गेल्या वर्षी तब्बल ४.७५ लाख भारतीय क्षयरोगामुळे ( टीबी) मरण पावले. हा सरकारी आकडा आहे. तो कदाचित जास्तही असून शकतो. नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या क्षयरोग नियंत्रण परिषदेमध्ये पंतप्रधानांनी सर्व राज्यांना क्षयरोग समूळ नष्ट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘क्षयरोगमुक्त भारत’ हे ध्येय साध्य करण्यासाठी २०२५ पर्यंतची मुदत पंतप्रधानांनी दिली आहे. आजघडीला तरी हे एक अत्यंत कठीण असे आव्हान आहे..
शनिवारी (२४ मार्च) रोजी जागतिक क्षयरोग दिन पाळण्यात आला. त्या निमित्ताने क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी काय करणे शक्य आहे, याची चर्चा करणारा विशेष लेख..
४ मार्च १८८२ च्या संध्याकाळी जर्मन संशोधक रॉबर्ट कॉक्स यांनी एक सभा बोलावली. क्षयरोग वा टीबी हा आजार हवेतून पसरतो व त्याची भयावहता ही कॉलरा, प्लेग या साथीच्या रोगांहूनही अधिक आहे हे सांगत क्षयरोगाचा जिवाणू कोणता व त्याला कसे ओळखायचे हे रासायनिक द्रव्ये व सूक्ष्मदर्शक घेऊन प्रात्यक्षिक करून सर्वाना दाखवले आणि जगाला ‘मायक्रोबॅक्टेरिअम टय़ुबरक्युलॉसिस’ या सूक्ष्मजीवाची ओळख झाली.
आज हा आजार एक ‘टॉप किलर’ झालेला आहे व साऱ्या भारत वर्षांला या सूक्ष्मजीवाने जेरीस आणले आहे. साऱ्या जगातील क्षयरोगाचा तब्बल २५ टक्के भार आपण वाहतोय. साहजिकच क्षयरोगाचा पसारा हा शेकडो, हजारोत नाही तर क्षयरोग ही ‘लाखा-लाखांची गोष्ट’ आहे. गेल्या वर्षी तब्बल पावणेपाच लाख भारतीय क्षयरोगामुळे मृत्यू पावले. कदाचित हा आकडा अधिकही असेल. या आधुनिक काळात जेव्हा आपण अनेक आघाडय़ांवर प्रगती केली आहे, विज्ञानयुग आहे, पण तरीही दरवर्षी लाखांमध्ये जनसंहार, दिवसाला हजारहून जास्त मृत्यू या आजारामुळे होतात ही अत्यंत अस्वस्थ करणारी बाब आहे. पण हीच दारुण वस्तुस्थिती आहे. औषधे, रोगनिदानाच्या सुविधा, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, केमिस्टची दुकाने हे सर्व असूनही आज आपण क्षयरोगाचाविरुद्धच्या लढाईत प्रचंड पिछाडीवर आहोत. सामाजिक आरोग्याची व देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासाला बाधा आणणारी ही एक मोठी आणीबाणीची स्थिती आहे. विस्कळीत आरोग्यव्यवस्था, सशक्त प्राथमिक आरोग्यव्यवस्थेचा अभाव, जनमानसात न रुजलेली आरोग्यसाक्षरता या पाश्र्वभूमीवर क्षयरोगाविरुद्धची लढाई अधिकाधिक कठीण होत आहे. चुकीच्या (तर्कविसंगत) औषध योजना, अर्धवट सोडले गेलेले उपचार, चुकीचे वा विलंबाने झालेले रोगनिदान क्षयरोग समस्येची गुंतागुंत वाढवत आहेत. शासनातर्फे युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. अलीकडील काळात अनेक नवीन योजना उदा., खासगी क्षेत्रातील रुग्णांनाही मोफत औषधे, रेझिस्टंट क्षयरोगाचे निदान होण्यासाठी आधुनिक रोगनिदान पद्धती, ज्यांना क्षयरोगाची लागण झालेली असण्याची शक्यता आहे, त्यांचे टेस्टिंग, इत्यादी. अलीकडेच १३ मार्चला दिल्लीत जागतिक पातळीवरचा ‘एन्ड टीबी समिट’ ही शिखर परिषद भरवली गेली होती. क्षयरोगमुक्त भारत करण्यासाठी २०२५ सालचे उद्दिष्ट पंतप्रधानांनी देशासमोर ठेवले. आजघडीला तरी हे एक अत्यंत कठीण असे हे आव्हान आहे. आपण कुठेतरी कमी पडतोय हे निश्चित. खासगी व शासकीय यंत्रणेत अधिक एकवाक्यता, मार्गदर्शक तत्त्वांना धरूनच रॅशनल प्रिस्क्राइबिंग, रुग्णांनी पूर्ण कालावधीसाठी उपचार घेणे, त्वरित रोगनिदान होणे हे अत्यंत गरजेचे आहे. फुप्फुसाच्या क्षयरोगाच्या उपचारांवर न आलेला एक रुग्ण १० ते १५ व्यक्तींना वर्षभरात आपल्या इन्फेक्शनची देणगी देत फिरत असतो.
क्षयरोगाच्या रुग्णांबाबत डॉक्टर, फार्मसिस्ट व स्वत: रुग्ण यांनी केलेली कोणतीही चूक ही रुग्णासाठी तर महागात पडतेच, पण साऱ्या समाजासाठीच घातक ठरते. त्यामुळे ‘क्षयरोगा’ला अत्यंत ‘स्पेशल’ समजणे व जबाबदारीने हाताळणे ही काळाची गरज आहे.
हे कायम लक्षात ठेवा!
* क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे व पूर्ण कालावधीसाठी (६ महिने किंवा अधिक) उपचार घेणे आवश्यक आहे.
* अर्धवट वा चुकीच्या उपचारांनी क्षयरोगाचे जंतू बंडखोर होतात व रेझिस्टंट टीबी हा घात क्षयरोग होतो. यासाठी दोन वर्षे वा अधिक कालावधीसाठी उपचार घ्यावे लागतात व यात यशाची खात्री १०० टक्के देता येत नाही.
* फुप्फुसाचा क्षयरोग हा संसर्गजन्य आहे व दोन आठवडय़ांहून अधिक खोकला, बारीक ताप, वजन घटणे, घाम येणे अशी याची काही सर्वसाधारण लक्षणे आहेत.
* रुग्णांनी स्वमनाने औषधे घेत राहण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांकडे वा शासकीय इस्पितळात जाऊन त्वरित उपचार चालू केल्यास रुग्णाचाही फायदा आहे व त्याच्यापासून इतरांना लागण होण्याची शक्यताही कमी होईल.
* क्षयरोग झालेल्यांची माहिती शासनाकडे देणे हे शासनाने सक्तीचे केले आहे व त्यामुळे डॉक्टर्स, प्रयोगशाळा, फार्मसिस्ट यांनी ही माहिती देणे व त्यासाठी रुग्णांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
* कोंदट घरे, प्रदूषण, गर्दी, धूम्रपान-दारूसारखी व्यसने, कुपोषण, चुकीची जीवनशैली, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींचा अभाव क्षयरोगासाठी पोषक घटक आहेत. एड्स, मधुमेह झाल्यास क्षयरोग होण्याची शक्यता वाढते.
* रोगनिदान, उपचार या बाबतीत सुधारणा करतानाच क्षयरोगासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याची गरज आहे. ‘पोषण’ उत्तम असल्यास प्रतिकारक्षमता उत्तम राहून क्षयरोग होण्याची शक्यता कमी होते. उत्तम पोषण हे क्षयरोगासाठी एक प्रकारची उत्तम ‘लस’ आहे. याकडे शक्यतो आपण पुरेसे लक्ष दिलेले नाही. क्षयरोगाच्या ५५ टक्के केसेस या कुपोषणाशी निगडित आहेत, असे संशोधन सांगते.
प्रा. मंजिरी घरत symghar@yahoo.com