|| डॉ. अनिलकुमार भाटे
माझे म्हणणे मांडण्याआधी थोडीशी पाश्र्वभूमी सांगायला हवी. मी वैद्य नाही- इंजिनीअर, तंत्रवैज्ञानिक आहे. आयआयटी (पवई)मधून १९७१ साली विद्युत अभियांत्रिकी विषयाची एम्.टेक्. पदवी घेतल्यावर लगेच मी भारत सरकारच्या संरक्षण खात्यातर्फे सुरू झालेल्या संशोधन प्रकल्पावर काम करू लागलो. तो प्रकल्प रेडार सिस्टीम तंत्रविज्ञान विकसित करण्याचा होता. त्या काळच्या पाच आयआयटींपकी इतर चार ग्राऊंड रेडार तंत्रविज्ञान विकसित करत होत्या व लढाऊ विमानांवर बसवायच्या रेडार सिस्टीम विकसनाचे काम ‘आयआयटी- पवई’कडे दिले होते. पण त्याकरिता मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स तंत्रविज्ञान विकसित करण्याची गरज होती. कारण विमानावरचे रेडार आकाराने लहान व वजनाने हलके असावे लागते. हे त्या काळचे तंत्रविज्ञान तेव्हा भारतात अस्तित्वात नव्हते. त्या प्रकल्पामध्ये भारताच्या तंत्रवैज्ञानिक इतिहासातला पहिलावहिला टॅन्टॅलम थिन फिल्म मायक्रो-कपॅसिटर मी १९७१ साली आय.आय.टी.च्या प्रयोगशाळेत बनवला. या यशामुळे मला ताबडतोब शिकवण्याची संधी मिळाली आणि मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स हा त्या काळी भारतात कुठेच शिकवला जात नसलेला संपूर्ण नवा विषय (अभ्यासक्रम) मी घडवून १९७३ साली पहिल्यांदा व त्यानंतर अनेक वष्रे एम्.टेक्.च्या वर्गाला शिकवला. मुद्दाम सांगण्यासारखी गंमत म्हणजे तेव्हा माझे वय अवघे २६ वर्षांचे होते. त्या काळी सन्यदलामधले काही वरिष्ठ अधिकारी नवे तंत्रज्ञान शिकून घेण्याकरिता आयआयटीमध्ये पाठवण्यात आले होते. ते मजपेक्षा वयाने किती तरी मोठे होते, तरीपण वर्गामध्ये पहिल्या बाकावर माझे विद्यार्थी म्हणून बसत होते. थोडक्यात, मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स या तेव्हाच्या अत्याधुनिक क्षेत्रामधले संशोधन व शिक्षण या दोन्ही बाबतीत मी भारतातला पायोनियर ठरलो.
पण १९७२ सालापासूनच मी केवळ छंद म्हणून दोन गोष्टी करायला लागलो. पहिली गोष्ट वेदवाङ्मयाचा सखोल अभ्यास व व्यासंग. कारण माझे संस्कृत ज्ञान उत्तम आणि दुसरी गोष्ट अध्यात्मसाधना. माझ्या हट्टामुळे माझे वरिष्ठ सहकारी (कै.) डॉ. राजाभाऊ थत्ते यांनी पुढाकार घेऊन १९७३ साली उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थी घरी गेले असताना एक होस्टेल रिकामे करून घेतले व (कै.) गोएंका गुरुजी यांना बोलावून दहा दिवसांचे विपश्यना शिबीर भरवले.
त्या काळी गोएंका गुरुजी नुकतेच म्यानमार (तेव्हाचा ब्रह्मदेश)मधून भारतात परतले होते. प्रत्यक्ष त्यांच्यासमोर बसून मी विपश्यना शिकलो. ती आजपर्यंत गेली पंचेचाळीस वष्रे करत आलो आहे.
त्यानंतर १९७८ साली काशीचे प्रकांड विद्वान व तंत्रविद्यमधले अग्रणी कै. गोपीनाथ कविराज यांचे पट्टशिष्य (कै.) दादाजी सीताराम यांच्याकडून मी काश्मीर शैवीझम या परंपरेतला शक्तिपात घेतला व कुंडलिनी जागृती करून घेतली ती उपासनादेखील विपश्यनेबरोबरच समांतरपणे गेली चाळीस वष्रे करत आलो.
तीस वर्षांपूर्वी मी व माझ्या पत्नीने अमेरिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला व दोन मुली व धाकटा मुलगा अशा सर्व परिवारासकट अमेरिकेत स्थायिक झालो. मुद्दाम सांगायचे म्हणजे, तीस वर्षांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यामध्येसुद्धा मी विपश्यना आणि कुंडलिनी जागृती या दोन्ही चालू तर ठेवल्याच, पण अधिक जोराने पुढे नेल्या. एवंच, मी काश्मीर शैवीझम या पं. गोपीनाथ कविराजांच्या परंपरेमधला अव्वल योगी आहे.
आता मूळ विषयाकडे वळतो. पण मला जे सांगायचे आहे ते खूपच मोठे व विस्तृत आहे, किंबहुना म्हणूनच वरील पाश्र्वभूमी विस्ताराने सांगितली. सगळे एका लेखात सांगणे अशक्यच. तेव्हा इथे फक्त मुद्दे लिहितो.
(१) मी धार्मिक माणूस नाही. श्रद्धावान तर मुळीच नाही. भारतात व अमेरिकेत दोन्ही मिळून एकंदर चाळीस वष्रे अभियांत्रिकी व तंत्रविज्ञान प्राध्यापक म्हणून संशोधन, लेखन, शिकवणे करून वयाच्या साठीनंतर मी स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतली. अध्यात्माकडे बघण्याचा माझा संपूर्ण दृष्टिकोन आधुनिक व वैज्ञानिक आहे. शिवाय मुळातच माझा पिंड संशोधक वृत्तीचा आहे.
(२) संशोधक वृत्ती असल्याने मी अध्यात्म साधनेमध्येसुद्धा ‘रिसर्च’ करतो. पण हे कसे ते सर्व या लेखात लिहिणे शक्य नाही.
(३) पण साधनेच्या दरम्यान मी प्रत्यक्ष समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलो आहे व त्यानुसार वेदातली आणि अध्यात्मातली अनेक रहस्ये मी शोधून काढली आहेत. त्यावर मला आणखी बरेच लेखन करायचे आहे.
(४) अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की, साधनेच्या दरम्यान मी अनेक उच्च दर्जाचे अनुभव प्रत्यक्ष घेतले. पण त्यातला कुठलाही अनुभव आयुर्वेदाशी जुळत नाही. याउलट, माझे अध्यात्मातले सर्व, अक्षरश: एकूणएक अनुभव आधुनिक पाश्चिमात्य मेडिकल सायन्सशी जुळतात.
(५) त्यातही कुंडलिनी जागृती, षट्चक्र भेदन, या सर्वाचे शुद्ध वैज्ञानिक स्पष्टीकरण मी ‘न्यूरो-अॅनाटोमी’ या शास्त्राच्या आधारावर देऊ शकतो.
(६) माझा रोख आयुर्वेदिक औषधी वा त्यांचे गुणधर्म यावर नाही. अहो, पूर्वापार ‘आजीबाईचा बटवा’ ही चीज होतीच की. त्यातली औषधे घेऊन बरे वाटले, असे सांगणारे कित्येक लोक आजही भेटतात. माझा रोख आयुर्वेदाच्या मूलभूत तत्त्वांविषयी आहे.
(७) कारण आयुर्वेद म्हणजे ‘आजीबाईचा बटवा’ खासच नव्हे. आयुर्वेद मुळात कफ, वात, पित्त या त्रिदोषांवर आधारलेला आहे. पण अध्यात्म साधनेमधला कुठलाच अनुभव या तीन गोष्टींशी जुळत नाही. उलट सर्व अनुभव न्यूरो-अॅनाटोमीशी जुळतात. म्हणूनच आयुर्वेदाचा परस्परसंबंध योगविद्यशी नाही असे मी स्पष्ट म्हणतो.
(८) माझी काश्मीर शैविझम ही परंपरा तंत्रविद्यमधली आहे, म्हणून सांगतो की, तंत्रविद्या व आयुर्वेद यांचाही कोणताही परस्परसंबंध मला दिसत नाही.
(९) आयुर्वेदाचा परस्परसंबंध अथर्ववेदाशी आहे असाही दावा केला जातो. मी अथर्ववेदाचा अगदी कसून अभ्यास करतो आहे. त्यावर रिसर्चदेखील करतो आहे. पण मला असा काहीच परस्परसंबंध सापडलेला नाही. अपवाद म्हणून अथर्ववेदात वनौषधी व त्यांचे गुणधर्म यांची माहिती आहे; पण कफ, वात, पित्त यांच्याशी तर्कसंगत (लॉजिकल) संबंध दाखवलेला नाही.
(१०) किंबहुना इतर सर्व वेदवाङ्मयाशीदेखील आयुर्वेदाचा संबंध दिसत नाही. म्हणूनच मी त्याला मागाहून चिकटवलेले बांडगूळ म्हणतो.
(११) माझ्या मते आयुर्वेदाचे मूलभूत तत्त्व कफ, वात, पित्त हे पूर्णपणे कालबाह्य़ असून प्रत्यक्ष वस्तुस्थितीशी त्याचा काहीही संबंध नाही. शिवाय त्या कशाचेही मोजमाप करता येत नाही. आणि जे मोजण्याजोगे, मापण्याजोगे (क्वान्टिफिएबल व मेझरेबल) नाही, त्याचा अंतर्भाव विज्ञानामध्ये होऊच शकत नाही.
(१२) म्हणून संपूर्ण आयुर्वेदाची पुनर्रचना करून त्याची शास्त्रशुद्ध मांडणी आधुनिक पाश्चिमात्य मेडिकल सायन्सच्या आधारावर करायला हवी असे मला वाटते.
anilbhate1@hotmail.com