|| हृषीकेश शेर्लेकर
कृत्रिम प्रज्ञा (एआय) म्हणजे काय हे जाणून घेतल्यानंतर त्याच्या उत्क्रांतीच्या तीन टप्प्यांचा हा ऊहापोह.
मागील सदरात आपण भौतिक आणि डिजिटल विश्व, ऑटोमेशन ऑफ ह्य़ुमन एफर्ट, एआयची व्याख्या व मानवी बुद्धिमतेबद्दल जाणून घेतले. आजच्या सदरात एआय उत्क्रांतीचे टप्पे, भविष्यात येऊ शकेल अशी ‘अहं ब्रह्मास्मि’सारखी लास्ट स्टेज अशा रंजक विषयांवर माहिती करून घेणार आहोत.
कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) उत्क्रांतीचे तीन टप्पे खालीलप्रमाणे –
१. वीक व नॅरो एआय (ANI) – अपूर्ण व मर्यादित आणि सध्याची परिस्थिती
२. जनरल व स्ट्राँग एआय (AGI) – मानवी मेंदूचा व बुद्धीचा पूर्ण आविष्कार
३. सुपर इंटेलिजन्स किंवा सिंग्युलॅरिटी (ASI) – मानवी मेंदू, जाणीव व बुद्धीपेक्षा कैक पटींनी श्रेष्ठ अशी मशीन्स
आपल्याला परिचित अशी टॉप डिजिटल एआय साधने कुठली, तर लगेच आठवण येते गुगल मॅप्स, बुद्धिबळाचा कॉम्प्युटर गेम, चॅटबोट, भाषा ट्रान्सलेटर्स, मानवी भाषेत संवाद साधणारे अलेक्सा, अॅपल सिरी, गुगल असिस्टंट किंवा हवामान, ट्रॅफिक, आजार निदान, अंदाज सांगणारे अॅप्लिकेशन्स वगैरे यांची. गेल्या पाच-दहा वर्षांत ही अॅप्लिकेशन्स संगणक, मोबाइल व इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य हिस्सा बनली आहेत. पण एवढी प्रगती एआयमध्ये जरी झाली असली तरी हे सर्व तंत्रज्ञान अजूनही संपूर्ण मानवी बुद्धीच्या कितीतरी पटींनी अपूर्ण व मर्यादित आहे.
तुलनात्मक संदर्भ द्यायचा म्हटल्यास, मानव व एआयचा आयक्यू म्हणजे बुद्धय़ांक बघू. आजच्या घडीला जगातील साधारण ६९% लोकांचा आयक्यू ८५-११५ च्या दरम्यान आहे. हाच आयक्यू एआय मशीनमध्ये मोजायचा झाला तर? संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अहवालासाठी एक आयक्यू चाचणी विकसित केली आहे, जी ४७.२८ बुद्धय़ांक असलेल्या गुगलला प्रथम स्थानावर नेऊन ठेवते. एआय तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत तोच ४७.२८ बुद्धय़ांक मात्र एका सहा वर्षांच्या मुलाच्या बुद्धय़ांकापेक्षाही कमी आहे. (संशोधक फेंग लियू, योंग शि आणि यिंग लियू, २०१६). शास्त्रज्ञांच्या अनुसार एआय आयक्यूला मानवी आयक्यूपर्यंत पोहोचायला २०४५ ते २०५० उजाडेल. फक्त गमतीने म्हणतात तसे, ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उत्कर्षांबरोबरच मानवी बुद्धिमत्ता दिवसेंदिवस कमी होत चाललीय’’ असे व्हायला नको म्हणजे मिळवले.
१. वीक व नॅरो एआय – मागील सदरात आपण बघितले की, एआयची प्रगती अजूनही मानवी बुद्धीच्या फक्त पहिल्या पाच क्षमतेपर्यंतच झालेली आहे. मानवी भाव, सर्जनशीलता, अस्तित्ववाद इत्यादी विचार मशीन्समध्ये आणण्यासाठी अजून बराच लांब पल्ला गाठायचा आहे. यामुळे आपण म्हणू शकतो सध्याच्या एआय प्रगतीला वीक म्हणजे अपूर्ण. त्याचबरोबर सध्याची एआय अॅप्लिकेशन्सही एका क्षेत्रातील मर्यादित अशीच कामे करू शकतात, पण मानवी मेंदू व बुद्धीक्षमता ही अमर्यादित आहे. उदाहरणार्थ, मानवी भाषेमध्ये बोलणारा किंवा लिहिणारा रोबोट जसे अॅमेझॉन अलेक्सा, अॅपल सिरी, गुगल असिस्टंट, लेखी संवाद करू शकणारे चॅटबोट (आपण मागील सदरामधील एचडीएफसी बँकेच्याची ‘इव्हा’ बद्दल जाणून घेतले) ही सर्व एआय अॅप्लिकेशन्स फक्त मानवी भाषेत लिहू-बोलू शकतात, ज्याला नॅच्युरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) म्हणतात. इतर काही एआय अॅप्लिकेशन्स ही कॉम्प्युटर व्हिजन म्हणजे मानवी दृष्टीसारखे प्रतिमेमधील वस्तू ओळखणे, माणसांच्या चेहऱ्याच्या प्रतिमेवरून माणूस ओळखणे, चेहऱ्यावरील हावभाव ओळखणे अशी कार्ये करू शकतात. स्वयंचलित गाडी तंत्रज्ञान हे याच ‘कॉम्प्युटर व्हिजन’ या तंत्रज्ञानावर प्रामुख्याने अवलंबलेले आहे. कंपनीमधील रोबोट माणसासारखी हालचाल करून यांत्रिक कामे करू शकत असले तरी ते संवाद, दृष्टी वगैरे क्षमता शक्यतो बाळगत नाहीत. थोडक्यात सांगायचे म्हणजे, मानव जसा अनेक कला, क्षमता त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रयत्नाने, अनुभवातून शिकू शकतो व आत्मसात करून, तशी कामे करू शकतो, त्याप्रमाणे सध्याचे एआय रोबोट्स वा मशीन्स करू शकत नाहीत, म्हणून त्यांना ‘नॅरो’ किंवा मर्यादित एआय म्हटले जाते.
एक उदाहरण घेऊ. अॅपल सिरी, अॅमेझॉन अलेक्सा किंवा गुगल असिस्टंटना जेव्हा आपण सांगतो, ‘‘प्ले अरिजित सिंगस हिट्स’’ म्हणजेच अरिजित सिंगची हिट्स वाजव, तेव्हा या मशीन्स प्रथम या ध्वनिरूपी शब्दांचे लिखित शब्दांमध्ये रूपांतर करतात, मग तेच शब्द अॅमेझॉन म्युझिक किंवा गानासारख्या म्युझिक अॅप्लिकेशन्समध्ये सर्च करून, आलेल्या पर्यायांमधून सर्वात योग्य ती निवड करून गाणी वाजवतात. यामध्ये ध्वनिरूपी शब्दांचे लिखित शब्दांमध्ये रूपांतर करणे ही एक प्रकारची मानवी बुद्धिमत्ता नक्कीच आहे, परंतु या सिरी, अलेक्सा, असिस्टंटला आपण स्वत: कोण आहोत, आपण हे का करत आहोत, विचारणाऱ्याचे भाव इत्यादीबद्दल काहीही ज्ञान नसते. बोललेले शब्द ओळखणे, त्यांचे लिखित शब्दांमध्ये रूपांतर करणे व सर्च करणे इतकेच काय ते या मर्यादित एआय सिस्टीमकडून अपेक्षित असते.
व्याख्या : वीक व नॅरो एआय (ANI) म्हणजे एआय सिस्टीममध्ये एका ठरावीक क्षेत्रातील, मर्यादित मानवी बुद्धिमत्ता व ज्ञानग्रहणक्षमता आणणे व अशा सिस्टीमने एक छोटेसे मानवी कार्य, पण अत्यंत कुशलतेने आत्मसात करणे, आचरणात आणणे.
२. जनरल व स्ट्राँग एआय – वरील व्याख्येवरून आपल्याला लक्षात आलेच असेल की यापुढील महत्त्वाची पायरी असणार आहे मानवी मेंदू व बुद्धीचा पूर्ण आविष्कार. म्हणजे अशी मशीन्स जी तुमच्या-आमच्यासारखी सर्व मानवी कार्ये सहजपणे आत्मसात करू शकतील, आचरणात आणू शकतील. ‘‘हे कदापि शक्य आहे का? पूर्ण आविष्कार जरा अतिशयोक्तीच झाली की’’, ‘‘पिक्चर आणि वास्तव वेगळे असते भाऊ ’’- हा विषय आपण जरी थट्टेवारी, संशयाने घेऊ पण ध्येयाने, जिद्दीने पेटलेले शास्त्रज्ञ कसले शांत बसतायेत. त्यांच्या एआय संशोधनाचे प्रमुख उद्दिष्ट हे मानवाप्रमाणे वागणारी हुबेहूब मशीन्स बनवणे हेच आहे आणि प्रयोगशाळेत त्याचे काम वेगाने सुरू आहे.मशीन्स जेव्हा खालील सर्व गोष्टी करू लागतील, तेव्हा जनरल एआयचा टप्पा आपण गाठू असे म्हणता येईल.
– अनिश्चिततेमध्ये, अपूर्ण माहिती असताना अंदाज, निर्णय घेणे.
– मिळालेल्या माहितीचा, परिस्थितीचा अभ्यास करून त्यामागचा हेतू, कारण, निमित्त शोधणे.
– विचारलेल्या व स्वत:ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे असलेल्या माहितीद्वारे मिळवणे.
– पूर्वीचे ज्ञान व माहिती वापरून निर्णय घेणे.
– आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवासारखी जाणीव, संवेदना, भावना, आत्म-जागरूकता असे गुण असणे.
व्याख्या : जनरल व स्ट्राँग एआय (AGI) म्हणजे एआय सिस्टीममध्ये पूर्ण मानवी बुद्धिमत्ता व ज्ञानग्रहणक्षमता आणणे व अशा मशीन्सने सर्व मानवी कार्य अत्यंत कुशलतेने आत्मसात करणे, आचरणात आणणे व त्याबरोबरच त्यामध्ये मानवासारखी जाणीव, संवेदना, भावना, आत्म-जागरूकता असे गुणदेखील येणे.
३. सुपर इंटेलिजन्स किंवा सिंग्युलॅरिटी – ही अवस्था म्हणजे मनुष्यानेच बनविलेल्या मशीन्स मनुष्यापेक्षा किती तरी पट बुद्धिवान व प्रगत होणे. मशीन्स शेवटी माणसापेक्षा काही बाबतीत नेहमीच उजव्या ठरतात- एक, त्या थकत, कंटाळत नाहीत. दोन, त्या एकमेकांशी कनेक्टेड म्हणजे इंटरनेट क्लाऊडद्वारे जोडलेल्या असल्यामुळे त्यांची सामूहिक क्षमता एका मानवी मेंदूच्या मानाने किती तरी पटींनी जास्त, अमर्यादित. तीन, सूचनांचे पालन न करणे हे त्यांना माहीत नसते. आता इथेच खरी मेख आहे- सूचनांचे पालन ठीक आहे हो, पण कोणाच्या सूचना? जोपर्यंत आपल्या हाती लगाम आहे तोपर्यंत ठीक, नंतर काय? मशीन्स मनुष्यापेक्षा बुद्धिवान व प्रगत होतील तेव्हा त्या स्वत:च्याच सूचना निर्माण करू लागल्या तर?
थोडेसे भीतिदायक आहे नाही का? तुम्हाला लगेच आठवण झाली असेल आरनॉल्डच्या ‘टर्मिनेटर’ किंवा ‘द मॅट्रिक्स’ची. पण त्या सूचना मनुष्याला त्रासदायक, विनाशी अशाच असतील असे का म्हणून मानायचे? मला स्वत:ला असे वाटते की, मनुष्यप्राणी हा युगायुगांपासून अनंत नैसर्गिक अडचणींवर, त्याच्या किती तरी पटींनी जास्त बलवान प्राण्यांवर मात करीत आला आहे, ते फक्त आपल्या बुद्धीच्या आणि टिकून राहण्याच्या जिद्दीच्या जोरावर. हीच मानसिकता आपल्याला पुढेही तारणार आहे. एक मात्र नक्की, पुढचे युग हे मॅन-मशीन यांच्या भागीदारीचे असेल.
व्याख्या : सुपर इंटेलिजन्स किंवा सिंग्युलॅरिटी (ASI) म्हणजे एआय सिस्टीममध्ये अमर्यादित, अमानवी, अफाट बुद्धिमत्ता व ज्ञानग्रहणक्षमता येणे, जी सर्व मानवी बुद्धय़ात्मक कक्षेच्या कैक पटींनी अधिक प्रगत असेल. अशा मशीन्स अनेक कार्ये, ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही, ती अत्यंत कुशलतेने आत्मसात करतील व त्याबरोबरच त्यामध्ये मानवापेक्षाही पुढची अशी जाणीव, विश्व-जागरूकता असे गुणदेखील येऊ शकतील.
सुपर इंटेलिजन्सबद्दल अधिक माहिती करून घेऊ या पुढल्या सदरात. तोपर्यंत ज्यांनी आजपर्यंत वापरले नसेल, त्यांनी डाऊनलोड करा गुगल असिस्टंट (https://assistant.google.com/) किंवा Amazon-Alexa, Apple-Siri आणि रोबोटबरोबर मानवी संभाषणचा प्रयत्न करा.
hrishikesh.sherlekar@gmail.com
लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.