कॉमेडी कट्टा
राजकारण्यांचे आर्थिक घोटाळे, सतत वाढणारी महागाई आदींमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचे दिवाळीत चार घटका करमणूक व्हावी, हा हेतू नजरेसमोर ठेवून ‘युनिक फीचर्स’ने ‘कॉमेडी कट्टा’ हा विनोदाला वाहिलेला दिवाळी अंक वाचकांपुढे ठेवला आहे. या अंकाच्या मुखपृष्ठावरील लेखकांच्या नावाची मांदियाळी पाहिल्यानंतरच अंकाच्या वाचनीयतेची खात्री पटते. दिलीप प्रभावळकर, मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले, अवधूत परळकर, श्रीनिवास भणगे, प्रशांत कुलकर्णी आदींचे खुमासदार लेखन दाद देण्यासारखेच. विसोबा खेचर यांनी काही दैनिकांची व उपग्रह वाहिन्यांची उडवलेली रेवडी अवश्य वाचण्यासारखी झाली आहे. हास्यचित्रे, व्यंगचित्रे, हास्यकविता आदींचाही या अंकात समावेश आहे, परंतु या अंकाचे सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे वसंत सरवटे, मनोहर सप्रे, शि. द. फडणीस आणि मंगेश तेंडुलकर या चार व्यंगचित्रकारांनी आपल्या कलाविष्काराबाबत व्यक्त केलेली मनोगते! या चौघांच्या खास व्यंगचित्रे-अर्कचित्रांनी या लेखांचे सौंदर्य वाढवले आहे.
संपादक- सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी,
पृष्ठे- १४६, किंमत- ८० रुपये
तारांगण
भारतीय चित्रपटसृष्टीचे हे शताब्दीपूर्तीचे वर्ष असल्याने या दिवाळी अंकात ‘शंभर’ या संकल्पनेचा आधार घेण्यात आला आहे. सध्याची बहुचर्चित अभिनेत्री स्पृहा जोशी हिचे मुखपृष्ठावरील छायाचित्र वेधक झाले असून त्यात चित्रपटसृष्टीची शताब्दी प्रतीत करण्यासाठी रेखाटलेली रांगोळीसुद्धा आगळीवेगळी झाली आहे. सौ साल बाद, शंभर वर्षांपूर्वीची चित्तरकथा, चित्रसृष्टीची शंभरी, सिनेशतकाचा स्मृतिगंध आदी लेख छान वठले आहेत. यातील ‘सिनेशतकाचा स्मृतिगंध’ हा लेख विशेष माहितीपूर्ण झाला आहे. गायक-संगीतकार शंकर महादेवन यांनी लिहिलेला ‘संगीत हा माझा श्वास’ हा लेखही वाचनीय आहे. मृणाल कुलकर्णी, सलील कुलकर्णी, रवी जाधव, महेश लिमये, सुबोध भावे आदी कलाकारांनी ‘सौ साल बाद..’ या शीर्षकाखालील परिसंवादात सध्याचा सिनेमा १०० वर्षांनंतर कसा असेल, यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. या अंकाचे ठळक वैशिष्टय़ म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके यांची मुलाखत! १९२७-२८ मध्ये ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ‘सिनेमॅटोग्राफर एन्क्वायरी कमिटी’समोर फाळके यांनी साक्ष दिली होती. या साक्षीदरम्यान झालेल्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून फाळके यांच्या चित्रपटसृष्टीविषयक व्यासंगाचा आवाका सहज लक्षात येतो.
संपादक – मंदार जोशी,
पृष्ठे- १३८, किंमत- १०० रुपये.
पासवर्ड
सातवी ते दहावी वर्गातील कुमार वाचकांना समोर ठेवून युनिक प्रकाशनने ‘पासवर्ड’ हा दिवाळी अंक काढला आहे. डॉ. प्रकाश आमटे, अनिल अवचट, राजीव तांबे, रेणू गावस्कर यांच्याबरोबरच मयूरेश कोण्णूर, अवधूत डोंगरे यांसारख्या युवा लेखकांनीही केलेले लेखन हे या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़. केवळ कुत्रा किंवा मांजर नाही तर अस्वल, बिबटे, मगर यांसारख्या प्राण्यांना आपल्या कुटुंबाचे सदस्य करून घेणारे अवलिया म्हणून प्रकाश आमटे सर्वानाच ज्ञात आहेत. आपल्या घरातील अनोख्या सदस्यांचे अनुभवकथन करणारा लेख प्रकाश आमटेंनी या अंकात लिहिला आहे. अनाथ आश्रमातील मुलांचे भावविश्व उलगडून दाखवणारा रेणू गावस्कर यांचा ‘माझं कोण आहे?’, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील अंतरंगाची धावती ओळख करून देणारा मयूरेश कोण्णूर यांचा टीव्हीच्या पडद्यामागचं ‘लाइव्ह’ हे लेखही वाचण्यासारखे आहेत. त्याशिवाय आजच्या संगणकाचा गाभा असलेली ‘सी’च्या भाषेचा जनक डेनिस रिचीचा परिचय, माधव शिरवळकर यांनी घेतलेल्या हॅकर्सच्या दुनियेचा वेध, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मेरी कोमची मुलाखत, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यशवंतरावांनी राज्यनिर्मितीआधी नवमहाराष्ट्राचं स्वप्न दाखवलेलं ऐतिहासिक भाषण यासारख्या वैविध्यपूर्ण विषयाची मेजवानी या अंकात वाचायला मिळते. तसेच चहाच्या कँटीनमध्ये काम करणाऱ्या मुलाचे शीतल भांगरे यांनी लिहिलेले भावविश्व ‘चहाच्या किटलीसोबत एक दिवस’ हा हटके लेख तर सर्वच वयोगटांतील वाचकांनी वाचण्यासारखा आहे. सर्वच लेखकांनी शब्दमर्यादेच्या सीमारेषेचे काटेकोर पालन केल्याने प्रत्येक लेख अगदी आटोपशीर बनला आहे.
संपादक- सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी, पृष्ठे- ९८, किंमत- ७५ रुपये
छोटय़ांचा आवाज
दिवाळी अंकांच्या विश्वामध्ये ‘आवाज’चे मानाचे स्थान आहे. विनोदी कथा, व्यंगचित्रे, कविता यांची रेलचेल असलेल्या ‘आवाज’च्या अंकावर दरवर्षी वाचकांच्या उडय़ा पडत असतात. ‘आवाज’ची ही वाढती लोकप्रियता लक्षात घेत आता विविध वयोगटांतील वाचकांना डोळ्यासमोर ठेवून ‘आवाज’चे अंक निघत आहेत. दिवा दिवाळी पब्लिकेशनने खास शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘छोटय़ांचा आवाज’ हा दिवाळी अंक काढला आहे. या अंकाच्या मुखपृष्ठावर ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांचे व्यंगचित्र आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्येही सोशल माध्यमांबद्दल पसरलेल्या क्रेझचे खुमासदार चित्रण करण्यात आले आहे. गेली ७२ वर्षे अव्याहतपणे मस्ती करणाऱ्या ‘टॉम अॅण्ड जेरी’चा प्रवास संजीव पाध्ये यांनी उलगडला आहे. याशिवाय बच्चे कंपनीला आवडणाऱ्या कथा, कविता, शब्दकोडी यांची रेलचेल या अंकात आहे.
संपादिका – वैशाली मेहेत्रे, पृष्ठे- ९६,
किंमत- ६० रुपये