|| रितू सरिन
इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स (आयसीआयजे) आणि द इंडियन एक्स्प्रेस यांनी, भारत आणि इतर देशांमध्ये कोणत्याही सुरक्षा चाचण्यांविना अत्याधुनिक परंतु अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे किती सर्रास विकली जातात, त्यांच्या व्यापारावर कोणाचेही नियंत्रण कसे नसते, शस्त्रक्रिया फसल्यावर उपकरणे पुरवणाऱ्या कंपन्या उत्तरदायित्व आणि भरपाईबाबत कशा टाळाटाळ करतात याविषयी सविस्तर, सखोल वृत्तान्त प्रसिद्ध केले होते. त्यातील काहींचे हे संपादित सार..
वायव्य दिल्लीतील नरेला हा परिसर म्हणजे दाट औद्योगिक वस्ती. या औद्योगिक वस्तीमधल्या चिंचोळय़ा गल्ल्यांमध्ये अनेक वैद्यकीय केंद्रे आहेत, जिथे कृत्रिम स्तन प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाते. ‘के. डी. प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जरी सेंटर’ हे त्यापैकीच एक. शस्त्रक्रिया कक्ष आणि रुग्ण कक्ष असलेल्या या छोटय़ाशा वैद्यकीय केंद्रात कृत्रिम स्तन प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा भाव विचारला तर तेथील व्यवस्थापक आपल्याला ५० हजार रुपयांचा आकडा सांगतो.
‘के. डी. प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जरी सेंटर’पासून २० किलोमीटर अंतरावर पितमपुरा परिसरात ऑल्मेक प्लास्टिक सर्जरी सेंटर आहे. दिल्ली विकास प्राधिकरणाच्या जागेत असलेल्या या वैद्यकीय केंद्रात स्तन प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी डॉक्टरांची लगबग सुरू असते. अनेक रुग्णांवर येथे शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने एका रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी तब्बल दोन महिने प्रतीक्षा करावी लागते. या केंद्रामध्ये काम करणाऱ्या एका तंत्रज्ञाच्या लक्षात आले, स्तन प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सध्या जास्तच मागणी आहे. त्यामुळे त्याने स्व:चे दुकान काढले, के. डी. प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जरी सेंटर या नावाचे. हा व्यवसाय करण्यासाठी त्याच्याकडे कोणते वैद्यकीय प्रमाणपत्र आहे? अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्याकडे परवाना आहे? शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची नोंद त्यांच्याकडे आहे? शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला काही त्रास झाला नाही ना? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे मागितली, तर ती मिळण्याची शक्यता नाहीच. चुकीच्या पद्धतीने आणि अर्धशिक्षितांकडून या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याने अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी निवारक (करेक्टिव्ह) शस्त्रक्रिया करावी लागते. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारिता महासंघाच्या (आयसीआयजे) सहाय्याने कृत्रिम स्तन प्रत्यारोपण शस्त्रक्रिया प्रकारातला वैद्यकीय गैरप्रकार उघडकीस आणला.
‘इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भात पितमपुराच्या ऑल्मेक प्लास्टिक सर्जरी सेंटरचे डॉ. नरेंद्र कौशिक यांना बोलते केले. डॉ. कौशिक यांच्याकडे अनेक रुग्ण निवारक शस्त्रक्रियेसाठी येतात. त्यासंदर्भातील काही रुग्णांची माहिती आणि चित्रफिती डॉ. कौशिक यांनी दाखवल्या आणि या प्रकारातील गैरप्रकार आणि भयानक वास्तव समोर आले.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसांत प्रत्यारोपण केलेल्या स्तनाचा काही भाग निघाला आहे, अर्धवट प्रत्यारोपण झाले आहे, शस्त्रक्रियेनंतर जंतूसंसर्ग झाला, स्तनांवर पुरळ उठले आदी अनेक प्रकारांना रुग्णांना सामोर जावे लागल्याने या चित्रफितींमधून समोर आले. दर्जाहीन सिलिकॉन किंवा सलाइनचा वापर केल्याने प्रत्यारोपण केलेले कृत्रिम स्तन काही दिवसांत निघतात, असे डॉ. कौशिक सांगतात.
दक्षिण दिल्लीतील साकेत परिसरात असलेल्या वैद्यकीय केंद्रातील डॉ. मोनिषा कपूर यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. ‘‘माझ्याकडे कृत्रिम स्तन प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी जे रुग्ण येतात, त्यापैकी निम्मे रुग्ण दुबार किंवा निवारक शस्त्रक्रियेसाठी येतात. जंतुसंसर्ग होणे, पाणी निघणे, स्तनांचा आकार बिघडणे आदी कारणे घेऊन रुग्ण येतात. अनेक लोक फसतात कारण सौंदर्यतज्ज्ञ आणि आयुर्वेदिक डॉक्टरही आजकाल अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करत आहेत,’’ असे डॉ. कपूर यांनी सांगितले.
दुष्परिणामांबाबत अभ्यास नाही
कृत्रिम स्तन प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील धोके आणि दुष्परिणाम याबाबत भारतात कधीही वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केलेला नाही. परदेशात मात्र अनेक तज्ज्ञांनी याबाबत संशोधनात्मक अभ्यास केलेला आहे. स्तनांचा आकार वाढवण्यासाठी किंवा स्तन पुनर्निर्माण करण्यासाठी स्तन प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाते. मात्र अनेक रुग्ण आधीची शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याने नव्याने शस्त्रक्रियेसाठी येत असल्याचे दिसून आले आहे.
*********************************************************************************************************
सदोष कृत्रिम खुबा आरोपणामुळे जगणे असह्य़ – कौनेन शरीफ एम.
कृत्रिम गुडघा आरोपणानंतर रुग्णांवर झालेल्या दुष्परिणामांबाबतचे सत्य दडपल्याबद्दल जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला केंद्र सरकारच्या समितीने दोषी धरले आहे. कृत्रिम खुबा आरोपण केलेल्या ३६०० हून अधिक रुग्णांचा शोध घेणे कठीण आहे. परंतु त्यांच्यापैकी किमान चौघांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातलगांनी दाखल केलेले खटले सर्वोच्च न्यायालयात आहेत.
जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने अमेरिकेच्या कायद्यातील पळवाटांचा वापर करून भारतात आपली एएसआर (Articular Surface Replacement), पिनॅकल आणि अन्य कृत्रिम खुबा आरोपण उपकरणे कोणत्याही प्रकारच्या पूर्वचाचण्या न करता कशी खपवली याची माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’कडे आहे.
पिनॅकल आणि एएसआर या दोन्ही कृत्रिम आरोपणांमध्ये दोष आढळले. आता एएसआर उत्पादने कंपनीने २०१० मध्ये अधिकृतरित्या मागे घेतली. परंतु पिनॅकल उत्पादने मात्र तीन वर्षांनंतर ‘व्यावसायिकदृष्टय़ा’ मागे घेण्यात आली. एएसआर आरोपणानंतर अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण झालेल्या रुग्णांना मोबदला मिळू शकतो, हा या मागील उद्देश होता, असे सांगितले जाते. परंतु पिनॅकल वापरलेल्या रुग्णांच्या बाबतीत न्याय मिळणे हे एक दिवास्वप्न आहे. सध्या न्यायाची प्रतीक्षा करणे एवढेच त्यांच्या नातलगांच्या हाती आहे.
जॉन्सन आणि जॉन्सनची उपकंपनी असलेल्या डीप्यूची पिनॅकल आणि एएसआर ही दोन्ही उत्पादने अमेरिकेतही वापरली गेली. अमेरिकेतील चाचण्यांवर आणि निष्कर्षांवर पूर्णपणे विसंबून भारतीय यंत्रणांनी कोणत्याही वैद्यकीय चाचण्या न करता दोन्ही कृत्रिम उपकरणांच्या वापरास मुभा दिल्याचे आढळले.
याचा परिणाम असा झाला की अनेक भारतीय रुग्णांसाठी ही कृत्रिम उपकरणे आणि आरोपण शस्त्रक्रिया जीवघेण्या ठरल्या. शस्त्रक्रियेनंतर कोबाल्ट आणि क्रोमियम धातूंच्या या उपकरणांमधून विषारी द्रव पाझरून रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला. संसर्गही झाला. बहुतेक रुग्णांना वेदना असह्य़ झाल्या. दिल्लीच्या राजौरी गार्डन्स येथे राहणारे राजीव ठुकराल यांनी सांगितले, की कृत्रिम खुबा आरोपण करून घेताना आम्ही विहिरीत उडी घेत होतो, याची आम्हाला कल्पना नव्हती. राजीव यांची पत्नी ममता (५०) यांनी पिनॅकलचा एक खुबा आणि एएसआरचा दुसरा खुबा बसवला. या दोन्हींमुळे असह्य़ वेदना होत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘आज तिची परिस्थिती इतकी वाईट आहे की तिची एमआरआय तपासणी होऊ शकत नाही. एमआरआय यंत्रांत जाणे कठीण झाले आहे. तिला मानसिक धक्का बसला आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही समुपदेशन उपचार करत आहोत,’ असे राजीव यांनी सांगितले.
भारतात पिनॅकल उपकरणाच्या दुष्परिणामांची चौकशी सुरू असताना इंडियन एक्स्प्रेसने ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केलेल्या शोधपर वृत्तमालिकेच्या केंद्रस्थानी एएसआर हे उपकरण होते. रुग्णालये आणि रुग्णांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेमलेल्या समितीचे महत्त्वाचे निष्कर्षही या वृत्तमालिकेत प्रसिद्ध करण्यात आले होते. केंद्रीय समितीने जॉन्सन आणि जॉन्सनला दोषी ठरवून प्रत्येक रुग्णास किमान २० लाख रुपये देण्याची शिफारस करण्याबरोबरच संबंधित रुग्णांवर पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची मोहीम २०२५ पर्यंत चालवावी, अशी सूचना केली.
‘पिनॅकलनंतर एएसआर उपकरण आले. मग सरकार आमच्याकडे दुर्लक्ष का करीत आहे? आरोपण केलेले उपकरण काढण्यासाठी आम्ही १५ लाख रुपये खर्च केले, पण शरीराचे कायमचे नुकसान झाले त्याचे काय? त्यासाठी कंपनीच जबाबदार आहे,’ असे मुंबईतील भावेश गंगर यांनी सांगितले. भावेश यांचे वडील शांतीलाल हंसराज गंगर (वय ७४) यांच्यावर २००६मध्ये पिनॅकल आरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना संसर्ग झाला. तीव्र वेदनांनी ते तडफडत आहेत. शांतीलाल यांच्यावर पूर्वी अशी शस्त्रक्रिया झाली होती. परंतु त्यानंतर १२ वर्षे त्यांना कोणताच त्रास नव्हता. त्रास सुरू झाला तो पिनॅकल आरोपणानंतर.
या संदर्भात ‘द इंडियन एक्सप्रेस’ने जॉन्सन अँड जॉन्सनला प्रश्नावली पाठवली होती. प्रवक्त्याने त्याबाबत स्पष्टीकरण दिले. ‘२०१३मध्ये डीप्यूने भारतासह जगभरात यूएलटीएएमटी मेटल-ऑन-मेटल आर्टिक्यूलेशनची विक्री थांबविली आहे. मागणी कमी झाल्याने आणि रुग्णांसाठी अन्य पर्याय उपलब्ध असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला. आजपर्यंत, यूएलटीएएमटी मेटल-ऑन-मेटल आर्टिक्युलेशनशी संबंधित कोणतीही प्रतिकूल घटना भारतात घडल्याची माहिती नाही,’ असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.
*************************************************************************************************************
भारताच्या वैद्यक क्षेत्रावर ‘आघात’ – कौनेन शरीफ एम.
हाडांच्या प्रत्यारोपण क्षेत्रातील स्ट्रायकर इंडिया ही मातब्बर कंपनी, तिचे मूळ आणि कूळ अमेरिकेत असले तरी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या महानगरांमध्ये या कंपनीने आपले बाहू फैलावले आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षांत या कंपनीने रुग्णांच्या नितंबाची, गुडघ्याची प्रत्यारोपणे, मणका व मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठीची उपकरणे विकून तीनशे कोटींची उलाढाल केली आहे. विशेष म्हणजे भारतातील रुग्णालये व डॉक्टरांना या कंपनीने भ्रष्ट मार्ग वापरण्यात मोठी भूमिका पार पाडली अशी कबुली या कंपनीने अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाला दिली आहे. भारत, चीन, कुवेत यांसारख्या देशात भ्रष्टाचार प्रतिबंधाचे नियम धाब्यावर बसवल्याने अमेरिकेतील रोखे व विनिमय आयोगाने कंपनीकडून ५५ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वीच दिले आहेत. त्याची कागदपत्रे दी इंडियन एक्स्प्रेसच्या हाती लागली आहेत.
स्ट्रायकर कंपनीच्या भारतीय उपकंपनीने अनेक निकषांचे व नियमांचे उल्लंघन केल्याचे आयोगाच्या २८ सप्टेंबरच्या नोंदीत दिसून येते. उपकरणांच्या किमती फुगवून लावणे, डॉक्टरांना सल्ला फी, प्रवास व इतर फायदे देऊन प्रत्यारोपण यंत्रे रुग्णांच्या माथी मारणे असे प्रकार या कंपनीने केले आहेत. भारतातही २०१२ मध्ये स्पर्धा आयोगाने स्ट्रायकर इंडियाचा वितरक व इतर दोन आस्थापनांना निविदा प्रकरणात हेराफेरी केल्याने ३ कोटी रुपयांचा दंड केला आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स व सफदरजंग रुग्णालय तसेच इतर दोन सरकारी रुग्णालयातही कंपनीने असेच तंत्र वापरले. २०१० ते २०१५ दरम्यान कंपनीच्या लेखापरीक्षणात अमेरिकी आयोगाने अनेक गैरप्रकार दाखवून दिले आहेत, भारतातील वैद्यकीय व्यावसायिकांना प्रवास, सल्लाशुल्क यात लाच देऊन भ्रष्ट मार्गाला लावण्याचे कुकर्म या कंपनीने केले आहे. मेडिकल बझार या संकेतस्थळावरही या कंपनीचे गैरप्रकार सामोरे आले असून त्यांच्या उत्पादन विक्रीत रुग्णालये, डॉक्टर व कंपनी यांची अभद्र साखळी दिसून आली आहे.
कंपनीची भारतातील उलाढाल
३०० कोटींची असून इतर शंभर देशात ५८.८७ अब्ज डॉलर्सची उलाढाल आहे. रुग्ण व त्यांच्या विमा कंपन्या यांना अवाच्या सवा बिले लावून लुटण्यात कंपनीने कसूर ठेवली नाही, यात खासगी रुग्णालयांची व कंपनीला फायदेशीर सल्ले देणाऱ्या डॉक्टरांची चांदी झाली. विमा कंपन्यांनाही फायदा झाला, रुग्ण मात्र नागवले गेले.
रुग्णालयांना आधी प्रत्यारोपण संचाच्या चढय़ा किमती सांगून मगच स्ट्रायकर इंडियाच्या वितरकांना बोलणीसाठी पाठवले जात होते. त्यामुळे या वितरकांनाही भरपूर पैसे मिळाले. एप्रिल २०१२ मध्ये एमडीडी मेडिकल सिस्टीम अँड मेडिकल प्रॉडक्ट सव्र्हिसेस या व इतर आस्थापनांना याच प्रकारात ३ कोटींचा दंड करण्यात आला. त्यांनी एम्स व सफदरजंग रुग्णालयात गैरप्रकार केले होते. स्ट्रायकर कंपनीने चीन व कुवेतमध्येही अशाच प्रकारे नियम धाब्यावर बसून लूट केली आहे.
– अनुवाद: सिद्धार्थ ताराबाई, राजेंद्र येवलेकर व संदीप नलावडे