स्मरण, सौजन्य –
स्वातंत्र्यपूर्व भारताच्या खदखदणाऱ्या राजकारणात आत्यंतिक महत्त्वाची भूमिका बजावत असतानाही लोकमान्य टिळक वेळात वेळ काढून ‘द ओरायन’ तसंच ‘द आक्र्टिक होम इन वेदाज्’ या ग्रंथांसाठीचं संशोधन करत होते.. १ ऑगस्टच्या टिळक पुण्यतिथीनिमित्त –  
गॅलिलिओ गॅलिलीने दुर्बिणीच्या साहाय्याने आकाश निरीक्षण केल्याला चारशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २००९ हे वर्ष खगोल वर्ष म्हणून सर्व जगात साजरे झाले. मानवाला खगोलाचे कुतूहल आहे. त्याने अतिप्राचीन काळीही केवळ डोळ्यांच्या साहाय्याने आकाश निरीक्षण करून खगोलीय घटनांची नोंद आपल्या वाडय़ात केलेली आहे. या नोंदीच्या आधारे भूतकाळातील काही रहस्यांचा भेद करणे शक्य आहे. लोकमान्य टिळकांनीही प्राचीन वैदिक साहित्यांतील खगोलीय उल्लेखांच्या आधारे वेदांचा काल व आर्याचे मूळ वर्षांस्थान यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. टिळकांनी आपल्या The Orien आणि The Arctic Home In the Vedas या दोन अद्वितीय ग्रंथांद्वारे आपले संशोधन, आपले विचार जगाच्या समोर मांडले व सर्वत्र त्याचे जोरदार स्वागत झाले. १८९३ साली Orien प्रसिद्ध झाल्यानंतर, जॉन हॉपकिन्स युनिव्‍‌र्हसिटी, बाल्टीमोर येथील प्राच्य विद्येचे प्राध्यापक मॉरिस ब्लूमफिल्ड यांनी फेब्रु. १८९४ मध्ये दिलेल्या व्याख्यानात म्हटले की, ‘A literary event of even greater importance has happened within the last two or three months- an event which is certain to stir the world of science and culture’ हे पुस्तक म्हणजे ‘unquestinably the literary sensation of the year’ आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या ग्रंथांमुळे जहाल राजकारणाच्या पलीकडील प्रज्ञावंत टिळकांचे स्तिमित करणारे दर्शन जगाला झाले. या संशोधनामुळेच मॅक्समुल्लरसारख्या ऋषितुल्य विद्वानाची व टिळकांची जवळीक निर्माण झाली.
वेदवाङ्मय हे मानवाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात प्राचीन वाङ्मय आहे आणि मानवाचा विशेषत: आर्यवंशाचा अभ्यास करण्यास वेदांइतके दुसरे महत्त्वाचे असे काहीच नाही. १८८२ साली केंब्रिज विद्यापीठात ‘भारतापासून इंग्लंडने काय शिकावे?’ या विषयावरती प्रा. मॅक्समुल्लर यांनी व्याख्यानमाला गुंफली. आपल्या भाषणात संस्कृत साहित्याचे महत्त्व विशद करताना ते म्हणतात, ‘प्राचीन आर्यवंशाचा विस्तार आज ग्रीक, रोमन, जर्मन, स्लाव्ह अशा नानारूप रंगात झाला आहे. संस्कृत साहित्याच्या माध्यमातून या आर्यवंशाचा व त्यांच्या चालीरीतींचा व संस्कृतीचा परिचय आपल्याला होणार आहे. ऋग्वेदातील काही सूक्तात आजही आपल्याला आर्यजनांच्या पूर्वीच्या अवस्थेचे दर्शन होते.
मानवाच्या उत्क्रांतीचा विचार करताना आर्यसंस्कृतीचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे. परंतु वेदांसारखे अतिशय अभिजात वाङ्मय निर्माण करणाऱ्या आर्याबद्दलचा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा निर्णय झालेला नाही. त्यापैकी महत्त्वाचे प्रश्न म्हणजे १) आर्याचे मूळ वसतिस्थान कुठले? २) वेदांचा निश्चित काळ कोणता? ३) आर्य बाहेरून भारतात आले की भारतातून इतरत्र गेले? या सर्व प्रश्नांचा विचार खगोलशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र, भूगर्भशास्त्र वगैरे शास्त्रांच्या आधारे करणे आवश्यक आहे. मानवाची उत्क्रांती होत असताना अनेक स्थित्यंतरे झाली. हवामानातील बदल, पाण्याची उपलब्धता, इतर नैसर्गिक आपत्ती व मानवी टोळ्यांतील आपापसातील आक्रमणे यातून मानवाचे निरनिराळे गट सतत स्थलांतर करत होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये संस्कृतीचे आदानप्रदान होत होते. शब्दांच्या देवाणघेवाणीमुळे भाषांमुळे वैविध्य येत होते. काही नवीन भाषा उदयाला येत होत्या, तर काही भाषा मृत होत होत्या. या सर्वाचा विचार करता आर्यासंबंधीच्या समस्येची उकल करण्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे, काटेकोरपणे उपलब्ध पुराव्यांची छाननी करून, विविध शास्त्रांच्या साहाय्याने तर्कशुद्ध निष्कर्ष मांडणे आवश्यक आहे.
टिळकांचेही लक्ष या गहन प्रश्नांकडे गेले आणि त्यांनी चिकित्सकपणे वैदिक साहित्याचे संशोधन केले. त्या संशोधनाची फलश्रुती म्हणजेच टिळकांचे हे दोन अपूर्व ग्रंथ! भगवद्गीतेचे परिशीलन करत असताना विभूती योगांतील ‘मासाना मार्गशीर्षोऽहं, ऋतुना कुसुमाकर:’ या श्लोकाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. या वचनामध्ये विशेष अर्थ दडलेला आहे असे त्यांना वाटले अन् त्या अनुरोधाने त्यांनी वेदकाळाचा निर्णय करण्याचे ठरवले. इजिप्तची संस्कृती सर्वात प्राचीन आहे, असे पाश्चात्त्य विद्वान मानत होते. परंतु आर्य संस्कृती मात्र इ.स. पूर्व २४०० पेक्षा जास्त जुनी नाही असे त्यांचे मत होते. टिळकांनी आपल्या संशोधनाद्वारे नेमके हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, आर्यसंस्कृती अतिप्राचीन आहे व वेदातील विशेषत: ऋग्वेदातील आर्याच्या धार्मिक चालीरीती ख्रिस्तपूर्व ४००० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यावेळी वसंत संपात मृग नक्षत्रात होत असे. या संबंधात टिळकांनी वैदिक वाङ्मयातील सूक्ते व पुराणकथा यांचा पुरावा म्हणून वापर करून त्यांचा अर्थ नव्याने लावला. त्याचप्रमाणे वैदिक आर्याच्या या चालीरीती व पुराणकथा यांचा इराण व ग्रीसच्या चालीरीती आणि पुराणकथा यामध्ये आश्चर्यकारक साम्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले. आपले मत सिद्ध करण्यासाठी लोकमान्यांनी वैदिक साहित्यातील अत्यंत विश्वसनीय पुरावेच वापरले व पुराणकथांचा उपयोग केवळ मतपुष्टीसाठी केला.
प्रो. मॅक्समुल्लर यांनी वेदांचा काल ठरवण्यासाठी वेद वाङ्मयाची छंद, पंत, ब्राह्मण आणि सूत्र अशी विभागणी त्यातील भाषेच्या फरकाप्रमाणे केली. परंतु भाषाशास्त्रीय किंवा वाङ्यमयीन पद्धतीने वेदांचा काल ठरवण्याची पद्धत सदोष आहे. प्रो. मॅक्समुल्लर यांनी प्रत्येक कालखंड ५०० वर्षांचा धरला. अशा तऱ्हेने भाषाशास्त्रीय पद्धतीने वेदांचा काल ठरवू पाहणाऱ्या विद्वानातच एकवाक्यता नव्हती. म्हणूनच भाषाशास्त्रीय पद्धतीशिवाय दुसरी कुठली तरी पद्धत वापरणे आवश्यक आहे, असे टिळकांना वाटले. या दृष्टीनेच त्यांनी खगोलशास्त्राच्या साहाय्याने वेदांचा काल ठरवण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीवरही अर्थातच टीका झाली. परंतु या पद्धतीने अनुमान काढू पाहणारे विद्वान वैदिक वाङ्मयातील खगोलीय उल्लेख शोधून त्याचा योग्य तो अर्थ लावण्याऐवजी, नक्षत्रांची संकल्पना चीनकडून हिंदूंनी घेतली की हिंदूंकडून चीनने घेतली, वेदकालीन कालचक्र हे पाच की सहा वर्षांचे होते, चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा मेळ घालण्यासाठी Intercalary दिवस किंवा महिने कधीपासून सुरू झाले, अशा प्रश्नांच्या चर्चेतच घुटमळत राहिले. त्यामुळेच त्यांना योग्य तो कालनिर्णय करता आला नाही, असे टिळकांचे मत होते.
खगोलीय पद्धतीने कालनिर्णय करण्यासाठी उत्तरायण, दक्षिणायन आदी ज्योतिषशास्त्रीय घटनांचे सूक्ष्म ज्ञान आवश्यक आहे. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे संपात बिंदूंचे चलन होते व ते क्रमाचे एकेका नक्षत्रांतून फिरत असतात. या संपात चलनामुळे वैदिक काळी मृगशीर्ष नक्षत्रांत असलेला वसंत संपात बिंदू रोहिणी, कृतिका, भरणी, अश्विनी, रेवती अशा क्रमाने उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात सरकला आहे. याचाच अर्थ असा की मृगशीर्ष नक्षत्रापूर्वी आद्र्रा, पुनर्वसू या नक्षत्रांमध्ये वसंत संपात होत असावा. टिळकांच्या मते वेदवाङ्मयात याचे अस्पष्ट उल्लेख आहेत. पुनर्वसू नक्षत्राची देवता अदिती होती व आर्याचे नववर्ष व पंचांग पुनर्वसू नक्षत्रातून सुरू होत असल्याचे उल्लेख ऐतरीय व तैतरीय ब्राह्मण तसेच वाजसेनीय संहितेत आहेत, हे त्यांनी दाखवून दिले. वेदवाङ्मय निर्मितीपूर्वीचा हा काळ असून लोकमान्यांनी त्याला ‘अदिती काल’ असे नाव दिले. लोकमान्य टिळकांनी आपल्या अद्वितीय ज्योतिज्र्ञानाने आणि गणिती प्रतिभेने वैदिक साहित्यात अयनचलनांचे उल्लेख आहेत हे सिद्ध केले. मृगशीर्ष (आग्रहायण किंवा ग्रीक ओरायन) नक्षत्र वसंत ऋतूच्या प्रारंभी उगवत असताना आर्यलोक यज्ञप्रारंभ करीत असल्याचे उल्लेख वेदांत आहेत हे त्यांनी निदर्शित केले. वेदवाङ्मयनिर्मितीच्या काळी वसंत संपात मृग नक्षत्रात होत असल्याचे नि:संदिग्धपणे सिद्ध करणाऱ्या वेदातील आख्यायिका म्हणजे १) प्रजापती दुहितृगमन, २) श्वानकथा, ३) वृषाकपी सूक्त इ. लोकमान्यांच्या मते प्रजापती हा आर्याचा मूळपुरुष असावा. त्याचेच प्रतीक म्हणून आजही उपनयनसंस्कार केला जातो व बटूचा वेश प्रजापतीप्रमाणे (दंड, मेखला इ.) असा असतो. हाच संस्कार पारशी लोकांमध्ये ‘नवज्योत’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे पुरावे व अयनचलनांच्या सूक्ष्म गणिताद्वारे लोकमान्यांनी ऋग्वेदाचा काल इ.स.पू. ४००० वर्षे असावा, असा सिद्धांत मांडला.
सर्वसामान्य भारतीयांची व दुरभिमानी पोथीपंडितांची अशी समजूत होती की, संस्कृत या गीर्वाणभाषेतूनच जगातील सर्व भाषा निर्माण झाल्या आहेत. परंतु, टिळकांनी हे सिद्ध केले की वेदकाली संस्कृतसारख्याच काही प्रगत भाषा अस्तित्वात होत्या व अथर्ववेदांत अन्य भाषेतील विशेषत: खाल्डियन भाषेतील शब्द आहेत. तसेच तुलनात्मक भाषाभ्यासानेही लक्षात आलेले आहे की संस्कृत, ग्रीक, लॅटिन वगैरे भाषांमध्ये विलक्षण साम्य आहे. परंतु, संस्कृत ही इंडोयुरोपियन भाषासमूहाची जननी नसून ती ग्रीक, लॅटिन वगैरे भाषांची सहभगिनी आहे. यावरून आपणास असे ढोबळ अनुमान काढता येते की, या सर्व भाषा अतिप्राचीन काळी अस्तित्वात असणाऱ्या भाषेपासून निर्माण झालेल्या असाव्यात व ही प्राचीन भाषा बोलणारे आर्य लोक कुठे तरी केव्हा तरी एकत्र राहत असावेत.
वेदकाळाचा वेध घेत असतानाच टिळकांनी आर्याच्या मूळ वसतिस्थानाचाही शोध घेतला. त्यांच्या मते शेवटच्या हिमयुगापूर्वीच्या काळात आर्यजन उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते. परंतु, नंतर झालेल्या हिमयुगामुळे आर्यानी आपले मूळ वसतिस्थान सोडले. नवीन वसतिस्थानाच्या शोधात त्यांच्यातील काही टोळ्या युरोपात विखुरल्या, काही आशियात आल्या. त्यातील काही गट इराणमार्गे भारतात आले. वेदांची बुहतांश रचना ही उत्तर ध्रुव प्रदेश किंवा आर्यानी आपले मूल वसतिस्थान सोडल्यानंतर झालेली आहे. तरीही वेदांमध्ये आणि पारशी लोकांचा धर्मग्रंथ झेंद अवेस्तांमध्ये उत्तर ध्रुवावरील आपल्या मातृभूमीच्या आठवणी आर्यानी जतन करून ठेवलेल्या आहेत. अवेस्तांमध्ये आर्याच्या आनंदी निवासस्थानाचे ‘अैर्यानाम वेजो’ असे वर्णन आहे. येथे अनेक महिने कडक थंडी व काही महिनेच उन्हाळा असे. या बाबतीत वैदिक व इराणी परंपरांचे मत जवळजवळ सारखेच आहे. वेदातही दीर्घकालीन दिवस व रात्री यांचा उल्लेख आहे. लो. टिळकांनी ऋग्वेदांतील,
तानीदहानि बहुलान्यासन या प्राचीनमुदिता सूर्यस्य।
यत: परिजार इवाचरन्त्युषो ददृक्षे न पुनर्यतीव।।
या ऋचेकडे लक्ष वेधले. सूर्योदयापूर्वी बराच काळ लोटला आहे असा उल्लेख येथे आहे. टिळकांनी अशा तऱ्हेचे कालमान फक्त उत्तर ध्रुव प्रदेशातच असू शकते असे प्रतिपादन केले. टिळकांच्या मते वेदातील व अवेस्तांतील परंपरांचा विचार करता आर्याच्या उत्तर ध्रुव प्रदेशातील मूळ वसतिस्थानाचे अक्षांश साधारणत: बरोबर ठरवता येतात. परंतु रेखांश किंवा ही आर्यभूमी उत्तर ध्रुव प्रदेशात कुठपर्यंत पसरलेली होती हे ठरवणे मात्र कठीण आहे. आर्याचे हे वसतिस्थान युरोप की आशियाच्या उत्तरेला होते हे ठरवणे शक्य नाही, ते सायबेरियाच्या उत्तरेला असणेही अशक्य नाही. परंतु, याबद्दल अधिक संशोधनाची गरज आहे, हे त्यांना मान्य होते.
वैदिक वाङ्मयात पूर्व युगातील (पूर्वयुगम) म्हणून अनेक स्फुट, अनाकलनीय आख्यायिका आहेत. त्या दुबरेध असून, त्यांचा योग्य अर्थ लावणे सहज शक्य नव्हते. परंतु लोकमान्यांनी संशोधन करून असे मत मांडले की या सकृद्दर्शनी, दुबरेध आख्यायिकांचा अर्थ आर्य लोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते असे मानले तर सहज लावता येतो. आर्यानी उत्तर ध्रुव प्रदेश सोडल्यानंतर वेदांची रचना झालेली असली तरी वैदिक देवतांना उत्तर ध्रुव प्रदेशाचा स्पष्ट संदर्भ आहे. महाभारतीय युद्धापर्यंत वेदांत नवनवीन सूक्तांची भर पडत होती, त्यामुळेच यातील अनेक आख्यायिका पुरातन काळातील असून, पूर्वीच्या ऋषीची (पूर्वेऋषय:) दैवी वाणीच पुनरुक्त करत असल्याचे उल्लेख या ग्रंथांत आढळतात. या पुरातन आख्यायिकांपैकी ऋग्वेदातील इंद्रवृत्रयुद्ध, दीर्घरात्रीभय, दीर्घतमस कथा, अष्टपुत्रा अदिती आख्यायिका आदींच्या साहाय्याने टिळकांनी आर्याच्या मूळ वसतिस्थानाविषयीची आपली उपपत्ती मांडली. यासाठी त्यांनी तत्कालीन भूगर्भशास्त्रीय व पुरातनशास्त्रीय संशोधनाचाही विचार केला. ‘आक्र्टिक होम इन द वेदाज’ या ग्रंथाद्वारे त्यांनी आपले हे संशोधन सादर केले. १८९९ साली टिळक डोंगरीच्या तुरुंगात असतानाच या ग्रंथाची सिद्धता झाली, म्हणजेच ‘गीतारहस्य’प्रमाणे हा ग्रंथही लोकमान्य तुरुंगात असताना जन्मला असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
पृथ्वीवरील शेवटचे हिमयुग इ.स.पू. दहा हजार वर्षे इतके आधी झाले असावे. लोकमान्यांनी हिमयुगोत्तर कालाच्या सुरुवातीपासून ते बुद्धपूर्वकालातील आर्याच्या स्थित्यंतराची पाच कालखंडांत विभागणी केली, तो येणेप्रमाणे-
इ.स.पू. दहा हजार ते आठ हजार – या कालखंडात आर्यलोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत असावेत. दीर्घकालीन हिमप्रलयामुळे आर्याना मूळ वसतिस्थान सोडावे लागले. हिमयुगोत्तर काळाची सुरुवात.
इ.स.पू. आठ हजार ते पाच हजार – नवीन वसतिस्थानाच्या शोधात आर्याचे स्थलांतर, युरोप व आशियाच्या उत्तरेला आर्याची भटकंती. या कालखंडात वसंत संपात पुनर्वसू नक्षत्रात होत असावा व पुनर्वसू नक्षत्रांची देवता अदिती असल्यामुळे या कालखंडाला ‘अदिती काल’ असे नाव.
इ.स.पू. पाच हजार ते तीन हजार – ‘ओरायन कालखंड’ आर्याच्या स्थित्यंतरातील सर्वात महत्त्वाचा कालखंड. या काळी वसंत संपात मृग नक्षत्रात होत असे. वेदांतील बहुतांश सूक्ते/ ऋचा याच कालखंडात वैदिक ऋषींना स्फुरल्या. परंतु, उत्तर ध्रुव प्रदेशातील आपल्या मूळ वसतिस्थानाच्या आठवणी त्यांच्या स्मृतिकोशात साठवलेल्या असल्यामुळे वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख याच कालखंडात आपले पंचांग व धार्मिक चालीरीती रिफॉर्म करण्याचा प्रयत्न आर्यानी केला.
इ.स.पू. तीन हजार ते चौदाशे – ‘कृतिका काळ’ वसंत संपात कृतिका नक्षत्रात होत असे. तैतरीय संहिता, ब्राह्मणे वगैरेंची रचना याच कालखंडातील आहे. आर्यानी उत्तर ध्रुव प्रदेश सोडून आता बराच काळ लोटलेला असल्यामुळे, त्यांच्या स्मृतीतील आपल्या मूळ वसतिस्थानाच्या परंपरांच्या आठवणी पुसट झालेल्या असल्यामुळे त्यांचा चुकीचा अर्थ लावला जाई. कित्येक वैदिक सूक्तेही अगम्य झालेली होती. ‘वेदांग ज्योतिषा’ची मूळ रचना याच काळातील.
इ.स.पू. चौदाशे ते पाचशे – ‘बुद्धपूर्वकाळ’ सूत्र आणि तत्त्वज्ञानाच्या (उपनिषदे वगैरे) विविध पद्धतींची सुरुवात
टिळकांच्या व्यासंगाची व अथक परिश्रमाची एक आठवण येथे नमूद करणे अप्रस्तुत ठरणार नाही. १९१८ साली टिळक इंग्लंडला गेले होते, त्या वेळी विशेष खटला व इतर राजकीय कामकाजात व्यग्र असतानाही टिळक ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’त जाऊन खाल्डियन व असीरियन संस्कृतीवर प्रकाश टाकणारे इष्टिका लेख लिहून घेत. तसेच असीरियन संस्कृतीचे थोर अभ्यासक डॉ. थॉमस यांच्याबरोबर लोकमान्यांची चर्चा होत असे. तेव्हा दादासाहेब खापर्डे लोकमान्यांना म्हणाले, ‘इतक्या कामानंतर आपल्याला शीण न येता आपण अशा गहन विषयाकडे कसे वळता?’ यावर टिळकांचे उत्तर होते, ‘राजकीय कामाचा शीण जावा म्हणून तर मी माझ्या आवडीच्या विषयावर चर्चा करायला जातो. टिळकांचा गौरव करताना डॉ. राधाकृष्णन म्हणालेच होते, की ही वॉज बाय नेचर अ स्कॉलर अ‍ॅण्ड ओन्ली बाय नेसेसिटी अ पोलिटिशन’ (He was by nature a scholar and only by necessity a politician.)
वैदिक साहित्यातील अनाकलनीय सूक्तांचा ऋचांचा अर्थ लावून टिळकांनी वेदकाल इ.स.पू. चार हजार ते साडेचार हजार वर्षे इतका मागे गेला आणि पृथ्वीवरील शेवटच्या दोन हिमयुगामधील (Interglacier) काळात आर्य लोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते हे सिद्ध केले. ज्योतिर्गणिताच्या साहाय्याने टिळकांनी हे संशोधन केले असले तरी वैदिक वाङ्मयातील सूक्तांचा अर्थ लावण्याचे काम हे मूलत: संस्कृत भाषातज्ज्ञांचे आहे आणि एकदा का आपण लावलेला अर्थ बरोबर आहे हे मान्य झाले तर खगोलशास्त्राच्या आधारे वेदवाङ्मयाचा काल व आर्याच्या मूळ वसतिस्थानाचे गूढ उकलणे सहज शक्य आहे, अशी टिळकांची धारणा होती. टिळकांनी आपले दोन्ही ग्रंथ इंग्रजीत लिहिले. जेणेकरून वेदांची व आर्यसंस्कृतीची प्राचीनता व महानता पाश्चात्त्य विद्वानांना समजेल. तसेच इंग्रजी भाषेत हे ग्रंथ प्रसिद्ध झाल्याने जगातील विद्वानांमध्ये, आर्यसंस्कृतीच्या अभ्यासकांमध्ये या ग्रंथासंबंधी चर्चा होऊन जागतिक पातळीवर आपल्या संशोधनाची दखल घेतली जाईल याची टिळकांना खात्री होती. तसेच आपल्या संशोधनावर काही आक्षेप घेतले जातील, आपल्या काही मतांचे खंडनही होईल याची पूर्ण जाणीव त्यांना होती. परंतु, ज्याप्रमाणे सोन्याची शुद्धताही अग्निसान्निध पारखली जाते, तद्वत आपले संशोधन टीकाकारांच्या परीक्षेतून तावूनसुलाखून बाहेर पडून आर्याच्या प्रश्नावरती नवीन प्रकाश पडेल किंवा यामुळे आर्यसंस्कृतीच्या प्राचीनत्वाविषयीच्या संशोधनास चालना मिळून पूर्वग्रहविरहित चर्चेस प्रोत्साहन मिळेल, अशी टिळकांची भावना होती. अशा तऱ्हेने कुठलाही दुराग्रह न बाळगता, निखळ संशोधकाच्या भूमिकेतून टिळकांनी आपले संशोधन अत्यंत विनम्रतेने जगापुढे सादर केले.