स्वतंत्र तेलंगणाचे आंदोलन आता निर्णायक वळणावर असताना स्वतंत्र विदर्भाचा ‘स्फुल्लिंग’ जवळजवळ विझण्याच्या मार्गावर आहे. विदर्भाचे सामथ्र्य, सौंदर्य आणि भावविश्व याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. उपेक्षा आणि अपेक्षांच्या कात्रीत सापडलेला आजचा विदर्भ कापूस उत्पादक शेतक ऱ्यांचे प्रश्न, सिंचन, नक्षलवादाचा प्रभाव आणि औद्योगिक विकासाच्या मुद्दय़ावरून आक्रमक झाला आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भातील
१९५७ साली झालेल्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबई-महाराष्ट्रासह मराठवाडय़ात तर महागुजरात समितीने गुजरात राज्यात काँग्रेसला पाणी पाजले होते. त्या वेळी विदर्भाच्या जनतेने काँग्रेसला साथ दिली होती. काँग्रेसला विदर्भातील ६२ पैकी ५४ जागांवर दणदणीत विजय मिळाला होता. विदर्भाच्या पाठिंब्याच्या भरवशावर मुंबई राज्याचे तत्कालीन यशवंतराव चव्हाण यांचे सरकार टिकणार होते. परंतु, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा आग्रह धरणाऱ्या सर्व आमदारांनी त्यांचे राजीनामे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या स्वाधीन केल्याने तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे उभा झालेला पेच कन्नमवारांनी विदर्भाची मागणी सोडून दिल्यानंतरच सुटला. यशवंतरावांचे सरकार विदर्भाच्या भरवशावर तरले. राजकीय संघर्षांचा असा पूर्वेतिहास असलेले महाराष्ट्र राज्य १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले. तसे पाहिले तर स्वतंत्र विदर्भाची मागणी नवीन नाही, ती स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची आहे.
महात्मा गांधींनी वर्धेतील सेवाग्रामला आश्रम स्थापन केला आणि १९३४ पासून त्यांनी विदर्भाच्या मातीशी स्वत:ला जोडून घेतले तेव्हाच विदर्भाचे महत्त्व अधोरेखित झाले. अकरा जिल्ह्य़ांचा समावेश असलेल्या विदर्भाची राजधानी म्हणून ओळखली जाणारी नागपूर नगरी भारताच्या मध्यवर्ती स्थानी आहे आणि संपूर्ण भारताला जोडणारे हे शहर आहे. आचार्य विनोबा भावे देशव्यापी भूदान आंदोलनाची यात्रा संपवून १९४६ साली विदर्भात आले तेव्हा नागपूर नगरीतील गिरण्यांचे भोंगे दणाणले होते. या अभूतपूर्व स्वागताने भारावलेल्या आचार्यानी नागपूरला ‘बुद्धिवंतांचे शहर’ अशी उपमा दिली होती. १९४२ सालच्या झेंडा सत्याग्रहादरम्यान सरदार पटेल यांनी नागपूरला भेट दिली तेव्हा त्यांना वैदर्भीय मातीतील क्रांतीची धग जाणवली होती. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात विदर्भातून थोर राजकारणी, साहित्यिक, समाजसेवी, दानशूर, शिक्षणतज्ज्ञांचा उदय झाला. त्यांनी विदर्भाच्या सामाजिक, सांस्कृतिक, कृषी आणि राजकीय चळवळीत दिलेले योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. विदर्भाच्या झाडीपट्टी रंगभूमीला स्वतंत्र इतिहास आहे. ही विदर्भाची अत्यंत सकारात्मक बाजू आहे. इंग्रजांविरुद्ध लढला गेलेला चिमूर-आष्टीचा संग्राम इतिहासातील सुवर्णपान झाला आहे. संक्रमणकाळातून जाताना विदर्भाला प्रांतवाद, भाषावाद, जातीयवादाची किरकोळ झळ बसली असली तरी हिंस्र जातीय दंगलींचा डाग मात्र कधीही लागलेला नाही. विदर्भातील राजकीय पुढाऱ्यांमधील राजकीय मतभेदांचे मनभेदात परावर्तन झाल्याचे पाहण्यात नाही. मध्य भारतात हिंदी भाषकांसोबत राहणाऱ्या मराठी भाषकांनाही तेवढाच सन्मान मिळत आला खरा, परंतु, विदर्भाच्या लोकसंख्येचा एकूण आलेख तयार केला तर मराठी भाषकांपेक्षा हिंदी भाषकांचेच वर्चस्व जाणवेल. मिश्र संस्कृतीचा मिलाप असलेली वैदर्भीय संस्कृती आजही संपन्न म्हणूनच ओळखली जाते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याशी नागपूरचा ऐतिहासिक काळापासून छुपा दुरावा असल्याचा इतिहास लिहिला गेला आहे.
मध्यंतरीचे वाद मुंबईशीही सांस्कृतिक दुरावा निर्माण करून गेले. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राने विदर्भावर अन्याय केल्याची भावना असली तरी महाराष्ट्राच्या अन्य भागांशी सुरेल सांस्कृतिक सुसंवाद साधण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे, याची आठवण या निमित्ताने करून द्यावीशी वाटते. विदर्भाच्या विकासाचे हिरवेगार चित्र फक्त औद्योगिक कारखानदारीने उभे राहील, हा गैरसमज ठरेल. कारण, जंगल, पाणी आणि वीज भरपूर प्रमाणात असल्याने उद्योजकांना आता विदर्भाची आठवण होऊ लागली आहे, याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही. तरीही अलीकडच्या काळातील घडामोडी वैदर्भीय
उद्योगक्षेत्रासाठी पूरक म्हणता येतील कारण, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीच्या दृष्टीने मैलाचा दगड असलेल्या मिहानचे काम सुरू झालेआहे,
विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरू शकणाऱ्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाचा पाया रचण्यात आला आहे. भेलचा प्रकल्प येतो आहे.
या पाश्र्वभूमीवर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर नवे प्रश्नचिन्ह उभे झाले असून जागतिक अर्थकारणाच्या संक्रमणात आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र देश गदागदा हलत असताना स्वतंत्र विदर्भ कसा तगणार हा कळीचा मुद्दा चर्चिला जात आहे. शेतकरी आत्महत्या, कुपोषण, गडचिरोलीतील नक्षलवादाचे प्राबल्य यामुळे विदर्भाचे नकारात्मक चित्र सातत्याने मांडले जाते. पण, त्यावरही कायम उपाय शक्य आहेत. यात विदर्भाच्या जंगलक्षेत्रात राहणाऱ्या आदिवासींचा
विकास हा विकासाचा पहिला टप्पा असू शकतो.
गडचिरोली, गोंदिया, अमरावतीचा मेळघाट, यवतमाळ, बुलढाण्यातील आदिवासी भागांत स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेला ६० वर्षेझाल्यानंतरही विकासाची गंगा पोहोचू शकलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. गोसीखुर्दसह सिंचनाचे शेकडो प्रकल्प मार्गी लावून शेतक ऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले तर समृद्धीची गंगा खळाळून वाहू शकेल. नागपूर वगळता अन्य दहा जिल्ह्य़ांमधील दळवळणाची साधने विकसित करण्यावर भर द्यावाच लागेल.
राज्याच्या अन्य भागांपासून दुरावलेली सांस्कृतिक नाळ जुळण्यासाठी चळवळ उभारावी लागेल. अखंड महाराष्ट्राच्या
वर्धापनदिनाच्या निमित्ताने विदर्भाची उपेक्षा दूर होईल, या अपेक्षेत वैदर्भीय अजूनही आहेत.
विकासाचा असमतोल संपुष्टात येणार!
स्वतंत्र तेलंगणाचे आंदोलन आता निर्णायक वळणावर असताना स्वतंत्र विदर्भाचा ‘स्फुल्लिंग’ जवळजवळ विझण्याच्या मार्गावर आहे. विदर्भाचे सामथ्र्य, सौंदर्य आणि भावविश्व याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सातत्याने केला जात
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-05-2013 at 06:04 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unbalance in development will be decrease development will get start in maharashtra