डॉ. विवेक कोरडे
गांधीजींचे नेतृत्व आधी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांवरच्या अन्यायाच्या निवारणार्थ आणि नंतर भारतीय स्वातंत्र्यलढय़ापुरते मर्यादित असले, तरी त्यांच्या विचारांचा आवाका विश्वव्यापी होता. गांधी विश्वपुरुष होते..परवा साजऱ्या झालेल्या गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या सर्वधर्मसमभावाची ही चर्चा
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील नेत्यांमधील काही अपवाद वगळले तर बहुतेकांची मनोधारणा धार्मिक होती. धर्माने निर्माण केलेल्या सामाजिक गुलामीविरुद्ध लढा देणारे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामस्वामी नायकर या समाजनेत्यांची घडणही मूलत: धार्मिक होती. या साऱ्यांमध्ये सर्वात धार्मिक कोण हे जर ठरवायचे झाले, तर ते महात्मा गांधींना ठरवावे लागेल. गांधींचे सारे जीवनच एका व्रतस्थाचे जीवन होते. त्यांची सत्य-अिहसेची साधना त्यांचे जीवन संपुष्टात आणेपर्यंत अखंडपणे सुरू होतीच, परंतु अर्धशतकाहून अधिक काळ राजकारणाच्या आणि तेही संघर्षांच्या राजकारणात व्यस्त असतानाही महात्म्याने प्रार्थना आणि भजनात कधी खंड पडू दिला नाही. सोमवार त्यांच्या मौनाचा दिवस होता. त्यांनी बोलणे कितीही निकडीचे असो, पण त्यांनी मौन सोडले नाही. स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेणारा हा महात्मा अन्य सनातन्यांहून वेगळा कसा होता हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आज धार्मिकतेच्या नावाखाली जो सामाजिक उन्माद निर्माण केला जातोय आणि त्यालाच धर्म म्हटले जातेय त्या काळात गांधीजींचा धर्म समजून घेणे फारच महत्त्वाचे आहे.
सनातनी हिंदू म्हणवून घेत असतानाही गांधीजी सर्वधर्मसमानत्वाची कल्पना मांडू शकले, ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ गाऊ शकले. कारण ब्रिटनच्या वास्तव्यात त्यांचा अनेक चांगल्या ख्रिश्चनांशी संबंध आला. तो इतका की गांधीजी ख्रिस्ती धर्म स्वीकारणार अशी चर्चा त्या काळात सुरू झाली होती. पुढे दक्षिण आफ्रिकेतील संघर्षांमध्ये त्यांचे प्रमुख सहकारी मुस्लीम धर्मानुयायी होते. त्यांचे जवळचे सहकारी जॉन पोलॉक ख्रिस्ती होते, तर पोलॉकांच्या पत्नी या ज्यू धर्मीय होत्या. या साऱ्यांच्या जवळच्या सहवासातून, मनुष्य जर खऱ्या अर्थाने धार्मिक असेल, मग त्याचा धर्म कोणताही असो, त्याला त्याचा धर्म चांगला मनुष्य बनायची प्रेरणा देतो, याचा अनुभव गांधीजींनी घेतला होता. साऱ्याच धर्माचा तौलनिक अभ्यासही महात्म्याला ‘सर्व धर्म समभावाची’ प्रेरणा देत होता.
बहुतेक धर्मग्रंथ आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ अशी भूमिका घेत असताना महात्मा सर्वधर्मसमभावाची भूमिका कशी घेऊ शकला, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. या प्रश्नाचे अगदी समर्पक उत्तर नरहर कुरुंदकर देतात.
‘सर्वधर्मसमानत्व कोणत्याच धर्माला मान्य नसते. प्रत्येक धर्माचे अनुयायी आपला धर्म परिपूर्ण, निर्दोष व श्रेष्ठच मानीत असतात. हिंदू, बौद्ध व जैन आपणाला परिपूर्ण व निर्दोषच मानतात. फक्त ख्रिश्चन व मुसलमान यांच्याप्रमाणे आपला धर्म इतरांवर लादणे न्याय्य व समर्थनीय मानत नाहीत. ख्रिश्चन व मुसलमान तर आपला धर्म सर्वश्रेष्ठ असल्यामुळे तो इतरांच्यावर लादणे अन्याय समजतच नाहीत. अशा अवस्थेत सर्वच धर्म सारखेच खरे ही भूमिका म्हणजे ख्रिश्चन आणि मुसलमान धर्माला आपला धर्म इतरांवर लादण्याची गरज नाही, अशी भूमिका आहे. सर्वच धर्मातील अध्यात्म तेवढे खरे असून चालीरीती खोटय़ा आहेत अशी ही भूमिका आहे’. (जागर, नरहर कुरंदकर, पृ. १३२-१३३)
गांधीजी सर्वच धर्म परमेश्वरप्रणीत आहेत असे मानत असत. पण धर्मग्रंथांना ते मानवनिर्मित मानत असल्याने त्यातील ज्या गोष्टी सामाजिक न्याय व समतेच्या विरोधात असतील त्या गोष्टी गांधी नाकारताना गांधीजींना कधी अडचण वाटली नाही. त्यासाठी धर्म आडवा येऊ देण्यास महात्मा तयार नव्हता.
बालपणापासूनच गांधीजींच्या मनात अस्पृश्यतेच्या प्रथेबाबत घृणा निर्माण झाली होती, ही गोष्ट त्यांच्या त्यांचे मित्र जॉन पोलॉक यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारातून स्पष्ट होते. १९३२ च्या ‘पुणे करारा’नंतर गांधीजींना अस्पृश्यतेविरोधात देशव्यापी चळवळ सुरू करायची होती. या काळात वाई येथील प्राज्ञपाठशाळेच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व अन्य धर्मपंडितांबरोबर त्यांची आगा खान पॅलेस येथील तुरुंगात हिंदू धर्मातील अस्पृश्यतेबाबत चर्चा झाली. अस्पृश्यता धर्मसंमत नाही, तिला धर्मग्रंथाची मान्यता नाही, हे शास्त्रीबुवांनी दाखवून दिल्यानंतर गांधींनी त्यांना तसे पत्रक काढावयास सांगितले. अस्पृश्यतेला धर्मग्रंथाची मान्यता असती, तरीही गांधीजींनी त्याविरोधात चळवळ केलीच असती. कारण तसे वचनच त्यांनी पुणे करारात दिले होते व सामाजिक न्यायाविरोधातली कुठलीही सामाजिक आणि धार्मिक रूढी-परंपरा त्यांना अमान्य होती.
महात्म्यासाठी धर्म हे मनुष्य आणि ईश्वरातील नाते होते. त्याने धर्माचा अर्थ प्रेम, अिहसा आणि शांती असा ठरविला होता आणि म्हणूनच तो साऱ्याच धर्माकडे समत्वाने पाहू शकत होता. धर्माची लेबले त्याला अमान्य होती. गांधीजी लिहितात,
‘ख्रिश्चन वा अजून कोणता धर्म खरा आहे, असे मला कळताच त्याचा प्रचार करण्यापासून मला जगातील कोणतीही शक्ती अडवू शकणार नाही. जिथे भीती असते तिथे धर्म नसतो. कुराण व बायबलचा मी जो अन्वयार्थ लावला आहे, त्यानुसार मला स्वत:ला ख्रिश्चन वा मुसलमान म्हणवून घेण्यावर माझी कोणतीही आपत्ती असू नये. कारण तशा अवस्थेत हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे सर्व पर्यायी शब्द होऊन जातील. परलोकात ना हिंदू आहेत, ना मुसलमान, ना ख्रिश्चन अशी माझी भावना आहे. जिथे व्यक्तीचे मूल्यमापन नावाच्या वा धर्माच्या पट्टय़ा पाहून करण्यात येत नाही तर त्यांच्या कर्माच्या आधारावर करण्यात येते, मग त्यांचा धर्म कोणताही असो. आमच्या लौकिक जीवनात या नामपट्टय़ा राहतीलच. त्यामुळेच जोपर्यंत या पट्टय़ा माझा विकास अवरुद्ध करीत नाहीत आणि कुठेही चांगली गोष्ट दिसली तर ती आत्मसात करण्यापासून या पट्टय़ा मला अडवत नाहीत, तोपर्यंत पूर्वजांच्या नामपट्टय़ा कायम राहू देणे मला उचित वाटते. (यंग इंडिया, २ जुलै १९२६, पृ. ३०८)
महात्मा सनातनी धर्माचा अर्थ असा लावत होता. पुढे गांधीजी लिहितात, ‘मी कट्टर हिंदू असतानाही माझ्या धर्मात ख्रिश्चन, मुस्लीम, ज्यू या सर्व धर्मातील उपदेशांकरिता स्थान आहे आणि यामुळेच काही लोकांना माझे विचार ढिगाऱ्याप्रमाणे वाटतात, तर काहींना मी सारसंकलन करणारा आहे असे वाटते. एखाद्याला सारसंकलक म्हणतात याचा अर्थ त्या माणसाचा कोणताच धर्म नाही, असा होत असतो. उलट माझा धर्म एक व्यापक धर्म आहे व तो ख्रिश्चनांच्याच काय परंतु प्लायमाऊथ ब्रदर्ससारख्यांच्याही विरोधी नाही. तसेच तो कट्टराहून कट्टर मुसलमानांचाही विरोध करीत नाही. व्यक्तीच्या कट्टरपणामुळे तिला बरीवाईट म्हणायची माझी तयारी नाही, कारण मी कोणत्याही व्यक्तीला तिच्या स्वत:च्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो. माझा हा व्यापक धर्मच मला जिवंत ठेवतो. (यंग इंडिया, २२ डिसेंबर १९२७, पृ. ४२६) अशा व्यापक दृष्टीमुळेच महात्मा साऱ्या धर्माकडे आदराने पाहू शकत होता. सारेच धर्म खरे आहेत असे म्हणू शकत होता.
हिंदू-मुसलमान ऐक्य ही भारतीय स्वराज्याची पूर्वअट होती, म्हणून महात्मा सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करीत होता असे म्हणता येऊ शकेल. परंतु असे म्हणणे हा महात्म्यावरचा सर्वात मोठा अन्याय होईल. भारतीय स्वातंत्र्यलढा हा भारतीयांना राजकीय गुलामीतून मुक्त करण्याचा लढा होता. कारण गुलामाला व्यक्तिस्वातंत्र्य नसते आणि स्वातंत्र्यहीन मनुष्य आत्मोन्नती करू शकत नाही, हे महात्मा जाणून होता. गांधीजींचे नेतृत्व आधी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांवरच्या अन्यायाच्या निवारणार्थ आणि नंतर भारतीय स्वातंत्र्यलढय़ापुरते मर्यादित असले, तरी त्यांच्या विचारांचा आवाका विश्वव्यापी होता. गांधी विश्वपुरुष होते. पाश्चात्त्य जग, ख्रिश्चन धर्मपंडित गांधीजींकडे येशू ख्रिस्त होऊन गेल्याचा पुरावा म्हणून पाहात होते. रोमाँ रोलाँसारख्या फ्रेंच विचारवंताला गांधीजी ख्रिस्ताचा अवतार वाटत होते. कारण सत्य-अिहसेचा उपासक असलेल्या महात्म्याला साऱ्या विश्वाचेच रूपांतर एका कुटुंबात करून विश्वात खऱ्या अर्थाने ‘देवाचे राज्य’ स्थापन करायचे होते.
सर्वधर्मसमभावाच्या प्रतिपादनामुळे आणि त्यासाठी आग्रही असल्यामुळे, तसेच सारेच धर्म सारखे असल्याने धर्मपरिवर्तनाची गरज नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने साऱ्याच धर्ममरतडांनी महात्म्याचा दुस्वास केला. पण महात्मा आपल्या सिद्धांतापासून हटला नाही. कारण जगात सर्वात जास्त हिंसा धर्माच्या लेबलांमुळे होते, हे महात्मा जाणून होता आणि ही लेबले नाममात्र ठरविणे आणि साऱ्या विश्वात धर्माच्या नावाने होणारी हिंसा थांबविणे हाच महात्म्याचा धर्म होय.
आपण एकमेकांचे सांडू नये म्हणून महात्म्याने आपले रक्त सांडले व आपण एकमेकांचे घेऊ नयेत म्हणून महात्म्याने आपले प्राण दिले. अिहसा हाच त्याचा धर्म होता.
लेखक गांधीवादी कार्यकर्ते व त्यांच्या विचारांचे अभ्यासक आहेत.
drvivekkorde@gmail.com