पर्यावरण रक्षणाचा विचार मुळातून पटणे महत्त्वाचे आहे, या उद्देशाने एक लेख लिहिला गेला, त्यावर मतभेद असल्याचे दिसले. परंतु प्रत्येकाला मुळातून पटायला हवा असलेला हा विचार ‘निसर्गासाठी’ करायचा की ‘माणसासाठी’? हा प्रश्न टोकाचा ठरला आणि मतभेदाचे वाटणारे अनेक मुद्दे दिसू लागले.. त्या मुद्दय़ांचा गुंता सोडविण्यासाठी हा प्रतिसाद आणि मूळ लेखाच्या कर्त्यांचेही स्पष्टीकरण..
‘सम्यक निसर्ग : एक शुद्ध भंकस’ (१७ ऑक्टोबर) या लेखात राजीव साने यांनी निसर्गाच्या नियमाविषयी केलेले विवेचन शास्त्रीयदृष्टय़ा योग्य व पर्यावरणवादीच आहे. प्रश्न आहे पर्यावरणवाद्यांमधील काही भोंगळ पर्यावरणवाद्यांचा. त्यांच्या शिक्षणासाठी तो लेख आवश्यकच म्हणायचा. पण लेखाचा बाज असा झाला की वरवर वाचणाऱ्याला लेख एकूणच सर्व पर्यावरणवादय़ांच्या विरोधी वाटावा.. त्यामुळे त्यावर प्रतिक्रियादेखील तशा उमटत आहेत. यावर टिपणी करण्याच्या उद्देशाने तसेच या लेखाच्या प्रतिक्रियेतून आलेल्या सत्यजित चव्हाण यांच्या काही विधानांचीदेखील दखल घेण्यासाठी ही प्रतिक्रिया.
भूगर्भीय कालमापनाच्या मोजपट्टीवर ‘अलीकडील’ काळात पृथ्वीवरील जमिनीच्या स्थितीत स्थित्यंतर केले ते हत्तींनी. त्या नंतर मानवाने. एक अभ्यास सांगतो की पर्यावरणावर सर्वात जास्त कोणत्या मानवी कृतींचा परिणाम झाला असेल तर तो शेती, बांधकाम व दळणवळण यामुळे. उत्क्रांतीदरम्यान मानवाला विशिष्ट शरीररचना व इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त बुद्धी (हादेखील निसर्गाचाच भाग आहे) मिळाल्याने तो साधने बनवणारा प्राणी झाला व त्याने साधनांद्वारे नसíगक संसाधनांचा इतर प्राण्यांपेक्षा फार जास्त व विविध प्रकाराने वापर केला. अर्थात हे करताना त्याच्या काही कृतींचा पर्यावरणावरील परिणाम हा भरून न निघणारा वा पूर्वस्थिती न येणारा (इर्रिव्हर्सिबल) होईल याचे त्याला सुरवातीला भान असण्याचे कारण नव्हते. पण मानवानेच विकसित केलेल्या विज्ञानामुळे आता त्याच्या असे लक्षात आले की ही वाटचाल किंवा हा विकास चिरकाल टिकणारा शाश्वत नसून निसर्गाचा अधिक्षेप असाच सुरू ठेवल्यास मानवाच्या अस्तित्वालाच भविष्यात धोका आहे व येणाऱ्या पिढय़ांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तेव्हा प्रश्न असा आहे की विकासाच्या या टप्प्यात हे कालचक्र उलटे फिरवणे शक्य आहे का किंवा तसा प्रयत्न करावा काय? नसíगक संसाधनांचा उपयोग / उपभोग घेणे बंद करून इतिहासात परत जाता येणे शक्य नाही.
या स्थितीला उत्तर हेच असू शकते की नसíगक संसाधनांचा यापुढे वापर करताना आपल्याला आपल्या जीवनपद्धतीत, संसाधनांच्या वापरामध्ये व विकासाच्या एकूणच संकल्पनेत बदल करावा लागेल, जेणेकरून मानवाच्या येणाऱ्या पिढय़ा या नैसर्गिक संसाधनांचा चिरकालीन उपभोग (हो उपभोगच. उगाच उपयोग वगरे शब्दच्छल करून ताकाला जाऊन भांडे लपविण्यात काही अर्थ नाही) घेऊ शकतील व त्याद्वारेच पर्यावरणाचे संरक्षण साधेल. ज्या गोष्टीचा टिकाऊ उपभोग घ्यायचा असतो तिचेच माणूस संरक्षण करतो हा तर इतिहास आहे. यात वाघ-सिंहाचे संरक्षणदेखील आले. कारण ‘वाघ-सिंहा’चे हे संरक्षण त्यांच्या भूतदयेपोटी किंवा निसर्गप्रेमींच्या केवळ निसर्गास्वादासाठी नसून हे करण्यासाठी निसर्गातील अन्नसाखळीचे संरक्षण व त्याद्वारे त्या परिसंस्थेचे संरक्षण यासाठी आहे. पुन्हा या संरक्षणामागील खरी प्रेरणा ही त्या परिसंस्थेपासून मिळणाऱ्या ‘सेवा व वस्तूंचा’ (गुड्स अँड सव्र्हिसेस) पुरवठा शाश्वतपणे होत राहावा ही आहे. आणि याच कारणाने जास्त पाणी न मानवणाऱ्या जमिनीत ओलीत करणे चूक आहे किंवा पश्चिम घाट किंवा हिमालयावरील जैवविविधता टिकवून ठेवावयाची आहे. यापुढे जाऊन हेदेखील खरे आहे की या जैवविविधतेचा भविष्यात जो उपयोग संभवतो ( नवनवीन शोधांमुळे) त्यासाठीदेखील ती आम्हाला टिकवावी लागेल. केवळ जैवविविधतेच्या भावनिक बांधीलकीमुळे नाही. हा विचार अर्थातच पूर्णपणे ‘मानवकेंद्रित व प्रबुद्ध’ आहे व यात अपराधीपणाची भावना असण्याची गरज नाही. याच शाश्वत व चिरकालीन उपभोग घेण्याच्या जीवनपद्धतीला सान्यांनी त्यांच्या लेखात त्रोटकपणे ‘तंत्राच्या मानवघातक परिणामांविषयी सावधानता’ किंवा ‘मानवकेंद्री व प्रबुद्ध- आर्थिक पर्यावरणवाद’ म्हटलेले दिसते.
निसर्गशक्तींची क्षमता ही मानवी क्षमतांच्या तुलनेत एवढी अफाट असते की, जोवर त्या शक्ती आम्हाला सुसह्यपणे जगू देतात तेवढय़ाच अवकाशात (जागेत या अर्थाने ‘स्पेस’मध्ये) आम्हाला हा शाश्वततेचा विचार करण्याला वाव असतो. या निसर्गशक्तींना काही स्वेच्छा-सहेतुकता (मोटिव्ह) असते ना तर काही चांगले- वाईटपणाशी कर्तव्य. पण अशा मानवाला लागू पडणाऱ्या व मूल्याधिष्ठित संकल्पना निसर्गाला चिकटवणाऱ्या पर्यावरणवाद्यांना भोंगळ म्हणावेसे वाटते.
आपल्या कल्याणासाठी माणसाने आपल्या कृतींना आवर घालून निसर्गाशी सलोख्याने व मर्यादेत राहावे एवढे मात्र खरे. उलट, माणसाने ‘आपण निसर्ग वाचवू या’ म्हणणेदेखील केवळ आत्मवंचना ठरते.
कुणाच्या कल्याणासाठी?
पर्यावरण रक्षणाचा विचार मुळातून पटणे महत्त्वाचे आहे, या उद्देशाने एक लेख लिहिला गेला, त्यावर मतभेद असल्याचे दिसले.
First published on: 31-10-2013 at 01:22 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Welfare for whom