|| प्रा. मंजिरी घरत
जागतिक आरोग्य संघटनेने फार्मसिस्टची भूमिका काय असावी हे १९८८ मध्येच विशद केले होते. मात्र आपल्याकडील वास्तव प्रचंड अस्वस्थ करणारे आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मसिस्ट दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने या क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न व ते सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे शक्य आहे, याची मीमांसा करणारा लेख..
ग्रामीण महाराष्ट्रातील एक खेडूत वृद्ध स्त्री व फार्मसिस्ट यांच्यातील हा संवाद-
फार्मसिस्ट- या गोळ्या जेवणाअगोदर अर्धा तास घ्यायच्या बरं का आज्जी.
आजी- अरं बाबा, घडय़ाळ नाही कळतं म्या.. पोरं बी घरात नसत्यात.
फार्मसिस्ट- (थोडासा विचार करून) आज्जे, राणादा बघताय काय टीव्हीवर?
आजी- व्हयं, बघते की!
फार्मसिस्ट- मग झ्याक झालं. आज्जे, राणादा सुरू झालं की ही गोळी घ्यायची आन् संपले की जेवायचे.
****
वरील किस्सा आपण ‘व्हॉट्सअॅप’वर कदाचित वाचलाही असेल. रुग्णाला समजेल, रुचेल अशा पद्धतीने या अशिक्षित आजीला फार्मसिस्टने टीव्ही मालिकेच्या संदर्भाने केलेले मार्गदर्शन खचित नावीन्यपूर्ण व स्तुत्य आहे.
औषधविक्रीच्या केवळ धंदेवाईक चक्रात अडकून न पडता त्यापलीकडे जाऊन रुग्णहितासाठी धडपड करणाऱ्या सर्व फार्मसिस्टना २५ सप्टेंबर या फार्मसिस्ट दिनानिमित्त शुभेच्छा! जागतिक स्तरावर सांख्यिकीदृष्टय़ा डॉक्टर्स व नर्सेस- पाठोपाठ फार्मसिस्ट आरोग्य क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाचे आरोग्यसेवी मनुष्यबळ समजले जाते. आरोग्य क्षेत्रावरच्या चर्चेत फार्मसिस्ट या घटकाचा अगत्याने विचार केला जातो. बहुतांशी देशांमध्ये फार्मसिस्ट हा एक रुग्णाभिमुख व्यावसायिक समजला जातो व त्याची भूमिका ही आता विस्तारत आहे. आपण मुख्यत: औषध दुकाने व रुग्णालयातील फार्मसिस्टबाबत चर्चा करत आहोत.
इंग्लंडमधील डॉक्टर्सवर कामाचा बोजा वाढत असल्याने त्यांचे काही काम फार्मसिस्टवर सोपवावे व त्यासाठी ते सक्षम आहेत अशा शिफारसी एनएचएस, म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेत केल्या गेल्या आहेत. औषधविषयक समुपदेशन, आजारविषयक मनमोकळी सल्लामसलत, रक्तदाब, रक्तशर्करा तपासून घेणे अशा सेवेसाठी बहुतांशी पाश्चात्त्य देशांमधील नागरिक फार्मसिस्टला पसंती देतात. काही देशांत फॅमिली फार्मसिस्टची संकल्पना रूढ आहे. सर्वसाधारणपणे जेथे औषधे, तेथे फार्मसिस्ट, हे समीकरण पक्के आहे व औषधांची विक्री, वितरण व संबंधित सेवा या फार्मसिस्टद्वारेच दिल्या जातात. जागतिक आरोग्य संघटनेने फार्मसिस्टची भूमिका काय असावी हे १९८८ मध्येच विशद केले होते. या पाश्र्वभूमीवर आपल्याकडील वास्तव प्रचंड अस्वस्थ करणारे आहे. औषध व्यवसाय म्हणजे केवळ धंदा हे समीकरण, औषधे म्हणजे इतर वस्तूंसारखीच वस्तू (कमॉडिटी) व बरेचसे कायदे-नियम केवळ पुस्तकात असे संपूर्ण देशातील सात-साडेसात लाख औषध दुकानांकडे नजर टाकल्यास चित्र दिसते. औषध व्यवसाय हा सुनियंत्रित आहे, जबाबदारीचा आहे, यातील चुका म्हणजे रुग्णाच्या जिवाशीच खेळ आहे. या व्यवसायाचा केंद्रबिंदू औषधे नसून रुग्ण असावा याची जाणीव आपल्याकडे फारशी नाहीच. फार्मसिस्टचे आरोग्य क्षेत्रातील स्थान याविषयी शासनापासून स्वत: फार्मसिस्टपर्यंत कोणालाच पुरेशी कल्पना नाही. काही फार्मसिस्ट जरूर संवेदनशील, अभ्यासू आहेत व असे फार्मसिस्ट रुग्णांसाठी काही ना काही विशेष सेवा देणे, स्व-नियमांचे कसोशीने पालन करणे, दुकानात फेरफार करत चांगली सेवा अमलात आणण्याचे प्रयत्न करणे, अॅप्रन घालणे असे प्रयत्न सातत्याने करताना दिसतात. पण हे प्रवाहपतित न झालेले, प्रवाहाच्या विरुद्ध काम करणाऱ्या फार्मसिस्टची स्थिती त्रिशंकू होते. त्यांचा उत्साह, उमेद खच्ची व्हावी असे धंदेवाईक वातावरण असते. आरोग्यविषयक कायद्यांची अंमलबजावणी कडकपणे न होणे व त्यामुळे अनेक दुकानांमध्ये फार्मसिस्ट नसणे हे चित्र कमी-अधिक प्रमाणात देशात सर्वत्र आहे. प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री व फार्मसिस्टच्या उपस्थितीत किंवा अनुपस्थितीत सर्रास होते. शहरी भागात दुकानांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे स्पर्धा असतेच व डिस्काऊंटचे युद्ध चालू असते. त्यात ऑनलाइन औषधविक्री (त्यासाठीची नियमावली अजून बनलेली नसतानाही) व त्यात ग्राहकांना दिली जाणारी सवलत, त्याच्या अत्यंत आक्रमक जाहिराती यामुळे ‘सवलत युद्ध’ अधिकच तीव्र झाले आहे. फार्मसिस्टना डाचणारी अजून एक बाब म्हणजे डॉक्टरांकडूनच रुग्णांना होणारा औषधांचा पुरवठा. ( डॉक्टर्स डिस्पेंन्सिंग)
अपूर्ण प्रिस्क्रिप्शन्स, न वाचता येणारे अक्षर, भोंदू डॉक्टर्स, औषधांचे हजारो ब्रॅण्ड्स व त्यामुळे आव्हानात्मक असलेली ‘इन्व्हेंटरी मॅनेजमेंट’, हजारोंनी उपलब्ध तर्कविसंगत औषध मिश्रणे अशा अनेक बाबी फार्मसी प्रॅक्टिस अधिक गुंतागुंतीची, कटकटीची करतात. अनेक औषधीय चुकांना त्यामुळे वाव असतो व फार्मसिस्ट नसलेली दुकाने असतील तर अर्थातच धोका निश्चितच अधिक असतो.
स्पर्धा, चढाओढ यामुळे व डॉक्टरांचे कन्सल्टिंग तास लक्षात घेऊन दुकाने रात्री उशिरापर्यंत चालू ठेवली जातात. म्हणजे कामाचे तास १२, १४, १६ असतात. सुट्टी अशी फारशी नाहीच. स्वत:साठी व कुटुंबासाठी वेळही मुश्कीलच. कौटुंबिक आयुष्य नसते. दुकानातच बुडून राहावे लागते. म्हणून आपल्याला मुलींकडून नकार आले व लग्न जमवताना अडचणी आल्याचे काही तरुण फार्मसिस्टनी नमूद केले. फार्मसी प्रॅक्टिसच्या संदर्भात फार्मसी शिक्षण क्षेत्रातील स्थितीही अजिबात पोषक वा उत्साहवर्धक नाही. रिटेल वा हॉस्पिटल फार्मसीमध्ये मुख्यत: डी.फार्म. (डिप्लोमा इन फार्मसी) अर्हता असलेले व थोडे बी.फार्म. फार्मसिस्ट प्रवेश करतात. याचा अभ्यासक्रम १९९१ पासून बदललेला नाही. कॉलेजची संख्या भरमसाट वाढली आहे व शिक्षणाचा दर्जा सर्वत्र उत्तम आहे असे नसावे. कारण अनेक कॉलेजमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना फार्मसीचे जुजबी ज्ञानही नसते, असे खेदाने अनेक फार्मसिस्ट सांगतात. हे विद्यार्थी जेव्हा डिप्लोमा करून प्रशिक्षणासाठी दुकानात वा रुग्णालयात रुजू होतात तेव्हा तेथील फार्मसिस्टच्या नजरेत ही बाब येते. म्हणजे भावी फार्मसिस्टचा शिक्षणाचा पायाच कच्चा असल्यास पुढे ते काय व्यवसाय करतील याची कल्पना करावी. परिस्थितीची गुंतागुंत अजूनही वाढवणारी बाब म्हणजे बोगस फार्मसिस्ट. हे काय नवीन गौडबंगाल असे अनेकांना वाटेल. दुर्दैवाने भारतात सध्या अशी काही फार्मसी महाविद्यालये आहेत की जेथे उपस्थित न राहता, न शिकताच पैशाच्या बळावर डिप्लोमा/ डिग्री विकत घेता येते. अशा फार्मसिस्टचे प्रमाण किती हे निश्चित नाही सांगता येणार, पण त्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे फार्मसिस्टमध्ये अस्वस्थता, नाराजी रास्त आहे हे निश्चित. हा लेख लिहीत असतानाच एका गुणी माजी विद्यार्थ्यांचा फोन आला. आता तो एक कष्टाळू, चांगला फार्मसिस्ट म्हणून नावारूपाला आला आहे. त्याच्या फोनचे कारण त्याची उद्विग्नता होती. कारण काय? आसपास दोन नवीन दुकाने चालू झाली आहेत व दोन्हीमध्ये हे कागदी, पोकळ, बोगस फार्मसिस्ट आहेत. एकाने कुठून राजस्थानमधून डिप्लोमा मिळवला आहे, तर दुसऱ्याने कर्नाटकातून. आता या खराखुरा फार्मसिस्टला स्पर्धा होणार कोणाची, तर या बोगस फार्मसिस्टची.
औषध दुकाने प्रामुख्याने खासगी क्षेत्र झाले, मग शासकीय क्षेत्रात, शासकीय रुग्णालयांमध्ये काय स्थिती आहे? तेथे तरी सर्वत्र फार्मसिस्ट असतील अशी आपली अपेक्षा असेल तर तीही दुर्दैवाने चुकीची आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते मोठय़ा रुग्णालयापर्यंत फार्मसिस्टच्या अनेक जागा रिक्त आहेत. औषधांचे डिस्पेंन्सिंग कुणी इतरेजन करताहेत, असे चित्र बऱ्याच ठिकाणी आहे. शिवाय आहे त्या फार्मसिस्टवर कामाचा अतिरिक्त ताण, त्यांना प्रमोशनसाठी काही वाव नसणे, अशा समस्या आहेतच. फार्म.डी. (सहा वर्षांचा रुग्णाभिमुख अभ्यासक्रम) झालेले अनेक बेकार आहेत.
फार्मसी व्यवसायातील काही गंभीर प्रश्नांची थोडक्यात चर्चा केली. सर्वच प्रश्नांचा आढावा घेणे येथे शक्य नाही, पण महत्त्वाचे काही प्रश्न मांडले. शासन, प्रशासन, शिक्षण, ग्राहकांची मानसिकता, कायद्यांची अंमलबजावणी या साऱ्या आघाडय़ांवर त्वरेने काम होणे गरजेचे आहे. वर चर्चिलेल्या अनेक समस्या या दीर्घकाळापासून आहेत आणि कुठे तरी हे सर्व अंगवळणी पडत चाललेय. ‘हो हे असेच असते, कुठे काय प्रॉब्लेम?’ असे जर वाटू लागले, म्हणजे आपण जर या परिस्थितीचा ‘इम्यून’ झालो तर मग भरकटलेले फार्मसी क्षेत्र योग्य दिशेला लागणे कठीण आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी एकत्र येऊन ‘हो, या समस्या आहेत’ व रुग्ण सुरक्षेसाठी, सामाजिक आरोग्यासाठी व फार्मसी प्रोफेशनसाठी त्या सोडवल्याच पाहिजेत हे आधी मान्य करायला हवे. भक्कम राजकीय इच्छाशक्ती, भ्रष्टाचारविरहित कामकाज, रुग्णहिताची खरी तळमळ, दूरदर्शकता या साऱ्यांची आज तातडीने गरज आहे.
महत्त्वाचे काही उपाय
- कायद्याची कडक अंमलबजावणी व औषधविषयक सर्व नियमांची अंमलबजावणी यासाठी औषधी नियंत्रण विभाग अधिक सक्षम होणे, पुरेसे मनुष्यबळ असणे गरजेचे आहे.
- ऑनलाइन फार्मसी हे फार मोठे आव्हान आहे. त्यांस सर्वानी एकत्र येऊन ठामपणे विरोध करणे अत्यंत गरजेचे आहे.
- फार्मसिस्टची नोंदणी होण्याआधी पूर्ण भारतात पूर्वपरीक्षा घेण्यासाठी कायद्यात तरतूद
- शिक्षणाचा दर्जा, काळानुरूप अभ्यासक्रम, त्यात रुग्णाभिमुख दृष्टिकोन येणे आवश्यक
- बोगस फार्मसिस्ट तयार करणाऱ्या महाविद्यालयांवर त्वरित कायमची बंदी
- शासकीय क्षेत्रातील फार्मसिस्टचे प्रश्न हाताळण्यासाठी स्वतंत्र संचालनालय प्रत्येक राज्यात हवे
- फार्मसिस्टच्या क्षमता, कार्याच्या कक्षा यासाठी सुस्पष्ट निकष
- भविष्यात फार्मसीचे दुकान चालू करण्यास फक्त फार्मसिस्टलाच परवानगी द्यावी का याविषयी विचार हवा. अनेक देशांत फक्त मालक फार्मसिस्टलाच परवानगी आहे.
- लोकसंख्या, भौगोलिक रचना याचा विचार करून प्रत्येक भागात किती दुकाने असावीत, दोन दुकानांत किती अंतर असावे याचा विचार हवा
- प्रत्येक राज्यातील लोकसंख्या, फार्मसिस्टची गरज याचा विचार होऊन फार्मसी महाविद्यालयांच्या संख्येवर नियंत्रण हवे
- फार्मसिस्ट कल्याणासाठी विचार, कामाचे तास, कामाच्या ठिकाणी सोयीसुविधा (विशेषत: महिला फार्मसिस्टसाठी), दीर्घकालीन फायदे, विमा, सुट्टय़ा, स्पष्ट नियम इत्यादी
- फार्मसी असिस्टंट/ टेक्निशिअन असे कर्मचारी व त्यासाठी अभ्यासक्रम असावा.
ही यादी खूप मोठी असू शकते. सरतेशेवटी एक मात्र मनापासून नमूद करावेसे वाटते. प्रत्येक संवेदनशील फार्मसिस्टने, संघटनेने जे जे शक्य ते आता केलेच पाहिजे. तू तू, मैं मैं करण्यात वेळ जाण्यापेक्षा आपल्या पातळीवर जे शक्य ते केले पाहिजे. यात धोरणकर्त्यांना, शासनाला वेळोवेळी पत्र पाठविणे, आपले मुद्दे मांडणे अत्यावश्यक आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या वेबसाइट्सवरही आपण मते मांडू शकतो. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. ‘मन की बात’मध्ये फार्मसी प्रोफेशनल्सबाबत मुद्दे मांडा, अशी विनंती पंतप्रधानांकडे करता येईल. कोण दखल घेणार, असा काही नकारात्मक विचार न करता जे सहजशक्य आहे ते प्रथम केले पाहिजे. सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम करायला हवे व शासन, प्रशासनाचे लक्ष वेधून घ्यायला हवे.
symghar@yahoo.com