१९७२ च्या दुष्काळात धान्यसाठा नव्हता आणि रोजगाराचीही साधने मोजकीच होती. त्यावेळी दुष्काळी कामावरच्या लोकांची पाण्यासाठी वणवण पाहावत नव्हती. पाणीसाठे अपुरे आणि लांब. १९७२ मध्ये यशवंतराव चव्हाण केंद्रीय मंत्री असल्याने त्यांनी वेळोवेळी सरकारतर्फे मदत पाठवली.
आताच्या दुष्काळात चारा छावण्या आहेत. कामासाठी विविध पर्यायही आहेत. टँकरने पाणी कमीअधिक प्रमाणावर उपलब्ध आहे. तेव्हाच्या परिस्थितीचे वास्तव मांडणारा लेख..
१९७२ च्या दुष्काळात आम्ही चाकणला राहत होतो. दुष्काळ असो वा नसो, पाण्याची टंचाई तेथे पाचवीलाच पुजलेली! तेव्हा चाकण हे एक बऱ्यापैकी मोठे परंतु गावच होते. गावाला नदी नाही, नळ पुरवठा नाही, विहिरीवरचं, तळ्यावरचं, झऱ्याचं, ओढय़ानाल्याचं पाणी याचाच आधार! त्यात १९७२ चा भीषण दुष्काळ संकटरूपाने आसमंतात घोंघावू लागला. पाहता पाहता त्याने तीव्र स्वरूप धारण केले. शेतात धान्य पिकले नाही, चारा नाही, पाणी नाही, पाणी होते फक्त डोळ्यात. तेही आटून गेलं. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही फक्त आधार, स्वस्त धान्य दुकानांचा. त्यांनी तर गैरफायदा घेऊन उखळ पांढरं करायचा निर्धारच केला होता.
या भीषण परिस्थितीत, सरकारने हाताला काम देणाऱ्या रोजगार योजना सुरू केल्या. मामा शिंदे व चाकणचा एक ग्रुपच सेवादलाच्या मुशीत तयार झालेला. आम्ही स्वस्थ न बसता काय करता येईल या विचाराने झपाटून गेलो. त्यावेळी पुण्याचे महापौर निळूभाऊ लिमये होते. त्यांनी तातडीने पीएमटीच्या एका बसचे वैद्यकीय सेवेचे वाहन म्हणून रूपांतरित करून घेतले. मूळचे चाकणचेच, परंतु पुण्यात राहाणारे डॉ. रमेशचंद्र शहा याशिवाय पिंपरी-चिंचवडचे डॉ. श्री. श्री. घारे, डॉ.आबड इ.चे वैद्यकीय पथक तयार झाले. निळूभाऊंनी औषध खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला आणि दुष्काळग्रस्तांसाठी वैद्यकीय सेवा सज्ज झाली. संपूर्ण खेड तालुका हे आमचे कार्यक्षेत्र बनले. स्वयंसेवकांची फौजच तयार झाली. दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच होती. चाकणच्या परिसरातच दुष्काळी कामांची संख्या सारखी वाढत होती. कुरुळी, निघोजे, महाळुंगे, चाकणच्या वाडय़ा आळंदी परिसरातील गावे मिळून हजारो माणसे स्त्री-पुरुष दुष्काळी कामावर जात होते.
प्रथमत: हे लक्षात आले की लहानग्यांना घेऊन स्त्रिया कामावर येताहेत. त्यांच्यासाठी रणरणत्या उन्हात निवाऱ्याची कोणतीही सोय नाही. कुठे तरी पाटीखाली, टोपलीखाली ही बाळं रडून रडून झोपलेली असायची. पाण्याची तर कुठलीच सोय नव्हती. ज्याने त्याने घरून पाणी, भाकरतुकडा घेऊन यायचे. हत्यारेही सरकारने पुरविली नव्हती. तीही घरून आणायची. आम्ही याविरुद्ध आवाज उठवायचे ठरविले. दुष्काळग्रस्तांना एकत्र आणून त्यांचा आवाज तहसीलदारापर्यंत पोहोचवला. परंतु तो क्षीण असल्याने, शासन काही हालत नव्हते. मग संघर्षांला पर्यायच उरला नाही. आठवडय़ाचा एक वार सुट्टीचा असे. त्यावेळी दुष्काळग्रस्तांना रस्त्यावर उतरविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याला साथ मिळेल का? अशी शंका होती. परंतु आमच्यापैकी प्रत्येक जण रोजच कोणत्या ना कोणत्या कामावर दिवसभर जाऊन थांबायचा. तीव्र उन्हाळ्याने आणि पाणीटंचाईने आता उग्र स्वरूप धारण केले होते. आम्ही त्यांना दिलासा देण्यासाठी जात असू तेव्हा तहानेच्या वेळी तिथलेच पाणी पीत असू. पावसाळ्यात रस्त्यावर वाहाणाऱ्या पाण्यापेक्षाही गढूळ, घाण. आम्ही त्यात तुरटीचे काही खडे घेऊन टाकत असू. त्याने फारसा फरक पडत नव्हता, आहे तसेच पाणी प्यावे लागे.
दुसरीकडे पोटात पुरेसे अन्न नाही. उन्हाच्या तीव्र झळ्यांत काम आणि घाणेरडे पाणी जे पाणी आता बांधकामात किंवा फरशा पुसायलाही वापरणार नाही ते प्यायचे? लोकांचे आरोग्य बिघडू लागले. आजारी पडणारांच्या मागे एक ना दोन वेगवेगळे आजार लागू लागले. तरीही सरकारी आरोग्य सुविधा झोपलेली. आम्ही मग पुणे-पिंपरी-चिंचवडच्या डॉक्टरांचे पथक असलेली बस चाकणला आणली आणि प्रत्येक दुष्काळी कामावर वेळेचे नियोजन करून नेऊ लागलो. दुष्काळी कामावरच औषधोपचार मिळू लागले. आमच्याबरोबरच्या लोकांची नाळ आता जमू लागली. आमच्याकडे लोक विश्वासाने पाहू लागले. प्रसंगी त्यांच्या भाकरतुकडय़ाचा घासही देऊ लागले. त्यांच्या प्रेमापोटी तो घासही आम्ही आनंदाने खात असू.
१९७२ च्या दुष्काळाची भीषणता आणि तीव्रता आता नव्या पिढीसाठी माहीत नसलेली गोष्ट झाली. तर, आमच्या पिढीसाठीही त्याच्या आठवणी पुसट होऊ लागल्या आहेत. या वर्षीचा दुष्काळ आता पुन्हा त्यावेळच्या आठवणी जाग्या करतोय, परंतु आता गुणात्मक खूपच फरक पडला. त्यावेळी दुष्काळी कामावरच्या लोकांची पाण्यासाठी वणवण पाहावत नव्हती. पाणीसाठे अपुरे आणि लांब, मग याची तड लावायचीच असा निश्चय कार्यकर्त्यांनी केला. रघुनाथ राऊत, राजाराम सोरटे, महादेव बेंद्रे, नामदेव जाधव अशी किती नावे घेऊ? पाठीमागून गोपाळ जगनाडे भक्कम आधार देणारे. भाऊ वाडेकर, शंकरराव वाघ यातील काही कार्यकर्ते मंडळी आता हयात नाहीत आणि आणखी बरीचशी नावे स्मरणात नाहीत. तर पाण्याचा प्रश्न सोडवायचाच, म्हणून एकदा तहसीलदार दुष्काळी कामाची पाहणी करण्यासाठी आले अन् त्याच्या जीपलाच घेरावा घातला. चाक फिरणे थांबले. मग त्यांनी लगेच एक बैलगाडी व त्यावर दोन बॅरल, गाडीवान दादा मंजूर केला. आणि प्रत्येक दुष्काळी कामावर पाणी मिळू लागलं.
प्रश्न तर अनेक होते. एकेक करून सोडवायचे होते. रेशन दुकानात धान्याचा खडखडाट. धान्य गावापर्यंतच्या दुकानात पोहोचायचे नाही. आता तर लाल मिलो, किडकी ज्वारी, लाल तांदूळ तोही एका कुटुंबाला सर्वाना मिळून शिधापत्रिकेवर आठवडय़ात चार किलो. शेतकऱ्याचे कुटुंब मोठे. खाणारी तोंडे फार, त्यांना १५ दिवस तर काहींना महिन्यात धान्याचं पोतंच लागायचं तिथे हे चार किलो! घरात खरिपाच्या हंगामात जे थोडे फार धान्य पिकलेले तेही संपले! आता होत होती उपासमार!
एके दिवशी यशवंतराव चव्हाणांचा खेड तालुक्यात दुष्काळी कामाच्या पाहणीचा धावता दौरा ठरल्याचे कानी आले. आम्ही मग सगळेच लागलो कामाला. मिळेल त्या साधनांनी सर्व दुष्काळी कामावर जाऊन लोकांच्या बैठका घेतल्या. धान्याचे प्रमाण वाढवावे. तुटपुंजी मजुरी वाढवून मिळावी, कामाचे पैसे दर आठवडय़ाच्या आठवडय़ालाच मिळावे, मिलोबरोबर गहू, साखर इ. मिळावे, धान्याचा काळाबाजार थांबावा, या मागण्यांसाठी दुष्काळग्रस्तांना रस्त्यावर उतरावयाचे ठरविले. चव्हाणसाहेब येणार तो दिवस कामाचा. दुष्काळी कामे लांब अंतरावर. चव्हाणसाहेब चाकणहूनच पुढे, दावडी वगैरे भागांत जाणार होते. म्हणजे चाकणला सर्वाना जमणे भाग होते. सर्वाना कळकळीचे आवाहन केले. आता नाही तर कधीच नाही. परंतु तरीही शंकाच होती. अशा आंदोलनाला लोक येतील? आम्ही मात्र ठाम होतो-मागण्यांची तड लावून घेतल्याशिवाय साहेबांची गाडी जाऊच द्यायची नाही. कोणी आले नाही तर आम्ही कार्यकर्ते गाडी अडवायचीच, अशा निर्धाराने जमणार होतो. काय होईल? फार तर अटक करतील. आम्हाला परिणामांची पर्वा नव्हती.
दौऱ्याचा दिवस उजाडला. त्यापूर्वी आमच्या आंदोलनाची बातमी पोलिसांच्या कानावर अगोदर गेलीच. त्यावेळी ग्रामीण भागाचे डीएसपी होते आर श्रीनिवासन आणि डीवाय एसपी होते विर्कसाहेब. (हेच नंतर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक या पदावरून निवृत्त झाले.) त्यांचे येणे-जाणे सुरू झाले. मग चाकण पोलीस स्टेशनवर वेळी-अवेळी बोलावणे येऊ लागले. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांशी आमचे संबंध चांगले होते. त्यांनी खोदून खोदून विचारले, किती निदर्शक जमतील? हा आकडा आम्हाला तरी कोठे माहीत होता? आम्ही सांगितले कोणी येण्याने किंवा न येण्याने फरक पडणार नाही. आम्ही जे कार्यकर्ते तुमच्यासमोर बसलो आहोत एवढे तर नक्कीच असणार आहोत. आंदोलनाची रूपरेषा विचारली, तर सांगितले की, आम्ही त्यांची गाडी अडवणारच आणि मागण्या-मान्य झाल्याशिवाय जाऊ देणार नाही. चव्हाणसाहेब महत्त्वाचे केंद्रीय मंत्री होते. त्यांच्याबरोबर बीबीसीसह काही परदेशी व देशी पत्रकार असणार होते. दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी कळकळीची विनंती केली की गाडी थांबवण्याची व्यवस्था काही क्षणासाठी होईल. परंतु त्यांना निवेदन देऊन तुम्ही मागे सरकायचे. आम्ही काहीच आश्वासन द्यायला तयार नव्हतो. मग त्यांनी पोलीस बळावर आम्हाला हटवायचे ठरवून तयारी सुरू केली.
अखेर दौऱ्याचा दिवस उजाडला! आम्हाला निदर्शने, निवेदनासाठी जागा ठरवून देण्यात आली. ५० पोलीस, काही अधिकारी व पोलीस व्हॅन्स तयार ठेवण्यात आल्या. सकाळीच गाडय़ा चाकणवरून जाणार होत्या. आम्ही ठरलेल्या ठिकाणी आलो. गाडय़ा जायला आणखी दोन, तीन तास तरी होते. आम्हाला दिलेल्या जागेपासून थोडय़ा अंतरावर काँग्रेसजनांचा मोठा जथ्था साहेबांच्या स्वागतासाठी हारतुरे, ढोल-लेझीम घेऊन थांबला होता! त्यांना निवेदन वगैरे काही द्यायचे नसावे!
आम्ही जसे येऊन थांबलो, तसे काही वेळातच त्या चौकात चारी बाजूंनी माणसे येऊ लागली. आमची माणसे कुदळ, फावडे, घमेल्यासह! म्हणजे ही येथूनच नंतर कामाला जाणार होती. पाहता पाहता जमावाचे झुंडीत रूपांतर झाले. आमच्या आश्चर्याला पारावार उरला नाही! आणि परिस्थितीचा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनाही यायला वेळ लागला नाही. परंतु तोपर्यंत गाडय़ा येण्याची वेळ झाली होती. हजारो लोकांना हटविणे आता पोलिसांना अशक्य होते आणि निदर्शनाला हिंसक वळण लागले तर? दोन्ही अधिकारी आमच्याजवळ आले आणि म्हणाले, ‘एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर महिला, मुले, पुरुष येण्याचा अंदाज तुम्ही आम्हाला दिला नाही.’ आम्ही काय बोलणार? ही तर आमच्या कामाची पावती होती! दोन्ही अधिकारी म्हणाले, ‘स्त्रियांना हटवण्यासाठी महिला पोलीसही नाहीत. हाताबाहेरच्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी काहीही करावे लागेल.’ त्यांचा हात कोठल्या हत्यारावर होता हे सांगता येणार नाही! परंतु ‘आता जबाबदारी’ तुमची एवढे सांगून निघून गेले! काही वेळातच चव्हाणसाहेबांच्या गाडय़ांचा ताफा आला. निदर्शक अक्षरश: रस्त्यावर झोपले. गाडय़ा पुढे जाण्याचा प्रश्नच नव्हता. स्त्रिया तर अधिक आक्रमक झाल्या होत्या. त्यांच्यापुढचे रोटी-रोजीचे, अन्न पाण्याचे प्रश्न तीव्र होते. त्यातील काहींनी चव्हाणसाहेबांच्या गाडीकडे धाव घेतली. काहींनी दरवाजाला हात घालण्याचा पवित्रा घेतलेला दिसला, तर काही गाडीच्या बॉनेटवर चढण्याच्या प्रयत्नात दिसल्या. पोलिसांनी आपापल्या अॅक्शन घेतल्या आणि परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाईल असे दिसून आल्याक्षणीच मी निर्णय घेतला आणि घोषणा दिली- ‘यशवंतराव चव्हाण झिंदाबाद!’ सारेच चक्रावून गेले. ‘मुर्दाबाद!’ सोडून ‘झिंदाबाद.’ सारेच अवाक आणि स्तब्ध झाले. यशवंतराव सावकाशपणे गाडीतून बाहेर पडले. मी एका पुलाच्या कठडय़ाजवळ उभा होतो. डोक्यात लाल टोपी होती. माझ्याजवळ येऊन, मागण्यांचा कागद घेत वाचला आणि म्हणाले, ‘मला थोडा वेळ लागेल, पण तुमच्या मागण्यांची तड आठच दिवसात लागेल.’ रस्ता रिकामा झाला! गाडय़ा पुढे गेल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांचे हारतुरे बहुधा न स्वीकारताच! माझ्या ‘झिंदाबाद’च्या घोषणेवरून आमच्यातही बरेच वादळ झाले, पण परिस्थिती नियंत्रणात आणण्यास दुसरा मार्गही नव्हता. आठच दिवसांत मागण्यापैकी अनेक गोष्टींची बऱ्याच प्रमाणात पूर्तता झाली. या काळात तरीही स्वस्त धान्य दुकानात बऱ्याच ठिकाणी काळाबाजार व्हायचा. त्यावेळचे तहसीलदार अतिशय उमदे होते. आम्ही तक्रार करायला गेलो तर, आम्हालाच जीपमध्ये बसवून त्या धान्य दुकानाची अचानक तपासणी व्हायची. प्रसंगी लायसन्सही रद्द व्हायचे. याची बरीच जरब बसली.
राजाभाऊ थिटे तेव्हा नामवंत पत्रकार होते. त्यांचा आमचा चांगलाच परिचय होता. त्यांच्या शब्दाला वजन होते. त्यांनाही आम्ही करत असलेल्या कामाची माहिती होती. एका भेटीत ते म्हणाले, ‘तुम्ही आणखी काय करू इच्छिता?’ आम्ही उत्तर दिले. ‘जनावरांचा चारा कमी पडतोय.’ ते म्हणाले, दोन दिवसांनी गाडी घेऊन या. आपण अकलूजला जाऊ. त्यावेळी चाकणला मुख्याध्यापक होते दि. ब. वनारसे. त्याशिवाय भाऊ वाडेकर, मी आणि राजाभाऊ अकलूजला गेलो, ते शंकरराव मोहिते पाटीलांना भेटण्यासाठी. राजाभाऊंमुळे मागण्यांची पूर्तता झाली. चार ट्रक चारा आठवडय़ातच तालुक्यात आला. यंत्रणेमार्फत गरजूंना चारावाटप झाले.
१९४२ च्या दुष्काळात उघडय़ा डोळ्यांनी धान्याच्या राशीकडे पाहत बुबुक्षीत, भुकेल्या नेत्री, जनतेच्या मुडद्याच्या राशी, कलकत्त्यात गल्लीबोळी पडल्या. ७२ ला वेगळे चित्र होते. शेतकरी शेतमजुरांच्या फलटणी, दुष्काळी कामावर तरी जात होत्या, हक्कासाठी लढत होत्या, ४३ लाख मृत्युमुखी पडण्याऐवजी, तेवढेच लोक दुष्काळी कामावर काम करत होते. एखाददुसरा भूकबळीही पडत होता. परंतु हे चित्र तेवढे समाधानकारक नव्हते. कित्येक वर्षांत मिळवला नाही एवढा नफा व्यापाऱ्यांनी मिळवला आणि अधिकारी? ते तर सर्वात पुढे.. वानगीदाखल, नगरच्या एका इंजिनीअरचे उदाहरण देतो. त्याच्याकडे २०० तोळे सोने आणि लाखो रुपये सापडले. फलटणच्या एका सहकारी संस्थेच्या सेक्रेटरीने त्याने गोळा केलेल्या मालमत्तेचा तपशीलच पुढे आला होता. या काळात त्याने ५२ एकर जमीन फक्त १.७५ लाखाला खरेदी केली होती. त्याशिवाय बुधवार पेठेत दोन मोठी घरे, शेतावर बंगला, दोन फ्लॅट. झडतीमध्ये २७० तोळे सोने, शेतीसाठी ट्रॅक्टर, चार इलेक्ट्रिक मोटारी, जनावरे, २२ पँट्स्, ३५ पैठणी, गालीचे, मोटारसायकली.. यादी फार मोठी आहे. असो. दुष्काळी कामावर राबणाऱ्या बळीराजाला ७२ च्या दुष्काळात मजुरी कोठे १ रु. २० पैसे तर कोठे दोन रुपये. ही मजुरी किमान तीन रुपये मिळावी यासाठीही आंदोलन करावे लागले! आता मनरेगा (ग्रामीण रोजगार हमी योजनेत किमान मजुरी १६२ रुपये. तरीही फक्त अडीच लाख लोक कामावर आहेत. म्हणजे आता ऐरणीवरचा प्रश्न जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा आहे.) त्यावेळी जनावरांसाठी बैलतगाई होती. किती? संपूर्ण शिरूर तालुक्यासाठी फक्त साडेतीन लाख रुपये. म्हणजे एका शेतकऱ्याला १ हजार रुपये दिले तरी फक्त ३५० शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळणार होते. भ्रष्ट प्रांत अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी एका भ्रष्ट धान्य दुकानदाराकडे वरिष्ठ अधिकारी गेले, आणि त्यांनीच तेथील एक पोते तांदूळ, साखर स्वत:साठी जीपमध्ये घालून नेले! धान्य दुकानात भिजका गहू. १० किलो वाळवल्यानंतर आठ किलो भरे.
आता चारा छावण्या आहेत. कामासाठी दुष्काळी कामाशिवाय विविध पर्यायही आहेत. लहानग्यांची निवाऱ्याची सोय आहे. टँकरने पाणी कमीअधिक प्रमाणावर उपलब्ध आहे. परंतु हे बदलता येईल. राळेगणसिद्धी, हिवरे बाजाराची प्रेरणा घेऊन राजस्थानमध्ये शेकडो गावांनी दुष्काळ कायमचा हटवला आहे.
यापासून प्रेरणा, कृती लोकसहभागातून हवी. भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवूनच!