नाना पाटेकरांची एक प्रतिमा आहे. रांगडा आणि परखड अशी. ते मोठे अभिनेते आहेतच. पण तिथंही पुन्हा हीच प्रतिमा आहे. तिथं त्याला जोड असते हळव्या रोमँटिकपणाची. नाना कविताबिविता म्हणू लागतात, तेव्हा भलतेच उबदार वाटतात, धनगरी घोंगडीसारखे. या प्रतिमांमुळं होतं असं, की नाना आपले वाटता वाटता त्यांचा दरारा वाटू लागतो. प्रत्यक्ष बाळासाहेबांना चार शब्द सुनावण्याची ऐपत असलेला हा मनुष्य. त्यांच्या फटकळ वाणीचा दरारा वाटणारच.
नानांच्या अंधेरीच्या घरी जाताना त्यामुळे थोडी धाकधूकच होती, की त्यांचा मूड असला तर बरं. रस्त्यात चार ठिकाणी पत्ता विचारत पोचलो, तेव्हा संध्याकाळ झाली होती. इमारतीच्या खालून संपादकांनी त्यांना मोबाइल लावला. त्यांनी खिडकीतून खाली डोकावलं आणि खणखणीत साद दिली- गिरीश.. म्हटलं, व्वा! अंधेरीच्या उच्चभ्रू सोसायटीत अशी वरून जोरात हाक मारणं हे खरं रांगडेपण!
या-या..करत नानांनी स्वागत केलं. घरात ते एकटेच होते. अंगात सँडो बनियन नि धावायला जाताना घालतात तशी राखाडी पँट. एका लाकडी कोचावर पुस्तकं, कवितांचे काही कागद. एका पुस्तकात खुणेसाठी चष्मा ठेवलेला. घरात सगळं शिसवी फíनचर. एक पुस्तकांचं कपाट. समोर छोटय़ा स्टँडवर भलामोठा टीव्ही. चारी कोपऱ्यांत बोसची म्युझिक सिस्टिम आणि िभतीवर फक्त नानांच्या वडिलांचं पोटर्र्ेट. ते नटाचं अपार्टमेंट नव्हतं. ते घर होतं. ओळखपाळख झाली. संपादकांनी- मी पूर्वी गोव्यात पत्रकार म्हणून काम करत होतो, असं सांगितल्यावर नाना जरा खुलले.
म्हणाले, अरे, गोव्यात मी एक मस्त घर बांधलंय. असं समोर पाहिलं की समुद्र. अधूनमधून तिथं जातो. आता लवकरच तिकडं जाणार आहे. लग्न आहे घरातलं. मग त्यांच्या गोव्यातल्या आठवणी निघाल्या. खासकरून दोस्तदारांच्या. हा काय करतो, तो कुठं असतो.. गोव्यासाठी दोघांच्याही मनात एक हळवा कोपरा राखून ठेवलेला..
नानांची गप्पांची गाडी फार काळ एका स्थानकावर थांबत नाही. एखाद्या नदीसारखा तो प्रवाह असतो. वाहता वाहता त्याला उपनद्या फुटतात. जरा वेळाने लक्षात येतं- मुख्य विषय बाजूलाच पडलाय आणि उपनदीचीच महानदी झालीय. मग पुन्हा तो प्रवाह कधी तरी पहिल्या वळणावर येतो. गोवा, हेमलकसा, आनंदवन, आमटे कुटुंबीय, तिथं जाऊन त्यांच्याबरोबर व्यतीत केलेले दिवस, विजयाबाई, आजकालचं जगणं, समाज, भ्रष्टाचार, नक्षलवाद.. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे अनेक विषय निघत होते. नाना बोलत होते. मधेच कविता वाचून दाखवत होते. मधेच पूर्वीच्या दिवसांच्या, नाटकातल्या गमती सांगत होते. बोलता बोलता त्यांनी उठून बबन प्रभूंची नक्कलही करून दाखवली. त्या गप्पा नव्हत्याच. तो एक सहज स्वाभाविक परफॉर्मन्स होता. रक्तपेशींमध्ये अभिनय असा मुरला की, माणसाचं साधं बोलणंही सिनेमॅटिक होऊन जात असावं.
संपादकांनी येण्यामागचा हेतू सांगितला. जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात ‘लोकसत्ता’चा वर्धापनदिन आहे. तुम्ही अतिथी संपादक म्हणून तो अंक काढावा आणि त्यानिमित्ताने आजच्या सामाजिक परिस्थितीवर तुम्ही भाष्य करावं, अशी कल्पना आहे. बरोबर राम जगताप होता. तो म्हणाला, त्यानिमित्ताने ‘लोकरंग’मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांचे या विषयावरचे लेखही यावेत. तर तुम्ही काही नावं सुचवा. मग त्यावर चर्चा सुरू झाली. बोलता बोलता नानांना काही तरी आठवलं अन् ते तटकन् उठून आत गेले. अरे, घरात कुणी नाही रे चहा करायला. हे घ्या, असं म्हणत त्यांनी समोर ड्रायफ्रूटच्या तीन बरण्या आणून ठेवल्या. चहाऐवजी चखना! मनात म्हटलं, हेसुद्धा भारीच. यामुळेच नाना आवडून जातात.
पुढच्या आठवडय़ात पुण्याच्या त्यांच्या घरी गेलो, तेव्हा त्यांनी पाहुणचाराची ही कसर भरून काढली. तो नाताळचा दिवस होता. नानांच्या सोसायटीत पोचलो तेव्हा दुपारचे बारा-साडेबारा झाले होते. लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर गेलो. तिथं समोर दोनच फ्लॅट. दोन्हींवर नावं नाहीत की नंबर. आता यातलं नानांचं घर कोणतं? एका घराचा दरवाजा उंची लाकूडकाम केलेला होता. म्हटलं, नक्की हे नानांचंच घर. इथंही लाकडी फíनचरचंच ऐश्वर्य होतं. बाहेर बाल्कनीत एका मोठय़ा गोल टेबलभोवती आम्ही बसलो. नानांनी विचारलं, काय काही खाल्लंबिल्लं की नाही? संपादक म्हणाले, ‘हो, येताना चहापाणी झालं फूड मॉलवर.’ बोलता बोलता नानांनी आतून बाजरीच्या भाकरीचा चिवडा अन् दह्य़ाच्या ताटल्या आणून आमच्यासमोर ठेवल्या. म्हणाले, ‘घ्या. मी स्वत: बनवलाय.’ नानांसारखा मोठा स्टार- अभिनेता स्वत:च्या हाताने बनवलेले पदार्थ स्वत:च वाढत होता. काय कसा झालाय, विचारत होता. पचायला जरा कठीणच होतं ते!
नाना सांगत होते, मला स्वैपाकाची आवड आहे. मी कुणाला बाहेर पार्टी देत नाही. पार्टीचा अर्थ, मी माझं सगळं करणार. विचारणार- कसं झालंय, छान झालंय?..भडव्या, सकाळी गेलो होतो, सहाला उठलो, मटण आणलं, मग हे केलं, ते केलं.. असं सगळं!..
नानांना शिव्यांचं सोवळं नाही. त्यांच्या व्याकरणात भडव्या वगरे शब्द म्हणजे सर्वसाधारण सर्वनामं असतात. पण असं असतं ना, की शिवी, शिवी केव्हा होते, तर जेव्हा ती िहस्र असते. नानांच्या शिव्यांत आपुलकी असते. म्हणजे ते चिडलेले नसतील तेव्हा. एरवी त्यांच्या शिव्या म्हणजे चॉपरच! एकूणच एक स्वच्छ, ग्रामीण मोकळेढाकळेपणा हे नानांचं वैशिष्टय़. तुकाराम हा त्यांच्या आवडत्या कवींतला एक. तेव्हा हा मोकळेपणा थोडा तिथून अन् थोडा कोकणातल्या, मुंबईच्या चाळीतल्या जुन्या दिवसांतून आला असावा.
नानांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. संपादक, मुकुंद संगोराम, राम जगताप प्रश्न विचारत होते. नाना बिनधास्त उत्तरत होते. दूर मराठवाडय़ातल्या दुष्काळाने हळहळत होते. भ्रष्टाचाराने चिडत होते. पुन: पुन्हा माणसाच्या तुटलेपणावर बोट ठेवत होते. माणसं अशानं नक्षलवादी होतील, असं म्हणत होते. प्यायला पाणी नाही रे तिथं. तुम्ही त्यांना असं िभतीत ढकलत ढकलत नेलं ना, तर एक दिवस सगळे नक्षलवादी होतील..! अन्यायी व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या नक्षलवाद्यांबद्दल नानांना रोमँटिक ओढ असल्याचं दिसत होतं. कदाचित त्या नक्षलवाद्यांमध्ये त्यांना त्यांची तारुण्यातली आग दिसत असावी, की ती ‘अंकुश’, ‘क्रांतिवीर’मधल्या नानाची वैचारिक पोझ होती? काहीही असेल. पण त्या क्षणी ती अत्यंत अस्सल वाटत होती.
नानांचा धबधबा सुरूच होता. एवढय़ात घरकाम करणाऱ्या बाईंनी येऊन सांगितलं- बाहेर कुणी भेटायला आलंय. नानांनी बसल्या जागेवरून हाक दिली- कोण आहे रे? एक मध्यमवयीन गृहस्थ दबकत आत आले. त्यांच्याबरोबर एक तरुण मुलगा होता.
सर, आमंत्रण द्यायला आलोय.. प्रदर्शनाचं.. असं म्हणत त्या गृहस्थांनी अदबीने नानांच्या हाती एक अल्बम दिला. कुठल्या गावचे रे तुम्ही? नानांनी अल्बम चाळता चाळता विचारलं. त्या गृहस्थांच्या पत्नीने भरतकामातनं साकारलेल्या कलाकृतींची ती छायाचित्रं होती. एकाहून एक उत्तम अशी. ती पाहून नाना भारावलेच. आम्हाला दाखवत त्या एकेका कलाकृतीचं कौतुक करू लागले. अखेर म्हणाले, येतो.. नक्की येतो. किती वाजेपर्यंत आहे प्रदर्शन? त्या गृहस्थांच्या चेहऱ्यावर देव पावल्याचा आनंद दिसत होता. ते दोघे गेल्यावर नाना म्हणाले, ‘येतात रे माणसं अशी भेटायला.. भेटतो त्यांना. माणूस कसा आहे त्यावर आहे ते. काही वेळा आईमाईही काढतो.. पण मला या आर्टस्टि लोकांबद्दल खूप वाटतं. माझा सलामच आहे त्यांना. मोठीच मंडळी आहेत. आणि सगळ्या अडचणींतनं जाऊन हे करीत असतात रे..’
संपादक म्हणाले, ‘..पण तुम्हीही आर्टस्टि आहात. तेव्हा तुम्हाला असं अनाहूत कोणी आलं तर त्याचा व्यत्यय वाटत नाही का?’ नाना म्हणाले, ‘मला नाही कधी व्यत्यय वाटत. उलट, मीच व्यत्यय असतो च्यायला. कुणाकुणाला खूप त्रास देतो.’
दुपार कलायला लागली होती. गप्पा सुरूच होत्या. काही तरी बोलता बोलता वाक्य अध्र्यावरच तोडत नानांनी विचारलं, ‘वाजले किती?.. तीन.’
आपण जेवायला जाऊया ना.. खालीच पलीकडे एका छोटेखानी हॉटेलात जेवायला निघालो. नाना म्हणाले, ‘जवळच आहे. पायीच जाऊ.’ मराठी रंगभूमी, िहदी चित्रपटसृष्टी गाजवलेला हा अभिनेता साध्या माणसासारखा रस्त्याने चालला होता. आजूबाजूची माणसं थबकून त्यांच्याकडं पाहत होती. त्यांच्या डोळ्यांत खूप काही तरी आश्चर्य पाहिल्याचे भाव स्पष्ट वाचता येत होते. जाता जाता नाना कुणाला हात करत होते. कुणाशी हात मिळवत होते. सोसायटय़ांच्या रखवालदारांना, कसा आहेस रे बाबा, म्हणून पुसत होते. हॉटेलातही तसंच. तिथल्या वेटर मंडळींना तर काय करू अन् काय नको असं झालं होतं. जेवायला आलेली मंडळी नानांबरोबर हौसेने फोटो काढून घेत होती. मग सगळ्या वेटर लोकांनीही फोटो काढून घेतले. नानांना कशाचाच व्यत्यय वाटत नव्हता.
आमच्या गप्पा सुरूच होत्या. नाना अनेक विषयांवर बोलत होते. पडद्यावरचे क्रांतिवीर नाना आणि आमच्यासमोर मेथीची भाजी खात असलेले नाना.. त्यांच्या मतांमध्ये फार फरक जाणवत नव्हता. पोटतिडीक तीच होती. फटकळपणा तोच होता आणि रोमँटिक भाबडेपणाही तोच होता. पडद्यावरचे नाना त्या क्षणी तरी तसेच लार्जर दॅन लाइफ वाटत होते. पत्रकारितेत इतकी र्वष काढल्यानंतर असं सहसा होत नसतं. त्या दिवशी नानांना भेटलो, तो अपवादच म्हणायचा.
रांगडा आणि रुमानी!
नाना पाटेकरांची एक प्रतिमा आहे. रांगडा आणि परखड अशी. ते मोठे अभिनेते आहेतच. पण तिथंही पुन्हा हीच प्रतिमा आहे. तिथं त्याला जोड असते हळव्या रोमँटिकपणाची. नाना कविताबिविता म्हणू लागतात, तेव्हा भलतेच उबदार वाटतात, धनगरी घोंगडीसारखे.
First published on: 13-01-2013 at 01:09 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toughest and respective