध्ये या संस्थेची स्थापना केली. पण त्यापूर्वी दलितांच्या सर्वागीण विकासासाठी एक मध्यवर्ती सामाजिक केंद्र निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी इमारत फंड उभारण्यास सुरुवात केली. त्यासाठी पुरुषांकडून दोन तर महिलांकडून एक रुपया वर्गणी घेण्याचे आवाहन करण्यात आले. दलित समाजातील लोकांनी बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने या योजनेतून तब्बल ४५०९५ रुपयांचा निधी जमा झाला. या निधीतून बाबासाहेबांनी १० ऑक्टोबर १९४४  रोजी दादर- नायगाव विभागात गोकुळदास पास्ता रोडवर २३३२ चौरस यार्डाचा भूखंड ३६ हजार ५३५ रुपये खर्चून विकत घेतला व उरलेल्या निधीतून दी बाँबे शेडय़ुल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट बनविला. याच निधीतून या प्लॉटवर छोटे तात्पुरते साईट ऑफिस बांधण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढे ही इमारतच बाबासाहेबांच्या सर्व चळवळींचे केंद्रस्थान बनली. बाबासाहेबांचा खासगी प्रिंटिंग प्रेस नायगाव येथे होता. जातीय दंगलीत या प्रेसचे नुकसान झाल्यामुळे बाबासाहेबांना ही प्रेस त्यांच्या नायगाव येथील साइट ऑफिसमध्ये हलवावी लागली.  मात्र या वास्तूत प्रेस आणताच बाबासाहेबांनी जागेच्या भाडय़ापोटी ट्रस्टमध्ये महिना ५० रुपये जमा करण्यास सुरुवात केली. वास्तविक ट्रस्ट बनविणे, त्याच्या नावावर जागा खेरदी करणे या गोष्टी बाबासाहेबांनीच  केल्या होत्या व ट्रस्टला भाडे देण्याचाही निर्णय त्यांचाच होता. पण दुर्दैवाने बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतील वास्तू आजवर तयार झाली नाही. ज्या ध्येयाने प्रेरित होऊन बाबासाहेबांनी हा प्लॉट खरेदी केला त्याची पूर्तता आजपर्यंत विविध कारणांमुळे होऊ शकली नाही. बाबासाहेबांचे सुपुत्र दिवंगत यशवंतराव आंबेडकर यांना उत्पन्नाचे साधन नव्हते. म्हणून त्यांच्याकडे प्रेसच्या व्यवस्थापकाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पण यशवंतरावांनी बाबासाहेबांना न विचारताच या प्लॉटची जागा काही दुकानासाठी देऊन टाकली. त्यामुळे बाबासाहेबांना हा प्लॉट सोडविण्यासाठी कोर्टात जावे लागले. मात्र न्यायालयीन प्रकरणे १९७५ पर्यंत चालली. त्यानंतर ट्रस्टने बाबासाहेबांच्या संकल्पनेनुसार  दलितांच्या सर्वागीण विकासासाठी समाजकेंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले. पण अनेक अडचणींमुळे ते शक्य झाले नव्हते. दरम्यानच्या काळात  मुंबई महापालिकने या प्लॉटवर माध्यमिक शाळेचे आरक्षण टाकले. ट्रस्टने माध्यमिक शाळेचा तीन मजली प्लान महापालिकेला सादर करून त्याला मंजुरी घेतली. वास्तविक या प्लॉटवर बाबासाहेबांना माध्यमिक शाळा अपेक्षित नव्हती. मात्र आरक्षणामुळे या शाळेच्या प्लानमध्ये तळमजल्यावर पाìकगची तरतूद केली होती. हे पाìकग म्हणजे शाळेच्या मागच्या भागाला ज्याला गरसमजुतीने ‘आंबेडकर भवन’ म्हणून संबोधले गेले. वास्तविक पाìकग एरियात पाìकग सोडून कोणताही उपयोग अनुज्ञेय नाही. मात्र या पाìकग एरियात प्रकाश,आनंदराज आणि भीमराव या आंबेडकर बंधूंनी जबरदस्तीने आपली राजकीय कार्यालये थाटली. एवढेच नव्हे तर ट्रस्टचा फायदा घेताना वीज बिल वा भाडय़ापोटी एक पसासुद्धा ट्रस्टकडे जमा न करता १५ हजार चौरस फूट जागेवर अनधिकृतच कब्जा केला आहे.

सध्याच्या ट्रस्टने मोठय़ा प्रयत्नांनी या जागेवरील शाळेचे आरक्षण बदलून पब्लिक हॉल व संस्थात्मक उपयोग असे नवे आरक्षण बदल डिसेंबर २०१५ मध्ये करून घेतले व बाबासाहेबांच्या स्वप्नाप्रमाणे भव्य १७  मजली इमारतीचा आराखडा तयार केला. यात बाबासाहेबांचे भव्य म्युझियम,  बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय-इतिहास दालन, सुसज्ज व भव्य ग्रंथालय, कायदा साहाय्य केंद्र, अन्याय अत्याचार निवारण व समाजकल्याण केंद्र, कला दालन,  विपश्यना हॉल व बुद्ध धम्म साहित्य कक्ष, महिलांचे सबलीकरण व युवकांना कौशल्य प्रशिक्षण आदी सोयी-सुविधा या केंद्रात निर्माण करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हजारो युवक,  युवती, विद्यार्थी व दलित चळवळीला योग्य दिशा प्राप्त होणार आहे. मुंबई महापालिकने नवीन इमारत आराखडा मंजूर केला आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे स्वप्न लवकरच साकार होईल.

जे आंबेडकर भवन (खरे म्हणजे पाìकग एरिया ) पाडण्यात आले, त्याचा चळवळीशी अथवा कोणत्याही हेरिटेजशी संबंध नसून हे बांधकाम १९७५ नंतर करण्यात आले. तसेच िपट्रिंग प्रेस बंद होऊन ५० वर्षांचा कालावधी लोटला आहे. असे असताना मोडकळीस आलेल्या या इमारतीबाबत भावनात्मक मुद्दा करून आंबेडकरी जनतेची जाणूनबुजून दिशाभूल करण्यात येत आहे.

या ट्रस्टच्या घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ट्रस्टच्या विश्वस्तपदावर त्यांच्या कुटुंबातील सदस्य न घेण्याचे धोरण अवलंबिले होते. तेच बाबासाहेबांचे धोरण विश्वस्तांनी गेल्या ६० वर्षांत चालू ठेवले आहे. एवढेच नव्हे तर बाबासाहेबांनी आपल्या मुलाला म्हणजेच यशवंतराव आंबेडकर यांना २३ फेब्रुवारी १९५६ रोजी बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसच्या उत्पन्नाच्या संदर्भात लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ही प्रेस सार्वजनिक मालमत्ता असून ती तुझी किंवा माझी मालमत्ता नाही. आंबेडकर बंधूंनी त्यांचा ट्रस्टच्या जागेवर कोणताही कायदेशीर अधिकार नसताना या पवित्र कार्यात अडथळे आणायला सुरुवात केली आहे. या मोडकळीस आलेल्या इमारतीस पाडण्याची रीतसर नोटीस  मुंबई महापालिकने १ जून रोजी ट्रस्टला दिली. मात्र आंबेडकर बंधूंनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी या नोटिशीला आव्हानदेखील दिले नाही किंवा आपले सामानदेखील हलविले नाही. उलट या ठिकाणी जुन्या धोकादायक इमारतीच्या बांधकामासंदर्भात चाचणी सुरू असताना पोलिसांच्या समक्ष ट्रस्टींना मारहाण करून  परत पाठविण्यात आले. त्यामुळेच नाइलाजास्तव हे बांधकाम रात्री पाडावे लागले.

तरी सर्व सुज्ञ आंबेडकरी जनतेने व प्रत्येक देशप्रेमी भारतीयांनी कोणाच्या अपप्रचाराकडे लक्ष न देता या प्रकल्पाकडे बाबासाहेबांची त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त होणारी स्वप्नपूर्ती म्हणून पहावे, ही कळकळीची विनंती.

 

– रत्नाकर गायकवाड 
लेखक ‘दी पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे ’ सल्लागार आहेत.

 

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The bombay scheduled caste improvement trust