‘पुस्तकं गाजलेली, न गाजलेली’ या मराठी वाचनसंस्कृतीच्या विदारक स्थितीवर खोलवर प्रकाशझोत टाकणाऱ्या नितीन रिंढे यांचा लेख न-वाचक आणि पट्टीचा वाचक या दोहोंच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरू शकेल. भल्याभल्या वाचक म्हणवणाऱ्यांना आपल्या वाचनथिटेपणाची तपासणी करून घेण्याची गरज हा लेख व्यक्त करतो. ‘परम मित्र’च्या इतर आकर्षणांमध्ये चित्रपट विषयक लिखाणाचे स्थान मोठे आहे. भारतीय चित्रपटांच्या शंभरीनिमित्ताने संतोष पाठारे यांनी मृणाल सेन यांच्या चित्रपटांचा, रेखा देशपांडे यांनी चित्रगीतांचा परामर्श घेतला आहे. जेम्स बॉण्डशी पन्नाशी इब्राहीम अफगाण यांनी साजरी केली आहे. उद्योग जगतातील लाखो कोटींच्या उलाढालींचे गणित सुनील कर्णिक यांच्या लेखातून उलगडलेले आहे. साधना बहुळकरांनी गुस्ताव क्लिम्ट आणि रवि वर्मा या समकालीन चित्रकारांच्या स्त्री प्रतिमांचा लेखाजोखा मांडला आहे. आजच्या वृत्तवाहिन्यांच्या जगातील वास्तव ‘चढाओढ’ मांडणारी अनुवादित कथा, शर्मीला कलगुटकर, चांगदेव काळे, कृष्णा किंबहुने यांचे लेख वाचनीय आहेत.
पृष्ठे १७६, किंमत : १००

लोकमत दीपोत्सव
मानवी आयुष्यात एकच गोष्ट कायम स्थिर असलेल्या ‘बदल’ या संकल्पनेचा धांडोळा विविध पल्ल्याच्या माणसांच्या माध्यमांतून घेण्याचा प्रयत्न अंकात करण्यात आला आहे. सतत परदेशी बाहुली म्हणून हिणविल्या जाणाऱ्या, ठोकळेबाज सौंदर्याचा पुतळा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कतरिना कैफ या बॉलीवूडच्या अभिनेत्रीचा गेल्या दहा वर्षांतील भारतीय चित्रपटसृष्टीवर झेंडा रोवण्यामागची मेहनत आणि आयुष्याची अज्ञात बाजू अंकातील सर्वात चकित करणारे योगदान आहे. जगाच्या नजरेत भारतीय परंपरा आणि संस्कृतीच्या बदलत्या स्थानामुळे निर्माण झालेला चकवा भारतीय मुळं सोबत घेऊन लिहिणाऱ्या झुंपा लाहिरी यांनी उलगडला आहे. तालमणी शीवमणी यांची अध्यात्मिक बाजू, एकता कपूर यांचे ‘सीरियल’बाज समर्थन, राखी सावंत, शबाना आझमी, दलाई लामा, सुभाष अवचट, डॉ. विजय केळकर यांच्या आयुष्यातील बदलवाटा उत्तम जमल्या आहेत. चहूबाजूंनी टीका होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या सद्यस्थितीच्या बाजूने ठाम उभे राहणाऱ्या अर्णब गोस्वामी यांची बाजू आवर्जून दखल घेण्याजोगी आहे. कथा, कविता, राशीभविष्य या पारंपरिक प्रकाराला सुटी देऊन देखणा व रसरशीत मजकूर देण्यात आला आहे.
संपादक : अपर्णा वेलणकर
पृष्ठे २१६, किंमत : १५०

पद्मगंधा
रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्ताने पद्मगंधाने ‘निवडक पद्मगंधा २५’ हा भरगच्च वाचनमेवा यंदा सादर केला आहे. गेल्या २५ वर्षांची वाटचाल विषद करून संपादकांनी खणखणीत लेखांचा गुच्छ एकत्रित केला आहे. साहित्य अभ्यासकांना, मराठी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना संग्राह्य़ ठरावी अशी ही भेट आहे. पद्मगंधाने दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना राबवून विशेषांकांची वार्षिक बरसात आजवर केली आहे. आत्मचरित्र लेखनाचे दिवस, काळाने अभिजात ठरविलेल्या पुस्तकाची लेखनप्रक्रिया दस्तुरखुद्द लेखकांना उलगडून दाखविणारी एक पुस्तक एक लेखक या मालिका पुन्हा एकत्रितरीत्या वाचायला मिळणार आहेत. मराठी साहित्याच्या गेल्या १०० वर्षांमधील घटनांचा आलेख चितारणाऱ्या अनेक दिग्गज लेखकांच्या लेखनाची ही गुंफण नॉस्टॅल्जिया उत्पन्न करणारी आहे. पद्मगंधाच्या वाचकांना पुनर्भेटीचा आनंद देणारा, व पद्मगंधाशी परिचय नसणाऱ्यांना चाहते करून घेणारा असा अंक आहे.
संपादक : अरुण जाखडे
पृष्ठे ३६८, किंमत : १५०

 साहित्य सूची
‘वेगळी’ किंवा ‘आगळी वेगळी’ या विशेषणात बसणारी संकल्पना राबविण्यासाठी सर्वच अंक धडपडत असतात. मात्र वाचकांना रुचणारी, पटणारी किंवा विशेषणाला पात्र ठरणाऱ्या अंकांमध्ये मोजक्याच अंकांचा क्रमांक लागतो. साहित्य सूचीने यंदा जन्मशताब्दी विशेषांक काढायचे ठरवून या विशेषणाला पात्र ठरल्याचे पटवून दिले आहे. अंकामधील पाच ते दहा टक्के भाग कुठल्याही शताब्दीसाठी वापरून विषयापासून ऋणमुक्त होण्याच्या प्रवृत्तीला टाळून साहित्य, विज्ञान, उद्योग, राजकारण, कला, धर्म, क्रीडा, शिक्षण, इतिहास आदी सर्व विषयांतील संस्था, व्यक्ती यांच्या जन्मशताब्दीला हा अंक वाहिला आहे. जन्मशताब्दी वर्षांचा आरंभ आणि सांगता या काळात माध्यमांमुळे आठवण राहण्याच्या काळात आपल्या ज्ञानापलीकडे असणाऱ्या व्यक्ती- संस्था आणि त्यांचे शतकोत्तर कार्य यांची महती जाणून घेणे, या अंकातून शक्य होऊ शकते.
संपादक : योगेश नांदुरकर
पृष्ठे २६६, किंमत : ८०

सामना
इंग्रजी ‘सायब’ जाऊन ६५ वर्षे झाली पण आजच्या राज्यकर्त्यांचा सायबी थाट काही कमी झाला नाही. देशातील नव्या ‘साहेबां’नी सत्ता व संपत्ती स्वत:कडे ठेवल्याने ‘सायबा’चे राज्य खरंच गेले आहे काय? असा प्रश्न सामनाच्या संपादकीयामध्ये विचारण्यात आला आहे. वाढत्या महागाईत दिवाळी साजरी करणे सामान्य माणसांना अवघड होत चालले आहे, सामान्य माणसांच्या याच व्यथा ‘महागाईची दिवाळी’ या विशेष भागात मांडण्यात आल्या असून यामध्ये द. मा. मिरासदार, संतोष पवार, श्रीरंग गोडबोले, अरुण म्हात्रे, यासारख्या दिग्गजांनी लेखन केले आहे.
 बाळासाहेब ठाकरे यांना गुरुस्थानी असलेल्या दीनानाथ दलाल यांची व्यंगचित्रांबाबत अनंत काणेकार यांचा लेख पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. याशिवाय कथाप्रेमी वाचकांसाठीही विविध कथांची मेजवानी या अंकात देण्यात आली आहे.
संपादक – बाळ ठाकरे,
पृष्ठे – १५२,  किंमत – ६० रुपये

साप्ताहिक विवेक
संघ परिवाराला दिशादर्शन करणारा सा. विवेकचा दिवाळी अंक दरवर्षीप्रमाणेच वैचारिक आणि ललित साहित्याने भरगच्च आहे. शेषराव मोरे यांचे ‘काँग्रेस व गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ या पुस्तकाने मोठी खळबळ उडविली आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने दिलीप करंबेळकर यांनी प्रदीर्घ लेख लिहिला आहे. दो आँखे बारह हाथ हा सिनेमा शांतारामबापूंनी एका सत्यकथेवर बनवला होता. हे एक धाडसच होते. त्याचा वेध विजय पाडळकर यांनी घेतला आहे. डॉ. अरुणा ढेरे यांचा एका ‘कन्याशाळे’च्या निमित्ताने, हा लेखही मनोज्ञ झाला आहे. यानिमित्ताने भगिनी निवेदितांची वेगळी ओळख वाचकांना होते. वैद्यकीय शिक्षण हे आज अतिशय महत्त्वाचे परंतु तेवढेच वादग्रस्त बनले आहे. या समस्येचा साकल्याने धांडोळा डॉ. संजय ओक यांनी घेतला आहे. खास मोरांच्या अभयारण्याचा छायाचित्रमय फेरफटका सुहास बारटक्के यांनी मारून आणला आहे. प्राचीन भारतातील महिलांच्या आयुष्याचे दर्शन घडविणारा, त्या पुरेशा स्वतंत्र होत्या आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही त्यांना होते याचे दाखले जातक कथांमध्ये मिळतात, असे प्रतिपादन करणारा रमेश पतंगे यांचा लेखसुद्धा वाचनीय आहे. याशिवाय ललित लेख, कथा, कविता, व्यक्तिचित्रे, व्यंगचित्रे यांनी हा भरगच्च अंक छान सजला आहे.
संपादन : अश्विनी मयेकर
पृष्ठे ३३८ मूल्य : रु. १२५/-

पुरुषस्पंदनं
कुटुंबसंस्था आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच कुटूंब आणि स्त्री-पुरुष संबंध या अतिशय महत्त्वाच्या विषयावर तळमळीने आणि जबाबदारीने लिहिणाऱ्या लेखकांना यंदाच्या अंकात पाचारण करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही वैशिष्टय़पूर्ण, संपूर्णपणे चौकटीबाहेरचा विचार करून अंकाचा विषय संपादकांनी ठरविला आहे. कुटुंबसंस्था हा विषय वगळून भारतीय समाजात तरी कुणालाच पुढे जाता येत नाही. विभक्त कुटुंब पद्धती ही काळाची गरज बनली असली तरी कुटुंबविहीन समाजाची कल्पना आपल्याकडे मांडली जात नाही. अंकातले संपादकीयानंतर आलेले टिपण यातून हे मांडण्याचा धाडसी प्रयत्न संपादकांनी केला आहे. कुटुंबसंस्थेने नाकारलेले समाजघटक याविषयी मान्यवरांनी लिहिले आहे. आधुनिकता, कुटुंब आणि कम्युन हा आलोक ओक या तरुणाने लिहिलेल्या लेखातून वेगळ्या दिशा सुचविण्याचा प्रयत्न केला आहे. मुकंद टाकसाळे, प्रतिमा जोशी, अवधूत परळकर, नीरजा, डॉ. छाया दातार, डॉ. अनुराधा औरंगाबादकर, नसीमा हुरजूक अशा अनेक मान्यवरांचे लेखन मराठी वाचकाला विचारप्रवृत्त करणारे आहेत. कविता विभागामध्ये प्रशांत मोरे, संजय बोरूडे, सायमन मार्टिन, विनय पाटील यांच्या कविता तर आहेतच. शिवाय ‘कविता : पुरुषाने, पुरुषांवर (पुरुषांसाठी) केलेल्या’ हा विशेष विभागही वाचनीय आहे.
संपादन : हरीश सदानी, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
पृष्ठे १९२, किंमत ९०   

Story img Loader