|| उद्धव कांबळे
लोकांना त्यांच्या जीवनाला ग्रासलेले, त्यांच्या जीवनावर परिणाम व आघात करणारे वास्तव का समजून घ्यायचे नाही, अज्ञानाची अवस्था मान्य करून का जगायचे आहे? भ्रामक असली तरी आजच्या, आधुनिक माणसाला हवी असतात त्याच्या जगण्या-वागण्याला अर्थ आणि संदर्भ प्राप्त करून देणारी पूर्वनिर्धारित मते. अशी रेडीमेड, पूर्वनिर्धारित मते प्रस्थापित व्यवस्थेतले सरकार, मीडिया, शिक्षणसंस्था, धर्मसंस्था इत्यादी घटक त्याला पुरवत असतात. यामुळे मनोधैर्य, विजीगिषा संपून जातात, पण माणसांना वाटते की आपण मजेत जगतो आहोत! वास्तव ओळखून त्याच्याशी दोन हात करण्याची प्रेरणा अशा माणसांना कशी द्यायची, हा पेच आहे..
लोक अज्ञानी आहेत म्हणून जगभर, आजूबाजूला जे घडते त्याबद्दल लोकांमध्ये जाणिवा आणि जागृती निर्माण करण्यात अनेक अडथळे निर्माण होतात असे म्हटले जाते. पण हे गृहीत एकदा तपासून पाहिले पाहिजे. लोक खरोखरच अज्ञानी असतात की ते अनेकवेळा अज्ञानाचे सोंग घेत आत्मवंचना करतात याचाही मागोवा घेतला पाहिजे. कारण असे अज्ञानाचे सोंग घेण्यातून निर्माण होणारी आत्मवंचना (ज्याँ पॉल सार्त् आणि अस्तित्वादी जिला ‘बॅड फेथ’ म्हणतात) कशी हाताळायची हा परिवर्तनवादी चळवळींपुढील एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
लोकांचे अज्ञानाचे सोंग आणि आत्मप्रतारणा याचे विश्लेषण करण्याचे आणखी एक कारण म्हणजे आज इंटरनेट व इतरत्र खूप चांगले ज्ञान, माहिती सहज उपलब्ध आहे. कॉर्पोरेट मीडिया, ज्ञानप्रक्रियेत सक्रिय असलेल्या प्रस्थापित संस्था, विचारवंत हे सत्ताधाऱ्यांची, प्रस्थापित व्यवस्थेची कितीही वकिली करीत असले तरी त्याच्या पलीकडे जगभरच्या आणि आपल्या भोवतालच्या वास्तवाचे पुष्कळ ज्ञान, माहिती आता उपलब्ध आहे. सत्याशी बांधिलकी मानणारे पत्रकार, विचारवंत आणि कार्यकर्ते यांनी आजवर सत्यान्वेषी असे खूप चांगले पर्यायी ज्ञान आणि विश्लेषण उपलब्ध करून दिले आहे. शोधले तर ते सहज आत्मसात करता येईल. स्पष्टच सांगायचे तर सत्यशोधन व संशोधन करून सत्यापर्यंत पोहोचायला आता जास्त कष्ट पडत नाहीत, असे असतानाही लोकांना त्यांच्या जीवनाला ग्रासलेले, त्यांच्या जीवनावर परिणाम व आघात करणारे वास्तव का समजून घ्यायचे नाही, अज्ञानाची अवस्था मान्य करून का जगायचे आहे, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यातही प्रश्न केवळ अज्ञानाचा नाही तर वास्तव जाणून घेण्याच्या इच्छाशक्तीचाही आहे. विशेषत: शोषितांमध्ये काही जाणकार, बुद्धिमान लोकही आहेत ज्यांनी पर्यायी ज्ञान, वास्तव वा सत्य समजून घेतले तर त्यांचा फायदाच होईल नुकसान काहीच होणार नाही. असे लोकही जेव्हा हेकेखोरपणे ज्ञान मिळविण्यास आणि त्यांच्या मानगुटीवर बसलेल्या प्रस्थापित व्यवस्थेला समजून घेण्यास नकार देतात, ज्ञानशाखा बंद करून झापड लावतात तेव्हा प्रश्न अधिक गंभीर बनतो.
यावर प्रश्न असा पडतो की ही ज्ञानाबद्दलची, सत्य व वास्तव जाणून घेण्याबद्दलची अनास्था, अज्ञान काय आहे? आणि आपल्याजवळ ते का आहे? कुठलेही असो करियरच्या अतिप्रेमापोटी आलेला आंधळेपणा आहे? तुटपुंज्या तात्कालिक फायद्यासाठी केलेली अश्लाघ्य तडजोड आहे? म्हणजे ही अनास्था, अज्ञान नेमके काय आहे? याबाबतीत प्रसिद्ध विचारवंत लेखक अप्टॉन सिन्क्लेअर म्हणतो ‘‘ज्या माणसाचा पगार (पैसा) अज्ञानी राहण्यावर, समजून न घेण्यावर अवलंबून आहे अशा माणसाला काही समजून सांगणे आणि त्यांनी ते समजून घेणे फार अवघड आहे म्हणजे जवळपास अशक्य आहे.’’
असेही म्हटले जाते की सरकार, कॉपरेरेट मीडिया आणि ज्ञान व माहितीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतर संस्था या खोटी, अपुरी माहिती खरी व परिपूर्ण म्हणून लोकांच्या गळी उतरवतात आणि त्यांना अज्ञानात ठेवतात. लोकांना अज्ञानात ठेवण्यातच त्यांचे भले असते. कारण लोक सज्ञान झाले तर प्रश्न विचारतील, म्हणून लोक सज्ञान झालेले त्यांना नको असतात. हे एका अर्थाने खरे असले तरी अर्धसत्य आहे. लोकही त्याला तितकेच जबाबदार असतात. वस्तुस्थिती अशी आहे की तंत्रज्ञानात बुडालेल्या समाजात आधुनिक काळात केला जाणारा प्रचार (प्रोपगंडा) हा फार गुंतागुंतीचा खेळ आहे. आपण समजतो तसे मीडिया आणि सरकार हे लोकांशी लबाडी करतात, त्यांना फसवतात आणि लोक फसतात, बळी पडतात एवढे हे प्रकरण साधे सोपे नाही. याबाबतीत फ्रेंच तत्त्ववेत्ता आणि समाजशास्त्रज्ञ जॅक्यूस इलल यांचे म्हणणे असे की असा प्रचार आधुनिक जनतेच्या काही गरजा भागवितो. जॅक्यूस इलल यांचे म्हणणे मान्य केले तर ही जनतेच्या फसवणुकीची प्रक्रिया दुहेरी असते. आधुनिक जनतेच्या अशा काय गरजा असतात म्हणून ती अशी फसते? जॅक्यूस ईललच्या म्हणण्याप्रमाणे पहिली गरज म्हणजे सतत न्यून देणाऱ्या, जगण्याच्या निरंतर व असह्य़ संघर्षांत स्वत्व जपत ‘जगणे सुसह्य़ करण्या’ची असते. आजचा माणूस स्वत:ला सत्ताविहीन, निराधार आणि निसत्व समजतो आणि तो एक प्रकारच्या पराभूत मनोवृत्तीने जगत असतो. आजच्या आधुनिक माणसाला सत्ताधाऱ्यांच्या, प्रशासनाच्या अशा निर्णयावर अवलंबून राहावे लागते. ज्या निर्णयावर त्याचे नियंत्रण नाही, ज्याबाबत त्याला काही ‘आवाज’ नाही. पण ही आवाज नसल्याची जाणीव क्लेशदायक असते, त्याला अस्वस्थ करणारी असते. अशा अवस्थेत तो फार काळ जगू शकत नाही कारण ती काही ‘नॉर्मल’ अवस्था नसते. माणसाला त्याचे जीवन अधिक अर्थपूर्ण व सधन असावे असेही वाटत असते. त्यामुळे या आधुनिक माणसाला तो अर्थपूर्ण जगात राहतो, वावरतो, त्यात तो सामील व सहभागी असतो असे दाखवायचे असते. त्यालाही आजूबाजूच्या परिस्थितीबद्दलची स्वत:ची मते आहेत हे दाखवून द्यायचे असते. पण असे करताना त्याला विश्लेषण, प्रक्रिया करावे लागणारे ज्ञान माहिती नको असते. त्यासाठी त्याला हवी असतात आयती तयार मते. भ्रामक असली तरी त्याला हवी असतात त्याच्या जगण्या-वागण्याला अर्थ आणि संदर्भ प्राप्त करून देणारी पूर्वनिर्धारित मते आणि साचेबंद निर्णय आणि अशी तयार, पूर्वनिर्धारित मते प्रस्थापित व्यवस्थेतले सरकार, मीडिया, विचारवंत (लुईज अल्थसर ज्याला ‘आयडियालॉजिकल स्टेट अपराइट्स’ म्हणतो त्यातले मीडिया शिक्षणसंस्था, धर्मसंस्था) इत्यादी घटक त्याला पुरवत असतात.
लोक अज्ञानाची अवस्था मान्य करतात, तो स्वीकारतात त्याचे दुसरे कारण म्हणजे लोकांना सत्य जाणून घेतल्यानंतर आणि ते कळल्यानंतर समोर येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करणे, संघर्ष करणे टाळायचे असते. समाजात जगताना लोकांना संघर्ष व कटुता टाळून इतरांपुढे एक चांगला माणूस, भला माणूस ‘पेश’ व्हायचे असते. माणसांना लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे, लोकांना आपण हवेसे वाटावे, आवडावे असे वाटत असते म्हणून लोक त्याला जिथे सुरक्षित वाटते अशा त्यांच्यासाठी विणलेल्या सामाजिक, सांस्कृतिक कोषात राहणे, रमणे पसंत करतात. त्यामुळेही लोक अज्ञानाची अवस्था मान्य करतात, स्वीकारतात. मुके, बहिरे असण्यात त्यांची सोय असते म्हणून लोकांना फसवणूक झालेली चालते आणि सरकार आणि मीडिया आणि इतर घटक याचा फायदा उठवत लोकांना सुखद वाटणारा, चघळायला आवडणारा व त्यांच्या विपन्नतेचे विरेचन करणारा हलका फुलका मसाला पुरवत असतात. या दोन कारणांमुळे हा आधुनिक माणूस आत्मवंचनेला, आत्मप्रतारणेला (बॅड फेथ) तयार होतो. या आत्मवंचनेचा आधार घेऊन तो सत्य दडवत असतो. या आत्मवंचनेतून तो सत्याचा अपलाप करत असतो.
अशा अज्ञानाचा आधार घेऊन लोकाना आणखी एक बचाव आणि बनाव रचता येतो तो म्हणजे स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा. सत्याचा अपलाप आणि अज्ञानाला तसेच सरकार, कॉर्पोरेट मीडियाची लबाडी आणि विषारी प्रचार याला लोक स्वत: जबाबदार नाहीत, असा कांगावा ते करू शकतात. पण हेही तितकेच खरे की लोक त्यांच्या वाटय़ाला येणारे सगळे दु:ख, दैन्य वर्षांनुवर्षे भोगत असतानाही छळाच्या तसेच मृत्यूपासून ते जेलमध्ये जाण्याच्या अनेक शक्यता त्याच्याभोवती घोंघावत असतानाही असे सोंग घेणे, मौन धारण करणे पसंत करतात. आज लोक अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर मुग्धता आणि मौन पाळताना दिसतात. समाजातील शोषण, दमन यांबद्दलच्या अनास्थेने आणि निरिच्छेने ग्रासल्यासारखे वागत असतात. जणू काही त्याची प्रतिकार आणि प्रतिरोध करण्याची शक्ती, लढय़ाच्या प्रेरणा आणि विजीगिषा निद्रिस्त झाल्या आहेत. मरू घातल्या आहेत.
असे असले तरी आधुनिक माणूस या अवस्थेपर्यंत का आणि कसा आला? यात आधुनिक माणसाची जबाबदारी काय आणि कितपत आहे याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे सगळा दोष सामान्य माणसावर ढकलणे त्याच्यावर अन्याय करणारे ठरेल. ज्याँ पॉल सार्त् आणि अस्तित्ववादी असे मानतात की माणूस अशी आत्मवंचना, आत्मप्रतारणा (बॅड फेथ) परिस्थितीच्या रेटय़ामुळे करतो. पण मग हा ‘परिस्थितीचा रेटा’ काय असतो आणि तो कुठून येतो? स्पष्ट सांगायचे तर ही परिस्थिती आणि परिस्थितीचा रेटा सरंजामी, भांवडली व शोषणावर आधारलेल्या व्यवस्थेतून येतो. अशा व्यवस्थेत माणसाचे हक्क, त्याची जगण्याची साधने, त्याचे सगळे माणूसपण ओरबाडून, हिरावून घेतल्यामुळे अंतर्बाह्य़ निर्थक, निसत्व व निराधार बनलेल्या माणसामध्ये कार्ल मार्क्स ज्याला ‘परात्मभाव’ (आलिनेशन) म्हणतो तो ‘परात्मभाव’ निर्माण होतो. एका अर्थाने माणसाला स्वत:ची मते नसणे, त्याने ज्ञानाची कास सोडून त्याबद्दल अनास्था बाळगणे याला मोठय़ा प्रमाणावर ‘परात्मभाव’ ही कारणीभूत असतो. ती अनास्था, निरिच्छा या परात्मभावाचा परिपाक असतो. जर्मन लेखक कार्ल क्राऊस याने इ.स. १९३० च्या दशकातील हिटलरच्या चढत्या काळातील अशा गलितगात्र आणि किंकर्तव्यमूढ अवस्थेचे फार चांगले विश्लेषण केले आहे. क्राऊस म्हणतो, जगाचा खरा विनाश व अंत माणसाची प्रेरणा आणि मनोधैर्य नष्ट करण्यात असतो.
त्यानंतर उरते ते केवळ अशी प्रेरणा व मनोधैर्य नष्ट झाल्यानंतरचे केविलवाणी, लाचार धडपड करत मेटाकुटीला येऊन जगणे किंवा आतून पोकळ असलेल्या माणसाने सत्तेच्या आश्रयाने धाडसी (?) गोरक्षक बनून भ्याड हल्ले करत राहणे.
यावर एकच उपाय असतो तो म्हणजे माणसाचे, समाजाचे हे गेलेले मनोधैर्य, विजीगिषा त्याला पुन्हा प्राप्त करून देणे. त्याला परात्मभावाच्या खोल अंधाऱ्या गर्तेतून बाहेर काढून जगभरच्या, आपल्या आजूबाजूच्या जनतेला संघटित करून त्याच्यात अशा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध प्रतिरोधाची व प्रतिकाराची प्रेरणा, जिद्द पुन्हा निर्माण करणे आणि त्याच्याशी दोन हात करण्याची ताकद त्याच्या मनगटात पुन्हा निर्माण करणे आणि हेच आपले कार्य करण्याचे मुख्य उद्दिष्ट व जीवित कार्य असले पाहिजे.
(लेखकाच्या ‘डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवाद’ या लोकवाङ्मय गृह प्रकाशित करीत असलेल्या आगामी पुस्तकातील लेखाचा हा संपादित अंश आहे.)