आज जे अराजक उक्राईनात (युक्रेन) चालू झाले आहे ते पुतीन यांना शह देण्यासाठीच असणार यात शंका नाही. पुतीन काही फार लोकशाहीवादी आहेत असे मुळीच नाही. पण त्यासाठी उक्राईनाला शहीद करण्याची गरज नाही..
उक्राईना- स्थानिक लोक स्वत:च्या देशाला याच नावाने संबोधतात. देशाच्या इतिहासाबद्दल उक्राईनांना अभिमान आहे, परंतु इतिहासात हा भाग पोलंड, रशिया, उस्मानी साम्राज्य (ऑटोमन एम्पायर) यांच्या बेचक्यात सापडलेली एक रणभूमी होता. त्याचे देश म्हणून स्वतंत्र अस्तित्व कधीच नव्हते. सोव्हिएत संघाची शकले झाल्यावरच देश म्हणून उक्राईना अस्तित्वात आले व अनेक अडचणी सोसत हे अस्तित्व त्यांनी टिकवून ठेवले आहे. भारतात, आपल्याला रशिया थोडा फार माहीत असतो पण उक्राईनाचे नाव, रशियाचे धान्याचे कोठार म्हणूनच माहीत असते. आज हा देश लढाईचे मैदान होते की काय ही धास्ती वाटते आहे. म्हणून हा छोटासा परिचय माझे कीवमधील वास्तव्य आनंददायी व यादगार बनवणाऱ्या माझ्या उक्राईनी बांधवांसाठी!
उक्राईनाचा ज्ञात इतिहास साधारणपणे सहाव्या-सातव्या शतकापासून सुरू होतो. स्लाव जमातीच्या टोळ्या उक्राईनाच्या भूमीवर, बल्गेरियाहून येऊन वसत होत्या. या टोळ्या पेगन म्हणजे पंचमहाभूतांची उपासना करणाऱ्या होत्या. जीझसच्या मृत्यूनंतर ख्रिस्ती धर्माचा प्रसार जो-तो आपल्या मगदूराप्रमाणे करत होता. अलेक्सान्ड्रियाच्या बायझेन्टाइन साम्राज्याचा ख्रिस्ती धर्म, १०व्या शतकात कीवच्या व्लादिमीरने स्वीकारला. लगेचच सायबेरियाकडून येणाऱ्या तुर्की टोळ्यांनी बायझेन्टाइन साम्राज्य नष्ट करून उस्मानच्या साम्राज्याचा पाया रचला. कीवमध्ये असलेल्या व्लादिमीरच्या स्लाव साम्राज्याने स्वत:ला बायझेन्टाइनचे धार्मिक तसेच सांस्कृतिक वारसदार म्हणवले व कीवमध्ये दिमाखदार चर्च बांधले. ऑर्थोडाक्स धर्माचे कीव हे केंद्र झाले व आजही आहे. लवकरच चेंगिजखानाच्या मंगोल टोळ्यांनी स्लाव राज्याला व टोळ्यांना उत्तरेकडे
उक्राईनाला हे नाव २०व्या शतकात मिळाले. या लोकांचा वंश स्लाव. बहुसंख्यांचा धर्म आर्थोडॉक्स चर्च, पश्चिमेकडे थोडे लोक कॅथोलिक, भाषा स्लाविक गटात मोडणारी- खूपशी रशियनच्या जवळ पण बरेच पोलीश शब्द व क्रियापदे, व्याकरण रशियन पद्धतीचे आहे. आर्थोडॉक्स चर्च रोमन कॅथोलिकांसारखे एकमेकांशी जोडलेले नसते. मॉस्कोच्या चर्चचा ग्रॅण्ड पॅट्रिआर्क असतो पण त्याचा इतर आर्थोडॉक्स चर्चवरील अधिकार सीमित असतो. आपल्याकडे लोकांची समजूत असते की रशियन हे ग्रीक ऑर्थोडॉक्स असतात, पण ऑर्थोडॉक्स पद्धतीप्रमाणे रशियन, युक्रेन, जॉर्जिया, ग्रीस, केरळ वगैरे प्रांतांतील चर्चेस त्यांची-त्यांची असतात. बल्गेरिया, युक्रेन, रशियन, ग्रीस या प्रांतांची लिपी सिरिलिक आहे. ग्रीक सिरिलिक असली तरी थोडी वेगळी आहे. जॉर्जियाची स्वत:ची लिपी आहे. युक्रेनच्या भाषेवर पोलीश भाषेचा प्रभाव आहे, कारण सतराव्या, अठराव्या शतकात झारचे साम्राज्य बलिष्ठ होईपर्यंत, युक्रेन कधी पोलीश राजाने तर कधी झारने स्वत:च्या अधिपत्याखाली ठेवले होते. कोसॅक गणराज्य सोडल्यास युक्रेनला स्वतंत्र अस्तित्वच नव्हते. बोगदान ख्मिलनित्स्की नावाच्या एका कोसॅक पुढाऱ्याने सर्व युक्रेन, रशियाशी जोडण्याचा करार केला, म्हणून त्याचा पुतळा कीवमध्ये आहे. तर पोलंडमध्ये तो देशद्रोही समजला जातो. तटस्थ विचार केल्यास ख्मिलनित्स्कीच्या कृतीमागे दोन्ही ऑर्थोडॉक्सदेशीयांचे एकत्रीकरण हा विचार प्रामुख्याने असावा.
पोलंड हा कॅथोलिक देश आहे व पोपने रशियाला आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी इतर कॅथोलिक देशांना, रशियाशी लढाया करण्यास अनेकदा उद्युक्त केले होते. आपल्या देशात युरोपचा इतिहासही बराचसा फक्त पश्चिम युरोपचा इतिहासच शिकवला जातो. असो. अर्थात पोलीश लोकं व भाषाही स्लाव गटातच मोडणारी आहे. अठराव्या- एकोणिसाव्या शतकात रशियन झारने, उस्मानच्या साम्राज्याकडून काळ्या समुद्राच्या वरील भूभाग जिंकून स्वत:च्या साम्राज्यात सामील करून घेतला. हा भूभाग म्हणजे क्रीमिया व त्याच्या जवळचा स्टेपे हा गवताळ व सुपीक प्रदेश. स्लाव लोकांनी इथे वस्ती करावी म्हणून झारने शेतकरी
एकोणिसाव्या शतकापासून युरोपात जनतेच्या अस्मिता, एक भाषा व एक संस्कृती याच्याभोवती गोळा होऊ लागल्या. हे घडणे सरळ व सहज नव्हते. त्यामुळे सतत नेशन-देशाची व्याख्या करण्याचा प्रयत्न या काळी होताना दिसून येतो. अशीच व्याख्या लेनिनने क्रांतीपूर्वी १९१३ साली स्तालिनकडून करून घेतली. झारच्या साम्राज्यात विविध भाषी व विविध धर्मी समाज सामील होते. झारविरुद्धच्या लढय़ातही हे सर्व समाज सामील होते. या सर्वाना न्याय देण्यासाठी लेनिन यांना एका वैचारिक मांडणीची गरज भासली. त्या मांडणी अनुसारच उक्राईना अस्तित्वात आला. आज तो स्वतंत्र देश आहे. पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधील व आता स्वतंत्र देशांमध्ये सगळीकडेच उलथापालथ चालू आहे. स्वतंत्र होतेवेळी युक्रेनला वाटले होते की, बाल्टिक देशांप्रमाणे (लाटविया, इस्टोनिया, लिथुआनिया) आपल्यालाही बरीच आर्थिक मदत मिळेल. परंतु सोव्हिएत संघ तुटल्यावर पश्चिमी देशांना उक्राईनामध्ये फारसा रस नव्हता. एक काळ असा होता की, उक्राईनाच्या शहरांमध्ये तेल नसल्याने बस सव्र्हिस चालू नव्हती. तेलाअभावी अनेक प्रश्न सोडवणे कठीण होते. शेवटी परत सर्व स्वातंत्र्यापूर्वी संघीय देश एकत्र आले व स्वत:चे एक कॉमनवेल्थ बनवले. रशियाही तेव्हा अतिशय अवघड परिस्थितीतून जात होता. आता परिस्थिती सुधारत आहे. युक्रेनमध्येही तेल सापडले आहे. आज जे अराजक उक्राईनात चालू झाले आहे ते पुतीन यांना शह देण्यासाठीच असणार यात शंका नाही. पुतीन काही फार लोकशाहीवादी आहेत असे मुळीच नाही. पण त्यासाठी उक्राईनाला शहीद करण्याची गरज नाही. उक्राईना ऐतिहासिक, धार्मिक वा सांस्कृतिक, कुठल्याही दृष्टीने युरोपला जवळचा नाही. त्यांनाच त्यांचे प्रश्न सोडवू द्यावेत हेच त्यांच्या दृष्टीने भलेपणाचे होईल.
युक्रेन शतकानुशतके पोळलेला देश..
आज जे अराजक उक्राईनात (युक्रेन) चालू झाले आहे ते पुतीन यांना शह देण्यासाठीच असणार यात शंका नाही. पुतीन काही फार लोकशाहीवादी आहेत असे मुळीच नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 09-03-2014 at 01:22 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine is burning from centuries