पोलीस दलाबाबत सामान्यजनांच्या प्रतिक्रियांमध्ये तीन तऱ्हा असतात. अकार्यक्षमतेविषयी चिडचिड, या दलात बोकाळलेल्या भ्रष्ट प्रवृत्तींविषयी संताप आणि पोलिसांच्या मनोधैर्याविषयी चिंता! या खचत्या मनोधैर्याची चर्चा निराळय़ा अंगाने करणारं हे टिपण..
गृह खाते, पोलीस दल तसेच एकंदर कायदा व न्याय व्यवस्था यांचा विचार केल्यास २०१२ मधील सर्वात मोठी घटना म्हणजे अजमल कसाबची फाशी! कसाबचा खटला घटनेप्रमाणे चालावा यासाठी सरकारने कोटय़वधी रुपये खर्च केले. वेळेचा, साधनसामग्रीचा अपव्यय केला. फाशीची शिक्षा देण्याचा हेतू हा असतो की त्यामुळे इतरांमध्ये जरब, भीती, दहशत निर्माण व्हावी. मग फाशी देण्याच्या घटनेबाबत गुप्तता पाळल्याबद्दल आणि एका निशस्त्र प्याद्याला मुंबईवरून पुण्याला आणण्याच्या कारवाईबद्दल ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जाहीर सन्मान करण्याचे ठरविले जाते आणि अतिशय गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये सद्विवेकबुद्धीला स्मरून घेतलेल्या निर्णयाबद्दल पालघर केसमध्ये दोन अधिकाऱ्यांना शिक्षा होते, ही प्रचंड विरोधाभास दाखविणारी घटना आहे. त्यामुळे सामान्य पोलिसांची अवस्था प्रयोगातील ऱ्हेनस जातीच्या माकडासारखी होते.
अमेरिकन शास्त्रज्ञांनी एका विशिष्ट पिंजऱ्यात ऱ्हेनस जातीचं माकड ठेवलेलं होतं. या जातीची माकडं अनेकदा प्रयोगांमध्ये वापरली गेली आहेत. या विशिष्ट प्रयोगात, पिंजऱ्यात दोन बटणे होती. एक काळे व एक पांढरे. काळे बटण दाबलं तर माकडाला खाऊ मिळायचा व पांढरे बटण दाबलं तर मात्र विजेचा सौम्य झटका बसायचा. माकड लवकरच काळे बटण दाबायला शिकले. त्यानंतर शास्त्रज्ञांनी प्रयोगाची दुसरी पायरी सुरू केली. काळे बटण दाबल्यावर खाऊऐवजी विजेचा धक्का बसायला लागला आणि पांढरे बटण दाबलं की विजेच्या धक्क्याऐवजी खाऊ मिळू लागला. कालांतराने माकड ही गोष्टसुद्धा शिकले. शास्त्रज्ञांनी प्रयोगाची तिसरी पायरी सुरू केली. पिंजऱ्यातील काळे किंवा पांढरे बटण दाबलं की कधी खाऊ तर कधी विजेचा धक्का बसू लागला. कोणते बटण दाबले तर काय होईल ते माकडाला ठरविता येईना. कदाचित खाऊ तर कदाचित विजेचा धक्का! पोलीस दलात काम करणाऱ्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नसते. प्रयोगातील माकड त्या दोन बटणांकडे धास्तीने बघत राही. कोणते बटण दाबावे? काय करावे? हे माकडाला समजेना. इकडे आड अन् तिकडे विहीर! अस्वस्थ झालेले माकड पिंजऱ्याचे गज हातात धरून बटणाकडे पाही. पोटात भूक आणि विजेच्या धक्क्याची तेवढीच जोरदार वेदना. काचेच्या मण्यासारख्या त्याच्या डोळ्यांत फक्त वेदना दिसत. अमेरिकन शास्त्रज्ञांनी प्रयोग येथेच थांबविला. माकडाची सुटका करून त्याची तपासणी केली. प्राणिशास्त्रज्ञांना काय दिसलं? माकडाच्या पोटात पेप्टिक अल्सर झाला होता. पोलिसांची तपासणी केली तर?
अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) हे आयएएस अधिकारी असून त्यांनी दोन अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला तो तणावाखाली. मग त्यांनी पालघर केसमधील अधिकाऱ्यांच्या तणावाचा विचार का केलेला नाही. पोलीस दलाची कालबाह्य़ कार्यसंस्कृती बदलण्याबरोबरच अपुरे आणि कालबाह्य़ बेसिक ट्रेिनग बदलणे, खात्यांतर्गत प्रशिक्षण सुरू करणे, व्यूहरचना बदलणे ही सर्व कामे पोलीस महासंचालक, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांची आहेत. ती जबाबदारी पूर्ण न पाडल्याने पालघरसारखी घटना घडते. गुन्हेगारी, दंगली, बॉम्बस्फोट, अतिरेकी कारवाया रोखण्यातील अपयशाला नेहमी राजकीय नेतृत्वाला दोष दिला जातो. तसेच अपुरे संख्याबळ, अत्याधुनिक शस्त्रसामग्रीचा अभाव अशी कारणे सांगितली जातात. पण एवढय़ा मोठय़ा पोलीस दलाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्या क्षमतेबद्दल विचार होतो का?
यूपीएससी परीक्षेची प्रश्नपद्धती यंदापासून बदलली आहे. पण त्यापूर्वी, या परीक्षेतून मिळणाऱ्या प्रशासकीय नेत्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला असता त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. सध्याच्या परीक्षेमध्ये अधिकाऱ्यांचा जो बुद्धय़ांक तपासला जातो, त्यामध्ये उमेदवाराची मॅथेमॅटिकल, व्हर्बल आणि लॉजिकल क्षमता तपासली जाते व त्यात जास्तीतजास्त गुण मिळवणारे तरुण अधिकारी म्हणून निवडले जातात. वास्तविक प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी इतर अनेक बुद्धय़ांकांची गरज असते. जनतेच्या प्रश्नाशी भावनिक तादात्म्य पावून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इमोशनल आय.क्यू.ची (बुद्धय़ांकाची) गरज असते. आहे त्या साधनात जनतेचे प्रश्न सोडवून सुधारणा आणि नावीन्यपूर्ण प्रयोग राबविण्यासाठी क्रिएटिव्ह आय.क्यू.ची गरज असते. वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, राजकारणी, जनता यांच्याशी योग्य संवाद साधून प्रश्न सोडवण्यासाठी इन्टरपर्सनल आणि इन्ट्रापर्सनल आय.क्यू.ची गरज असते, परंतु दुर्दैवाने सध्याच्या परीक्षेमध्ये यापकी कुठलाही बुद्धय़ांक तपासला जात नाही. निव्वळ मॅथेमॅटिकल, लॉजिकल आणि व्हर्बल या चाचणीतून फक्त चांगले कारकून निवडले जातात. त्यामुळे सध्याच्या यूपीएससी परीक्षेतून लॉटरी लागल्याप्रमाणे काही मोजकेच योग्य अधिकारी प्रशासनात मिळतात. पोलीस दलाचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांपकी फक्त दोन टक्के अधिकाऱ्यांना आयपीएस बनायचे असते. आयपीएस पोलीस महासंचालकावर आयएएस असलेले अ‍ॅडिशनल चीफ सेक्रेटरी होम हे नियंत्रण करतात. अशी भोंगळ व्यवस्था जगात कुठेच नाही. पोलीस दलावर नियंत्रण करणाऱ्या अ‍ॅडिशनल चीफ सेक्रेटरीसारख्या अधिकाऱ्यांनी नोकरीच्या काळात कधीही दखलपात्र गुन्ह्याचा तपास केलेला नसतो किंवा कमरेला पिस्तूल लावून हिंसक आंदोलनात बंदोबस्त केलेला नसतो, तरीही ते पोलीस दलाचे प्रमुख म्हणून काम करतात आणि हीच पोलीस दलाच्या नेतृत्वाची शोकांतिका आहे!

Story img Loader