प्रदीप आपटे

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

समुद्रमार्गे व्यापाराची सक्तीच झाल्यावर कुठली बंदरे कुठे वगैरेच्या नोंदी करणे भागच पडले. अशा स्मृती आणि नोंदींतून नकाशे बनलेच, पण नौवहनाच्या शिस्तीलाही काहीएक आकार आला.. तो कसा?

शेक्सपीअरच्या ‘र्मचट ऑफ व्हेनिस’ (अंदाजित साल १५९६-१५९८) या नाटकाची सुरुवात होते ती तीन व्यापाऱ्यांच्या संवादाने. अँटोनिओ त्यातला एक व्यापारी. तो मोठा चिंतातुर आहे. त्याची जहाजे निघाली आहेत. जहाजावर मोठा किमतीमोलाचा माल आहे आणि ती जहाजे वादळात सापडली आहेत अशी त्याला कुणकुण आहे. ती कुठवर पोहोचली असतील? कुठल्या भागात असतील? वादळात सापडून भरकटली? की खडकाळ भागांवर आपटून नादुरुस्तीने अडकली? की कुण्या चाचे लोकांनी भंडावून त्यांनी कावा साधला? अशा अनेक शंकांची काळजी त्याला जाळते आहे! अँटोनिओला असा सचिंत बघून त्याचा मित्र म्हणतो, ‘‘तुझं चित्त जणू समुद्री लाटांवर खळबळतंय.’’

हे चित्र आहे व्हेनिसमधले! इटलीच्या भरभराटलेल्या नैसर्गिक बंदराचे! तुर्कस्तानने कॉन्स्टनटिनोपलवरून जाणारा भूमार्ग काबीज करून नाकेबंद केलेला तो काळ आहे. समुद्रमार्गाशिवाय गत्यंतर नाही.

नवे सागरी मार्ग शोधण्याची मजबुरी तर आहेच, पण त्याचबरोबरीने नवे प्रदेश आहेत. तिथल्या नव्या बाजारपेठा आहेत. नव्या पुरवठय़ाच्या शक्यता आहेत आणि त्यातून ‘घबाड लाभेल’ असं खुणावणारी संपत्तीची भुरळही आहेच! यामुळे युरोपातले राजे, सरदार अशा नव्या ‘अपरिचित प्रदेशांच्या’च्या शोधांसाठी दर्यावर्दीना पाठबळ देऊ लागले होते. ख्रिस्त विरुद्ध महंमद पाठीराख्यांच्या ‘क्रुसेडी’ झगडय़ांसोबतीने ही साम्राज्यविस्ताराची राजेशाही उमेदसुद्धा होतीच.

सतराव्या शतकाच्या प्रारंभालाच दोन व्यापारी मंडळी ऊर्फ ‘कंपनीं’ची स्थापना झाली. एक इंग्लिश आणि दुसरी डच. दोन्हींच्या नावांत ‘ईस्ट इंडिया’ हे शब्द समान! कारण पूर्वेकडे असलेला हिंदुस्तान, त्याच्या दक्षिणेलगतचा सिलोन, पूर्वेलगतचा चीन आणि दक्षिण पूर्वेतल्या बेटांतून मसाल्याचे पदार्थ खेरीज अनेक ज्ञात-अज्ञात विकाऊ वस्तू, कच्चा माल यांची कंपन्यांना मोहिनी होती. त्या कंपन्यांना मायभूमीपासून दूरदूरवरच्या भागांशी व्यापारात उतरायचे होते. एका ठिकाणाहून माल मिळवून वाटेतल्या भागातून वाट काढीत काढीत मायभूमीला परतायचे तर फार मोठा समुद्रमार्गी पल्ला ओलांडत यावे लागायचे. जिथून माल खरेदी करायचा तिथला किनाऱ्याचा आणि गरज पडेल तसा किनाऱ्यांच्या पुढचा म्हणजे ‘आतला’ भूभाग जुजबी परिचित असायचा. नव्या जागी चौफेर फिरून यावे अशी सोय आणि तरतूद तोकडी असायची. तरीदेखील कानी पडतील त्या गोष्टी, दिसतील/ हाताळता येतील त्या वस्तू, भेटतील त्या व्यक्ती न्याहाळायच्या! त्याची नोंद करायची, तिचे ‘स्मरण’ ठेवायचे. पुनर्भेटीत कुणालाही उमगेल असे वर्णन करायचे ही सवय काहींनी लावून घेतली. गरजेपोटी आणि सोयीपोटी. तीच प्रवासवर्णनांची मूळ घडण आणि ठेवण.

समुद्रमार्गाने येताजाता कुठेकुठे थांबता येते. तिथे आणखी काही बाजारी व्यवहार संभवतो का? जहाजाची दुरुस्ती आणि जहाज उतरणीची सोय काय आहे? सागरी वाटेवर हल्ला करून मालाची वाटमारी होते का? त्यांच्याशी मुकाबला करायला काय तयारी पाहिजे? असे किती तरी प्रश्न असायचे. परंतु भरवशाची निश्चित उत्तरे नसायची. व्यापार कुणीही केला, भले अगदी ईस्ट इंडिया कंपनीसारख्या राजाश्रय लाभलेल्या ‘कंपनी’ने केला तरी या अपरिचितपणामुळे, ‘निखात्री’पणावर तोडगा नव्हता.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने उपलब्ध माहिती धुंडाळायचा सपाटा सुरू केला. हिंदुस्तानात शिरायचे तर अगोदर तिथे समुद्रमार्गे पोहोचले पाहिजे. एकीकडे त्यांनी पाठबळ दिलेली जहाजे मोहिमांवर निघाली. २ मे १६०१ : इंग्लिश खाडीच्या ‘टॉर बे’वरून जेम्स लांकेस्टर आपली चार जहाजे आणि शिधा घेऊन निघाला. ही कंपनीच्या आरंभकाळातील पहिली लक्षणीय मोहीम. पुढच्या वीस वर्षांत दरसाल किमान एक वा अधिक मोहिमा कंपनीने राबविण्याची शिकस्त केली. १६०७ सालच्या मोहिमेचा म्होरक्या होता कॅप्टन कीलिंग. सुरत येथे पोहोचणारा हा पहिला यशस्वी म्होरक्या! कीलिंगनेच फिंच यांना सुरतेला आणले. त्याच्या हाताखालचा उपमुख्य कप्तान हॉकिन्स पुढे आग्रा येथे जाऊन मुघल दरबारी पोहोचला. कशासाठी? तर येणाऱ्या इंग्रजांना मुघल अधिकाऱ्यांनी ‘न्याय्य आणि सहकंप कृपाळूपणे’ वागवावे असे फर्मान मिळविण्यासाठी!

या सगळ्या खटाटोपांनंतर हाती काय आले? तर या खलाशी लोकांनी केलेले गद्य वर्णन आणि चित्ररूप तुकडय़ांतली माहिती! त्या वेळचा प्रचलित इंग्रजी शब्द म्हणजे ‘प्लॉटस्’ ऊर्फ ‘चार्ट्स’.  त्या जोडीला जहाजे हाकारण्याबद्दलच्या टेहळणीवजा सूचना! वाटेने जाताना ‘आधी’ आणि ‘नंतर’ टेहळता येतील अशा ठिकाणांची वर्णने. दुर्बिणीतून दिसणारे दूरवरचे प्रदेश- त्याच्या नभरेखा, ठरावीक कालखंडाने उमगणारे अक्षांश, दिशांतरीचे तारामंडल वा नक्षत्रे अशा नोंदी काळजीपूर्वक केल्या जात. त्या काळात रेखांश उमगण्याची क्लृप्ती अवगत झाली नव्हती. या सगळ्या निरीक्षणांची, टिपा आणि सूचनांची जंत्री काळजीपूर्वक तपासून तयार झाली एक नियमावली! त्याचे नाव ‘रुल्स फॉर ईस्ट इंडिया नेव्हिगेशन्स’. या ‘विधि-नियमां’चा ‘स्मृती’कार होता जॉन डेव्हिस ऑफ ल्यूमहाऊस! त्याने स्वत:च अशा पाच मोहिमा हाकारल्या होत्या.

या जोडीनेच दुसरे आणखी एक शोध- संकलन जारी होते. त्याचा प्रणेता रिचर्ड हाकल्यूत! हा वयाच्या पाचव्या वर्षी अनाथ झालेला एका कातडी आणि फरविक्रेत्याचा मुलगा. वेस्टमिन्स्टर शाळेत शिष्यवृत्तीवर शिकत होता. त्याच्या सांभाळकर्त्यां चुलत्याने जगाची व्युत्पत्ती, बायबलसंबंधी नकाशे अशा गोष्टी ऐकविल्या. हाकल्यूत अशा भौगोलिक ज्ञानाबद्दल इतका मोहून गेला की त्याचा हा झपाटलेला ध्यास होऊन बसला. केंब्रिज वा ऑक्सफर्ड विद्यापीठे म्हणजे मुळात ख्रिस्ती धर्मगुरू प्रवचक तयार करणाऱ्या प्रौढशाळा ऊर्फ कॉलेजांचा समूह. हाकल्यूत ऑक्सफर्डमध्ये शिकला. यथावकाश तो ‘वेस्टमिनस्टर’चा आर्कडिअकान म्हणजे ‘उपधर्माधिकारी’ बनला. पण त्याने भू-गोल ज्ञानाचा वसा सोडला नाही. त्या वेळी उपलब्ध असणारे भूगोलविषयक प्रत्येक वाक्य त्याने वाचले. मिळतील ती प्रवासवर्णने, त्याबद्दलच्या नोंदी हौसेने जमविल्या. त्याचे यथायोग्य संकलन संपादन केले. त्या विषयांवर तो जागोजागी व्याख्याने देत असे. या ज्ञानाचा प्रचार-प्रसार हे त्याचे ब्रीद होते. अमेरिका खंड, आसपासचे भूभाग इंग्लिश लोकांनी पादाक्रांत करावे, तिथे वसाहती वसवाव्या, मळे उभे करावे असा त्याचा ग्रह आणि आग्रह असे. त्याचे दोन गाजलेले ग्रंथ ‘डायव्हर्स वोयाजेस टचिंग द डिस्कव्हरी ऑफ अमेरिका’ आणि ‘दि प्रिन्सिपल नॅव्हिगेशन्स वोयाजेस अँड डिस्कव्हरीज ऑफ दी इंग्लिश नेशन्स’. इंग्लंडच्या फ्रेंच राजदूताचा सेवक म्हणून त्याने काम केले होते. त्याच्या ‘धारणां’चे ‘धोरण’ होण्यासारखी परिस्थिती जसजशी आकाराला आली तसतसे त्याच्या या ध्यासाला पाठबळ मिळत गेले. ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाचा पहिला अध्यक्ष सर थॉमस स्मिथ याने त्याला कंपनीचा इतिहासकार नेमले आणि कंपनीने केलेल्या सर्व मोहिमांची इत्थंभूत कागदपत्रे व माहिती त्याच्या हवाली केली. जुन्या माहितीचे परीक्षण, परिशीलन, सुधारणा, नव्या नकाशांची आखणी-रेखणी, गोल आणि गोलार्धाची प्रतिमाने, प्रतिकृती या सगळ्यांचे तो मोठय़ा उत्साहाने संकलन आणि संवर्धन करू लागला. हाकल्यूतच्या या ध्यासाचा वसा तो निवर्तल्यावरदेखील थंडावला नाही. त्याने जमविलेल्या पण अप्रकाशित राहिलेल्या ‘श्रुती-स्मृतीं’चे अनेक खंड रिचर्ड पुर्चासने सिद्धीला नेले! त्याने स्वत: घातलेल्या भरीसह! पुढे तर हाकल्यूतचा गौरवपूर्ण स्मृतिध्यास साकारला तो हाकल्यूतच्या नावाने एक इतिहास मंडळ निघाले ‘हाकल्यूत सोसायटी’! त्या सोसायटीने एकाच गोष्टीला जणू वाहून घेतले. जे आणि जेवढी लाभतील ते प्रवासवर्णनपर स्मृतिनोंदींचे ग्रंथ ही ‘सोसायटी’ छापून प्रसिद्ध करू लागली.

या सगळ्या प्रयत्नांना पुढे आणखी बळ लाभले. कंपनीने १६१६ साली एडवर्ड राइट या त्या काळच्या ‘गणिती’ तज्ज्ञाला मोहिमांच्या माहितीवर जोपासलेली नकाशांची सुधारणा आणि आखणी करण्यासाठी नेमले. कंपनीचा व्यवसायसंपर्क जवळपास हिंदुस्तानच्या पश्चिमेपासून जपानपर्यंत वधारला होता. नवे किनारे, नवे भूभाग सागरतीराने गवसत होते. मूळच्या विधि/नियम स्मृतींचा आवाका वाढतच होता. जे पाहिले, जे केले, ते ‘नोंदवायचे’, ‘कळवायचे’ हा नाविक कामकाजाचा शिरस्ता रूढावला.

यादरम्यानचे बहुतेक नकाशे ‘किनारे किनारे दरिया’ न्याहाळत उपजले. ही सागरी सर्वेक्षणाची नाविक मुहूर्तमेढ. याची परंपरा आणखी विस्तारली. तंत्र आणि यंत्रे सुधारली तसतशी अधिकाधिक सूक्ष्म अचूक होत राहिली. आजमितीला कार्यरत असणाऱ्या नाविक दलाच्या बहुआयामी सर्वेक्षणाची ही नांदी ठरली.

असा हा व्यापारी घडणीने मढलेला पहिला ‘नाविक नकाशेदार’ कालखंड!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com