दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता याद्या जोपर्यंत जाहीर केल्या जात होत्या, तोपर्यंत जवळपास प्रत्येक वर्षी पहिल्या दहा विद्यार्थ्यांच्या यादीत एका शाळेचे नाव हटकून असायचे.. लक्ष्मणराव आपटे प्रशाला. शहरातील जुन्या नामवंत शाळांपैकी ही एक शाळा. भव्यदिव्य आवार, चकाचक, रंगीबेरंगी इमारती.. असे काहीच या शाळेत नाही. ‘प्रयोगशील’ म्हणावी, तर तशीही ओळख नाही. तरीही गेली अनेक वर्षे गुणवत्तेच्या बाबतीत आपटे प्रशालेचे नाव समोर येते. शाळेलाच जोडून असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी असते. अनेक मोठय़ा महाविद्यालयांना मागे टाकत ही शाळा दरवर्षी विज्ञान शाखेचा सर्वात जास्त कट ऑफ नोंदविते.
‘विद्या महामंडळ’ या संस्थेची ही शाळा. १९६१ मध्ये या शाळेची स्थापना झाली. पुण्यातील आपटे रस्त्यावर वसलेली. शारदा बालक विहार, शारदा विद्या मंदिर, लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालय, विद्या महामंडळाचे व्यवसाय शिक्षण आणि संशोधन केंद्र या बंधू संस्था. एकाच आवारात या सर्व संस्था चालतात. त्याचबरोबर रात्रशाळाही चालते. शाळेचे तुलनेने लहानसे आवार ही खरंतर मर्यादाच! पण ती शाळेच्या गुणवत्तेच्या विकासाच्या आड कधीच आली नाही. शाळेतील प्रवेशही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर दिले जातात. त्यामुळे वेगवेगळ्या सामाजिक, बौद्धिक, आर्थिक पातळीवरील विद्यार्थी या शाळेत एकत्र शिकतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने शाळा सर्वसमावेशक म्हणावी अशीच! दहावी आणि बारावीमध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनाही शाळा सामावून घेते.
साधीशीच पण, सुविधांनी सुसज्ज
‘ज्ञानरचनावाद’ हा परवलीचा शब्द समोर आला की वेगवेगळे प्रयोग करून पाहणाऱ्या शाळा समोर येतात. आपटे प्रशालाही वेगवेगळे उपक्रम आणि प्रयोग करत असते. मात्र ते कोणताही गाजावाजा न करता. शाळा ‘फाइव्ह स्टार’ वाटावी अशी चकाचक दिसत नसली, तरी सगळ्या सुविधांनी सुसज्ज आहे. वेगवेगळ्या प्रयोगशाळा या मुलांसाठी खुल्या असतात. मुलेही या प्रयोगशाळांमध्ये रमलेली दिसतात. शाळेचे अद्ययावत ग्रंथालय आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मधल्या सुट्टीत वाचन उपक्रम. वर्गावर्गामध्ये अवांतर पुस्तकांच्या वाचनाचे तास असे उपक्रम राबवले जातात. विद्यार्थीही या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद देत असल्याचे शाळेतील शिक्षक सांगतात.
अपंग समावेशीत शिक्षण
शाळेत अपंग शिक्षण केंद्रही आहे. श्रवणदोष आणि वाचादोष असलेले २८ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. नियमित विद्यार्थ्यांबरोबरच अक्षम विद्यार्थ्यांचेही शिक्षण चालते. या विद्यार्थ्यांशी जमवून घेण्यासाठी शाळेतील शिक्षकांनाही प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियमित शाळेतील वर्गात सगळ्या महत्त्वाच्या विषयांच्या तासाला हे विद्यार्थी बसतात. त्यानंतर या विद्यार्थ्यांची अपंग शिक्षण केंद्रात पुन्हा एकदा सर्व विषयांची उजळणी करून घेतली जाते. ‘अपंग विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्यांबरोबर शिकल्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास वाढतो. बाहेर गेल्यावर ही मुले बुजत नाहीत. त्याचबरोबर या मुलांशी संवाद साधण्याची, जमवून घेण्याची सवय इतर विद्यार्थानाही लागते. शिक्षण हक्क कायद्याने सर्वसमावेशकतेचे तत्त्व सांगितले आहे. मात्र त्यापूर्वीपासून आम्ही ही पद्धत वापरत आहोत,’ असे या केंद्राच्या प्रमुख अंजली चवाथे यांनी सांगितले.
गुणवत्ता राखण्यासाठी..
विद्यार्थ्यांना अतिरेकी स्पर्धेत लोटू नयेच. मात्र याचा अर्थ त्यांची चाचणीच घ्यायची नाही असा होत नाही. त्यामुळे शाळा नियमित परीक्षा, चाचण्या घेते, असे शाळेच्या मुख्याध्यापिका तेरेसा डेव्हिड यांनी सांगितले. शाळेत पाचवीपासून सेमी इंग्रजी माध्यम आहे. पाचवी ते आठवीच्या वर्गात जे विद्यार्थी आवश्यक तेवढी कौशल्ये आत्मसात करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी शाळेत विशेष वर्ग घेण्यात येतात. मात्र त्याच वेळी विद्यार्थ्यांना या वर्गामध्ये येण्यासाठी न्यूनगंड वाटणार नाही याचीही काळजी घेतली जाते. ती जबाबदारी शिक्षक उचलतात. या विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्यात येते, असे डेव्डिड यांनी सांगितले. ‘आम्ही प्रवेश देताना गुणवत्तेचे, गुणांचे निकष लावत नाही. शाळेत येणारे विद्यार्थीही वेगवेगळ्या स्तरातील असतात. आजूबाजूच्या वस्त्यांमधील विद्यार्थीही शाळेत आहेत. काहींच्या घरी अडचणी असतात, आर्थिक परिस्थिती चांगली नसते, शिक्षणाचे वातावरण नसते, कधी एखादाच विषय आवडत नसतो. अशा विद्यार्थ्यांची नेमकी अडचण ओळखून त्यांना त्या दृष्टीने मदत केल्यास मुले आपोआप पुढे जातात. शाळा त्यासाठीच हातभार लावत असते. गुणवत्तायादीत येण्यासाठी शाळा आटापिटा करत नाही. पण आमच्या शाळेची मुले अव्वल असावीत, अशी भावना कायमच असते आणि त्यासाठी प्रयत्न केले जातात,’ असे शाळेची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले.
नियमित समुपदेशन
विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचेही समुपदेशन ही शाळेने उचललेली आणखी एक जबाबदारी. शाळेत विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचेही आवश्यक तेथे समुपदेशन केले जाते. विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन पुढील मार्ग काय असावेत याचेही मार्गदर्शन केले जाते. अगदी परीक्षेच्या वाटणाऱ्या भीतीपासून ते पुढे कोणते क्षेत्र निवडावे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुलांना मिळावीत यासाठी ही शाळाच प्रयत्न करत असते. ‘मूल शाळेत आल्यापासून ते नंतर कायमच आमचे असते. बाहेर पडल्यावरही ते आपटे प्रशालेचा विद्यार्थी म्हणून वावरणार असते. ते सर्वार्थाने आपल्या पायावर उभे राहावे याच दृष्टीने सगळ्या गोष्टींची आखणी केली जाते,’ असे डेव्हिड म्हणाल्या. विद्यार्थ्यांना समुपदेशकांमार्फत शाळेत लैंगिक शिक्षणही दिले जाते.
कला-खेळातही आघाडीवर
गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या मुलांची शाळा. म्हणजे अभ्यासू किंवा पुस्तकांत डोके खुपसून बसलेल्या विद्यार्थ्यांची शाळा असे चित्र या शाळेत अजिबातच नाही. गाणे, एकांकिका, नृत्य, खेळ, विविध भाषांच्या परीक्षा, शासकीय परीक्षा, चित्रकला अशा सगळ्या स्पर्धामध्ये शाळेचे विद्यार्थी आघाडीवर असतात. नुकतेच चिरायू कवाटिया या विद्यार्थ्यांने स्केटिंगमध्ये जागतिक विक्रम नोंदवला आहे. बालनाटय़, नाटय़वाचन स्पर्धामध्ये शाळेला दरवर्षी पारितोषिके असतात. शाळेत नियमित खेळाच्या आणि कार्यानुभवाच्या तासापलीकडे जाऊन कथक, गाणे आणि कराटेचेही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. हे प्रशिक्षण सर्वाना बंधनकारक नाही. ज्या विद्यार्थ्यांना आवडत असेल, त्यांच्यासाठी शाळेने हे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. हस्तलिखितांचा उपक्रम हे शाळेचे वेगळेपण. दरवर्षी शाळेतील प्रत्येक वर्ग एक हस्तलिखित तयार करतो. त्यासाठी प्रत्येक वर्गाने आपली एक विषय निश्चित करून त्यावरच हस्तलिखित काढायचे असते. त्याचे मुखपृष्ठ तयार करण्यापासून, आतील मजकूर, जाहिराती सर्व विद्यार्थी करतात. हस्तलिखितांची शाळेच्या स्तरावर एक स्पर्धा घेतली जाते. ‘हस्तलिखितातून आम्हाला विद्यार्थ्यांची खरी कल्पना येते. त्यांनी लिहिलेल्या कविता, निबंध, गोष्टी, काढलेली चित्रे यांवरून क्षमता तर कळतेच पण भावविश्वही कळते. त्यामुळे हा उपक्रम शिक्षकांनाही दरवर्षी नवे काही देणारा असतो,’ असे शिक्षक सांगतात.
गुणवत्ता हीच आमची खरी ओळख आहे, असे सांगून डेव्हिड सांगतात, ‘होणाऱ्या बदलांचा बाऊ किंवा बडेजाव न करता ते आत्मसात केले की गुणवत्ता आपोआप राखली जाते. मुलांचे भावविश्वही वातावरणानुसार बदलत असते.’ बदलणाऱ्या वातावरणाची जाणीव ठेवून त्यानुसार बदल केले की मग शिक्षण विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठीही आनंददायी होणे अवघड नाही, हे शाळेने कृतीतून दाखवून दिले आहे.
व्यवसाय शिक्षण
कनिष्ठ महाविद्यालयासाठी व्यवसाय शिक्षणाची सोय आहे. पर्यटन आणि बिल्डिंग मेन्टेनन्स या विषयाचे विभाग कार्यरत आहेत. मात्र नववीपासूनच एका तुकडीला या दोन विषयांपैकी एका विषयाचे शिक्षण दिले जाते. यामध्ये अगदी फ्रेंच, जर्मन भाषेचेही शिक्षण पर्यटन अभ्यासक्रमात दिले जाते. अपंग विद्यार्थी केंद्रातील विद्यार्थ्यांसाठीही व्यवसाय शिक्षणाचा स्वतंत्र विभाग आहे.
जागतिक विक्रम
गाणे, एकांकिका, नृत्य, खेळ, विविध भाषांच्या परीक्षा, चित्रकला स्पर्धामध्ये शाळेचे विद्यार्थी आघाडीवर असतात. नुकतेच चिरायू कवाटिया या विद्यार्थ्यांने स्केटिंगमध्ये जागतिक विक्रम नोंदवला.
संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com