कबीर कला मंच या सांस्कृतिक संघटनेच्या चार कलाकारांना त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून काही दिवसांपूर्वी अटक झाली. छत्तीसगडमध्ये नक्षलींच्या हिंसक कारवाया सुरूच आहेत. त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते किंवा तरुण नक्षलवादाकडे आकर्षित होत आहेत का, अशी एक गंभीर चर्चा राज्यात सुरू झाली. या अनुषंगाने मधु कांबळे यांनी ‘लोकसत्ता’मध्ये दोन लेख लिहून यातील महत्त्वाचे पैलू समोर आणले होते. या प्रश्नी विद्रोही सांस्कृतिक चळवळीने मांडलेली बाजू..

‘लोकसत्ता’मध्ये मधु कांबळे यांनी लिहिलेल्या दोन लेखांवरून आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते नक्षलवादी चळवळीकडे वळतात, अशा प्रकारची एक मांडणी सध्या चर्चेत आहे. त्याला छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्याकांडाची पाश्र्वभूमी जशी आहे, तसेच कबीर कला मंचच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली, त्याचाही संदर्भ आहे.
कबीर कला मंचचे कार्यकर्ते विद्रोही नावाने सांस्कृतिक बदलाचे काम करतात आणि या बॅनरखाली आंबेडकरवादी तरुण सामील आहेत असा एक प्रचार सध्या चालू आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही धर्माध जातीयवादी साहित्य चळवळीच्या विरोधात उभी राहिलेली चळवळ आहे. ही चळवळ साहित्याचे माध्यम धरून आपली भूमिका मांडण्याचे काम करीत आहे. सुरुवातीला एकसंध असणारी विद्रोही सांस्कृतिक चळवळ नंतर गटातटात विभागली. ‘विद्रोही’ हा शब्द तसा परिवर्तनासाठी वापरलेल्या अनेक नावांपैकी आहे. या शब्दाचे अनेकांना आकर्षणही आहे. सुरुवातीला या चळवळीमध्ये मार्क्‍सवादी तरुणांचा सहभाग बऱ्यापैकी होता. आज फुटलेल्या चळवळीमध्ये माझ्यासारखे फुले, शाहू, आंबेडकरवादी दलित कार्यकर्ते बऱ्यापैकी सहभागी आहेत. या चळवळीची नव्याने मांडणी होत आहे. विशेषत: मी, धनाजी गुरव, बाबुराव गुरव, राजा शिरगुप्पे ही मंडळी या नवीन मांडणीमध्ये सहभागी आहोत. आम्हा सर्वाचा लोकशाही शासन व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली घटना आम्ही पूर्णपणे मानतो. त्याच्यामुळे नक्षलवाद्यांची भूमिका आम्हाला पूर्णपणे अमान्य आहे. हिंसेवरती आम्हा कुणाचाच विश्वास नाही. लोकशाही शासनप्रणालीतील ‘धर्मनिरपेक्ष’ ही संकल्पना पूर्णत: सर्मथनीय आहे अशी विद्रोही सांस्कृतिक चळवळीची खात्री आहे. हिंदूंच्या नावाने वैदिक धर्मीय मूलतत्त्ववाद हा पूर्णत: निषेधार्ह आहे. कोणत्याही धर्मातील मूलतत्त्ववाद आम्ही निषेधार्थ मानतो.
या विषयीची लिखित भूमिका विद्रोही सांस्कृतिक चळवळीची आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीने तयार केलेल्या जाहीरनाम्यात श्रमण संस्कृतीच्या भूमिकेला प्रथम स्थान दिलेले आहे. श्रमण संस्कृती ही भारताची खरी संस्कृती आहे. या संस्कृतीची निर्मिती करणे विद्रोहीची भूमिका आहे. बुद्ध, कबीर, बसवप्णा, वारकरी संप्रदाय यांचे तत्त्वज्ञान हेच या देशातील धार्मिक शोषण आणि विषमता नष्ट करू शकते. या विचारावर विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा पूर्ण विश्वास आहे. स्वत:ची जात नाकारणारा बुद्ध व इतरांप्रमाणेच ब्राह्मण जातीत जन्मून जात नाकारणारे बसवप्णा विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या विचारांचा आधार आहे.
बुद्धाने जगामध्ये धर्मनिर्मितीची संकल्पना मांडली. त्याच्यानंतर महंमद पैगबर, येशु ख्रिस्त यांनी ही भूमिका कळत नकळत आपल्या धार्मिक विचारात मांडली आहे. याचा अर्थ वेगवेगळ्या मार्गाने बुद्धविचार जगाने स्वीकारला आहे. या भूमिकेचा विद्रोही सांस्कृतिक चळवळ पाठपुरावा करीत आहे. येथील वर्गवाद मांडणाऱ्या काही मंडळींना धर्माच्या आधारावर जातनिर्मिती झाली याचे आकलन झालेले नाही. जातिव्यवस्था संपवणे हा बुद्धांसहित इतरांनी मांडलेला विचार विद्रोही सांस्कृतिक चळवळ आपल्या लढय़ाचा मुख्य उद्देश मानते. जातिव्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या होणाऱ्या शोषणाला विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा पूर्ण विरोध आहे. जातिव्यवस्थेचे आकलन झालेली काही मंडळी या देशात पुरोगामी परिवर्तनवादी, राजकीय भूमिका सातत्याने मांडत आलेले आहेत. या भूमिकेला कोणी वर्गवाद म्हणतात, कोणी डावी राजकीय चळवळ म्हणतात. त्याचे फारसे फायदे या देशातील जनतेला झालेले आहेत, असे अभावाने दिसते. तत्त्वज्ञान म्हणून गरिबीविरोधी लढय़ाचे आकर्षण म्हणून याच्याकडे कोणी आकर्षित झाले असेल तर ते त्यांच्या विचाराचा भाग राहतो. विद्रोही सांस्कृतिक चळवळ जातिअंताच्या लढय़ाचा महत्त्वाचा प्रवाह आहे. आदिवासी, मागासवर्गीय, गावगाडय़ाच्या बाहेरील अस्पृश्य जाती यांच्या उत्थानाचा समतेचा मार्ग हा श्रमण संस्कृतीच्या विचारानेच पुढे सरकू शकतो, याची अनेक उदाहरणे या देशाच्या इतिहासात मिळतात. त्याच्यामुळे इतर कोणत्याही तत्त्वज्ञानाचा उपयोग जातिव्यवस्थेची चौकट मांडण्यासाठी झालेला नाही.
मार्क्‍स, माओचे नाव घेऊन चाललेल्या हिंसावादी नक्षलवादी चळवळीने याचा विचार करणे गरजेचे आहे. दलित, आदिवासी, गरीब जनतेने लोकशाहीच्या मार्गाने विकासविरोधी असणारे शासन वेळोवेळी बदलले आहे. या बदलात मागासवर्गीय, आदिवासी, गरीब जनतेचा सहभाग महत्त्वाचा राहिलेला आहे. १९७९पासून या देशाने हे अनुभवले आहे. याची उदाहरणे पंजाब, आसाम या प्रांतांत दिसून आलेली आहेत. अलीकडे कर्नाटकात हेच घडलेले आहे. आमच्या विकासाच्या विरोधात कोणी कृती करीत असेल तर त्याला सत्तेच्या सोपानावरून पायउतार व्हावे लागेल हेच वेळोवेळी खालच्या जातींनी, अल्पसंख्याकांनी दाखवून दिलेले आहे. सुरा, सुरुंग, गन, तलवार यांच्या मार्गाने गेलेली माणसे फक्त माणसेच मारू शकतात याचे उदाहरण खलिस्तानवादी चळवळ किंवा आसाम गणसंग्राम परिषद व सुभाष घिशिंग यांच्या गोरखा लॅन्ड चळवळीने दाखवून दिले आहे. काही प्रमाणात काश्मीर ही बोलकी उदाहरणे आहेत. अशा हिंसेला विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा विरोध राहिलेला आहे आणि राहील. शेवटी या हिंसा, प्रादेशिक अस्मितेच्या नावावर चालविल्या होत्या. त्यांनाही हा हिंसेचा मार्ग सोडून द्यावा लागलेला आहे आणि लोकशाहीच्या प्रवाहात सामील व्हावे लागले आहे.
एखाद्या विचाराचा विपर्यास करण्यात भारतातील काही विचारवंत नेहमीच सरसावलेले आहेत. अगदी वर्गवादाची मांडणी करणाऱ्या मार्क्‍सलाही या मंडळींनी वेठीला धरलेले आहे. भारतात लोकशाही तत्त्वज्ञान स्वस्तात आणि शॉर्टकटने आल्यामुळे त्यात उणिवा असतील. त्या उणिवा गोळीने अथवा माणसे मारून पूर्ण होणाऱ्या नाहीत, तर लोकशाहीप्रणाली नीट समजून घेऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रही राहूनच पूर्ण होऊ शकतात, असे विद्रोही सांस्कृतिक चळवळ मानते. बदलावर विश्वास आहे. अन्यायाविरोधी लढण्यासाठी लोकशाही मार्ग हा सर्वात स्वच्छ आणि चांगला मार्ग आहे. मतपरिवर्तन ही या देशाची तात्त्विक भूमिका आहे. कडवा धार्मिक जातीवाद, कडवा वर्गवाद याला विरोध करणे गरजेचे आहे. परंतु तो अहिंसेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने व्हावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी केलेले प्रयत्न प्रथम समजून घ्यावेत, त्याचप्रमाणे बुद्धाने सांगितलेले ‘सिगाल सूक्त’ ही गरिबीवर मात करणारे सर्वात मोठे सूक्त आहे, याचा विचार व्हावा. बुद्धाने गुलामाशी मालकाने कसे वागावे याचे खूप चांगले उदाहरण सांगितले आहे. कोणतीही समता प्रस्थापित करण्यासाठी, मग ती वर्गीय असो, जातीय असो, सांस्कृतिक असो, यासाठी हिंसा करणे हे पूर्णत: चुकीचे आहे. हिंसेचा मार्ग कोणत्याही प्रकारच्या विषमतेवरचे उत्तर नव्हे, असे आम्हाला वाटते.
(* लेखक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष आहेत.)