अनधिकृत बांधकामांच्या यादीत विदर्भातील राजकीय नेत्यांचा अनुशेष नाही! वाशीम जिल्ह्य़ात आजी-माजी आमदार, खासदार आजी-माजी मंत्र्यांनी त्यांच्या स्वत:च्या वा संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी पालिका प्रशासनाची परवानगी न घेता बांधकाम केल्याची बाब उजेडात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात सर्वच राजकीय पक्षांना अवैध बांधकामाची लागण झाली असून मोठय़ा नेत्यांना सोडले तर काही नगरसेवकांची बांधकामे पूर्णपणे अवैध आहेत. शहरातील छोटय़ा व दुसऱ्या फळीतील नेत्यांनी नियम धाब्यावर बसवूनच बांधकाम केले असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
* नागपूर : काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांच्या जनता चौकातील १३ मजली इमारतीचे वरचे चार मजले मध्यंतरी ‘रडार’वर होते. नंतर हा मुद्दा थंड बस्त्यात गेला.
* बुलढाणा :  शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे डोणगांव रोडवरील कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम नंतर प्रशासनाकडून अधिकृत करण्यात आले. शिवसेना आमदार विजयराज शिंदे यांचे बुलढाणा विश्रामगृहाजवळील अतिक्रमित बांधकामाविषयी वाद आहेत.काँग्रेसचे बुलढाण्याचे माजी आमदार धृपतराव सावळे यांच्या माळविहिर येथील महाविद्यालयाचे अनाधिकृत बांधकाम, धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय विश्वस्त संस्थेच्या जागेची खरेदी व बांधकाम वादाच्या भोवऱ्यात आहे.
भाजप आमदार पांडुरंग फुंडकर यांच्या संस्कार ज्ञानपीठाचे दुसऱ्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम चर्चेत आहे.
मनसेचे बुलढाण्याचे नगरसेवक संजय गायकवाड यांच्या राहत्या घराचे अनधिकृत बांधकामही चर्चेत आहे.
* वर्धा : वध्र्याचे काँग्रेस खासदार दत्ता मेघे यांच्या वर्धेतील सावंगी येथील वैद्यकीय संस्थेतील वसतिगृह व अन्य बांधकामही वादात अडकले आहे.
हिंगणघाटचे आमदार अशोक शिंदे यांचे हिंगणघाट शहरातील कार्यालयही अवैध बांधकामाच्या यादीत आहे.
* वाशीम :  भाजपचे आमदार लखन मलिक यांनी तर त्यांचे वाशीम शहरातील जनसंपर्क कार्यालयच पालिकेच्या जागेवर बांधले आहे.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे तसेच माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी वाशीम शहरालगत असलेल्या ‘सुरकुंडी’ शिवारातील शासकीय जमीन भाडेपट्टय़ाने घेऊन त्या जमिनी ज्या उद्देशासाठी घेतल्या होत्या त्याच्या अटी व शर्तीचा भंग केला आहे. असे असूनही जिल्हाधिकाऱ्यांनी आजपर्यंत त्या जमिनी परत घेण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी वाशीम शहरामध्ये आययुडीपी भागात १२ वर्षांपूर्वी एक भूखंड घेतला. आययुडीपी भागात रहिवासी प्रयोजनासाठीच बांधकाम करण्याचा नियम असताना त्यांनी ‘त्या’ जागेवर व्यावसायिक प्रयोजनासाठी बांधकाम करून दुचाकी गाडय़ांचे भव्य दुकान थाटले आहे.
* यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या जनशिक्षण संस्थेअंतर्गत रिसोड शहरामध्ये सुरू असलेले मंगलमूर्ती विद्यालय आणि लायसियम इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे बांधकाम विनापरवाना सुरू असल्याचा वाद सुरू आहे.

Story img Loader