कृष्णानंद होसाळीकर, भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक (पश्चिम विभाग)

गेल्या काही वर्षांपासून वातावरणात बदल घडू लागले आहेत. लांबणारा पाऊस, हिवाळ्यात पडणारा पाऊस, उष्ण वर्ष असे वातावरणीय बदल होत आहेत. यामागचे वैज्ञानिक कारण समजून  घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी केलेली ही बातचीत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

* हिवाळा संपताना पावसाची शक्यता वर्तवली जात आहे, ती कशामुळे?

यापूर्वीच्या नोंदीनुसार हिवाळ्यात देशात आणि राज्यात डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सरासरीनुसार हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे प्रमाण असते. हिवाळ्यात ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे पूर्वेकडून येणारे दमट वारे, त्याच वेळी उत्तर भारतात  सक्रिय असलेली पश्चिमी प्रकोप स्थिती आणि त्यामुळे येणारे थंड आणि कोरडे वारे (आग्नेयेकडून पश्चिमेकडे) वाहत असतात. पश्चिमी प्रकोपाचा प्रभाव भारताच्या उत्तर, तसेच अनेकदा मध्य भागावरही जाणवतो. या दोन्ही हवामान स्थिती एकत्र येतात तेव्हा पावसाची शक्यता निर्माण होते. सध्या पावसाची शक्यता ही दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार वर्तविली आहे. या पूर्वानुमानातील शेवटच्या दोन आठवडय़ाची शक्यता ही केवळ मार्गदर्शक म्हणूनच वापरावी. पावसाची शक्यता वर्तविताना सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण किती अधिक असेल हे सांगणारा तक्ता असतो. तो पाहता मध्य महाराष्ट्रातील पाऊस हा सरासरीपेक्षा केवळ एक मिलिमीटरपेक्षा अधिक असेल. अगदी हलका पाऊस असेल, मात्र हवामान ढगाळ राहील. दीर्घकालीन पूर्वानुमान हे दर गुरुवारी पुढील चार आठवडय़ांसाठी अद्ययावत केले जाते. त्यामुळे पुढील आठवडय़ातील बदल पाहणे महत्त्वाचे असेल.

* पावसाचे आगमन, परतीचा प्रवास यांमध्ये बदल झाला आहे, तसे इतर ऋतूंबाबत होते का?

देशातील पावसाचे आगमन आणि परतीचा प्रवास या तारखा शास्त्रीय नोंदीतून तयार झाल्या आहेत. पावसाचे आगमन नियमित (१ जून रोजी केरळ) आहे, मात्र वायव्येला पोहोचण्याचा कालावधी कमी होत आहे. तेथून परतीच्या प्रवासाची तारीख लांबली आहे. त्यामुळे पाऊस अधिक काळ राहत आहे. त्यातून नेमके काय परिणाम होतील ते येत्या काही वर्षांत कळू शकेल.

हिवाळा येणे आणि जाणे याबाबतच्या तारखा शास्त्रीय दृष्टिकोनातून अद्याप तयार केलेल्या नाहीत. उत्तरेकडून येणारे आणि शुष्क वारे (उत्तर ते उत्तर पूर्वी) आणि पश्चिमी प्रकोपाची स्थिती जशी निर्माण होते, तेव्हा राज्यात थंडी पडते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ाचे कमाल आणि किमान तापमान किती आहे याच्या सर्व नोंदी आपल्याकडे आहेत. पण हिवाळा लांबलाय का किंवा कमी झाला आहे का, यावर आता भाष्य करणे शास्त्रीयदृष्टय़ा योग्य नाही.

* हिवाळा आणि प्रदूषण याचे गणित काय आहे? यावर्षी अनेकदा मुंबईची तुलना दिल्लीशी केली गेली.

गेल्या ७० वर्षांतील मुंबईमधील वातावरणाच्या नोंदीनुसार जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात भेडसावणारी घटना म्हणजे धुरके . धुके  आणि पावसाच्या घटना काही प्रमाणात आहेत, पण धुरक्याचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कधी कधी त्याची तीव्रता वाढते आणि दृश्यमानता कमी होते.  सकाळी हवेच्या खालच्या थरात एक यंत्रणा कार्यरत होते. त्याला ‘टेम्परेचर इन्व्हर्नशन’ असे म्हणतात. जसजसे जमिनीपासून वर जातो तसतसे तापमान कमी होते. पण हिवाळ्यात जमिनीपासून सर्वसाधारणपणे ५०० ते ७०० मीटरवर गेल्यावर तापमान वाढताना दिसते आणि मग कमी होते. या खालच्या थरात धुलीकण अडकतात. वारे जोरात वाहत नसल्यामुळे ते त्याच थरात अडकून राहतात. बांधकाम, वाहनांचे प्रदूषण आणि माणसांचा वावर यामुळे हा प्रकार वाढतो. जसाजसा सूर्य वर येतो तसा तो थर निघून जातो.

* हवा प्रदूषणाची माहिती सर्वसामान्यांना कशी मिळू शकते?

हवामान विभागाच्या सफर (सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅण्ड  वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड  रिसर्च) या यंत्रणेद्वारे शहरात नऊ  ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजण्याची सुविधा आहे. त्यावर दर १५ मिनिटांची स्थिती अद्ययावत केली जाते.  सर्वसामान्यांना ते सफरच्या अ‍ॅपवर पाहता येते. त्यावेळी कोणती काळजी घ्यावी याची माहिती आहे. मुंबई महापालिका या नोंदीचा वापर ‘शहराचा पर्यावरण स्थिती अहवाल’ मांडण्यासाठी करते.

* २०२० हे वर्ष सर्वाधिक तिसरे उष्ण वर्ष आहे. त्याबद्दल काय सांगता येईल?

२०२० हे वर्ष तीव्र ‘ला निना’साठी ओळखले जाते. ‘ला निना’ सक्रिय असेल तेव्हा तापमान कमी होते, तर  ‘अल निनो’ सक्रिय असेल तर तापमान वाढते. अद्यापही ‘ला निना’ सक्रिय आहे. गेल्या वर्षी तापमानात घट होईल, असे म्हटले जात होते. मात्र नुकतेच २०२० हे वर्ष आणखी एक उष्ण वर्ष ठरले. कर्ब उत्सर्जनाचे वाढते प्रमाण हे यामागचे कारण आहे. गेल्या वर्षी करोनाकाळात वाहने कमी होती, प्रदूषणात घट झाली. पण हे अगदीच मर्यादित काळासाठी होते. यापूर्वीपासून निर्माण केलेले प्रदूषक घटक हवेतच आहेत. त्यामुळेच २०२० हे उष्ण वर्ष म्हणून गणले गेले. त्यामुळेच मध्य भारतात तेवढी थंडी आली नाही असे म्हणता येईल. हवामान बदल सर्वत्रच होत आहे. देशातील तापमान वाढताना दिसत आहे. उष्ण लहरींची तीव्रता, कालावधी आणि संख्या वाढू शकते. पॅरिस करारानुसार ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी आपल्याला आणखी आक्रमक पावले उचलावी लागतील. कर्ब उत्सर्जनामध्ये प्रगत आणि प्रगतिशील देशांमधील फरक समजून घ्यावा लागेल. भारत या कराराचा भाग आहे. वातावरण बदलाचा परिणाम सर्वच व्यवसाय, वैयक्तिक जीवन आणि पुढच्या पिढीवर होणार हे लक्षात घेऊन काम करावे लागेल.

* यावर्षीचा उन्हाळा कसा असेल?

साधारणपणे फेब्रुवारीच्या मध्यावर उन्हाळ्याबाबत भारतीय हवामान विभाग अनुमान जाहीर करते. हिवाळा इतका तीव्र नसेल असे हवामान विभागाने पूर्वीच सांगितले होते.

मुलाखत : सुहास जोशी

Story img Loader