एक काळ असा होता की, इंटरनेट आणि गुगल हे एकच असल्याचा समज जगात होता. ज्या त्या गोष्टींच्या ज्ञानासाठी अर्धे जग अद्यापही गुगलशरण आहे. पण आरंभ असलेल्या कुठल्याही गोष्टीला अस्त असतो, या नियमाला गुगलने तरी अपवाद का ठरावे? इंटरनेटचा साम्राज्यविस्तार जसा वाढत आहे, तसाच त्याच्या वापरामध्ये सीमांत उपभोगितेचा सिद्धांत कार्यरत झाला आहे. या सिद्धांतानुसार एखाद्या गोष्टीच्या अतिवापरानंतर त्या गोष्टीचे महत्त्व घसरत जाते. इंटरनेटची गती मंदावेल तशी गुगलचीही मंदावणारच. विकसित राष्ट्रांमध्ये गुगलला पर्यायी यंत्रणा तयार झाल्यामुळेही त्याच्या लोकप्रियतेला धक्का बसायला सुरुवात झाली आहे. आपल्या देशातील गुगलप्रेम अद्याप आटलेले नसताना गुगलास्ताच्या आरंभाचा हा आढावा..
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले लॅरी पेज यांचा मूड गेल्या आठवडय़ात ठीक नव्हता. त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगले काम केले पण तरीही पेज यांच्या मनासारखे काही झाले नव्हते. महसूल १९ टक्क्यांपर्यंत वाढून १५.४ अब्ज डॉलर झाला. कुठल्याही मालकाला महसूल कितीही वाढला तरी समाधान होत नसते हे खरेच, पण लॅरी पेज यांच्या मनात काही तरी वेगळीच भीती आहे, ती म्हणजे इतर कंपन्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी करूनही गुंतवणूकदार या कंपनीकडे आकृष्ट होण्याचे कमी झाले आहेत. गुगलची वाढ होते आहे, पण कृष्णेकाठी कुंडल पूर्वीचे उरलेले नाही. गुगलची आर्थिक कामगिरी थंडावली नसली तरी वाढ मात्र रोडावली आहे. गुगलची भिस्त ही इंटरनेट वापरणारे लोक व मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांवर आहे. इतके दिवस गुगलवर लोकांचे प्रेम होते, पण ते आटणारच नाही व नवे पर्याय येणारच नाहीत असे नाही. ज्या मानवतावादी लाटेवर गुगल तरंगत होते तशी परिस्थिती आता राहिली नाही, असे असिमको या विश्लेषक कंपनीचे मत आहे.
गुगलला धोका का आहे याचे कारण इंटरनेटची वाढ कमी होते आहे व गुगल म्हणजेच इंटरनेट अशी सध्याची स्थिती आहे. शोधविनंत्यांपैकी ८० टक्के भाग गुगल सांभाळते व लाखो लोक जीमेल, यूटय़ूबचा वापर करतात. वेबला पर्यायी शब्द म्हणजे गुगल अशी परिस्थिती आहे. इंटरनेट जसे वाढेल तसे गुगल वाढणार असा त्याचा अर्थ आहे. पण इंटरनेटची वाढ निरंतर होणार नाही, त्यामुळे गुगललाही मर्यादा आहेत. इंटरनेट पृथ्वीवरील ५० टक्के लोकांपर्यंत पोहोचले आहे, पण आता त्याची वाढ कमी होत चालली आहे. थोडक्यात, २०१६ पर्यंत वेबची सद्दी संपणार आहे व त्यामुळे गुगल अडचणीत येऊ शकते. अमेरिका व पश्चिम युरोपात फार थोडी घरे अशी असतील जिथे लोक ऑनलाइन नाहीत. ऑनलाइनवर नवीन लोक येणार नसतील तर गुगलचे उत्पन्नही घटणार आहे. गुगलचा महसूल जर आपण बघितला तर चीनवगळता जितके लोक ऑनलाइन आहेत त्याच्या समांतर आहे. गुगलला चीनने प्रवेश दिलेला नाही हे येथे सांगायला हवे. गुगलची जी महसूल वाढ आहे ती विकसित देशांत जास्त आहे. गुगलला जर वाढायचे असेल तर गरीब देशांमध्ये इंटरनेटचा वापर वाढला पाहिजे. इंग्लंड-अमेरिकेत गुगलला वर्षांकाठी वापरकर्त्यांमागे ८६ डॉलर मिळतात, पण उर्वरित जगात केवळ १२ डॉलर महसूल मिळतो. त्यात जपान व युरोपचाही समावेश आहे. दर वापरकर्त्यांमागे कमी होत चाललेला महसूल गुगलला अडचणीत आणत आहे. श्रीमंत जग गरीब जग श्रीमंत होण्याची गेली २०० वर्षे वाट पाहात आहे, पण तसे तर काही घडताना दिसत नाही. अविकसित देशांत फार फरक पडलेला नाही. गुगलला प्रत्येक वापरकर्त्यांमागे १.२० डॉलर नफा मिळतो, पण कित्येक वर्षांत त्यात फरक पडलेला नाही. गुगलची महसूल मिळवण्याची क्षमता, प्रत्येक क्लिकमागे मिळणाऱ्या महसुलाचे प्रमाण कमी होत आहे, यावर उपाय एकच आहे तो म्हणजे गुगलला वेब म्हणजे इंटरनेटपेक्षा वेगाने वाढावे लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा