‘योगा’चा आंतरराष्ट्रीय प्रसार झालेला आहेच आणि आता युनेस्कोनेही आंतरराष्ट्रीय योग-दिनास मान्यता दिलेली आहे. या निमित्ताने भारतीयांनी योगसाधनेकडे का पाहावे आणि कसे पाहावे, याविषयी चिंतन करणारे हे टिपण..  हे काही ‘मार्गदर्शन’ नाही, त्यामुळे त्यातील काही प्रश्न अनिर्णितही वाटतील.. पण हे प्रश्न सहमती आणि सह-कृतीखेरीज सुटणारही नाहीत.
२१ जून हा युनेस्कोतर्फे आंतरराष्ट्रीय योग-दिवस म्हणून मान्य केला जाणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे एक मोठे यश आहे. गेली अनेक दशके अनेक पाश्चात्त्य आणि पौर्वात्य देशांतील नागरिकांना योगाभ्यासात रुची निर्माण झाली आहे. बिहारचा मुंगेर येथील योगाश्रम, लोणावळ्याचे कैवल्यधाम आणि त्यानंतर गेल्या २० ते ३० वर्षांत देशभर शेकडो योगाभ्यास केंद्रे निर्माण झाली आहेत. भारतातली योगपरंपरा पंधराशे वष्रे जुनी आहे असे मानले जाते. महर्षी पतंजलींच्या महत्त्वपूर्ण योगसूत्रांच्या आधीदेखील काही शतके योगविद्याचे विविध प्रवाह भारतवर्षांत चालू असणार, त्यातूनच कदाचित यांचे संकलन एका बाजूला पतंजली आणि नंतर दुसऱ्या बाजूला नाथ संप्रदायाचा हठयोग निर्माण झाले असावेत. आज जगात ‘योगा’चे अक्षरश: हजारो प्रकार व अनेक पटींत योगाभ्यास केंद्रे आहेत. इंटरनेटवर ‘योगा’ या शब्दशोधास लाखो संकेतस्थळे मिळतात. मी मुक्त विद्यापीठात असताना योगशिक्षक अभ्यासक्रमासाठी एक तज्ज्ञ समिती तयार केली होती. यातून एक चांगला योगशिक्षक कार्यक्रम सुरू झाला व तीन-चार हजार पदविकाधारक महाराष्ट्रात तयार झाले. त्याआधी व त्यानिमित्ताने झालेल्या माझ्या अभ्यासातून काही गोष्टी चच्रेसाठी मांडता येतील.
पहिला मुद्दा म्हणजे पतंजलीप्रणीत योगशास्त्रात (अष्टांगयोग) आसन वगरे शारीरिक क्रियांना असलेच तर दुय्यम स्थान (फक्त स्थिर-सुखासनम्) आहे. पतंजली सूत्रानुसार योग म्हणजे ‘चित्तवृत्ती निरोध’ हीच व्याख्या आहे. तरंगहीन सरोवराप्रमाणे चित्त पूर्ण शांत झाल्यानंतर पुढच्या अवस्था गाठता येतात. अंतिम अवस्था समाधी म्हणजे चित्त आणि शरीराची तात्पुरती फारकत करणे हा आहे. पतंजली सूत्रे पूर्णपणे त्या वेळच्या मानसशास्त्रीय माहितीनुसार मांडलेली असून हा कमीत कमी शद्बांत प्रचंड अर्थ सांगणारा ग्रंथ आहे. विवेकानंदांनी ज्याला ‘राजयोग’ म्हटलेले आहे तोही अष्टांगयोगच आहे. या अष्टांगयोगात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या आठ पायऱ्या सांगितलेल्या आहेत. पकी यम म्हणजे अिहसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह ही बाह्य़-व्यावहारिक आचार-संहिता आहे. नियम म्हणजे स्वत:च्या शरीराची शुद्धता, मनाची शुद्धता, संतोष, अभ्यास-तप आणि ईश्वरशरणता हे पाच िबदू आहेत. आसन हे केवळ स्थिर आणि शिथिल स्थिती एवढय़ापुरतेच मर्यादित (आसनांचा विस्तार हठयोगात होत गेला); आणि प्राणायाम ही श्वासोच्छ्वास नियंत्रणाद्वारे प्राणिक ऊर्जा नियंत्रित करण्याची पद्धत आहे. प्रत्याहार हे बाह्य़ वस्तूपासून लक्ष काढून आत ओढणे. धारणा म्हणजे एखाद्या बाह्य़ वस्तूवर चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास, ध्यान म्हणजे आंतरिक एकाग्रता आणि समाधी म्हणजे आत्मप्रचीती किंवा आत्मविलय. समाधीमध्ये अनेक प्रकार व गुंतागंत आहे. मात्र आजकालच्या योगाभ्यासात आसन, प्राणायाम, ध्यान व धारणा हीच चार उपांगे कमीअधिक प्रमाणात व्यवहारात आहेत. आजकालच्या योगाभ्यासात समाधीचा जवळजवळ काहीही संबंध नाही.
योगाचे शारीरिक शास्त्र
मनाचे नियंत्रण करण्यासाठी पुढेपुढे, विशेषत: नाथ संप्रदायात शरीर आसनांमध्ये ठेवण्याचे तंत्र विकसित झाले. शेकडो आसने चार-पाच मुख्य प्रकारांत विभागता येतात. शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने लवचीकता, स्नायूबळ, अवयवांचा सुघडपणा वगरे दृष्टिकोनातून योगासनांची एकूण रचना ही विलक्षण आहे. कसलेल्या हठयोगी लोकांची आसने बघून प्रचंड आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. (नाशिकच्या कुंभमेळ्यात यंदा ही संधी अनेकांना मिळेल. शरीरशास्त्राच्या सामान्य नियमांच्या पलीकडे जाऊन श्वास रोखून धरणे वगरे प्रकारही पाहायला मिळतील. भारतात अनेक अर्वाचीन लेखकांच्या उल्लेखांमध्ये विलक्षण गोष्टी करणाऱ्या साधूंचे उल्लेख आहेत. उदा. गो. नी. दांडेकरांच्या ‘भ्रमणगाथे’त एका साधूच्या ध्यानामध्ये िवचवाच्या तीन-चार दंशांनीही खंड पडला नाही हे वाचणे विलक्षणच.) तासन्तास एकाच आसनात सुखपूर्ण आणि स्थिर असणे ही गोष्ट स्वत:च असंभव वाटावी अशी आहे. केवळ हठयोग म्हटला तरीही भारताची जगाला थोर देणगी ठरू शकते. यमनियम वगरे प्रारंभिक व ध्यानधारणादी अंतिम अवस्थादेखील मानवी संस्कृतीच्या आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरू शकतात (मात्र ईहवादापासून परावृत्त करणे ही एक समस्या यात आहेच, पण ती फार पुढची गोष्ट आहे). आरोग्य-रक्षणासाठी आणि शारीरिक व्याधी टाळण्यासाठी (हेयं दु:खम् अनागतम्) योगशास्त्र एक स्वतंत्र मांडणी करते. याचे शारीरिकशास्त्र शोधण्यासाठी स्वामी कुवलयानंदांनी बरेच अध्ययन केलेले होते. योगाभ्यासातल्या जलनेती, वमन, भस्त्रिका, नौली वगरे शुद्धीक्रिया या सुरुवातीस अशक्य वाटल्या तरी अभ्यासाने सहजसाध्य होतात. यौगिक उपचार पद्धतीत शुद्धीक्रियांना महत्त्वाचे स्थान आहे. (उदा. अगदी जुनाट सायनसायटीसचा / सततसर्दीचा त्रास असेल तर असे बहुतेक आजार जलनेतीने दुरुस्त होऊ शकतात.) शवासनासारख्या शिथिलीकरण पद्धती मानसिक ताण, अनिद्रा, अतिरक्तदाब वगरे व्याधींसाठी उपकारक आहेत यात वाद नसावा. सध्याच्या अनेक जुनाट, खर्चीक दुखण्यांसाठी यौगिक उपचार हा चांगला पर्याय वा पूरक मार्ग आहे.
मानसप्रक्रिया आणि ‘धर्म’
तरीही योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम नव्हे. सूर्यनमस्कारदेखील पारंपरिक योगाभ्यासात न बसणारी गोष्ट आहे पण त्याने त्याची महती कमी होत नाही. शारीरिक योगशास्त्र म्हणजे कमीत कमी कष्टात स्नायूबळ फारसे किंवा अजिबात न वापरता, हृदय किंवा श्वासगती न वाढवता करायचे संथगतिशील किंवा जास्त करून स्थितिशील पद्धती आहेत. हा व्यायाम अजिबातच नाही, त्याविरुद्धचे टोक आहे. व्यायामात सिम्पथेटिक (उत्तेजना- धावपळीची व लढतीची) ऑटोनोमिक चेतासंस्था काम करते, तर शास्त्रीय योगाभ्यासात विरामजनक पॅरासिम्पथेटिक चेतासंस्था जास्त कार्यरत असते त्यामुळे शिथिलता व शांती हे योगाभ्यासाचे व्यवच्छेदक गुणधर्म आहेत.
योगाभ्यासात ईश्वरप्रणिधान असा शब्द असला तरी योगशास्त्र (अष्टांगयोग) जवळजवळ ईश्वररहित पद्धती आहे, ती मूलत: मानसप्रक्रिया आहे. योगाभ्यासाला खरे म्हणजे देवता-प्रार्थनांची गरज नाही, त्या ऐच्छिकच असतात. (उदा.- मला दैवत कल्पना निर्थक वाटते, पण गुरुवंदना आवश्यक आहे.) पण ओंकार ही एक नादमय संकल्पना आहे, त्याला अनेक लोक ब्रह्म किंवा गणेशाकार जरी म्हणत असले तरी एका विलक्षण अंतर्नादाच्या पलीकडे ओंकारात आणखी काही पाहण्याची गरज नाही असे मला वाटते. कदाचित भ्रामरी प्राणायामानेदेखील हाच अनुभव येऊ शकतो. योगविद्य्ोचे कठोर अभ्यासक याबद्दल अधिक सांगू शकतील.
‘दिना’पलीकडले प्रश्न
आंतरराष्ट्रीय योग-दिनाच्या निमित्ताने ‘योगा’पेक्षा योग-विद्य्ोच्या खऱ्या व गंभीर अष्टांगाकडेही लक्ष जाईल अशी आशा आहे. तोपर्यंत आसन, प्राणायामदेखील बरीच प्रगती साधतील. पण योगशास्त्राचा धर्माशी काही संबंध आहे असे मला तरी वाटत नाही. शाळांमध्ये सुरू होऊ घातलेल्या योगाभ्यासात तर केवळ काही शारीरिक आसने, दीर्घश्वसन व एखादी प्रार्थना (तीही ऐच्छिक) असू शकते. पुढे कधी तरी या विद्यार्थ्यांना प्रगत योगविद्य्ोची रुची वाटू शकेल एवढे पुरे आहे. जगभर अनेक भिन्नधर्मीय नागरिक ‘योगा’शास्त्राचा फिटनेससाठी प्रचार करीत आहेत आणि काही विपश्यनादी गंभीर साधनाही करीत आहेत. त्यातून धार्मिक कल्पना किंवा श्रद्धा बदलण्याचा सुतराम संबंध नाही. तरीही ज्या मुस्लीम पालकांना आपल्या मुलांनी योगातल्या निदान प्रार्थना किंवा ओंकार वगरे टाळाव्यात असे वाटत असल्यास त्यांना ते स्वातंत्र्य असायला हवे आणि बहुधा आहेही.
या निमित्ताने एखाद्या राष्ट्राने धर्म आणि संस्कृती यांच्या सीमारेषा कशा ठरवायच्या याबद्दल विचारमंथन करायला पाहिजे. हिंदू संस्कृतीत निरीश्वरवादापासून (चार्वाकमत) आत्मविचार ते ईश्वरसत्तेपर्यंत विस्तृत प्रदेश आहे व खाचखळगेही आहेत. योग ईश्वरी चौकटीत फारसे बसणारा नाही. योगशास्त्रात ‘आत्मा’ ही त्या काळची वैदिक कल्पनाही फार स्पष्टतेने वापरलेली नाही. पण शालेय शिक्षणातून किंवा सार्वजनिक जीवनातून सगळ्याच सांस्कृतिक गोष्टी धर्मकल्पनेच्या आरोपाखाली बाद करायच्या असतील तर मूल्यव्यवस्था कशा जोपासायच्या, असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होईल. संस्कृतीशिवाय शिक्षण-प्रशिक्षण होऊ शकते का, हा (मला पडलेला) प्रश्न आहे. घटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही इतरांशी व्यवहार करताना लागणारी उदात्त मूल्य-व्यवस्था आहे. पण योगशास्त्रात जास्त व्यापक असे व्यक्तिगत व ऐतरेय यमनियम प्राथमिक पाया म्हणून धरले जातात. केवळ काही जणांना गरसमजुतीने असेल पण शाळांमध्ये योगाभ्यास नको असेल तर त्यांना तशी स्वेच्छा-मुभा असावी. पण इतर मुले योग म्हणून जे काही करतील त्या वेळी बाजूला वेगळेच काही करत राहणे हा अलगतावाद खरे तर नको. याचे संमजसपणे निराकरण करून चांगल्या सांस्कृतिक परंपरांचा शालेय शिक्षणात अंतर्भाव करणे ही काळाची गरज आहे. हे किती चांगल्या पद्धतीने होईल हे आपल्या शालेय शिक्षण व्यवस्थेच्या चारित्र्यावरदेखील अवलंबून असते (कारण पी.टी.चा तासदेखील धडपणे होत नाही ही वस्तुस्थिती आहे.). मूल्य-शिक्षणासाठी, शरीर-स्वास्थ्यासाठी, रोग-प्रतिबंधासाठी आणि सामाजिक-स्वास्थ्यासाठी शालेय काळातला योगाभ्यास भारतातच नव्हे तर जगात अनेक देशांमध्ये उपयुक्त ठरू शकतो, तो चांगला करणे ही भारतापुरती आपली जबाबदारी आहे.
डॉ. शाम अष्टेकर
लेखक सार्वजनिक आरोग्य व संबंधित प्रश्नांचे अभ्यासक आहेत. ईमेल : shyamashtekar@yahoo.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा