वेगाचे राजकारण फक्त वेगाभोवतीच फिरते. वेगाने जाणाऱ्याला ना आजूबाजूचे काही दिसते ना धड समोरचे.. जमीन विका व विकासाला कवेत घ्या अशी भाषणे करत, शेतकऱ्याच्या मुलाला वेगाच्या विकासाची साद घालत जेव्हा पंतप्रधानच बोलू लागतात तेव्हा विकासाच्या दलालांनी, वेगाच्या साधनांची मालकी असणाऱ्या प्रबळांनी आपली यंत्रणा पुरती पोखरली आहे याचीच प्रचीती येते.
नॅशनल हायवे क्र. ४ वर १४५ कि. मी. प्रतितासाच्या वेगाने उजव्या बाजूने गाडी चालवत असताना तुमच्या गाडीचा पुढचा टायर फुटला तर काय होईल? चाकाचे तुकडे होत गाडी कोलांटउडय़ा घेत कोसळेल. मागून येणाऱ्या गाडय़ा आदळतील. त्यातील माणसांना काय होते आहे हे समजण्याचाही अवधी मिळेल किंवा नाही हेही सांगता येणार नाही. परंतु तरीही एखादी वेळ अशी असते की असे होऊनही तुमची गाडी अलगद एका बाजूला येऊन उभी राहते. लोक जमतात. तुम्हावर देवाची कृपा म्हणतात. नास्तिकाच्या मनातही अशा वेळी ‘चमत्काराचे’ चांदणे चमकू शकते. आपण कसे वाचलो याचे उत्तर मिळत नाही. अशा चमत्कृतींचे वैज्ञानिक कारण शोधणे अशक्य नसले तरी कठीण व कित्येकदा मानवी मर्यादांचे दडपण वाढवणारे असते. कार्ल जूंग या प्रसिद्ध मानसशास्त्राचा चमत्कारावर नव्हे पण ‘आदिबंधात्मक जाणिवां’वर विश्वास होता. किंबहुना फ्रॉइडच्या ‘मनाच्या अबोध’ कोपऱ्याचे नियंत्रण करण्यासाठी अशा; आध्यात्मिकच वाटाव्या अशा जाणिवा कारणीभूत असतात असे त्याचे मत होते. त्यामुळे ज्या घटनांचे व्यावहारिक कारण मिळत नाही, भौतिक विश्लेषण करताना अडचणी उत्पन्न होतात त्या घटनांपाठी घटना व विविध भौतिक (तसेच आदिबंधात्मक असल्यामुळे अभौतिकसुद्धा?) शक्तींचे समक्रमण- (सिंक्रोनिसिटी- synchronicity) कारणीभूत असते असे त्याचे मत होते.
‘वेग’.. पॉल व्हिरिलिओ या आपल्या काळातील तत्त्वचिंतकांच्या मते वेग हे व जवळपास हेच कारण प्रत्येक अपघाताच्या मुळाशी असते. इतकेच नव्हे तर तो पुढे जाऊन असेही म्हणतो की, तंत्रज्ञानाच्या अस्तित्वातच अपघाताची बीजे रोवलेली असतात. दोघेही एकसाथ वाढतात. वाफेच्या इंजिनाचा शोध आणि गाडी रुळावरून घसरणे या दोन्ही गोष्टींचा जन्म एकत्रच झाला असे त्याचे थोडक्यात म्हणणे सांगता येईल.
पॉल व्हिरिलिओ हा काही विज्ञान वा तंत्रज्ञानविरोधी मनुष्य नव्हे. तो स्वत:ला क्रांतिकारकही म्हणू इच्छित नाही. तरीही जोमाने व वेगाने भौतिक विकासाची धावणारी गाडी त्याच्यासाठी चिंतेचा विषय आहे. विकासाच्या महामार्गावर विकासाच्या गाडीचे चाक निखळून आत बसलेल्या ‘सब का साथ’ असलेल्या माणसांच्या जिवाची त्याला काळजी वाटते. जागतिकीकरणाच्या रेटय़ात साऱ्या जगभर एका वेडेपणाची साथ पसरली आहे आणि हे विकासाचे वेड आहे असे तो म्हणतो.ज्या वेळी साऱ्या जगभर आणि अलीकडे विशेषत: आपल्या देशात ‘प्रगतीचा वारू’,‘ विकासाची घोडदौड’, ‘वेगाने विकास’ आदी घोषणांचा पाऊस पडत असताना जेव्हा वेग व विकासाविषयीचे कोणी मूलभूत व तात्त्विक प्रश्न उपस्थित करतात तेव्हा ते गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण होते.
वेग हा आपल्या नव्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सारा दिवस आपण सारे कुठूनपासून कुठे तरी धावतच असतो. ‘धावत उठणे, धावत झोपणे, धावत दात घासणे, धावत ऑफिसला जाणे, धावत काम करणे, धावत सुटीवर जाणे, धावतच गाडीत किंवा विमानात बसणे, धावत सारे जग बघून येणे, धावतच म्युझियम किंवा निसर्गरम्य ठिकाणांना भेट देणे, धावतच चर्चा करणे, धावत मतदान, धावत एसएमएस, धावत प्रेम, धावत संभोग किंवा धावतच खून करण्यापासून धावत कविता लिहिणे, धावतच किंवा धावता धावता मरणे..’ या माझ्याच एका जुन्या कवितेतील ओळी व्हिरिलिओचे चिंतन वाचताना मला आठवतात.
वेग हेच जीवन असे मानल्यामुळे सारासार विचार करण्याची वृत्ती तर खुंटतेच, परंतु वेगाशी विकासाचे नाते जोडल्यामुळे वेगाला शक्तीचे, सामर्थ्यांचे नवे परिमाण मिळते. वेग हीच नव्या जगातील एक मुख्य (राजकीय) शक्ती केंद्र बनते. ज्याचा वेग अधिक तो जास्त शक्तिमान बनतो. वेगाची साधने म्हणजे नवनवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता, ते विकत घेण्यासाठी लागणारा पैसा ज्याच्याकडे (ज्या वर्गाकडे) अधिक तो साहजिकच बलवान ठरतो.
वेग, पैसा व वेगाची साधने जेव्हा राजकीय शक्तीची जागा घेतात तेव्हा साहजिकच सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, कामगार असा जो खरा जनतेचा चेहरा तोच साऱ्या ‘बदलाच्या’ वा ‘विकासा’च्या राजकारणात उपरा ठरतो. मुख्य राजकीय व सामाजिक प्रगतीच्या मार्गावरून बाहेर फेकला जातो. वेग साऱ्या समाजाला वेडे करतो. एकदा विकासाचे वेड लागले की, अशा समाजाला मोहिनी घालणे सहजशक्य होते. ज्याप्रमाणे भोंदूबाबा, वैदू किंवा तोतया साधू खोटय़ा चमत्कारातून हवेतून अंगारा काढतात किंवा भूलथापा देतात तसाच प्रचार चमकदार व वेगवान पद्धतीने अशा वेळी गावोगाव केला जातो. व्हिरिलिओला भीती वाटते ती अशा चमत्कारांची, अपघातांची नव्हे.
व्हिरिलिओच्या पठडीतील अनेक विचारवंत म्हणूनच या काळाला भांडवलशाहीचा नव्हे तर ‘टबरे’ भांडवली व्यवस्थेचा काळ असे संबोधतात. इथे वेगावर नियंत्रण नसते तर वेगच सारे काही नियंत्रित करीत असतो. अशा वेळी नकळत माणसाऐवजी यंत्रे जागोजाग निर्णय घेतात. मग मनुष्यविरहित ‘ड्रोन’ मुळे झालेली क्रूर हत्या असो, चुकून बटन दाबले गेल्यामुळे भलतीच आज्ञाप्रणाली कार्यान्वित झाल्यामुळे पडलेले वा पाडलेले प्रवासी विमान असो, सीरिया वा लिबियातील अमेरिकेला सुरू ठेवावे असे वाटणारे ‘सायबर’ युद्ध असो किंवा प्रचंड भांडवलाचा जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत एका निमिषात होणारा प्रवास असो, या सगळ्या निर्णयातला माणूसपणा जेव्हा हरवला जातो, नियंत्रणाची सूत्रेच जेव्हा नियंत्याकडून हिरावली जातात तेव्हा एका सार्वत्रिक ननिर्णायकीची नांदी वाजू लागते. येणाऱ्या अरिष्टाचे तत्त्व आणि ज्ञान हे अशा नांदीच्या घणघणाटात ऐकणे व त्याचे पृथक्करण करणे हे आजच्या विचारवंतांचे काम आहे.
वेगाचे राजकारण फक्त वेगाभोवतीच फिरते. वेगाने जाणाऱ्याला ना आजूबाजूचे काही दिसते ना धड समोरचे. एखादी गोष्ट दिसून ती नजरेत साठवण्याआधीच आपण नवीन गोष्टीपर्यंत पोचलेलो असतो. वेगासाठी नवे महामार्ग तयार होतात. जुने मार्ग मोडले जातात. एक्स्प्रेस हायवेवर ना खंडाळ्याच्या घाटाची, धुक्याची, झाडांची, माणसांची, रमाकांतच्या वडय़ाची गंमत ना इथल्या कुठल्या संदर्भाशी आपले मानवी लागेबांधे. रस्त्याची पुढे पुढे जाणारी बोथट पांढरी रेघ एवढीच आपली सोबत. अशा जगण्यात ‘वृक्षवल्ली आम्हां’सारखी जाणीव कोठून निर्माण होणार? अशा अमानवी जीवनाच्या प्रभावामुळे आपल्या पर्यावरण मंत्रीमहोदयांनी गाडगीळ आदी तज्ज्ञांच्या शिफारशी केराच्या टोपलीत भिरकावल्या तर आश्चर्य कसले? जमीन विका व विकासाला कवेत घ्या अशी भाषणे करत, शेतकऱ्याच्या मुलाला वेगाच्या विकासाची साद घालत जेव्हा पंतप्रधानच बोलू लागतात तेव्हा विकासाच्या दलालांनी, वेगाच्या साधनांची मालकी असणाऱ्या प्रबळांनी आपली यंत्रणा पुरती पोखरली आहे याचीच प्रचीती येते.
वेगामुळे दृष्टी मंद होते, भवतालाचा विसर पडतो, माणसाचा संवाद खुरटतो, यांत्रिकता वाढते, तात्त्विक व नैतिक प्रश्नांचा विसर पडतो, निसर्गाशी असलेला मानवी संबंधांचा पाया उखडला जातो. व्हिरिलिओच्या म्हणण्यानुसार अशा वेळी भौतिक, परस्परसंबंध आणि ज्ञान अशा तीन मूलभूत पातळ्यांवर प्रदूषणाची काळी छाया पडते. भविष्यातील व भविष्याचा संघर्ष मानवी बुद्धीच्या मर्यादेशीच जर होऊ लागला तर कोण व कसला विकास साधणार, हा खरा प्रश्न आहे.
भांडवलशाहीच्या भवितव्याची काळजी करणाऱ्या व तिचे समर्थन करणाऱ्यांसाठी तर हा काळ काळजीचा आहे व भांडवलशाहीच प्रगतीचा रस्ता आहे असे मानणाऱ्यांसाठी खरे तर हा काळ चिंतेचा आहे. आत्मविश्वास व स्पर्धा हे या व्यवस्थेचे पायाभूत स्तंभ. अशा अतिवेगवान साहसात हे दोन्ही खांब सध्या डळमळीत झालेले दिसतात. वित्तीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांकडेच आत्मविश्वासाची वानवा असावी. ‘येणारा काळ वाईट असेल’, ‘काही सांगता येत नाही’, ‘मार्केट कोसळणार’ अशी विधाने गेल्या काही वर्षांत वारंवार ऐकू येतात. पश्चिमी देशांतील बळकट मानल्या गेलेल्या अर्थव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळताना वा हादरताना आपण पाहतो आहोतच. चीनच्या बेबंद प्रगती वेगाची गर्वगीते म्हणताना कुणी फारसे हल्ली भेटत नाही. आत्मविश्वास व विशेषत: वित्तीय व भांडवली क्षेत्रातील आत्मविश्वास, आत्मभान हरवलेला समाज नकळत व वेगानं कमालीच्या हुकूमशाहीकडे व प्रबळांच्या दहशतवादाकडेच मार्गक्रमण करतो याची उदाहरणे आपल्या इतिहासात कमी नाहीत.
आत्मभान हरवलेल्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पक्षाकडून जेव्हा दंडेलशाही, दडपशाही, उर्मटपणा याचेच समर्थन केले जाते, बहुजनांचा/बहुमताचा जेव्हा दहशतवाद बनतो, अल्पसंख्याकांना भीती वाटू लागते, रिबेरोसारख्या धैर्यवान अधिकाऱ्याला अस्वस्थ वाटू लागते तेव्हा नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षा प्रमाणाबाहेर वाढतात. गर्वाचा दर्प सामान्यांच्या नाकातोंडात जातो. स्वातंत्र्य संकोचते. कला व साहित्य गुदमरते. अशा एकाधिकारशाहीच्या पोषक वातावरणात हुकूमशहांचे स्वप्न वास्तवात बदलू लागते. व्हिरिलिओसारखे अनेक विचारवंत जगभर वाढत चाललेल्या या वातावरणाने चिंतित आहेत.
अशा वातावरणात निकोप स्पर्धा व त्यातून उत्कर्ष साध्य तरी कसा होणार? गडगंज व टोलेजंग प्रबळांच्या वेगाशी तुम्ही- आम्ही काय व कसली स्पर्धा करणार? परंतु जगभर वाढत चाललेली बेकारी, नोकरीतील अनिश्चितता, बंद होणारे उद्योग, दिवाळखोरीत जाणारे अवाढव्य मॉल्स या व अशा अनेक घटनांमुळे वाढत जाणारी गरिबी हे या ‘टबरे’ भांडवली व्यवस्थेचे परिणाम आहेत. गरिबीचा आकार, आवाका आणि गरिबीची ‘विशालता’ इतकी प्रचंड आहे की, गरिबीच्या वाढत चाललेल्या रूपाचा धसका भांडवलशाहीच्या अनेक समर्थकांनी सध्या घेतलेला आहे. गरिबीच्या वाढत्या व वेगळ्या रूपाकडे वेळीच लक्ष पुरवले नाही तर मानवी समाजाच्या गेल्या हजारो वर्षांच्या प्रवासात विणलेल्या सुंदर जगाच्या ठिकऱ्या उडायला फार वेळ लागणार नाही. वेग, विकासाच्या भूलथापांचे विकासाच्या धमकीत होणारे रूपांतर, निसर्गाशी असलेल्या मानवी संबंधांचा नाश आणि माणसापासून तुटत जाणारा माणूस ही सर्व लक्षणे लोकशाहीच्या ऱ्हासाचीच आणि येणाऱ्या महाभयानक अरिष्टाची चाहूल देणारीच आहेत. अशा काळात मार्क्सच्या पुस्तकांच्या वाढणाऱ्या विक्रीच्या बातम्या म्हणूनच सुखद आणि आश्चर्य न वाटणाऱ्या ठरतात.
*लेखक चित्रकार, कलाचिंतक आणि नवतत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.