आणखी एका द्विशतकासाठी सचिनला हव्या होत्या फक्त सहा धावा. पाकिस्तानी गोलंदाज बचावात्मक मारा करत होते आणि क्षेत्रव्यूह फैलावून लावण्यात आलेला होता. चौकार-षटकार फटकावणं कठीण करण्यात आलं होतं. त्यातूनच पाक गोलंदाज षटक पुरे करण्यास जवळपास पाच मिनिटं घेऊ लागले होते आणि द्विशतकासाठी उत्सुक असलेल्या सचिनला गरज होती, आणखी तीन-चार चेंडू खेळण्याची. म्हणजेच, भारतीय डाव आणखी दोन षटकं चालू ठेवण्याची.
पण भारतीय कर्णधाराचं, म्हणजे आजारी सौरभ गांगुलीच्या जागी त्या कसोटीपुरते नेतृत्व करणाऱ्या राहुल द्रविडचं मत वेगळं होतं. त्याने निर्णय घेतला : आता बस्स झालं! पावणेसातशे धावा भारताच्या खात्यात जमा झालेल्या आहेत. थकल्याभागल्या पाकिस्तानी सलामीवीरांना रिंगणात खेचण्याची वेळ. (दहा मिनिटापूर्वीची होती), पण निदान आत्ता ती साधलीच पाहिजे! वीरू सेहवागने ३७५ चेंडूत ३०९ धावांची जबरदस्त सलामी दिली, तिचं चीज केलंच पाहिजे!
हे सारं नाटय़ घडत होतं पाकिस्तानमध्ये मुलतान नगरीत. मालिकेतील सलामीच्या कसोटीत भारताने षटकात चार धावांच्या गतीने ५ बाद ६७५ असा धावांचा डोंगर उभारला होता. चहापानानंतर ७० मिनिटांचा खेळ बाकी असला तरी आणखी १८ षटकांचा खेळही हाताशी होता. सचिनच्या द्विशतकासाठी भारतीय डाव आणखी दोन षटकं चालू ठेवला असता (आणि दोन षटकांची अंतिम मुदत देत असल्याचा निरोप, त्याला पाण्याच्या ग्लासासह वा नवीन ग्लोव्हज्च्या जोडीसह, बाराव्या खेळाडूमार्फत पाठवला असता), तर काय बिघडणार होतं?
चहापानानंतरच्या त्या ७० मिनिटांत नेमकं काय रामायण घडलं, हे आजवर स्पष्ट झालेलं नाही. सचिनचा साथीदार युवराज स्वैर फटकेबाजी करत होता. फटफट ५९ धावांची बरसात करून तो मोकळा  झाला होता. सचिन मात्र शांतपणे षटकांत साडेतीन धावांच्या गतीने द्विशतकाकडे जात होता. असंही सांगतात की धावगती वाढवण्याच्या आणि लवकरात लवकर डाव सोडला जाणार असल्याच्या सूचना त्याला दिल्या गेल्या होत्या.
घिसाडघाई कशासाठी?
हे सारं क्षणभर खरं धरलं तरी प्रश्न उरतोच : १८ षटकांचा खेळ बाकी असताना, डाव घोषित करण्याची घिसाडघाई करायला हवी होती का? साडे दहा तास क्षेत्ररक्षण करून घामाघूम झालेल्या पाकिस्तानी खेळाडूंना, शेवटच्या १६ षटकांऐवजी १४च षटकं खेळायला लागली असती, तर भारताच्या हिताला फार मोठा धोका पोचत होता का?
त्या वेळी टेलीव्हिजनच्या पडद्यावर दिसलेली दृश्यं सूचक होती, स्फोटक होती. पडद्यावर एका कोपऱ्यात दिसत होता सौरभ गांगुली. ‘परत या’ असं तो हातानं खुणावत होता. त्या कसोटीपुरता कर्णधार असलेला राहुल द्रविड जणू आज्ञाधारक मुलासारखा कर्तव्यपालन करत होता. अगदी नेत्रपल्लवी, करपल्लवी. त्याचे कुणी वेगळे, किंवा वेगवेगळे अर्थ लावू शकतीलही, पण वादातीत गोष्टी अशा होत्या : १) १८ षटकांचा खेळ उरलेला होता (२) भारताने मारलेली पावणेसातशेची मजल पुरेशी मानायला जागा होती. (३) १९४ वर नाबाद असलेल्या सचिनला दोन षटकांची अंतिम मुदत देण्यासही वाव होता.
जाता जाता हेही सांगितलं पाहिजे की द्रविड-गांगुली यांनी डाव तिथेच सोडण्याचा हेका चालवून घेतला. अधिकार गाजवून घेतला, पण शेवटच्या १६ षटकांत पाक फलंदाजीस खिंडार पाडण्यात मात्र ते साफ अपेशी ठरले. फलंदाजीस अनुकूल खेळपट्टीवर पाकिस्तानी बिनीच्या जोडीने बिनबाद ४२ धावा फलकावर लावल्या होत्या. मग वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघहिताला प्राधान्य देण्याचा द्रविड-गांगुली यांचा अतिरेकी दावाही अधिकच साफ फसलेला होता.
त्या संध्याकाळी क्रीडा पत्रकारांशी बोलताना, सचिनला मनातील वैताग आवरता आला नाही. सौम्य शब्दांत त्यानं आपली नाराजी बोलून दाखवली. तो दिवस २९ मार्च, २००४. म्हणजे सचिनने दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषक दणाणून सोडल्यानंतरच्या वर्षांतला.
परिस्थिती नाजूक होती. स्फोटक होती. सचिन, सौरभ-राहुल या सुपरस्टार्सच्या त्रिमूर्तीत बेबनाव उफाळून येत होता काय?
संवाद, सुसंवाद
मला वाटतं इथं दिसून येतो सचिनचा  समंजसपणा. तसंच राहुलने त्याला दिलेला प्रतिसाद. त्याच सायंकाळी व रात्री, सचिन व राहुल यांनी एकमेकांशी संवाद साधला आणि सरतेशेवटी झालं गेलं ते गंगार्पण करूनच ते मैदानात उतरले! पाकिस्तान फॉलो-ऑन टाळण्यात यशस्वी होणारही, अशी चिन्हं दिसू लागली, तेव्हा राहुलने चेंडू दिला सचिनच्या हाती. स्थिरावलेल्या व धोकादायक दिसू लागणाऱ्या मोईन खानला त्याने साफ गंडवलं. चेंडू कसा वळतोय आणि कुठून कुठे जातोय याचा थांगपत्ता मोईनला लागला नाही. मला खात्री वाटते की त्याच रात्री, त्या क्षणांचे चित्रण (रिप्ले) टीव्हीवर पाहाताना, मोईनने स्वत:च्याच गालफडात मारून घेतली असेल!
हातातोंडाशी आलेलं द्विशतक हुकवलं, तेही डॅरील हेयर-स्टीव बकनर-नायजेल लाँग यांसारख्या पंचांनी नव्हे, तर आपल्याच दोन जुन्या व कर्तबगार सहकाऱ्यांनी. हे सारं हलाहल सचिनने त्याच रात्री पचवलं! आणि आपल्या गोलंदाजीची गरज संघाला जाणवू लागली तेव्हा लेग-स्पिन, टॉप-स्पिन व गुगलीची १४ षटकं टाकली व ३२ धावात दोन बळी घेतले. भारतीय संघाने पाकला एका डावाने हरवलं, त्यात सेहवागसह सिंहाचा वाटा उचलला.
प्रत्येक पिढीत, प्रत्येक जमान्यात, प्रत्येक राष्ट्रीय संघात नवनवे नायक, नवनवे सुपरस्टार्स असतात व असणारच. सी. के. नायडूंसह होते नझीर अली, विजय र्मचटसह लाला अमरनाथ, सुनील गावस्करसह कपिलदेव निखंज, महेंद्रसिंग धोनीसह वीरू सेहवाग या साऱ्या जोडय़ा थोरामोठय़ांच्या. तीच गोष्ट सचिन-सौरभ-राहुल या त्रिमूर्तीची आणि त्यांच्या छायेत वावरणारे कुंबळे, लक्ष्मण, गंभीर, झहीर, श्रीनाथ, हरभजन व युवराज.. या साऱ्यांत काही ना काही मतभेद उफाळून येणारच. पण मतभेद एका मर्यादेत मोडून, संघासाठी एकमेकांना सहकार्य द्यायचं व सांभाळून घ्यायचं, ही वृत्ती दाखवली सचिनने. वडीलधाऱ्यासारखा, थोरल्या भावासारखा वागला सचिन. आपापसातील मत्सर, हेवेदावे हे मर्यादेबाहेर जाऊ दिले नाहीत. भारतीय संघाची फळी फुटू दिली नाही. संघ एकसंध ठेवला.
हे सारं देणं त्याचंच
कसोटी-क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या १६ वर्षीय सचिनने पाकिस्तानात दाखवली बेडर, निर्भय वृत्ती. अब्दुल कादीरला षटकारापाठोपाठ षटकार खेचण्याची, भारतीयांकडून पाकिस्तानला अपेक्षित नसलेली आक्रमकता आणि जलद माऱ्याला सामोरे जाताना तोंड रक्तबंबाळ झालं तरी निवृत्त न होता, अधिकच जोमानं खेळत राहाण्याची झुंजार वृत्ती नवज्योत सिद्धू, संजय मांजरेकर, रवी शास्त्री यांच्यातही तीच वृत्ती जरूर होती. पण आता त्यांना समाधान देत होता संघातला बच्चा, कच्चाबच्चा नव्हे, तर सिंहाचा बच्चा.
भारताबाहेर खेळताना भारतीय फलंदाज लटपटायचे. त्यांच्यापुढे आदर्श ठेवला सलामीवीर सुनील गावस्करपाठोपाठ, मधल्या फळीतील सचिनने. निधडय़ा छातीच्या मोहिंदर अमरनाथने पाकिस्तान व विंडीज दौऱ्यातील दहा सामने गाजवले. लीडस्सारख्या स्विंगला अनुकूल वातावरणात दिलीप वेंगसरकरने तीन दौऱ्यात शतकमाला गुंफली आणि दक्षिण आफ्रिकन दौऱ्यात खंबीरपणे उभे राहाण्याची तंत्रशुद्धता राहुल द्रविडने छान दाखवली. पण जगातील सर्वात जलद व उसळत्या पर्थच्या खेळपट्टीवर, सचिनने मॅक्डरमॉट, रीड, व्हिटनी, ह्य़ूज यांच्या तोफखान्यावर जो प्रतिहल्ला चढवला, त्याला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात तोड नसावी!
वेंगसरकर, शास्त्री, अझर यांच्या निवृत्तीनंतर, एकविसाव्या शतकात भारताला फलंदाजांचा अभूतपूर्व संच लाभू लागला. सलामीला सेहवाग व गंभीर (यांसह जाफर, कार्तिक व बांगर), मधल्या फळीत सचिनसह द्रविड, लक्ष्मण, गांगुली व धोनी (तसेच युवराज, रैना व कैफ). तोपर्यंत संघाची तळपती तलवार असलेला युवक आता या मधल्या फळीचा केंद्रबिंदू व प्रमुख आधारस्तंभ बनला.
सचिनमध्ये उणीव नव्हती नेतृत्वगुणांची. पण वेगवेगळ्या कारणांमुळे व प्रायोजकांच्या सल्ल्यानुसार त्यानं लक्ष केंद्रित केले आपल्या कामगिरीवर आणि नेतृत्व सोडलं. पण नेतृत्व सोडल्यानंतर सर्वच नवनव्या संघ-नायकांचा, गांगुली-द्रविड-कुंबळे-धोनी आदी सर्वाचा, विश्वासार्ह सल्लागार तोच बनला. बच्चा सचिन बनला सचिनपाजी!
सचिननं हे सारं दिलं भारतीय संघाला. बरंच काही दिलं. पण जाता जाता असंही सांगावंसं वाटतं की अजातशत्रू राहाणं हीच त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती होती. विश्वनाथ, लक्ष्मण, एकनाथ सोलकर, मदनलाल शर्मा, रॉजर बिन्नी यांसारखा अजातशत्रू. पण तो ज्या जगात बागडला, वावरला त्यात अपप्रवृत्ती वाढत आहेत. कधीतरी सचिनने, निदान त्याच्या सुसंस्कृत शैलीत, त्यांच्याविरुद्ध आवाज उठवावा आणि राज्यसभेत पंतप्रधान वा राष्ट्रपती यांच्याकडे जाताना, उदाहरणार्थ राजीव शुक्लानींची संगत जाणीवपूर्वक टाळावी!
सरतेशेवटी सचिनला एक विनंती- कसोटीतून निवृत्त झाल्यावर येती दोन वर्षे तुझ्यामाझ्या मुंबईसाठी, रणजी स्पर्धेत खेळ. तरुण सहकारी आपोआप संस्कारित होतील आणि हरियाणातील लहान गावात खेळलास, तसाच कोकण-मराठवाडा-विदर्भ आणि गोवा-बेळगाव येथेही थोडा थोडा खेळ! तिथूनच उद्याचे पांडुरंग साळगावकर व महमद शमी गवसतीलही!

Story img Loader