प्रतीक अघोर
जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकाची अमेरिकी पोलिसांकडून विनाकारण हत्या होत असतानाचे चलचित्रमुद्रण पाहून संतापाची लाट उसळली. कृष्णवर्णीयांविरुद्धच असलेल्या अलिखित जाचक वास्तवाविरुद्ध अख्खी अमेरिका (अर्थात, वर्णवर्चस्ववादी आणि काही प्रतिगामी लोक सोडून) एकवटली. यामुळे अमेरिकन पोलिसांना असलेली अमर्याद सत्ता आणि लष्करी सामग्री हा मुद्दाच फक्त नाही, तर संपूर्ण व्यवस्थेमध्ये असलेले दोष समोर येत आहेत. कोविड-१९ चे जागतिक संकट टळलेले नसताना लोक शहरांत, गावांत रस्त्यावर येऊन आंदोलन करताहेत. या आंदोलनाला ‘दमनकारी इतिहासाच्या खुणा’ हटवण्यासाठी पुतळा-विरोधी वळण लागले..
व्यवस्थेविरुद्ध सुरू असलेल्या लढय़ात एका जमावाने बॉस्टनमधल्या नॉर्थ एन्ड पार्कमधील कोलंबसच्या पुतळ्याचा शिरच्छेद केला. रिचमंड, व्हर्जिनिया येथे एका बागेतील कोलंबसच्या पुतळ्याला आंदोलकांनी जलसमाधी दिली. मिनेसोटात कोलंबसाचा पुतळा खेचून खाली पाडण्यात आला.
कोलंबसाविरुद्ध एवढा द्वेष का? इतिहासात आणि मराठी कवितांमध्येही कोलंबसाची गर्वगीतेच लिहिली गेली आहेत. परंतु त्याच्या अमेरिकेत येण्याने अमेरिकन आदिवासींच्या वाटय़ाला आलेले अत्याचार व गुलामगिरी यांविषयी खूप कमी चर्चा झाली आहे. कोलंबसाला एक ‘साहसी प्रवाशा’चे वलय इतिहास आणि साहित्य यांनी बहाल केले – अगदी ‘एक हजार एक अरेबियन रात्रीं’मधल्या सिंदबादसारखे! पण कविकल्पनांतला कोलंबस आणि विषमतेच्या झळा सोसणाऱ्यांना दिसणारा कोलंबस यांच्यात गल्लत न करणे महत्त्वाचे आहे.
कोलंबस मुळात निघाला होता भारत शोधण्यासाठी. ‘पृथ्वी गोल आहे’ असा त्याचा विश्वास असल्याने पश्चिमेकडे आपण जात राहिलो तर आज ना उद्या भारताच्या किनाऱ्याला लागू असा त्याचा अंदाज. तो अंदाज बरोबर ठरलाही असता; पण त्यांनी हा विचार केलाच नाही की युरोप आणि भारत यांच्यामध्ये आणखी काही जमीनही असू शकते! जेव्हा तो आणि त्याचे खलाशी अमेरिकेच्या किनाऱ्याला लागले तेव्हा आपण भारतात आलो असे समजून त्याने अमेरिकेतल्या आदिवासींना ‘इंडियन’ म्हणजे भारतीय म्हणायला सुरुवातही केली! त्यांचा भारतात किंवा अमेरिकेत येण्याचा उद्देश कुसुमाग्रज म्हणतात तसा,
‘नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली, निर्मितो नव क्षितिजे पुढती! ’
हा होता; पण तो कुतूहलाचा, सृजनशील नसून ‘नवीन जगावर विजय’ (न्यू वर्ल्ड कॉन्क्वेस्ट) असा घातकी होता. आणखी एक हेतू व्यापार हा होता आणि व्यापारात नफा कमावण्यासाठी जुलूम, गुलामगिरी इत्यादी अमानवी प्रकारांचा अवलंब करण्यास मागेपुढे न पाहाणे असा त्याचा बाणा होता.
हे झाले उद्देशित हेतू. परंतु नकळत देखील, युरोपीय वसाहतवाद्यांच्या अचानक झालेल्या आगमनामुळे अमेरिकेतील मूळ रहिवाशांना हानिकारक परिणाम भोगावे लागले. कोलंबस आणि इतर अनेक युरोपीय वसाहतवादी अमेरिकेत आले तेव्हा आपल्याबरोबर अमेरिकेत पूर्वी नसलेले अनेक प्रकारचे नवे जिवाणूदेखील घेऊन आले. त्यामुळे साथी पसरू लागल्या आणि त्याविरुद्ध प्रतिकारक शक्ती बनवण्यास पुरेसा वेळ न मिळाल्याने मृत्युमुखी पडलेल्या मूळच्या अमेरिकी आदिवासींबद्दल बोललेही जात नाही. उदा. ताईनो ही जमात यामध्ये जवळपास लयालाच जाता-जाता कशीबशी टिकली.
अशा या कोलंबसाचे आजही अमेरिकेत अनेक ठिकाणी पुतळे उभे आहेत. हे म्हणजे समजा दुसऱ्या महायुद्धात अक्ष-राष्ट्रांचा विजय झाला असता, तर पोलंडमध्ये हिटलरचे पुतळे उभे करण्यासारखे; किंवा बंगालमध्ये मानवनिर्मित दुष्काळ पसरू देऊन लाखो लोकांच्या मरणास कारणीभूत असलेल्या चर्चिलचे त्याच बंगालमध्ये पुतळे उभे करण्यासारखे आहे!
चुकीचा अर्थ नसावा – कुसुमाग्रजांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही अतिशय सुंदर कविता आहे, माणसाच्या विजिगीषु वृत्तीला हाक घालणारी आहे; पण कुसुमाग्रजांनीही कोलंबसाची सिंदबादसदृश कविकल्पनाच जवळ केलेली दिसते. त्यामुळे कोलंबसाच्या पुतळ्यांचे उच्चाटन होणे हे कुसुमाग्रजांच्याच धाटणीत सांगायचे तर, ‘कोलंबसाचे गर्वहरण’ आहे.
लेखक अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर विद्यापीठात पीएच.डी. संशोधक आहेत.
ईमेल : pratik.aghor54@gmail.com