प्रिय सहकाऱ्यांनो,
अख्ख्या इंडियन एक्स्प्रेस समूहाशी संवाद साधण्याचा बहुधा हा पहिलाच प्रसंग असावा. हा संवाद साधणे अतिशय आनंददायी आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या अंकाची फेररचना आणि त्याचे फेरसादरीकरण साजरे करण्याची ही वेळ आहे. यानिमित्ताने माझा या वर्तमानपत्राबाबतचा दृष्टिकोन मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो आणि एका नव्या मोहिमेचा आरंभही करतो. इंटरनेटवरील आपल्या सर्व ब्रँड्सची झपाटय़ाने वाढ होत आहे, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. पुढच्या आठवडय़ात आपल्या जयपूर आवृत्तीचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणाही मला करावयाची आहे.
या वर्षी एक्स्प्रेसला ८३ वर्षे पूर्ण होतील. मानवी आयुष्यात हा वृद्धापकाळ आहे. वृत्तपत्राच्या वाटचालीच्या दृष्टीने पाहता हा केवळ एक लहानसा आकडा आहे. आपण आज परिवर्तनाच्या निर्णायक वळणावर उभे आहोत. येथून पुढे आपण भूतकाळातील आपल्या चांगल्या कामगिरीच्या पायावर भविष्यातील एका अक्षय संस्थेची उभारणी करू शकतो. स्वातंत्र्य, नैतिक मूल्ये आणि सचोटी यांचा मिलाफ ही संस्था घडवेल. याचबरोबर आर्थिक ताकदही ती निर्माण करेल. आपले हे निर्धारित उद्दिष्ट असून, आपण ते निश्चित साध्य करणार आहोत. याचा एक भाग म्हणून आपण इंडियन एक्स्प्रेसची फेरमांडणी केली असून, आता या मांडणीमुळे अंकाला नवी ऊर्जा मिळाली आहे. दुसरा भाग म्हणजे आपण दी इंडियन एक्स्प्रेस मोबाइल आणि वेब अ‍ॅपची फेररचना केली आहे. आपला अंक वाचकस्नेही व्हावा आणि तो कोणत्याही यांत्रिक साधनावर उपलब्ध व्हावा हा यामागचा हेतू आहे. आपण वाचकांना देत असलेला मजकूर हा नेहमीच उच्च दर्जाचा असतो. आता या मजकुराला आणखी खोली आणि ताजेपणा मिळाला आहे. अशाच प्रकारचे प्रयत्न ‘लोकसत्ता’त सुरू असून इतर ब्रँडमध्येही ते अवलंबण्यात येतील.
‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या रोजच्या अंकाची निर्मिती एका निष्ठावान चमूकडून केली जाते. सत्याला उजाळा देण्यासाठी अतूट बांधीलकी या चमूतील सदस्यांनी ठेवावी तसेच आपले काम त्यांनी सचोटीने आणि दर्जेदारपणे करावे, अशी माझी अपेक्षा आहे. आपल्या अंकात पेज थ्री नसेल, पेरलेल्या बातम्या नसतील आणि आपण राजकीय नेत्यांची वा बडय़ा उद्योगसमूहांची खुशमस्करी करणार नाही हे मी अगोदरच स्पष्ट केले आहे. आपण या तत्त्वांआधारेच बांधणी केली पाहिजे. आपण विचारी भारतीयांचे लक्ष वेधून घेतले पाहिजे. भाषेचे माध्यम कोणतेही असो, भारताशी बांधील असणारा आणि दिवसभरातील घडामोडींशी जोडला गेलेला सक्रिय नागरिक हा आपला वाचक असला पाहिजे, असे मला वाटते. अशा प्रकारच्या वाचकांची संख्या लाखोंच्या घरात आहे, असा मला विश्वास वाटतो. त्यांच्यासाठी विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित असे वर्तमानपत्र काढणे मला आवडेल. काहीशा साशंकतेने, पण काही अपेक्षेने राजकीय वर्गाकडून रोज सकाळी वाचले जाणारे वर्तमानपत्र असावे असे मला वाटते. शोधपत्रकारिता आणि वैविध्यपूर्ण सखोल विश्लेषण जोडीने सादर करणारे वर्तमानपत्र असावे, असे मला वाटते. असे करताना अर्थातच आपण कटाक्षाने सर्वागीण दृष्टिकोन अवलंबावा, असे मला निग्रहाने सांगावेसे वाटते.
आपण सध्या अनिश्चिततेने भरलेल्या जगात वावरत आहोत. डिजिटल क्षेत्रातील सातत्याने घडणाऱ्या बदलांमुळे जग समजून घेणे अवघड झाले आहे. मात्र, काही गोष्टी अक्षर असतात. धैर्य, विश्वास, सचोटी आणि बुद्धिमत्ता या गुणांचा नेहमीच आदर केला जातो. या गुणांचे प्रतिबिंब ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या दररोजच्या अंकात पडलेच पाहिजे. इंटरनेट आवृत्तीतही ते जाणवले पाहिजे. इंटरनेटच्या माध्यमाने समानतेचे तत्त्व आणले आहे. या माध्यमात केवळ पैशाच्या बळावर चांगला मजकूर देता येत नाही. इंटरनेट क्षेत्रात आपण भारतीय वृत्तपत्रांमध्ये तीन क्रमांकावर आहोत. आपण किरकोळ स्वरूपाचा मजकूर देत नसल्यामुळेच हे यश आपल्याला मिळाले आहे. यामुळे आपण दर्जेदार, गुणवत्तापूर्ण मजकुरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. याचबरोबर हा मजकूर संबंधित नागरिकाला समजेल असाही असला पाहिजे. गुंतागुंतीचे, क्लिष्ट विषय वाचकांसाठी सुलभ, सोपे करून मांडता येण्याची क्षमता ही देणगी आहे, असे मला वाटते. ही क्षमता दररोज घासूनपुसून लख्ख केली पाहिजे, असे मला वाटते.
‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या संपादकीय विभागातील काही ज्येष्ठ सदस्यांशी मी काही महिन्यांपूर्वी चर्चा केली. तेव्हा आपण काही नवी केंद्रे सुरू करणार आहोत, असे मी सूचित केले होते. रविवार, ५ जुलै रोजी आपण जयपूर येथून आवृत्ती छापावयास सुरुवात करत आहोत, ही घोषणा करताना मला आनंद होत आहे. एक्स्प्रेससाठी येता काळ हा उत्कंठावर्धक असेल, असे आश्वासन मी तुम्हाला देतो. देशात लादलेल्या आणीबाणीच्या पर्वाला यंदा ४० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या संस्थेचे संस्थापक रामनाथ गोएंका यांनी या खडतर काळात दाखविलेल्या धैर्याचे आणि लढाऊपणाचे स्मरण करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यांच्यासाठी एक्स्प्रेस हा केवळ व्यवसाय नव्हता. माझ्यासाठीही तो केवळ व्यवसाय नाही आणि भविष्यातही तसा तो नक्कीच नसेल. एक्स्प्रेस हे याआधीही एक मिशन होते, सध्याही ते मिशनच आहे. आपली संस्था ही स्वातंत्र्य आणि लोकशाही यांचा आधारस्तंभ ठरणारी भारतीय संस्था असेल, असे मी नमूद करतो. मी तुम्हा सर्वाचा आभारी आहे. माझ्या तुम्हा सर्वाना शुभेच्छा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा