राष्ट्रवाद ही संकल्पना चौदाव्या शतकानंतरच्या युरोपात आणि त्यामुळे ब्रिटिशांतर्फे भारतात आली, ही वस्तुस्थिती आहेच, पण हर्बर्ट स्पेन्सरसारख्या पाश्चात्त्य विचारवंताचे ग्रंथ एतद्देशीय संदर्भात भाषांतरित  करणाऱ्या महात्मा फुले यांनी इथल्या संदर्भाचा स्वतंत्र विचारही केला.  राष्ट्रवादासारख्या संकल्पनेचे पूर्णत भारतीयीकरण कधी होईल, भारतात खऱ्या अर्थाने राष्ट्रभावना कधी जागी होईल, याचे इंगित महात्मा फुले यांना गवसले होते आणि फुलेविचार म्हणून जो मानला जातो, त्याच्याशीही याचे नाते कसे होते, हे सांगणारी ही नोंद..
‘फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र’ या शब्दप्रयोगाच्या शीर्षस्थानी असणारे महात्मा फुले हे अष्टावधानी व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक चळवळीच्या इतिहासाशी ‘सत्यशोधक’ महात्मा फुले यांचे नाव एवढे निगडित झालेले आहे की, या महामानवाने इतर क्षेत्रांतही अतुलनीय असे योगदान दिलेले आहे, याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. उदाहरणार्थ ‘तृतीय रत्न’ हे नाटक लिहिणारे महात्मा फुले हे मराठी भाषेतील आद्य आधुनिक नाटय़लेखक म्हणून क्वचितच निर्देशिले जातात. उद्योजक महात्मा फुले हादेखील एक दुर्लक्षित पैलू आहे. महात्मा फुले यांच्या तत्त्वज्ञानाचा फारसा प्रसिद्ध नसलेला असाच एक घटक म्हणजे त्यांचा ‘राष्ट्रवाद’ होय. या वर्षीच्या स्मृतिदिनानिमित्त या राष्ट्रवादासंबंधी हे प्राथमिक विवेचन आहे.
सर्वप्रथम हे नमूद करणे आवश्यक आहे की, आधुनिक राष्ट्रवाद हे मूल्य आपणाकडे इंग्रजी राजवटीचा परिणाम म्हणून आलेले आहे. इसवी सन १७५५ मध्ये आंग्रेंचे म्हणजेच मराठय़ांचे आरमार बुडविण्यासाठी भारतीय पेशवे परकीय इंग्रजांची मदत घेतात. एवढेच नव्हे, तर इसवी सन १७९२ मध्ये परकीय इंग्रज व भारतीय निजाम यांच्याशी हातमिळवणी करून भारतीय पेशवे भारतीय टिपू सुलतानाचा पराभव करतात. या वस्तुस्थितिनिदर्शक उदाहरणांवरून, अगदी नजीकच्या इतिहासापर्यंत राष्ट्रवाद या मूल्याशी आपण किती अपरिचित होतो, हे दिसून येते. एवढय़ा अवाढव्य भूभागावरील अनेक सामथ्र्यशाली राजे-महाराजांचा इवल्याशा इंग्लंड राष्ट्रातील मूठभर लोकांनी का पराभव केला, याचे उत्तर राष्ट्रवादाचा अभाव हे आहे. म्हणून इंग्रज आमदानीच्या काळात इंग्रजी शिक्षणव्यवस्थेत तयार झालेल्या आपल्या सुशिक्षितांच्या पिढीला राष्ट्रवाद या मूल्याचा परिचय झाल्यानंतर त्यांनी भारतीय समाजात राष्ट्रवाद रुजविण्याचा प्रयत्न प्राधान्याने केला. अर्थात, आजच्याप्रमाणे तेव्हाही भारतीय राष्ट्रवादाबाबत मतभेद होते. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची ‘शतपत्रे’, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा ‘प्रार्थना समाज’ अथवा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा ‘केसरी’ हे सारे आविष्कार म्हणजे भारतीय राष्ट्रवादाला आपापल्या परीने आकार देण्याचे विविध प्रयत्न आहेत. ही यादी आणखी वाढविता येईल; परंतु महात्मा फुले यांचा कालखंड विचारात घेता एवढी नावे पुरेशी ठरावीत.
या पाश्र्वभूमीवर आपणास महात्मा फुले यांच्या राष्ट्रवादाचा विचार करणे सोयीचे होईल. कालवश इतिहास संशोधक डॉ. य. दि. फडके यांच्या संपादनाखाली महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर २००६ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ (६वी आवृत्ती) या ग्रंथात म. फुले यांच्या अन्य लिखाणाबरोबरच राष्ट्रवादासंबंधी त्यांचे मूलगामी चिंतनही समाविष्ट आहे. त्यातील पृष्ठ क्र. ५२३ वर महात्मा फुले यांनी राष्ट्रवादाची त्यांची व्याख्या निर्देशित केली आहे. ते म्हणतात,
‘.. बळीस्थानातील शूद्रादी अतिशूद्रांसह भिल्ल, कोळी वगैरे सर्व लोक विद्वान होऊन विचार करण्यालायक होईपावेतो ते सर्व सारखे एकमय लोक झाल्याशिवाय ‘नेशन’ निर्माण होऊ शकत नाही..’
महात्मा फुले यांच्या या व्याख्येवरून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. सर्वात पहिली, नजरेस भरणारी बाब म्हणजे देशाचा उल्लेख त्यांनी ‘बळीस्थान’ असा केला आहे. भारतीय मायथॉलॉजीमध्ये (पुराणकथांत) बळीराजा या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय जनमानसांत कमालीची लोकप्रियता व उत्तुंग आदराचेच स्थान प्राप्त केलेल्या बळीराजा या व्यक्तिरेखेवरून बळीस्थान हे नाव देण्यात आलेले आहे. अत्यंत शूर, न्यायी व दानशूर अशा या बळीराजाच्या काळात सारी प्रजा सुखी-समाधानी होती, अशा विश्वासातून या स्फूर्तिदायी बळीराजाचे स्मरण ‘इडा पीडा टळो, बळीराजाचे राज्य येवो’ अशा औक्षणाने दर वर्षी होत असते. हे स्मरण बहुजन समाजातील स्त्रियांकडून केले जाते, हे विशेष! दुसरीकडे, या दिवशी बटू वामनाने बळीराजाला तीन पावले जमिनीचे दान मागून कसे पाताळात गाडले, या धर्मशास्त्रोक्त कथेची प्रतीकात्मक पुनरावृत्ती बळी-‘वधा’च्या विधीने करण्याचा प्रघात तथाकथित अभिजनसमाजांत दिसतो. सर्वगुणसंपन्न अशा बळीराजाला वामनाने का मारले, हा प्रश्न कोणाही व्यक्तीच्या मनात येऊ शकतो. कालवश पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या मते, बळीराजाच्या राज्यात वर्णसंकर होत असे, म्हणून वामनाने त्याला पाताळात गाडले. अशा तऱ्हेने बळीराजा विरुद्ध वामन यांच्या द्वंद्वाचे एक प्रमुख कारण वर्णसंकर हे होते. या युद्धात पराभूत झालेला बळीराजा हा वर्णसंकराच्या बाजूचा म्हणजे समतावादी होता तर जेता हा वर्णसंकरविरोधी म्हणजे विषमतावादी होता. अशा बळीराजाचे मिथक वापरून महात्मा फुले यांनी बळीराजाला आदरणीय मानणाऱ्या बहुजन समाजातील समतावादी नेणिवेला चेतवून विषमतावादी जाणिवेला भस्मसात करण्याचे राष्ट्रकार्य आरंभिले. एवढेच नव्हे, तर या देशासाठी बळीस्थान हेच नामाभिधान वापरून महात्मा फुले यांनी पाताळात गाडल्या गेलेल्या बळीराजाला साजिवंत केले आणि जातिसंस्थानिर्मूलनाची रणदुंदुभी फुंकली.
शेवटी, राष्ट्र निर्माण करण्यासाठी महात्मा फुले यांनी शूद्रादि-अतिशूद्रांसह भिल्ल-कोळी वगैरे लोकांनी विद्वान होऊन विचार करण्यालायक व्हावयाचे आहे व नंतर सर्वानी विचारपूर्वक सारखे, एकमय व्हावयाचे आहे! जातिसंस्थानिर्मूलन हा फुलेवादाचा गाभा असल्याने भारतीयांनी, विशेषत: शूद्रादि-अतिशूद्रांनी, विद्वान होऊन विचार करण्याची क्षमता अर्जित केल्यानंतर जाणीवपूर्वक जातिसंस्था उद्ध्वस्त करून भारतीय म्हणून एकाच सामाजिक पातळीवर यावे, असा याचा अर्थ आहे.
या कसोटीवर सर्वाचा राष्ट्रवाद तपासून त्यासाठी उपयोजिण्यात आलेला कार्यक्रम पाहिल्यास, महात्मा फुले यांनी काळाची चौकट किती सहजगत्या ओलांडली आहे, हे समजून येते. पुढे कोल्हापूचे शाहू महाराज २६ जुलै १९०२ रोजी सर्व शूद्रादि-अतिशूद्रांना आरक्षण बहाल करतात आणि या समूहांना विद्वान बनवून एकमय होण्याची पायवाट तयार करतात. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लोकप्रदत्त झालेल्या आणि २६ जानेवारी १९५० पासून अमलात आलेल्या भारतीय संविधानामार्फत याच पायवाटेचा राजमार्ग करतात. या राजमार्गावरून चालण्याचे धाडस समस्त भारतीय समाजाने कितपत दाखविले, या प्रश्नाचे उत्तर विवाद्य असले तरी ‘फुले शाहू आंबेडकर’ या शब्दप्रयोगाची सार्थकता या घटनाक्रमाने अधोरेखित होते.
स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवानंतर आजच्या भारताचे चित्र पाहिल्यास, महात्मा फुले यांना अभिप्रेत असणाऱ्या शूद्रादि-अतिशूद्रांसह भिल्ल, कोळी वगैरे सर्व लोक ‘विद्वान होऊन विचार करण्यालायक झालेले आहेत’ असे म्हणणे धाडसाचे ठरेल. जिथे स्वत:ला उच्चजातीय, सुसंस्कारित वगैरे वगैरे म्हणवून घेणारी चांगली शिकली-सवरलेली माणसे धार्मिक, भाषिक व जातीय भावना पेटवितात, तिथे शूद्रादि-अतिशूद्रांसह भिल्ल-कोळ्यांची काय कथा? अशा बिकट काळात सर्वसामान्य भारतीय जनता विद्वान होऊन विचार करण्यालायक बनून सारखी- ‘एकमय’ कशी होईल, या दृष्टीने सर्वच देशप्रेमी नागरिकांना राष्ट्रीय कार्य करावयाचे आहे. फुले- शाहू-आंबेडकर यांच्या अनुयायांवर तर ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. भारतावरील इडा-पीडा घालविण्याचा हाच खरा बुद्धिगम्य मार्ग आहे. हा राष्ट्रोद्धाराचा मार्ग पत्करल्यास महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेले बळीराजाचे समतावादी राज्य येण्याचा दिन काही दूर नाही.