गिरीश कुलकर्णी
तंत्रज्ञान नवनवे जादूचे प्रयोग दाखवीत असण्याचा हा काळ पंधरा-वीस वर्षांमागे सुरू झाला. सुरुवातीच्या प्रयोगापासूनच जगाची रहाटी बदलण्याची त्या प्रयोगांमधली ताकद जाणवत राहिली. आता प्रयोग रंगला आहे. होणाऱ्या बदलांना सामोरे जाताना माणसं मनानं सरभर होत आहेत. त्याचवेळी त्यांचे देह मात्र चार िभतीत कोंडून घालत त्यांच्यावर सुखचित्रांचा भडिमार हे नवतंत्रज्ञान करीत आहे. घरामागे परसबाग अन् आड असल्याचे दिवस जसे लोपले, तसे या तंत्रयुगाने बाळसे धरले. घराघरात टीव्हीची खोकडी बसली आणि सिंदबादच्या पाठीवर बसलेल्या म्हाताऱ्यागत त्यांनी आम्हाला बंदिवान केले. यथावकाश त्या खोकडय़ाने रूप पालटले आणि घरबसल्या माणसांना स्वल्पदृष्टी बनवीत जगभरातली रंगीत सृष्टी त्यांच्या नजरेपुढे ओतली. गुहेतल्या कासिमसारखे डोळे विस्फारून आम्ही अजूनही ती दौलत निरखत बाहेर पडण्याचे सारे मंत्र अन् शब्द विसरत गेलो. सवयीचा गुलाम होण्याच्या माणूसलक्षणाचा मोठा चतुर वापर केला गेला. अर्थात, हे तंत्रज्ञान काही आभाळातून पडत नव्हते. आम्हीच खपून ते घडवीत होतो. या साऱ्या प्रयोगांतून नुसती माणसं कोंडूनच घातली नाहीत, तर भवतालही विपुल समृद्धीच्या वर्षांवाने बकाल केला. घराबाहेर पडण्याची आस अन् सोय काढून घेतलेले आम्ही सारे बंदिवान मग नव्या बदलांच्या इशाऱ्याची वाट पाहत घरातले निरनिराळे प्रकाशचौकोन पाहत बसलो. आणि मग जणू अतिशयोक्ती अलंकार वापरून नामकरण केलेला तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार गेल्या काही दिवसांत समोर आला. OTT अर्थात् ‘ओवर द टॉप’ किंवा ‘सज्जातून वर्षांव’! पहिल्या महायुद्धात जन्मास आलेला शब्दप्रयोग आहे म्हणे हा! तेव्हा खंदकातल्या सनिकांनी चक्क वर चढून गोळ्यांचा वर्षांव केला. थोडक्यात, अतिरिक्तता निदर्शक सार्थ नामाभिधान धारण करून हा ओटीटी नामे मंच सिद्ध झाला. यात माणसांचे आचरण बदलण्याची ताकद होती. आणि त्यामुळेच या नवशोधाने एक सफल ‘व्यवसाय व्यत्यय’ (Business Disruption) घडवीत अफाट लोकप्रियता मिळविली. या लोकप्रियतेतून प्रचंड आर्थिक व्यवहार तयार झाला. समकालीन साऱ्याच तंत्र-अपत्यांप्रमाणे हे बाळ दत्तक घेण्याची घरोघरी चढाओढ लागली. त्यातही लवचीकता अशी की, हातातल्या स्मार्ट फोनमध्येही हे ओटीटी मंच मावत होते. वापरायची पद्धत अत्यंत सोपी होती. आणि त्यामुळे याचे पालकत्व हा-हा म्हणता प्रत्येकाने खिशात टाकले. या तंत्रज्ञानाचा सर्वप्रथम वापर नेटफ्लिक्स नामे अमेरिकन नवउद्योगाने केला आणि पाठोपाठ अॅमेझॉन प्राइम नावाने द्वितीय रत्नही जन्मास आले. प्रस्थापित जुनी आर्थिक आणि व्यावसायिक मांडणी मोडीत काढून हा ‘व्यवसाय व्यत्यय’ घडविला गेला. अशा साऱ्याच व्यत्ययांतून प्रस्थापित महाकाय उद्योगांना आव्हान मिळण्याचे हे दिवस आहेत. स्वत:चे पंथ तयार करण्याची ताकद असणाऱ्या अशा बिझनेस डिसर्प्शनने हरघडी महाकाय गोलीएथ कंपन्या मोडीत निघत आहेत किंवा त्यांच्या अस्तित्वाला घरघर लागते आहे. केवळ ग्राहकसंख्येला महत्त्व न देता ग्राहकानुभवास प्राधान्य देणारी ही प्रणाली. माझे अवकाश संकुचित करीत मला स्वातंत्र्याचा अनुभव देणारी ही प्रणाली. जगासमवेत पाऊल टाकण्याची संधी देणारी ही नवप्रणाली. अनुभवाधारित ज्ञानाकडून माहितीआधारित ज्ञानाकडे घेऊन जाणारी आणिक एक प्रणाली. आजवर मी चित्रपट, नाटक, संगीत जलसे, नृत्यमहोत्सव आणि मनोरंजनाच्या साधनांकरिता घराबाहेर पडत होतो. टेलिव्हिजनने ते सारे घरात आणले होतेच. या ओटीटीने मात्र नावाला जागत त्यात अतिरिक्तता आणली. सारे भांडार माझ्यासमोर ओतले. त्यातही माझ्या सवडी-आवडीनुसार त्याचा उपभोग घेण्याचे स्वातंत्र्य मला बहाल करून टीव्ही जणू मोडीत काढला. जगभरातले चित्रपट, माहितीपट, मालिका सारेच माझ्यासमोर जादूच्या दिव्यातील राक्षसाप्रमाणे आदेशाची वाट पाहत उभे केले. साहजिकच यात मला हे कल्पनातीत सुख मिळणार होते. तेही परवडणारे शुल्क भरून. मी लगोलग वर्गणीदार झालो अन् नेटफ्लिक्सच्या पंथात (Cult) माझी वर्णी लावली. हेच अॅमेझॉनबाबत वा देशी कंपन्या- जसे की हॉटस्टार, इरॉस नाऊ, झी फाइव्ह, ऑल्ट बालाजी, जिओ इ. इ. बाबतीतही झाले.
एकाच जन्मात दूरदर्शनच्या मुंग्या ते जगभरचा मनोरंजन खजिना असा माझ्या दृष्टीअनुभवाचा प्रवास अत्यंत वेगाने घडला. या अनुभव वैविध्याकरिता तंत्रज्ञानाचे आभारच मानायला हवे. मात्र, हा साराच अनुभव उपभोग घेण्याच्या पद्धतीबाबतचा होता. म्हणजे एक चित्रपट पाहण्याकरता मला विशिष्ट वेळ राखून ठेवणे, आगाऊ नियोजन करणे, ट्रॅफिकच्या समस्यांना तोंड देणे आदी अनेक सायास करावे लागत होते. ते सारेच चुटकीसरशी नष्ट झाले. मात्र, चित्रपटगृहापर्यंत पोहोचण्याचा प्रवास प्रत्यक्ष चित्रपटगृहामधल्या व्यवस्था/ अव्यवस्था, सहप्रेक्षक, इ. घटकांतून येणारे बरेवाईट अनुभव यातून वजा झाला. या घटकांमधल्या अनुभवांचे वैविध्य (ज्यात अडचणी वा नकारात्मकताच जास्त होती.) नष्ट झाले. या नष्ट झालेल्या अनुभवांमध्ये इंद्रियानुभवाचा भाग होता. भौतिक क्रियाशीलता होती. या नव्या व्यवहारात चित्रपट पाहण्याची इच्छा होणे, ते प्रत्यक्ष पाहू लागणे- या क्रियांत सुगमता अन् वेग आला. सामुदायिक क्रिया व्यक्तिगत झाली आणि इतरांना समजावून सामावून घेण्याचा त्रास वाचला. कुणाचा अवचित फोन वाजणे नाही की कुणाच्या लाह्यांच्या पुडय़ाच्या आवाजात पडद्यावरील संवाद विरून जाणे नाही. या प्रकारे ग्राहकाचा उपभोगाचा अनुभव सुखकर झाला. प्राप्त परिस्थितीत तरी जे गमावलं त्याचं बहुसंख्यांना दु:ख वाटत नाही. आणि अशा सुखाची नेमकी काय किंमत मोजली जाते आहे याचा आम्हा कुणालाच अदमास नाही.
पण हा एक भाग झाला. याव्यतिरिक्त दुर्लभ, दुष्प्राप्य असे जगभरातले दृक्श्राव्य सृजन उपलब्ध झाले. ही उपलब्धी मोठीच आहे. आमच्या जगण्याच्या मिती एकसुरी होत असताना या विविध कलाकृतींद्वारे आमची समजूत वाढविण्याची स्वस्त, सोपी संधी प्राप्त झाली. जगभरातील निरनिराळ्या माणसांच्या, गावांच्या, चालीरीतींच्या, समस्यांच्या, शोधाच्या, सुखदु:खाच्या कहाण्या घरबसल्या पाहून आमचे कूपमंडूकत्व कदाचित कमी होईल. आमचे कठीण पूर्वग्रह कदाचित भंगतील. विचारांत आधुनिकता येऊ शकेल. अर्थात या केवळ शक्यता आहेत. त्या प्रत्यक्षात येण्याकरता ‘काय पाहायचे?’ हे ठरवितानाचा विवेक पाहणाऱ्याच्या ठायी असावा लागेल. याचं कारण इथे सगळेच आहे. पाहू नये, ते अन् पाहायलाच हवे, तेही. पण हा विवेक एकूणच जगतानाही लागतोच. भारतीय परिप्रेक्ष्यात मात्र याबद्दल चिंता वाटू शकते.
तर.. हे सगळं ग्राहक वा उपभोक्त्यांबाबत. आता याची दुसरी बाजू म्हणजे सर्जक वा निर्मकांची. ज्याप्रमाणे प्रचलित मनोरंजन उद्योगरहाटीमध्ये ग्राहकाठायी तयार होणाऱ्या नकारात्मक अनुभवाची वजावट या नवमंचामुळे झाली, त्याचप्रमाणे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, इतर विधांतले अनेक कलाकार अन् तंत्रज्ञ यांच्याकरिता प्रचंड संधीही निर्माण झाली. माझ्या सुदैवाने अगदी सुरुवातीच्या दिवसांतच मला या मंचाकरिताच निर्माण केल्या जाणाऱ्या विविध निर्मितींमध्ये सहभागी होता आलं. या अनुभवाबद्दलही सांगायला हवं. जर मंचावरील कन्टेन्ट पाहणारे ग्राहक, कन्टेन्ट तयार करणारे निर्मक आणि मंच व्यवस्थापन करणारे तंत्रज्ञ/ उद्योजक असे तीन प्रमुख घटक मानले तर पहिला घटक उपभोक्त्यांचा, दुसरा पुरवठादारांचा अन् तिसरा व्यवस्थापकांचा अशी फोड करता येईल. ही मांडणी मात्र जुन्या व्यवहारासारखीच आहे. मात्र, जुन्या व्यवहारातला वितरणाचा भाग तंत्रज्ञानामुळे वगळला गेला आहे. आता चित्रपटनिर्मिती करणाऱ्या कंपनीला वितरण व्यवस्था उभारण्यात अन् सांभाळण्यात ऊर्जाव्यय करावा लागणार नाही. जगभरामध्ये वितरण व्यवस्थेबाबतची मक्तेदारी ठरावीक लोकांकडे होती. त्याचबरोबर पायाभूत सुविधांची कमतरता (Infrastructural inadequacy) वा अपुरेपणाची समस्याही सुटत नव्हती. या दोन्ही प्रश्नांची सोडवणूक या मंचाने केली. अपुऱ्या सुविधांमुळे ग्राहकसंख्येची पडणारी मर्यादा हा मोठाच अडथळा या तंत्रज्ञानाने सहज दूर केला. चालता-फिरता हर माणूस ग्राहक बनवता येऊ शकतो हे यातून सिद्ध झालं. आणि मग हर तऱ्हेची आवड असणाऱ्या नवग्राहकासाठी हर तऱ्हेच्या रुचीचे मजकूर (कंटेन्ट) निर्माण करण्याची गरज निर्माण झाली. या नवग्राहकांमध्ये विविध वयोगटांचा समावेश होता. भारतात मात्र यात तरुणांची बहुसंख्या होती. आणि मग नवीनतम तंत्रज्ञान वापरणाऱ्या या तरुण वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्याकरता नेटफ्लिक्सने त्यांना आवडेल अशा ‘सेक्रेड गेम्स’ या पुस्तकाची मालिका निर्मितीसाठी निवड केली. अनुराग कश्यप आणि विक्रम मोटवाने या स्वत:चे प्रेक्षकपंथ तयार केलेल्या दिग्दर्शकांची निवड केली. आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसे अभिनेते, अभिनेत्री आणि तंत्रज्ञ निवडले. ही मालिका जरी नेटफ्लिक्सच्या भारतीय पदार्पणासाठी म्हणून निर्माण केली जात असली तरी जगभरातल्या साऱ्याच नेटफ्लिक्स पंथीयांना ती उपलब्ध होणार होती. एकूण १९० च्या वर देशांमध्ये ती पाहिली जाणार होती. या सगळ्या पलूंचा विचार करून या विशिष्ट मालिकेची निवड अन् निर्मिती करण्यात आली. प्रत्यक्ष निर्मितीबाबतही विविध टप्प्यांवरच्या तपासणी यंत्रणेद्वारे गुणवत्तेबाबत काटेकोर नियंत्रण ठेवण्यात आले. उदाहरणार्थ, सगळ्याच कलाकारांची निवड चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांचे चित्रण अमेरिकेत पाठवून तज्ज्ञांद्वारे निर्णयप्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रत्येक सहभागी माणसाच्या अनुभव अन् क्षमतेची खात्री पटल्यानंतरच त्यांना संघात समाविष्ट केलं गेलं. निवड झालेल्या प्रत्येकाशी साद्यंत कायदेशीर करार करण्यात आले. यात कलाकारांना मिळणाऱ्या साधनसुविधांची जशी माहिती होती, तशीच त्यांच्याकडून अपेक्षित वर्तनाबाबत सविस्तर अन् काटेकोर नियमावलीही होती. संपूर्ण पुस्तकाचे माध्यमांतर करून मालिका घडवायची असल्याने कथापटाचा विस्तार अनेक चित्रपटांच्या लांबीइतका होता. त्याची विभागनिहाय तोडणी करून आलेखन करण्यात आले. अशा सर्व सोपस्कारांनंतर प्रत्यक्ष चित्रीकरणास सुरुवात झाली. प्रत्यक्ष चित्रीकरण जरी पूर्णतया दिग्दर्शकद्वयींच्या अधीन असले तरी त्यांच्या कल्पनाविस्ताराकरिता आवश्यक अशी आधुनिक साधने अन् तंत्रज्ञान त्यांना पुरविण्यात आले होते. रंगभूषेपासून छायांकनापर्यंत साऱ्याच विभागांमध्ये याची प्रचीती येत होती. आजवरच्या अनुभवात अनेकदा साधनांचा अभाव आणि वेळेची मर्यादा यांचा अडथळा झाला होता. इथे मात्र वेळेचेही नियोजन सुयोग्य होते. कार्यसंस्कृतीतली आधुनिकता ही मोठीच उपलब्धी नेटफ्लिक्सच्या निमित्ताने भारतीय मनोरंजन क्षेत्राला झाली. काम कसे करावे, या प्रश्नाचे उत्तर आजवर आम्ही ‘कसेही करावे’ असेच देत होतो. एकूण समाज म्हणूनच आमच्यात कार्यसंस्कृतीचा अभाव असल्याने या उपलब्धीचे अप्रूप वाटले. अर्थात बहुतांश माणसे भारतीय असल्याने त्यांनी थोडा ‘चलता है’ रवैया घुसडलाच.
प्रत्यक्ष कथानकामधल्या अनेक गोष्टी प्रथमच भारतीय दिग्दर्शकांना पडद्यावर मांडता येणार होत्या. त्या मांडताना प्रेक्षकानुनय करण्याची गरज नव्हती. सृजनप्रक्रियेत इतरांची ढवळाढवळ नसल्याने सगळ्यांनाच नपुण्य कसास लावता आले. मजकुराच्या रचनेत मुक्तता आली. गोष्ट कशी सांगावी यासंबंधीचा पूर्णाधिकार दिग्दर्शकास राबविता आला. अर्थात अमेरिकेतून लक्ष ठेवले जात होते. काही वेळा प्रश्नही विचारले जात होते. मात्र, बाजू समजावून सांगता येत होती. समजून घेण्याची भूमिका निर्मात्यांमध्ये होती. या सगळ्या नवीन वातावरणाचा भाग होताना अनेक नव्या गोष्टी कळत होत्या. लहान तपशिलांचे महत्त्व समजत होते. उदाहरणार्थ, चित्रीकरणादिवशी चित्रित होणाऱ्या प्रसंगांची संहिता तुम्हाला दिली जात असे व चित्रीकरण संपताच न चुकता ते कागद परत घेतले जात असत. संपूर्ण लिखित संहिता काही मोजके कलाकार, तंत्रज्ञ वगळता इतरांना दिली गेली नव्हती. कथानकात अनेक उपकथानके असल्याने व अनेक कलाकार अनेक भूमिका करीत असल्याने पुस्तकातले नेमके काय दाखवले जाणार याचा कोणताही अंदाज बऱ्याच जणांना नव्हता. या साऱ्यातून एक मोठी उत्सुकता प्रेक्षकांच्याच नव्हे, तर प्रत्यक्ष सहभागी कलाकारांच्या मनातही निर्माण होत होती. प्रत्यक्ष चित्रीकरण मात्र नेहमीप्रमाणेच झाले.
‘सेक्रेड गेम्स’ हे कथानक दोन प्रमुख पात्रांच्या पाठशिवणीची कथा सांगते. यातील एक चोर, तर दुसरा पोलीस. पोलिसाच्या दृष्टिकोनातील कथानक विक्रम मोटवाने याने दिग्दíशत केले, तर गुंडाचा भाग अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला. मी रंगवीत असलेले पात्र या दोन्ही धारांशी संलग्न असल्याने मला एकच भूमिका दोन निराळ्या दिग्दर्शकांसह करता आली. त्या दोघांची कार्यपद्धती अत्यंत भिन्न आहे. विक्रम र्सवकष सरावावर भर देणारा, तर अनुराग अभिनेत्यांच्या उत्स्फूर्ततेवर भरवसा ठेवणारा. हा अनुभव दोन्ही शैलीतल्या गुणदोषांचे आकलन होण्याचा होता. त्यातील निरनिराळ्या शक्यतांचा अदमास देणारा होता.
मजकुराचे कोणतेही ‘नियमन’ होणार नसल्याने असभ्य भाषा, िहसा आणि लैंगिक व्यवहार या एरवी अभावाने दाखवल्या जाणाऱ्या मानवी जीवनातील पलूंचा वापर कथा सांगण्यात केला गेला. मात्र, या पलूंची जाहिरात करून मालिकेचा प्रचार केला गेला नाही. तरीही यावर वाद झाले. बऱ्या-वाईट प्रतिक्रिया आल्या. भारतीय समाजमनाला जडलेली पावित्र्याची जळमटे मात्र नक्कीच झाडली गेली. अर्थात हे काही प्रथमच होत होतं असं नाही, पण इतक्या सर्वदूर पाहिलं मात्र प्रथमच जात होतं. माणसाच्या जगण्याला वास्तविक सादरीकरणातून भिडण्याचा दिग्दर्शकांचा, लेखकांचा अधिकार त्यांच्या स्वाधीन असायलाच हवा. यानिमित्ताने सेन्सॉरशिप नियमनासंबंधीही चर्चाना उधाण आले. त्याविषयीची चर्चा हा स्वतंत्र विषय आहे. मी ज्या तीन वेब मालिकांमध्ये काम केले, त्या तीनही ठिकाणी मिळणाऱ्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदारीचे भान संबंधित दिग्दर्शकांकडे होते. हे सारेच आम्हाला नवे होते. मात्र, झपाटय़ाने आम्ही हे मंच आपलेसे करीत त्यांना आमच्या सांस्कृतिक जीवनाचे अंग बनविले. फावल्या वेळात विरंगुळा साधण्याकरिता ‘चला, नेटफ्लिक्स करू,’ अशी वर्तणूकविषयक संज्ञाही तरुणांनी रूढ केली. ‘स्वातंत्र्य आणि जबाबदारी’ असे ब्रीद असलेल्या नेटफ्लिक्सनं आपला पंथ तयार केला. जगभरात दीडशे कोटी वर्गणीदार असलेली ही कंपनी आपल्या कार्यसंस्कृतीबद्दल अत्यंत आग्रही आहे. भाडय़ाने आणलेली चित्रपट तबकडी हरवल्याने रीड हॅिस्टग्ज् या हुन्नरी माणसाने मार्क रँडॉल्फ या फ्रॉइडच्या चुलत पणतू असलेल्या सहकाऱ्यासह १९९७ मध्ये ही कंपनी स्थापन केली. आज चीन, द. कोरिया, सीरिया असे काही मोजके देश सोडता जगभर त्यांची स्ट्रीिमग सेवा उपलब्ध आहे.
नेटफ्लिक्सपाठोपाठ ‘अॅमेझॉन प्राइम’ नावानं अॅमेझॉन कंपनीनंही अशीच सेवा सुरू केली आहे. आणि येत्या काही दिवसांत अॅपल आणि डिस्ने या कंपन्यांची सेवाही सुरू होईल. येत्या काळात चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे ही काही खाशांची चंगळ बनेल अन् उर्वरित जग ओटीटी मंचावर आपलं मन रिझवत राहील. हे मंच प्रेक्षकाला स्वातंत्र्य देणारा अनुभव निर्माण करत राहतील. आपण मात्र जबाबदारीनं ही नवी संस्कृती अंगीकारूया. माणसाच्या मनाला सर्जनाचे वेड आहे. त्यातून घडणाऱ्या सगळ्याच निर्माणाला करुणेची किनार असू देत.