पुण्यभूषण
पुणेकरांनी, पुण्याला मध्यवर्ती ठेवून मात्र सर्वासाठी काढलेला दिवाळी अंक म्हणजे पुण्यभूषण! या अंकाचे हे दुसरे वर्ष आहे. या अंकात अभिनेते विक्रम गोखले, उद्योजक अरुण फिरोदिया, मुकुंद टाकसाळे, सुधीर गाडगीळ यांचे विशेष लेख आहेत. चहाला अमृततुल्य अशी उपमा देणाऱ्या पुणेकरांचे या पेयावरील प्रेमाला अधोरेखित करणारा ‘वाफाळत्या अमृततुल्यांच्या दुनियेत’ हा विनायक करमरकर यांचा लेख जमून आला आहे. केतकी घाटे, मंदार दातार यांचा ‘बखर टेकडय़ांची’ आणि अविनाश सोवनी यांचा ‘पुणेरी पेठांचं कूळ आणि मूळ’ हे लेखही वाचनीय आहेत. पुण्याचे वैशिष्टय़ असणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवाचा सचित्र आढावा ही या अंकाची जमेची बाजू आहे. छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनी या महोत्सवातील दिग्गज कलाकारांच्या निवडक छायाचित्रांचे केलेले संकलन संग्राह्य़ आहे.
संपादक – सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी, पृष्ठे- १७६, किंमत- रु. १००

मनशक्ती
योगविज्ञा, ज्योतिष यांपासून आध्यात्मिक विषयांना वाहिलेला ‘मनशक्ती’च्या दिवाळी अंकातील बहुतांश लेख वाचनीय ठरले आहेत. स्वामी विज्ञानानंद यांचा वंशजकल्याण, गीतेश कुलकर्णी यांचा हिग्ज बोसानच्या निमित्ताने, प्रमोद शिंदे यांचा योगसाधनेतील सिद्धी आणि अनुभूती हे लेख माहितीपूर्ण आहेत. ज्योतिषावर बोलू काही हा गजानन केळकर यांचा लेख त्या विषयातील जिज्ञासूंसाठी अभ्यासनीय आहे. शुभलक्ष्मी बापट यांनी संत तुकाराम यांच्यावरील लेखात तुकारामांच्या अभंगाचे मनोज्ञ विश्लेषण केले आहे.
संपादक- विद्या देशपांडे, पृष्ठे- २८२, किंमत- रु. १००

कथाश्री
कथाश्रीचा यंदाचा दिवाळी अंक नावाप्रमाणे कथाप्रकारास वाहिलेला आहे. यात प्रामुख्याने १९९१नंतरच्या वातावरणाचा वेध घेणाऱ्या कथांना प्राधान्य देण्यात आले असून त्यात नीरजा, संध्या रानडे, योगिनी वेंगुर्लेकर, साधना कामत आदींच्या कथांचा समावेश आहे. याशिवाय या अंकात सानिया, विजया राजाध्यक्ष, आशा बगे, मोनिका गजेंद्रगडकर, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे आदींचे वाचनीय लेखही आहेत. दिवाळी अंक असल्याने विजय पराडकर आणि यशवंत सरदेसाई यांच्या हास्यचित्रांचाही यात समावेश आहे. कथांवर प्रेम करणाऱ्या वाचकांसाठी हा अंक निश्चितच पर्वणीचा ठरेल.
संपादक- अशोक लेले, प्रकाश पानसे, पृष्ठे- २२८, किंमत- रु. १२०

आपलं महानगर  

सुशिक्षित महिला हा कुटुंब उभारणीचा पाया समजला जातो. समाजात निरनिराळ्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या पुरुषांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या घरातील महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. ‘आपलं महानगर’ मध्ये अमिताभ बच्चन, देवेंद्र फडणवीस, सदानंद दाते यांनी आपल्या घरातील कर्तृत्ववान महिलांच्या आठवणी सांगितल्या आहेत; तर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या यशाचा पाया रचणाऱ्या त्याच्या घरातील महिला वर्गाची ओळख चंद्रशेखर संत यांनी करून दिली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, नेमबाज अंजली भागवत, अभिनेत्री अमृता पत्की, मृणाल दुसानिस, अमृता खानविलकर व प्रसिद्ध निवेदक प्रदीप भिडे यांनी आपल्या शाळेतील मनोहारी दिवसांच्या खुमासदार शैलीतील आठवणी सांगितल्या आहेत. ‘माझ्यानंतर मी’ या सदरात डॉ. श्रीराम लागू, रवी परांजपे, द.मा. मिरासदार, नरेंद्र दाभोलकर, मोहन आगाशे या दिग्गजांनी आपल्या आजवरच्या वाटचालीचे आत्मचिंतन केले आहे, तर भारताने आपल्या शेजारी राष्ट्रांच्या हालचालींपासून सावध राहायला हवा, हे सांगणारा विशेष लेखही माहितीपूर्ण झाला आहे. या शिवाय बॉलिवूडची शंभरी, भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था यांसारख्या विषयांवरही संबधित तज्ज्ञांचे लेख वाचावयास मिळतात.
संपादिका – वृंदा बाळ  पृष्ठे – १८४ किंमत – ९० रुपये

ग्रहवेध
अध्यात्म, देव, दैवी उपाय, ज्योतिषशास्त्र, तत्त्वज्ञान, आरोग्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील लेख असलेला ग्रहवेध हा दिवाशी अंक. डॉ. प. वि. वर्तक यांचा इंग्रजीमधील देव व ईश्वर यावरील विवेचक लेख, गायत्रीदेवी वासुदेव यांची मुलाखत,  ग्रहांविषयक डॉ. निमाई बॅनर्जी यांचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून केलेली मीमांसा आदी विविध वाचनीय मजकूर ग्रहवेधमध्ये वाचावयास मिळतात. वार्षिक राशीभविष्यही आहेच. ज्योतिषशास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे डॉ. व्ही रमण यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणी त्यांच्या कन्या गायत्रीदेवी वासुदेव यांनी सांगितल्या आहेत. याशिवाय इसाक मुजावर, वामन देशपांडे, डॉ. मधुसूदन घाणेकर, डॉ. पु. म. लोहिया आदींचे अभ्यासपूर्ण लेख या ग्रहवेधच्या दिवाळी अंकात आहेत. अंकाचे हे २२ वे वर्ष आहे.
संपादक – डॉ. उदय मुळगुंद
पृष्ठे – १७२, किंमत – ९० रुपये.

शतायुषी
  ‘तुमचा फॅमिली डॉक्टर’ या आपल्या घोषवाक्याला जागत ‘शतायुषी’ने आपल्या परंपरेला साजेसा दिवाळी अंक वाचकांसमोर ठेवला आहे. ‘रेव्ह पार्टी’मधील लहान मुलांच्या वाढत्या सहभागाच्या घटना अलीकडच्या काळात उघडकीस आल्या. शतायुषीच्या संपादकीयमध्ये या विषयाचा परामर्श घेण्यात आला आहे. संपादकीय विभागात मांडलेल्या विषयाला अनुसरून ‘मुलांचे फाजील लाड आणि मुलांचे आजार ‘ ही दोन भागांची लेखमाला या अंकात देण्यात आली आहे. आपली मुलं बिघडायला नको असतील तर घरातील सर्वच पालकांनी वाचावी अशी ही लेखमालिका आहे.
सांधेदुखीवर या अंकात विशेष विभाग असून सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांसाठी तर हा विभाग उपयोगी आहेच, त्याशिवाय सांधे दुखायला लागण्यापूर्वीच हे लेख वाचले तर सांधेदुखी टाळण्यात किंवा निदान कमी करण्यात निश्चितच मदत होईल. सांधेदुखीच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी या विभागात केलेले लेखन त्यांच्या या विषयातील असलेल्या अभ्यासामुळे अधिक वजनदार बनले आहे. डॉक्टरांच्या वाढत्या दरामुळे आता रुग्णालयाचे शुल्क सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.आरोग्य विमासंदर्भातील विविध मुद्यांची माहिती देणारा हेल्थ इन्शुरअन्स काळाची आणि आजाराची गरज हा लेख संग्राह्य ठेवावा असा जमला आहे.
संपादक – डॉ. अरविंद संगमनेरकर, डॉ. आशा संगमनेरकर   पृष्ठे – २२६ किंमत – १०० रुपये    

Story img Loader