‘मकरसंक्रांत आणि उत्तरायण’ या लेखात (‘लोकसत्ता’, १३ जानेवारी) हेमंत मोने यांनी खगोलवैज्ञानिक सत्य ज्योतिषशास्त्रीय परिभाषेत पेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेखाची सुरुवातच मोने एका अ(खगोल) वैज्ञानिक वाक्याने करतात. त्यांचे पहिलेच वाक्य ‘सूर्याचा प्रवास मेष ते मीन या राशींतून होतो.’ असे आहे. पुढे पुढे त्यांच्या लेखात ‘सूर्याने तूळ राशीत प्रवेश केला की..’ ‘त्या दिवशी सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो.. ‘वगैरे वगैरे असंख्य अवैज्ञानिक विधाने आहेत.
खगोल-वैज्ञानिक सत्य आहे की, सूर्य कधीही कोणत्याही राशीत ‘प्रवेश’ वगैरे काहीही करीत नाही. तसेच सूर्य कोणत्याही राशीतून कधीही ‘बाहेर’ वगैरे पडत नाही. मुळात राशी (झोडियाक साइन्स) व नक्षत्रे (कॉन्स्टेलेशन्स) ही पूर्णपणे आभासी आहेत. ज्या ताऱ्यांची मिळून रास अथवा नक्षत्र बनते, त्यातला एक तारा आपल्या पृथ्वीपासून ५०० प्रकाशवर्षे दूर, तर दुसरा ४००० प्रकाशवर्षे दूर, अशी काहीतरी अवस्था असते. राशी-नक्षत्रांमधले तारे समतल-पृष्ठभागावर नसतात, तरीही त्यांची जोडणी करून आपण राशिचक्रे आणि नक्षत्रे बनवितो! या अशा आभासी राशी-नक्षत्रांतून सूर्य, चंद्र अथवा मंगळ ना कधी प्रत्यक्ष ‘बाहेर पडतो, ना कधी त्यात प्रत्यक्ष ‘प्रवेश’ करतो ही सारी अवैज्ञानिक ज्योतिषी परिभाषा मोने कशासाठी वापरताहेत?
राशी आणि नक्षत्रे यांचे ‘दिसणे’ आणि ‘अदृश्य’ होणे याचा संबंध पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाशी आहे; दुसऱ्या कशाशीही नाही. सूर्यमालेच्या (सोलर सिस्टीम) संदर्भात आणि तथाकथित राशी-नक्षत्रांच्या संदर्भातही सूर्य ‘स्थिर’ आहे. पृथ्वीच्या ३६५ दिवसांच्या चक्राकार प्रदक्षिणेत रात्रीच्या वेळी वेगवेगळी ‘तथाकथित राशी-नक्षत्रे’ दृष्टोत्पत्तीस पडतात, याचा अर्थ ‘नयनरम्य व्हिज्युअल स्पेक्टॅकल्स’ यापेक्षा अधिक नाही. अतिप्राचीन, प्राचीन आणि मध्ययुगीन काळातही ‘सूर्य, चंद्र, ग्रह-तारे सर्व काही आपल्या पृथ्वीभोवती गरगरा फिरत आहेत,’ असा भ्रम आपल्या इथेच नव्हे, तर साऱ्या जगात होता. त्या वेळच्या निव्वळ आणि फक्त निव्वळ आकाश निरीक्षणातून निर्माण झालेल्या राशिचक्रांना आणि नक्षत्रांना आजच्या घडीला किती महत्त्व द्यायचे याचा विचार मोने करणार की नाही? खगोल-विज्ञानाची व्याप्ती व आवाका ‘आकाश निरीक्षणा’च्या कितीतरी पलीकडला आहे हे सत्य लोकांना सांगणार की नाही? इथे आधीच आपल्याकडे अमक्या राशीत ‘मंगळ’ अन् तमक्या राशीत ‘शनी’ म्हणून अनेक अनुरूप युवक-युवतींचे विवाह (होण्याआधीच) बाद ठरविले जातायत! अशा अंधश्रद्ध सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात मोने ज्योतिषी परिभाषा, अन् तीही सततच्या सतत कशासाठी ‘हॅमर’ करताहेत?
आता राहिला प्रश्न ‘उत्तरायणा’संबंधीचा. इथेदेखील खगोल-विज्ञान स्पष्टपणे सांगते की, सूर्य आपली स्वत:ची दक्षिणयात्रा संपवून-थांबवून मग उत्तरेकडे ‘प्रयाण’ वगैरे काहीही करीत नाही. सूर्याची तथाकथित ‘दक्षिणयात्रा’ अन् तथाकथित ‘उत्तरयात्रा’ हे भ्रम आहेत.
वैज्ञानिक सत्य हे आहे की, उत्तर-दक्षिण ध्रुवांना जोडणारा पृथ्वीचा अक्ष (अॅक्सिस) सुमारे २३ अंशांनी कललेला आहे आणि वर्षांचे ३६५ दिवस तो तसाच कललेला राहतो. त्यामुळे २२ जूनला उत्तर गोलार्ध तर २२ डिसेंबरला दक्षिण गोलार्ध सूर्याच्या दिशेला जास्तीत जास्त कललेले (टिल्टेड) असतात. २२ डिसेंबरला आपल्या इथे सर्वात मोठी रात्र अन् सर्वात लहान दिवस असतो याची
वैज्ञानिक कारणमीमांसा ही अशी सोपी-सरळ आहे. २२ डिसेंबरनंतर सूर्य ‘पॅक-अप’ वगैरे करून ‘उत्तरायण’ सुरू करीत नाही! सूर्य असतो तिथेच स्थिर असतो. २२ डिसेंबरला तिथेच अन् २२ जूनलाही तिथेच!! वर्षांचे ३६५ दिवस सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला आपला सूर्य त्याच स्थानी अविचल असतो, असे असताना सूर्याचे ‘उत्तरायण’ अन् ‘दक्षिणायन’, त्यादरम्यान येणारे तथाकथित ‘संपात-बिंदू’ त्याचप्रमाणे सूर्याचे विविध राशींमधून होणारे तथाकथित ‘संक्रमण’ यांसारख्या भ्रामक कल्पना आणखी किती काळ उराशी कवटाळून बसणार? पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण हे वैज्ञानिक सत्य असतानाही, सूर्याला पृथ्वीभोवती फेरा मारायला लावणारे उरफाटे, आचरट गृहीतक (हायपोथेसिस) हे जनमानसात आधीच रुतलेल्या अंधश्रद्धांना आणखी जास्त घट्ट करणारे आहे, याची मोने यांना जाणीव आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा